अध्याय बत्तीसावा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


कनकफळावरी कंटक स्पष्ट ॥ तैसें शर रुतले सघट ॥ रावणही सोडी शर तिखट ॥ परी निष्फळ होती ते ॥१॥

मातेचियां कैवारें ॥ क्षत्रिय संहारिलें फरशधरें ॥ तैसा सौमित्र पडतां रघुवीरें ॥ असुरदळ तेव्हां संहारिलें ॥२॥

उरग संहारिले वैनतें ॥ कीं शंकरें जाळिलें त्रिपुरातें ॥ कीं प्रळयाग्नीनें सृष्टीतें ॥ कल्पांतकाळीं जाळिलें ॥३॥

षडाननें मारिलें सकळ ॥ कीं मार्तंडें तिमिरजाळ ॥ विध्वंसोनि टाकिलें ॥४॥

कीं शक्रें केले नग चूर ॥ कीं ज्ञारें हरे भवभय समग्र ॥ कीं नामे पापसंहार ॥ जैसा होय एकदांचि ॥५॥

तैसी प्रतापार्कें रघुनंदनें ॥ विध्वंसिली अरितारागणें ॥ जेवीं प्रयागीं एका स्नानें ॥ कोटि जन्मांची पापें जळती ॥६॥

प्रभंजन राम तमालनीळ ॥ विदारिलें रिपुजलदजाल ॥ तेव्हां किती पडलें राक्षसदळ ॥ गणित केलें वाल्मीकें ॥७॥

दाहा सहस्र वारण उन्मत्त ॥ नियुत तुरंग स्वारांसहित ॥ पन्नास सहस्र महारथ ॥ रथियांसहित पडियेले ॥८॥

शतकोटी पायदळ ॥ तेव्हां एक कबंध उठे सबळ ॥ ऐसीं कोटी कबंधें विशाळ ॥ तेव्हां नाचती रणांगणीं ॥९॥

तेव्हां रामधनुष्याची किंकिणी ॥ एकदां वाजे तये क्षणीं ॥ चौदाही घंटा रणांगणी ॥ वाजो लागल्या तेधवां ॥११०॥

एक अर्धयामपर्यंत ॥ घंटा घणाघणां वाजत ॥ तेव्हां राक्षस पडले अगणित ॥ शेषातेंही न गणवे ॥११॥

वेदांतशास्त्र गर्जे प्रचंड ॥ तैसे झणत्कारें रामकोदंड ॥ पाखंडी तर्क घेती वितंड ॥ रावणचाप तेवीं वाजे ॥१२॥

जैसे सन्मार्गी वर्तती संत ॥ तैसे श्रीरामाचे बाण जात ॥ वाल्मीक कोळी अभक्त ॥ तैसे शर येती रावणाचे ॥१३॥

असो रामें घालितां बाणजाळ ॥ तटस्थ जाहला राक्षसपाळ ॥ तों रामरूप सकळ ॥ दोनी दळें दिसों लागलीं ॥१४॥

कोट्यनुकोटी रघुवीर ॥ मोकलिती बाणांचे पूर ॥ दशदिशा विलोकी दशवक्र ॥ दशरथकुमर दिसती ॥१५॥

मागें पुढें सव्य वाम ॥ दिसती धनुर्धर श्रीराम ॥ राम राक्षस वानर घनश्याम ॥ स्वरूपें दिसती ते काळीं ॥१६॥

अंतरीं पाहे जों रावण ॥ तों उभा असे जगन्मोहन ॥ मन बुद्धि चित्त अंतःकरण ॥ रामरूप जाहलें ॥१७॥

दश इंद्रियें पंचप्राण ॥ पंचभूतें पंचविषय जाण ॥ चारही देह अवस्था भोगस्थान ॥ श्रीरामरूप जाहलें ॥१८॥

ऐसा राम रूप दिसे सर्वत्र ॥ रावण उघडोनि पाहे नेत्र ॥ तों रथ सारथि ध्वज चाप शर ॥ रघुवीररूप दीसती ॥१९॥

रथाजवळी रामरूप संघटलें ॥ रथावरी चढोनि आलें ॥ अंतर्बाह्य रामें व्यापिलें ॥ ठाव न दिसे पळावया ॥१२०॥

अणुरेणुपासूनि ब्रह्मपर्यंत ॥ अवघा व्यापिला रघुनाथ ॥ शस्त्र सोडोनि मयजामात ॥ रथाखालीं उडी टाकी ॥२१॥

तों रामरूप दिसे धरणी ॥ भयें ते क्षणीं ॥ मागें पाहे तों राक्षसवाहिनी ॥ धांवतचि येतसे ॥२२॥

अरे हे राम आले म्हणोन ॥ भयें हांक फोडी रावण ॥ पुढें पाहे जो विलोकून ॥ तों लंका रामरूप दिसतसे ॥२३॥

दुर्ग हुड्यांचे जे कळस ॥ त्यांवरी उभा अयोध्याधीश ॥ उडखळून पडे लंकेश ॥ उठोनि पळे मागुती ॥२४॥

असो रावण मंदिरांत ॥ पळोनि गेला पिशाचवत ॥ मंदोदरीजवळ बैसत ॥ सांगे सकळ समाचार ॥२५॥

म्हणे प्रिये म्यां पुरुषार्थ करून ॥ रणीं मारिला लक्ष्मण ॥ मग रामें व्यापिलें जनवन ॥ मी पळून येथें पातलों ॥२६॥

माझिये आंगींचें भयवारें ॥ अजूनि न जाय सुंदरे ॥ जेवीं करंड्यांतील कस्तूरी सरे ॥ परी मागें उरे मकरंद ॥२७॥

शुभाशुभ कर्में करिती ॥ मागें उरे जैसी कीर्ति ॥ कीं सायंकाळीं बुडतां गभस्ती ॥ आरक्तता मागें उरे ॥२८॥

कीं प्रचंड मारुत ओसरे ॥ परी तरुवरी हेलावा उरे । कीं नदी उतरतां एकसरें ॥ मागें थारे बरटी जैसी ॥२९॥

असो असुरगुरु जो कां शुक्र ॥ तेणें मृत्युंजय मंत्र ॥ मज दिधला असे परम पवित्र ॥ करीन त्याचे अनुष्ठान ॥१३०॥

मंदोदरी म्हणे दशमुखा ॥ व्यर्थ अनुष्ठान करूं नका ॥ अद्यापि तरी मदनांतकसखा ॥ मित्र करा आपुला ॥३१॥

अथवा समरीं घालोनि कांस ॥ युद्धचि करा बहुवस ॥ परी ते न मानी लंकेश ॥ घोरकर्मास प्रवर्तला ॥३२॥

होम करावया ते काळीं ॥ भूमींत गुहा गुप्त कोरिली ॥ त्यामाजी बैसला दशमौळी ॥ सामग्री सकळ घेऊनियां ॥३३॥

कालनेमी निशाचर ॥ त्यातें अज्ञापी दशकंधर ॥ द्रोणादी आणील वायुकुमर ॥ तरी तूं सत्वर जाईं पुढें ॥३४॥

त्यातें वाटेसी विघ्न करून ॥ हिरून घेईं गिरि द्रोण ॥ अथवा हनुमंतासी मारून ॥ वाटेंत टाकीं पुरुषार्थे ॥३५॥

नाना यत्न करून ॥ वाटेसी गोंवा वायुनंदन ॥ निशांतीं उगवतां चंडकिरण ॥ जाईल प्राण सौमित्राचा ॥३६॥

यावरी काळनेमी निघाला तेच वेळां ॥ घेऊनि राक्षसांचा मेळा ॥ वाटेसी जाऊन बैसला ॥ विप्रवेष धरूनियां ॥३७॥

असो इकडे रघुनंदन ॥ सौमित्राजवळी येऊन ॥ टाकूनियां धनुष्य बाण ॥ शोक थोर आरंभिला ॥३८॥

तंव तो वैद्यराज सुषेण ॥ विलोकीं सौमित्राचें चिन्ह ॥ म्हणे सूर्य उगवतां प्राण ॥ निश्चयें याचा जाईल ॥३९॥

द्रोणाचळीं पीयुषवल्ली ॥ कोणी जरी आणील ये वेळीं ॥ तरी सौमित्र याच काळीं ॥ उठेल जैसा पूर्ववत ॥१४०॥

चार कोटी योजनें जाऊन ॥ रात्रीं पर्वत आणावा पूर्ण ॥ ऐसें ऐकतां रघुनंदन ॥ विलोकी सर्व कपीतें ॥४१॥

कार्य न साधे म्हणून ॥ वानर पाहती अधोवदन ॥ तटस्थ पाहे सीतारमण । नेत्रीं जीवन पाझरे ॥४२॥

समय देखोनियां परम कठिण ॥ जो निर्वाणींचा सखा पूर्ण ॥ भुगर्भरत्नशोकहरण ॥ उभा ठाकला ते काळीं ॥४३॥

साष्टांग नमूनि जनकजामाता ॥ म्हणे त्रिभुवनपते न करावीं चिंता ॥ तृतीया प्रहर न भरतां ॥ द्रोणाचळ आणितों ॥४४॥

श्रीराम म्हणे आनंदोन ॥ सौमित्र तुझा याचक पूर्ण ॥ यासी देऊनि प्राणदान ॥ झडकरीं उठवीं स्नेहाळा ॥४५॥

ऐसेंं ऐकतां हनुमंत ॥ जयजय यशस्वी अयोध्यानाथ ॥ म्हणोनि उडाला अकस्मात ॥ उत्तरपंथ लक्षूनियां ॥४६॥

मनासी प्रार्थून तयेक्षणीं ॥ ठेवियेलें श्रीरामचरणीं ॥ जैसें प्राणमित्राचे सदनीं ॥ प्रिय ठेवणें ठेविलें ॥४७॥

सागरामाजीं मिळे लवण ॥ कीं नभी लीन होय पवन ॥ तैसें रामपदीं ठेवूनि मन ॥ वायुनंदन ॥ धांविन्नला ॥४८॥

पित्याची गति सांडून मागें ॥ हनुमंत नभीं झेपावें वेगें ॥ कीं तो उरगारि लगबगे ॥ क्षीराब्धीप्रति जातसे ॥४९॥

मस्तकीं लांगून वाहून ॥ घेत उड्डाणावरी उड्डाण ॥ जयजय रघुराज म्हणोन ॥ वारंवार स्मरण करी ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP