अध्याय सदतीसावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

जयजय राघवा करुणाकरा ॥ अवनिजाकुलभूषणा मनविहारा ॥ रावणानुजपाळका समरधीरा ॥ मित्रपुत्रहितप्रिया ॥१॥

प्रतापसूर्यवंशिविवर्धना ॥ मयजामातकुलकाननच्छेदना ॥ सकळवृंदारकबंधमोचना ॥ आनंदसदना अक्षया ॥२॥

कौसल्याहृदयारविंदभ्रमरा ॥ भरतनयनपद्मदिवाकरा ॥ सौमित्रप्राणआधारा ॥ अतिउदारा अयोध्याप्रभो ॥३॥

ब्रह्मानंदा रघुनंदना ॥ वदवीं पुढें ग्रंथरचना ॥ तुझी लीला जगन्मोहना ॥ तूंचि बोलें यथार्थ ॥४॥

पंडितीं ऐकावें सावधान ॥ छत्तिसावे अध्यायीं जाण ॥ राजाधिराज रघुनंदन ॥ राज्यासनीं बैसला ॥५॥

एकादशसहस्र वर्षें ॥ निर्विघ्न राज्य पुराणपुरुषें ॥ अयोध्येचें केलें संतोषें ॥ विश्व सकळ कोंदलें ॥६॥

तों विदेहराजनंदिनी ॥ जगन्माता प्रणवरूपिणी ॥ ते अयोध्यापतीची राणी ॥ झाली गर्भिणी पहिल्यानेंं ॥७॥

शास्त्रसंख्या मास भरतां जाण ॥ वोंटभरण करी रघुनंदन ॥ तो सोहळा वर्णितां पूर्ण ॥ भागे वदन शेषाचें ॥८॥

वसंतकाळीं क्रीडावनांत ॥ राघव प्रवेशला सीतेसहित ॥ अत्यंत वन तें शोभिवंत ॥ नंदनवनाहूनियां ॥९॥

वृक्ष सदाफळ आणि सघन ॥ माजी न दिसे सूर्यकिरण ॥ तेथें सीतेची अंगुली धरून ॥ राजीवनयन विचरतसे ॥१०॥

नानावृक्षांचिया जाती ॥ सीतेस दावी त्रिभुवनपती ॥ एकांत देखोन सीतेप्रति ॥ पुसत राघव प्रीतीनें ॥११॥

म्हणे सुकुमारे जनकबाळे ॥ तुज काय होताती अंतरीं डोहळे ॥ मना आवडे ते यें वेळे ॥ सांग सर्वही पुरवीन ॥१२॥

मग इच्छित हास्यवदन ॥ जानकी देत प्रतिवचन ॥ म्हणे एक आवडे रघुनंदन ॥ नलगे आन पदार्थ ॥१३॥

राजीवाक्ष म्हणे लाज सोडोनी ॥ डोहळे सांग काय ते मनीं ॥ जें म्हणशील ते यें क्षणी ॥ पुरवीन जाण राजसे ॥१४॥

जनकजा बोले याउपरी ॥ म्हणे जन्हकुमारीचिये तीरीं ॥ पवित्र ऋषिपत्न्यांमाझारीं ॥ पंचरात्रीं राहावें ॥१५॥

घालोनियां तृणासन ॥ करावें भूमीवरी शयन ॥ कंदमुळें भक्षून ॥ शुचिर्भूत असावे ॥१६॥

मनांत म्हणे रघुनंदन ॥ पूर्वी वनवास भोगिले दारुण ॥ अजूनि न धायेचि मन ॥ आवडे कानन इयेते ॥१७॥

पुढील भविष्यार्थ जाणोन ॥ अवश्य म्हणे रघुनंदन ॥ मनकामना पूर्ण करीन ॥ तुझी जाण सुकुमारें ॥१८॥

याउपरी एकदां रघुवीर ॥ पुरींचे रक्षक जे हेर ॥ त्यांसी पुसतसे श्रीधर ॥ दृढभावे निर्धारें ॥१९॥

तुम्ही नगरीं हिंडतां निरंतर ॥ आकर्णितां जनवार्ता समग्र ॥ तरी तें सांगावें साचार ॥ लोक काय म्हणती आम्हां ॥२०॥

वंदिती किंवा निंदिती ॥ यश किंवा अपयश स्थापिती ॥ अभय असे तुम्हांप्रती ॥ सांगा निश्चिती काय तें ॥२१॥

हेर म्हणती नगरांत ॥ राघवा तुझे सर्व भक्त ॥ सकळ लोक पुण्यवंत ॥ यश वर्णिती सर्वदा ॥२२॥

पर रजक एक दुर्जन ॥ तेणें स्त्रीस केलें ताडन ॥ त्या रागें ती स्त्री रुसोन ॥ पितृसदनाप्रति गेली ॥२३॥

माहेरी होती बहुदिन ॥ मग पित्यानें हातीं धरून ॥ जामातगृहाप्रति नेऊन ॥ घालिता जाहला ते काळीं ॥२४॥

तंव तो रजक क्रोधायमान ॥ श्वशुराप्रति बोले वचन ॥ म्हणे ईस माझें सदन ॥ प्रवेशों नेदीं सर्वथा ॥२५॥

मी तों राम नव्हे निर्धारी ॥ रावणें नेली त्याची अंतुरीं ॥ षण्मास होती असुरघरीं ॥ तेणें माघारी आणिली ॥२६॥

आम्ही रजक शुद्ध साचार ॥ जगाचे डाग काढणार ॥ आमुचे जातींत निर्धार ॥ विपरीत ऐसें सोसेना ॥२७॥

हे अनुचित केले रघुनाथें ॥ मागुती नांदवितो सीतेतें ॥ तैसा लंपट मी नव्हे येथें ॥ वदन इचें न पाहेंचि ॥२८॥

ऐसा चांडाळ तो रजक ॥ बोलिला लावून कलंक ॥ ऐसें ऐकतां रघुनाथ ॥ परम संतप्त जाहला ॥२९॥

पाचारूनिया लक्ष्मण ॥ त्यास सांगे सकळ वर्तमान ॥ म्हणे रजक निंदिलें मजलागून ॥ जानकी त्यागीन सौमित्रा ॥३०॥

दशमुख मारूनि सहकुळीं ॥ सुवेळीं आणिली जनकबाळी ॥ विधि पुरंदर चंद्रमौळी ॥ देवमंडळी सर्व होती ॥३१॥

सकळां देखत ते वेळें ॥ जानकीनें दिव्य दाविलें ॥ अजूनि रजक लांछन बोले ॥ तें मज सोसवे निर्धारे ॥३२॥

तनु त्यागी जैसे प्राण ॥ कोप टाकी रेणुकारमण ॥ कीं संसारसंकल्प तपोधन ॥ त्यागी जैसा साक्षेपें ॥३३॥

संसारभय तत्वतां ॥ योगी टाकी जैसी ममता ॥ तैसीच त्यागीन मी सीता ॥ सुमित्रासुता सत्य हें ॥३४॥

अहिंसक हिंसा सांडिती पूर्ण ॥ कीं मौनी त्यागी वाचाळपण ॥ सत्पुरुष मनांतून ॥ परनिंदा त्यागी जैसा ॥३५॥

श्रोत्रिय त्यागी दुष्टाचार ॥ तैसी सीता त्यागीन साचार ॥ यावरी सुमित्राकुमार ॥ काय बोलता जाहला ॥३६॥

पाखांडी म्लेंच्छ दुर्मती ॥ सदा निंदती वेदश्रुती ॥ परी पंडित काय त्यागिती ॥ जनकजापती सांगे हें ॥३७॥

मुक्तांस निंदिती वायस ॥ परी टाकिती काय राजहंस ॥ दर्दुर निंदती भ्रमरास ॥ परी तो पद्मिमीस टाकीना ॥३८॥

निंदक निंदिती संतांस ॥ परी विवेकीं पूजी रात्रंदिवस ॥ तस्कर निंदिती इंदूस ॥ परी चकोर विटेना ॥३९॥

याकारणें जनकजामाता ॥ सहसा न त्यागीं गुणसरिता ॥ त्या रजकाची सत्वतां ॥ जिव्हां आतां छेदीन ॥४०॥

श्रीराम म्हणे विशेष ॥ तरी लोक निंदितील रात्रंदिवस ॥ म्हणती दंडिले रजकास ॥ अंगीं दोष म्हणोनियां ॥४१॥

आतां सौमित्रा हेंचि जाण ॥ सीता टाकीं वनीं नेऊन ॥ नाहीं तरी आपुला प्राण ॥ मी त्यागीन आतांचि ॥४२॥

ऐसें बोलतां निर्वाण ॥ तत्काळ उठिला लक्ष्मण ॥ ब्राह्मी मुहूर्ती तेव्हां सदन ॥ जानकीचें प्रवेशला ॥४३॥

परम विव्हळ होऊन ॥ जगन्मातेचे वंदिले चरण ॥ म्हणे पहावया तापसारण्य ॥ आज्ञा दीधली रघूत्तमें ॥४४॥

ऐसें ऐकतांचि श्रवणी ॥ मनी हर्षली विदेहनंदिनी ॥ म्हणे जे डोहाळे पुरवीन चापपाणी ॥ मागे वचन बोलिले ॥४५॥

साच करावया तया वचन ॥ ॥ तुम्हांसी पाठविलें लक्ष्मणा ॥ तरी पंचरात्री क्रमोन जाणा ॥ सत्वर येऊं माघारें ॥४६॥

ऐसें सौमित्रें ऐकतां कर्णीं ॥ अश्रु सांडी नयनींहूनि ॥ मनीं म्हणे आता परतोनि ॥ कैंचे येणें माउलीये ॥४७॥

असो जानकी हर्षयुक्त ॥ वस्त्राभरणें वस्तु बहुत ॥ सौभाग्येद्रव्यें सवें घेत ॥ ऋषीअंगना पूजावया ॥४८॥

मंगळभगिनी सौभाग्यसरिता ॥ रथी बैसली क्षण न लागतां ॥ लक्ष्मणें रथ झांकून तत्वतां ॥ धुरेस आपण बैसला ॥४९॥

कोणास वार्ता न कळत ॥ जान्हवीतीरा आणिला रथ ॥ तेव्हां अपशकुन बहुत ॥ जगन्मातेस जाणवती ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 04, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP