अध्याय एकोणचाळीसावा - श्लोक १५१ ते १९५

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


भोजन करितां न कळत ॥ जिव्हेसी रुतला दंत ॥ तरी कोणावरी क्षोभ तेथ ॥ करावा सांग राजेंद्रा ॥५१॥

कनक रुसे कांतीवरी ॥ रत्न प्रभा घालूं इच्छी बाहेरी ॥ काष्ठ घेऊन निर्धारी ॥ वृक्ष मारी आपुलीं फळे ॥५२॥

गूळ गोडीवरी रुसला ॥ प्रवाहासी गंगा धरी अबोला ॥ प्रभेवरी दीप कोपला ॥ तैसा मांडिला विचार येथें ॥५३॥

हे जगदात्म्या अयोध्यापति ॥ तुझ्या वीर्याची अगाध गति ॥ आत्मा वै पुत्र नामासि निश्चिती ॥ गर्जती श्रुति राघवा ॥५४॥

वाल्मीकाचे बोल ऐकोन ॥ जाहले राघवाचें समाधान ॥ ते दिवसीं सीतारमण ॥ राहिले तेथें परिवारेंसी ॥५५॥

कुश लहू भेटती रघुनंदना ॥ तो सोहळा पाहावया नयना ॥ सकळ राजयांसहित सेना ॥ त्वरेंकरून धांवती ॥५६॥

शत्रुघ्न सुमंत धांवती ॥ हेममय शिबिरें उभी करिती ॥ अयोध्याजन वेगें येती ॥ महोत्साह पहावया ॥५७॥

वसिष्ठादिक मुनीश्वर ॥ कौतुके पाहूं आले सत्वर ॥ हेमांबर सभेसी रघुवीर ॥ सकळांसहित बैसला ॥।५८॥

नित्यनेम सारून रघुवीर ॥ नूतन वस्त्रें दिव्य अलंकार ॥ लेवोनियां श्रीरामचंद्र ॥ सभामंडपीं बैसला ॥५९॥

वाल्मीकें आश्रमाप्रति जाऊन ॥ लहू कुश आणि श्यामकर्ण ॥ राघवापाशीं आणून ॥ उभे केले तेधवां ॥१६०॥

इंद्रादि देवगण पाहती ॥ सर्व नृप सादर विलोकिती ॥ म्हणती केवळ रघुत्तमाच्या मूर्ती ॥ दोघे पुत्र दिसती हे ॥६१॥

श्यामसुंदर आकर्णनयन ॥ विशाळ भाळ सुहास्यवदन ॥ पुत्रांसहित रघुनंदन ॥ समसमान तिन्ही मूर्ती ॥६२॥

गर्जली तेव्हां आकाशवाणी ॥ राघवा तुझें पुत्र पाहे नयनीं ॥ जयजयकार करूनी ॥ मस्तक डोलविती सुरवर ॥६३॥

वस्त्रालंकारमंडित पूर्ण ॥ लहु कुश श्रीरामाजवळी येऊन ॥ हातीं तैसेंचि धनुष्यबाण ॥ घालिती लोटांगण पित्यासी ॥६४॥

जाहाला एकचि जयजयकार ॥ वृंदारक वर्षती सुमनसंभार ॥ रामास प्रार्थती नृपवर ॥ पुत्रांसी क्षेम देइंजे ॥६५॥

मग उठोनियां रघुनंदन ॥ हृदयीं धरिलें निजनंदन ॥ मस्तकीं करूनि अवघ्राण ॥ पुढें घेऊनि बैसला ॥६६॥

सकळवेदशास्त्रप्रवीण ॥ वाल्मीकें केलें दोघेजण ॥ पाठ शतकोटी रामायण ॥ बाळ म्हणोनि दाविती ॥६७॥

त्यावरी आरंभिलें गायन॥ अवतारचरित्रें गहन ॥ तीं ऐकतां रघुनंदन ॥ सप्रेम जाहला ते काळीं ॥६८॥

चवदा विद्या चौसष्टी कळा ॥ बाळांनी अभ्यासिल्या सकळा ॥ जैसा करतळींचा आंवळा ॥ अकळिल्या विद्या तैशाचि ॥६९॥

वाल्मीकास म्हणे रघुनाथ ॥ धन्य धन्य तुझें गुरुत्व ॥ विद्याभ्यास युद्ध अद्भुत ॥ बाळकांहातीं करविले ॥१७०॥

वाल्मीक वदे प्रत्त्युत्तर ॥ तुझें वीर्यसामर्थ्य परम तीव्र ॥ माझें गुरुत्व साचार ॥ काय करील नुसतेंचि ॥७१॥

सौमित्र भरत शत्रुघ्न ॥ सुमंत सुग्रीव बिभीषण ॥ हनुमंतादि सकळ सैन्य ॥ सीता आणावया चालिलें ॥७२॥

आश्रमापुढें येऊन ॥ घालिती सारे लोटांगण ॥ वाल्मीकें बहुत प्रार्थोन ॥ सीता आणिली बाहेरी ॥७३॥

सकळही सद्रद होऊन ॥ धरिती जगन्मातेचे चरण ॥ पुढें ठेविलें सुखासन ॥। जानकीसी बैसावया ॥७४॥

सकलऋषिपत्न्यांची पूजा करूनी ॥ जानकी बैसली सुखासनीं ॥ समुद्रासी भेटावया मंदाकिनी ॥ वेगेंकरून चालली जैसी ॥७५॥

जवळी देखोनि रघुनाथा ॥ खालीं उतरली जगन्माता ॥ वाल्मीक येऊनी तत्वतां ॥ रघुनाथाप्रति बोलतसे ॥७६॥

पंचभूतें शशी आदित्य ॥ रामा तूं साक्षी आहेस हृदयस्थ ॥ निष्पाप जानकी निश्चित ॥ आदिमध्यावसानीं ॥७७॥

माझी धर्मकन्या जनककुमारी ॥ आजिवरी पाळिली म्यां माहेरी ॥ आतां दिधली तुमचे करी ॥ अर्धांगी बैसवीं इयेतें ॥७८॥

तंव ते वदनी आकाशवाणी ॥ सत्य सती हे जनकनंदिनी ॥ मग श्रीरामें आलिंगोनी ॥ अंकावरी बैसविली ॥७९॥

लागला वाद्यांचा गजर ॥ मग वाल्मीकास प्रार्थीं रघुवीर ॥ घऊनी सकळ ऋषीश्वर ॥ अयोध्येसी तुम्ही चला ॥१८०॥

पूर्ण करावया महायज्ञ ॥ सकळिकां मानलें ते वचन ॥ मग वाल्मीकादि मुनिजन ॥ दिव्य वहनीं बैसविले ॥८१॥

जानकीसहित रघुनंदन ॥ रथीं बैसला चंडकिरण ॥ दोघे दोहींकडे नंदन ॥ विराजमान शोभती ॥८२॥

मस्तकीं विराजती दिव्य छत्रें ॥ मित्रपत्रें अतिविचित्रें ॥ निजभक्त अपार चामरें ॥ रघूत्तमावरी ढाळिती ॥८३॥

मकरबिरुदें पुढें चालती ॥ भाट सूर्यवंश वाखाणिती ॥ परम गजरें रघुपती ॥ अयोध्यामाजी प्रवेशला ॥८४॥

कौसल्या सुमित्रा प्रेमेंकरूनी ॥ सीतेस आलिंगिती तये क्षणीं ॥ लहूकुशांवरूनी ॥ मूद ओंवाळी कौसल्या ॥८५॥

सामुग्री पूर्वींच सिद्ध होती ॥ यज्ञदीक्षा घेऊन रघुपती ॥ पूर्ण केली पूर्णाहुती ॥ यज्ञ समाप्ति पावला ॥८६॥

वस्त्रालंकार दक्षिणा अपार ॥ देऊन बोळविले ऋषीश्वर ॥ वर्णित रघुवीरचरित्र ॥ आपले आश्रमाप्रति गेले ॥८७॥

रायांस दिधली पाठवणी ॥ श्रीरामाची आज्ञा घेऊनी ॥ सीतेचा महिमा वर्णित वदनीं ॥ निजनगरप्रति गेले ॥८८॥

बिभीषण सुग्रीव प्राणसखे ॥ गौरवूनियां रघुनायकें ॥ आपुले स्वस्थळाप्रति सुखें ॥ पाठविले तये काळी ॥८९॥

जानकीकुमरांसमवेत ॥ अयोध्येचें राज्य करी रघुनाथ ॥ ही कथा श्रवण करितां बहुत ॥ अक्षय सुख पाविजे ॥१९०॥

परम संकटहरणी हे कथा ॥ विजयी होय श्रोता वक्ता ॥ पाहतां श्रीरामविजयग्रंथा ॥ सर्व चिंता हरे पैं ॥९१॥

यावरी कथा गोड बहुत ॥ लीला कैसी दावी रघुनाथ ॥ तो शेवटींचा अध्याय यथार्थ ॥ सादर आतां परिसिंजे ॥९२॥

चाळीस अध्याय अवघा ग्रंथ ॥ त्यांत उरला एक गोड बहुत ॥ जैसा मुकुटावरी मणी झळकत ॥ तैसा अध्याय पुढील असे ॥९३॥

ब्रह्मानंदा स्वामी समर्था ॥ श्रीधरवरदा पंढरीनाथा ॥ हा ग्रंथ वाची त्या भक्ता ॥ तूंच रक्षी निजांगें ॥९४॥

स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ एकोनचत्वारिंशत्तमोध्याय गोड ॥१९५॥

श्रीरामचंद्रापर्णमस्तु ॥ श्रीशंकरार्पणमस्तु ॥ अध्याय ॥ ॥३९॥ ॥ ओंव्या ॥ ॥१९५॥

॥ श्रीरामचंद्रापर्णमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 04, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP