अध्याय एकोणचाळीसावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

देवाधिदेव राजीवनेत्र ॥ पुराणपुरुष घनश्यामगात्र ॥ लीला दाखविली विचित्र ॥ भक्तजन तारावया ॥१॥

सौमित्र पडिला रणांगणीं ॥ श्रवणीं ऐकतां कोदंडपाणी ॥ शोकाकुलित पडिला धरणीं ॥ सुमंतें सांवरून उठविला ॥२॥

दळ घेऊन अपरिमित ॥ समागमें घेतला हनुमंत ॥ रणाप्रति धांविन्नला भरत ॥ पवनवेगें करूनियां ॥३॥

भरत आणि हनुमंत ॥ रण विलोकिती समस्त ॥ तंव ते सससावोनि सीतासुत ॥ दोघे पुढें पातले ॥४॥

हनुमंताचे कर्णीं समस्त ॥ भरत सांगे गुप्त मात ॥ म्हणे हे राघवाऐसे दिसत ॥ सीतासुत निश्चये ॥५॥

जानकी होती गर्भिणी ॥ तैसीच रामचंद्रे सोडिली वनीं ॥ हनुमंत म्हणे मजही मनीं ॥ ऐसेंच गमें निश्चयें ॥६॥

वैरागरावांचून रत्न ॥ सहसा न होय निर्माण ॥ हे जानकीचे नंदन ॥ मजही पूर्ण कळों आले ॥७॥

तों लहूसी म्हणे कुश वीर ॥ पैल ते नर आणि वानर ॥ हळूच करितात विचार ॥ तें तुज कांही समजलें ॥८॥

आम्हां दोघांसी युद्धी गोवूनी ॥ श्यामकर्ण न्यावा सोडोनि ॥ हेंच त्यांनीं धरिले मनीं ॥ सांगती कानीं एकमेकां ॥९॥

तरी तूं रक्षी श्यामकर्ण ॥ त्यांसीं युद्ध करितों मी निर्वाण ॥ ऐसें कुश वीर बोलोन ॥ सरसावून पुढें आला ॥१०॥

धनुष्यासी लावून बाण ॥ भरताप्रती बोले वचन ॥ तूं वडील काय लक्ष्मणाहून ॥ तुझें आंगवण थोर दिसतसे ॥११॥

तुझें नाम काय सांग सत्वर ॥ पिता तुझा कोठील नृपवर ॥ त्वां पूर्वी युद्ध दुर्धर ॥ कोणासीं केलें सांगपां ॥१२॥

माझे नाम पुससील ये क्षणीं ॥ तरी मी वीर कुशेंद्र चूडामणी ॥ या उपरी भरत तये क्षणी ॥ काय बोलता जाहला ॥१३॥

म्हणे लेकुरा तूं जाय येथोन ॥ तुज मी दिधले जीवदान ॥ भरतें मज सोडिलें म्हणोन ॥ सांग आपुले मातेसी ॥१४॥

मग कुश बोले हांसोन ॥ तुझें बंधू पडले दोघेजण ॥ त्यांचा सूड घ्यावया पूर्ण ॥ रामें पाठविलें तुम्हांसी ॥१५॥

युद्ध सांडूनि सांगसी गोष्टी ॥ बंधूचा सूड घेईं उठाउठी ॥ ना तरी आता रणीं दावून पाठी ॥ अयोध्येसीं पळें कां ॥१६॥

पाठमोऱ्यासी न मारीं जाण ॥ तज अभय दिधलें पूर्ण ॥ कोण तुझा आहे रघुनंदन ॥ त्यासी घेऊन येईं वेगें ॥१७॥

ऐसें बोलतां सीतानंदन ॥ भरतें चापासी लावूनि बाण ॥ आकर्णपर्यंत ओढून ॥ कुशावरी सोडिला ॥१८॥

सीतात्मजे शर टाकून ॥ मध्येंच तोडिला तो बाण ॥ सवेंच शरजाळ घालून ॥ कटक बहुत संहारिले ॥१९॥

भरत जे जे अस्त्र सोडित ॥ तें तें न मानी सीतासुत ॥ युद्धविद्या सरली समस्त ॥ सीतासुत नाटोपे ॥२०॥

भरतें प्रेरिलें कार्तवीर्यास्त्र ॥ सहस्रकरांचे प्रकटले वीर ॥ बाण सोती अनवार ॥ हांकें अंबर गाजविती ॥२१॥

ऐसें देखतां राघवकुमरें ॥ भार्गवास्त्र सोडिले त्वरें ॥ कार्तवीर्यास्त्र एकसरें ॥ गुप्त जाहले तेधवां ॥२२॥

मग भरते प्रेरिली कालरात्री ॥ तमें दाटली धरित्री ॥ तंव सीतापुत्रें ते अवसरी ॥ द्वादश सूर्य प्रकटविले ॥२३॥

त्या प्रकाशे ते वेळां ॥ विरिंचिगोळ तपों लागला ॥ भरत म्हणे हा कळिकाळा ॥ सर्वथाही नाटोपे ॥२४॥

भरतें सोडिले महिषासुर ॥ कुशें टाकिली शक्ति अनिवार ॥ भरतें सोडिलें त्र्यंबकास्त्र ॥ येरें भस्मासुरास्त्र सोडिलें ॥२५॥

मग कुशेंद्रें ते वेळां ॥ सूर्यमुख बाण काढिला ॥ जैसी मेघांतून निघे चपळा ॥ तैसा गेला त्वरेनें ॥२६॥

भरताचे हृदयीं येऊन ॥ खडतरला दिव्य बाण ॥ स्यंदनावरून उलथोन ॥ भरत खाली पडियेला ॥२७॥

दळ पूर्वीच आटिले समस्त ॥ ऐसें देखोनि हनुमंत ॥ घेऊन एक विशाळ पर्वत ॥ कुशेंद्रावरी धांविन्नला ॥२८॥

भोवंडून बळें भिरकाविला ॥ कुशें वज्रमुख बाण सोडिला ॥ अचळ फोडोन पिष्ट केला ॥ धुरोळा उडाला आकाशीं ॥२९॥

मारुतीचे हृदय लक्षून ॥ सोडिले तेव्हां वज्रबाण ॥ तो वज्रदेही परी मूर्च्छना येऊन ॥ धरणीवरी पडियेला ॥३०॥

इकडे बिभीषण आणि रघुनंदन ॥ विचार करीत बैसले पूर्ण ॥ बाळक हे कवणाचे कोण ॥ युद्ध निर्वाण करिताती ॥३१॥

तों अकस्मात आली मात ॥ रणीं पडला वीर भरत ॥ मूर्च्छना येऊनि हनुमंत ॥ रणांगणीं तळमळे ॥३२॥

बिभीषण म्हणे रघुनाथा ॥ आतां कासया यज्ञ करितां ॥ परमाश्चर्य तत्वतां ॥ जाऊनियां पहावें ॥३३॥

रघुवीर बोले तेव्हा वचन ॥ काळ कैसा परम कठिण ॥ बंधू पडिले तिघेजण ॥ कुलक्षय पूर्ण मांडला ॥३४॥

परम क्रोधावला रघुनंदन ॥ तोडोनि टाकिले यज्ञकंकण ॥ होमद्रव्यें उलंडून ॥ सीतारमण ऊठला ॥३५॥

हडबडली अयोध्या सर्व ॥ निशाणीं न घालितां घाव ॥ रथारूढ होऊनि सर्व ॥ पवनवेगें धांवले ॥३६॥

बिभीषण सुग्रीव जांबुवंत ॥ नळ नीळ शरभ वाळिसुत ॥ अयोध्येचे दळ समस्त परम वेगें धांवत ॥३७॥

वर्षाकाळीं गंगेचे पूर ॥ सागराप्रति जाती सत्वर ॥ तेवीं नरवानरांचे भार ॥ रणसिंधूजवळी पातले ॥३८॥

तिघे बंधू पडिले रणीं ॥ ते नयनीं विलोकी चापपाणी ॥ की नमस्कार घातले धरणीं ॥ तिघांही मिळूनि एकदांचि ॥३९॥

तुझे कन्येस गांजिले व्यर्थ ॥ म्हणोनि पृथ्वीस नमस्कार करित ॥ असो प्रेते देखोनि रघुनाथ ॥ मनीं परम क्षोभला ॥४०॥

दुरोनी मग देखिले नयनीं ॥ श्यामसुंदर बाळें ते क्षणीं ॥ एकाकडे एक पाहोनी ॥ गोष्टी करिती कौतुकें ॥४१॥

कौपीन मौंजी यज्ञोपवीत ॥ तेणें शोभती किशोर अद्भुत ॥ माथांची शिखा उडत ॥ दृष्टी नाणिती परदळातें ॥४२॥

असो वृक्ष पाषाण घेऊन ॥ धांवले एकदांचि वानरगण ॥ तों दोघेही धनुष्य चढवून ॥ सरसावून पुढें आले ॥४३॥

आश्चर्य करी रघुनंदन ॥ सोडिती बाणापाठीं बाण ॥ मृगेंद्राऐसें गर्जोन ॥ दोघे वचन बोलती ॥४४॥

घालिती असंभाव्य बाणजाळ ॥ जर्जर केलें वानरदळ ॥ शिळा वृक्ष फोडोनि सकळ ॥ परदळावरी टाकिती ॥४५॥

अनिवार बाळकांचा मार ॥ न सोसवती दारुण शर ॥ प्रेते पडली अपार ॥ उरले वानर पळती भयें ॥४६॥

हनुमंत भावी मनांत ॥ ऊर्ध्वपंथे उतरून अकस्मात ॥ पुच्छें बांधोन दोघे त्वरित ॥ राघवापासी आणावे ॥४७॥

उडों पाहे अंजनीकुमर ॥ तो कुशें टाकिला सबळ शर ॥ त्याच्या हृदयीं आदळोनि सत्वर ॥ बाण पृथ्वीवरी पडियेला ॥४८॥

कुश बोले गर्जोन ॥ मर्कटा उभा राहे एक क्षण ॥ त्वां विध्वंसिले अशोकवन ॥ तें येथें न चले सर्वथा ॥४९॥

टाकोन वृक्षपाषाण ॥ हें राक्षसयुद्ध नव्हे जाण ॥ तों नव्हे रे गिरिद्रोण ॥ उपटून बळें न्यावया ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 04, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP