अध्याय बत्तीसावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


श्रीगणेशाय नमः ॥

भक्तवल्लभ त्रिभुवनेश्वर ॥ सुवेळाचळीं रणरंगधीर ॥ जैसा निरभ्र नभीं पूर्णचंद्र ॥ तैसा रघुवीर शोभतसे ॥१॥

रावणासी कळला समाचार ॥ करूनि अहिमहींचा संहार ॥ सुवेळेसी आला रघुवीर ॥ गर्जती वानर जयजयकारें ॥२॥

रावण परम चिंताक्रांत ॥ हृदयीं आठवला इंद्रजित ॥ तळमळ वाटे मनांत ॥ म्हणे काय व्यर्थ वांचोनि ॥३॥

दीपेंविण जैसें सदन ॥ कीं नासिकाविण वदन ॥ कीं बुबुळाविण नयन ॥ व्यर्थ जैसे न शोभती ॥४॥

इंद्रजिताविण लंका ॥ तैसी शून्य दिसे देखा ॥ ऐसें बोलतां राक्षसनायका ॥ आवेश बहुत चढियेला ॥५॥

म्हणे लंकेमाजी दळ ॥ अवघें सिद्ध करा सकळ ॥ ऐसी आज्ञा होतां प्रबळ ॥ रणतुरें वाजों लागली ॥६॥

सवें निघाले उरले प्रधान ॥ जैसा भगणीं वेष्टिला रोहिणीरमण ॥ चतुरंगदळेंसी रावण ॥ लंकेबाहेर निघाला ॥७॥

पादातिदळ अश्व रथ ॥ यांचें कोण करील गणित ॥ पर्वतासमान गज अद्भुत ॥ कोट्यानुकोटी चालिले ॥८॥

सहस्र सूर्यांचे तेज लोपत ॥ तैसा रावणाचा मुख्य रथ ॥ त्यावरी शस्त्रास्त्रमंडित ॥ लंकानाथ बैसला ॥९॥

रणासी आला दशकंधर ॥ देखतां क्रोधावले वानर ॥ घेऊन शिळा तरुवर ॥ हांका देत धांविन्नले ॥१०॥

रावणें चापासि लावूनियां गुण ॥ करिता जाहला घोर संधान ॥ वानरीं अरिसैन्यावरी पर्जन्य ॥ पर्वतांचा पाडिला ॥११॥

असंख्यात सोडिले बाण ॥ तितुकेही पर्वत फोडून ॥ यवपिष्टवत करून ॥ सैन्याबाहेर पाडिले ॥१२॥

चपळेहून बाण तीक्ष्ण ॥ दशमुखें सोडिले दारुण ॥ सोडोनि संग्रामाचें ठाण ॥ वानरगण माघारले ॥१३॥

ऐसें देखोनि रणरंगधीर ॥ अयोध्यानाथ प्रचंड वीर ॥ कोदंड चढवून सत्वर ॥ लाविला शर ते काळीं ॥१४॥

अग्नीसीं झगटला कर्पूर ॥ मग उगा न राहे वैश्वानर ॥ वृषभ येता व्याघ्र ॥ सहसा स्थिर न राहे ॥१५॥

तैसा प्रतापार्क रघुनंदन ॥ विषकंठवंद्य जगन्मोहन ॥ दशकंठासी लक्षून ॥ सोडिले बाण ते काळीं ॥१६॥

असंभाव्य रामाचे बाण ॥ सुटले अमोघ चापापासून ॥ जैसे चतुराचे मुखांतून ॥ अपार शब्द निघती पैं ॥१७॥

कीं मेघाहून अवधारा ॥ अपार पडती तोयधारा ॥ किंवा ओंकारापासूनि अपारा ॥ ध्वनि जैसे उमटती ॥१८॥

कीं मूळमायेपासूनि एकसरें ॥ असंख्य जीवसृष्टि उभारे ॥ तैसें एका बाणापासूनि त्वरें ॥ असंख्य शर निघती पैं ॥१९॥

सुटतां अद्भुत प्रभंजन ॥ जलदजाल जाय वितळोन ॥ तैसे राक्षस छिन्नभिन्न ॥ बहुत जाहले ते काळीं ॥२०॥

ऐसें देखतां दशकंधरें ॥ प्रेरिलीं तेव्हां असंख्य शस्त्रें ॥ परी तितुकींही राजीवनेत्रें ॥ हेळामात्रें निवारिलीं ॥२१॥

जें जें शस्त्र टाकी दशकंधर ॥ त्याहूनि विशेष रघुवीर ॥ जैसा प्रवृत्तिशास्त्रींचा विचार ॥ वेदांती उडवी एकाच शब्दें ॥२२॥

कीं लहरियां समवेत सरितापती ॥ एकदांच प्राशी अगस्ती ॥ कीं तिमिरजाळाची वस्ती ॥ उगवतां गभस्ति जेवीं नुरे ॥२३॥

जैसा मेघ वर्षतां अपार ॥ वणवा विझूनि जाय समग्र ॥ तैसें रामापुढें न चले शस्त्र ॥ दशकंधर तटस्थ पाहे ॥२४॥

भूतें चेष्टा बहुत करिती ॥ परी कृतांतासीं न चलती ॥ कीं सुटतां मारुतगती ॥ मेघपडळ केवीं बाधे ॥२५॥

ऐसें देखोनि रावण ॥ कोपारूढ जाहला दारुण ॥ विचारूनि काढिले पांच बाण ॥ कीं ते पंचबाण कृतांताचे ॥२६॥

कीं पंचाग्नींचीं स्वरूपें तत्वतां ॥ किंवा पांच काढिल्या विद्युल्लता ॥ लक्षोनियां जनकजामाता ॥ सोडिता जाहला रावण ॥२७॥

राघवें योजिलें निवारण ॥ तों अकस्मात आले पंचबाण ॥ सच्चिदानंदतनु भेदोन ॥ पलीकडे रूतले ॥२८॥

पंचशर भेदोनि गेले ॥ परी रामाचें वज्रठाण न चळे ॥ जैसा पंचबाणांचेनि मेळें ॥ मारुति न ढळे कल्पांतीं ॥२९॥

हाणितां कुठार तीक्ष्ण ॥ वृक्ष न जाय सोडोनि स्थान ॥ कीं वर्षतां अपार धन ॥ अचळ बैसका सोडीना ॥३०॥

निंदक निंदिती अपार ॥ न ढळे साधूचें अंतर ॥ कीं प्रल्हादासी लावितां विखार ॥ परी तो धीर सोडीना ॥३१॥

तैसें रामठाण अति गंभीर ॥ चळलें नाहीं अणुमात्र ॥ रामासी भेदले पांच शर ॥ म्हणोनि रावण तोषला ॥३२॥

यावरी राजाधिराज रघुनाथ ॥ परम चतुर रणपंडित ॥ चापासी बाण लावूनि सप्त ॥ दशकंठावरी सोडिले ॥३३॥

दशमुखाचें हृदय फोडून ॥ पलीकडे लंकेसी गेले सप्त बाण ॥ त्या व्यथेनें रावण ॥ मूर्च्छा येऊन पडों पाहें ॥३४॥

राघवतनु परम सुकुमार ॥ भेदोनि गेले पंच शर ॥ तें देखोनि सौमित्र ॥ स्नेहेंकरून उचंबळला ॥३५॥

पाठींसी घालूनि रघुनंदन ॥ सौमित्र मांडोनि वज्रठाण ॥ सोडोनि अर्धचंद्रबाण ॥ सारथि मारिला रावणाचा ॥३६॥

आणिक सोडिले दश बाण ॥ दाही धनुष्यें पाडिलीं छेदून ॥ तों पुढें धांवोनि बिभीषण ॥ अष्ट बाण सोडिले ॥३७॥

रावणरथींचे अष्ट तुरंग ॥ बिभीषणें मारिले सवेंग ॥ सवेंचि एक बाणें अव्यंग ॥ ध्वजही खालीं पाडिला ॥३८॥

दुसरा आणोनि स्यंदन ॥ त्यावर बैसला रावण ॥ क्षोभला जैसा प्रळयाग्न ॥ तप्त पूर्ण तेवीं जाहला ॥३९॥

मग ब्रह्मशक्ति परम दारुण ॥ बिभीषणावरी प्रेरी दशानन ॥ अनिवार शक्ति जाणून ॥ लक्ष्मण पुढें जाहला ॥४०॥

जैसें पडतां दारुण ॥ पुढें होय करींचें वोडण ॥ तैसा तो ऊर्मिलाजीवन ॥ बिभीषणापुढें जाहला ॥४१॥

शक्ति येत जैसी सौदामिनी ॥ राघवानुजें बाण सोडोनी ॥ गगनीं भाग त्रय करूनी ॥ असुरवाहिनीवरी पाडिली ॥४२॥

जैसा अविधीनें जपता मंत्र ॥ होय जेवीं आपला संहार ॥ तैसी शक्ति पडतां असुर ॥ दग्ध बहुत जाहले ॥४३॥

शक्ति व्यर्थ गेली जाणोन ॥ बिभीषणासी बोले रावण ॥ सौमित्राचे पाठीसीं दडोन ॥ कां रे संग्राम करितोसी ॥४४॥

रामासी भेटोनि मूर्खा ॥ संकट भेदावया देखा ॥ दीन वचनें बोलिलासी नेटका ॥ प्राण आपुला रक्षिला ॥४५॥

आम्ही राक्षस मृगनायक ॥ आम्हांत जन्मलासी तूं जंबुक ॥ कुळाभिमान सांडूनि देख ॥ शरण गेलासी शत्रूतें ॥४६॥

आम्ही पाळिलें तुज इतुके दिन ॥ जैसें भस्मांत घातले अवदान ॥ किंवा प्रेत शृंगारून ॥ व्यर्थ जैसें मिनविलें ॥४७॥

कीं नारी सुंदर पद्मिण ॥ षंढासी दिधली नेऊन ॥ तैसें तुझें पाळण ॥ व्यर्थ आम्हीं केले रे ॥४८॥

अरे बिभीषणा शतमूर्खा ॥ वैरियाचा जाहलासी सखा ॥ दीनवचन बोलोनि कीटका ॥ कुळक्षय केला रे ॥४९॥

बिभीषण म्हणे रे बुद्धिहीना ॥ दशग्रीवा कपटिया मलिना ॥ मी शरण आलों रघुनंदना ॥ जन्ममरणातीत जाहलों ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP