अध्याय एकोणतीसावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


ऐकतां बिभीषणाचें वचन ॥ जयजयकारें गर्जती कपिगण ॥ वदनें टवटवलीं पूर्ण ॥ आनंद गगनीं न समाये ॥५१॥

उदयाचळीं उगवे गभस्ति ॥ एकदांचि निघे तमाची बुंथि ॥ तैसी जाहली दुःखनिवृत्ति ॥ बिभीषणें वार्ता सांगतां ॥५२॥

कीं हृदयी प्रगटतां वेदांतज्ञान ॥ सहपरिवारें जाय अज्ञान ॥ कीं गृहस्वामी उठतां देखोन ॥ तस्कर पळती अवघेचि ॥५३॥

कीं क्षुधित पीडिला अन्नाविण ॥ तों क्षीराब्धि पुढें आला धांवोन ॥ कीं वारणें गांजितां पंचानन ॥ हांक फोडोनि धांविन्नला ॥५४॥

रोगें व्यापिला बहुवस ॥ तों वैद्य पाजिला सुधारस ॥ तैसें बिभीषण बोलतां रामास ॥ मिथ्या दुःख वितळलें ॥५५॥

बिभीषणवचन पौर्णिमा थोर ॥ कळायुक्त दिसे रामचंद्र ॥ उचंबळला कपिसमुद्र ॥ सुखभरतें दाटलें ॥५६॥

बिभीषणास म्हणे रघुनंदन ॥ तुझे उपकारा मी नव्हें उत्तीर्ण ॥ क्षणक्षणां आम्हांलागून ॥ सांभाळिसी प्राणसखया ॥५७॥

असो श्रीरामाचिये कर्णी ॥ बिभीषण सांगे तेचि क्षणीं ॥ इंद्रजितें निकुंभिलाभुवनीं ॥ कपटहोम आरंभिला ॥५८॥

होमधूमें कोंदलें निराळ ॥ होमाहुतीचें दाटले परिमळ ॥ अग्नींतून रथ तेजाळ ॥ अर्ध बाहेर निघाला ॥५९॥

अश्व सारथि धनुष्य बाण ॥ यांसह तो निघे स्यंदन ॥ कार्य सिद्धि जाहलिया पूर्ण ॥ मग रावणी नाटोपे ॥६०॥

तो चार वेळां येऊन ॥ रणीं गेला जय घेऊन ॥ आतां तो होम विध्वंसून ॥ आधीं सत्वर टाकावा ॥६१॥

विलंब करितांचि येथ ॥ तिकडे निघेल अवघा रथ ॥ रथ निघाल्या इंद्रजित ॥ कालत्रयीं नाटोपे ॥६२॥

द्वादश वर्षें निराहारी ॥ असेल जो ब्रह्मचारी ॥ तयाचेनि हातें शक्रारि ॥ मरेल ऐसें भविष्य असे ॥६३॥

ऐसें ऐकतां रघुनंदन ॥ सौमित्राकडे पाहे विलोकून ॥ धनुष्य चढवूनि गुण ॥ वेगें लक्ष्मण उभा ठाकला ॥६४॥

बंधूची बाल्यदशा देखोनि ॥ स्नेहभरित होय चापपाणि ॥ अनुजासी हृदयी कवळूनि ॥ मंत्र कर्णीं सांगतसे ॥६५॥

कोण्या मंत्रें कोण अस्त्र ॥ कोण्या समयीं प्रेरावें कोणते शस्त्र ॥ तें तें सर्वही राजीवनेत्र ॥ सौमित्रासी देता जाहला ॥६६॥

मस्तकीं ठेविला कृपाहस्त ॥ म्हणे सत्वर वधोनि इंद्रजित ॥ जयलाभ घेऊनि अद्भुत ॥ कल्याणरूप येइंजे ॥६७॥

सवें मारुती बिभीषण ॥ परम बुद्धिमंत कळाप्रवीण ॥ रामें धरूनि लक्ष्मण ॥ तयांचे हातीं दिधला ॥६८॥

नळ नीळ जांबुवंत अंगद ॥ गवय गवाक्ष ऋषभ मैंद ॥ पनस केसरी दधिमुख द्विविद ॥ वीर अगाध निघाले ॥६९॥

आणि असंख्य निघती वानरगण ॥ पुढें मार्ग दावी बिभीषण ॥ निकुंभिला गड परम कठिण ॥ लंकेहूनि अगाध ॥७०॥

अंगदस्कंधी लक्ष्मण ॥ जैसा गजेंद्रावरी सहस्रनयन ॥ पुढें कडे लागले कठिण ॥ मग बिभीषण बोलत ॥७१॥

म्हणे घ्या अवघे उड्डाण ॥ निकुंभिला दुर्ग ओलांडून ॥ शक्रजित करी हवन ॥ आधीं विध्वंसोनि टाका तें ॥७२॥

मग निराळपंथें ते वेळे ॥ निकुंभिलेंत प्रवेशले ॥ तो सैन्यदुर्ग सबळ बळें ॥ सात भोंवते रक्षिती ॥७३॥

वृषभ गवय हनुमंत ॥ घेऊनियां शिळा पर्वत ॥ जेथे हवन करी इंद्रजित ॥त्या विवरांत प्रवेशले ॥७४॥

तों सभोंवती भूतें रक्षिती ॥ तितुकीं झोडून पळवी मारुति ॥ तंव तो इंद्रजित पापमूर्ति ॥ वज्रासनीं बैसला ॥७५॥

रक्तोदकें स्नान करूनि ॥ रक्तवस्त्रें नेसला रावणी ॥ सप्त प्रेते पसरूनि ॥ त्यावरी आसन घातले ॥७६॥

पिंगट जटा मोकळ्या दिसती ॥ रक्तें थबथबां गळती ॥ नेत्र लावूनि आहुती ॥ टाकीतसे त्वरेनें ॥७७॥

ब्राह्मणांची शिरें बहुत ॥ त्यांचा जवळी पडिला पर्वत ॥ अस्तिमाळां गळां डोलत ॥ उरग मृत शिरीं वेष्टिले ॥७८॥

द्विजदंतांच्या लाह्या करूनि ॥ साजुक रक्त मांस घाली हवनीं ॥ रथ निघाला अग्नींतूनि ॥ तरणीहूनि तेजागळा ॥७९॥

प्राप्त होतां दिव्य निधान ॥ जैसें अभाग्यावरी पडे विघ्न ॥ तैसें हनुमंतें पर्वत टाकून ॥ होमकुंड विध्वंसिलें ॥८०॥

अग्नि चहूंकडे विखरत ॥ गेलें परतोनि आराध्यदैवत ॥ अग्नीनें गिळिला माघारीं रथ ॥ परम अनर्थ जाहला ॥८१॥

इंद्रजिताच्या पृष्ठीवरी ॥ ऋषभ देहधर्मातें करी ॥ यज्ञपात्रें फोडोनि झडकरी ॥ होमद्रव्यें उलंडीत ॥८२॥

गजर कानीं पडतां बहुत ॥ सावध जाहला शक्रजित ॥ देखोनियां तें विपरीत ॥ परम दुश्चित ते वेळे ॥८३॥

म्हणे दैवत क्षोभलें सबळ ॥ कैसी वैरियांनी साधिली वेळ ॥ माझें आयुष्यसिंधुजळ ॥ आजपासूनि आटलें ॥८४॥

वानर तेथें गेलें समस्त ॥ परम कोपला इंद्रजित ॥ वेगें आणूनि दिव्य रथ ॥ वरी आरूढें ते काळीं ॥८५॥

अद्भुत दळ घेऊनि ते वेळां ॥ निकुंभिलेबाहेर युद्धासी आला ॥ तों कपिभारेंसी उभा ठाकला ॥ सौमित्र देखिला शक्रजितें ॥८६॥

भगणांमाजी रोहिणीवर ॥ कीं किरणचक्रीं दिवाकर ॥ तैसा वानरांत सौमित्र वीर ॥ युद्धासी सिद्ध उभा असे ॥८७॥

जैसा कुळाचळांत मेरु अद्भुत ॥ तैसा रथारूढ दिसे इंद्रजित ॥ तों राक्षसदळ लोटलें समस्त ॥ वानरांवरी ते काळीं ॥८८॥

शिळा द्रुम पर्वत घेऊनी ॥ कपी धांवले तेक्षणीं ॥ राक्षसदळा होता आटणी ॥ प्रेतें अवनीं पडताती ॥८९॥

शूल असिलता शक्ति ॥ हीं आयुधें घेऊनि हातीं ॥ वानरांसी असुर खोंचिती ॥ कपी पडती विकळ तेणें ॥९०॥

तों नळ नीळ जांबुवंत ॥ प्रतापरुद्र अंजनीसुत ॥ यांचा मार अति अद्भुत ॥ आटले बहुत निशाचर ॥९१॥

अरिप्रताप देखोनि अत्यद्भुत ॥ परम क्रोधावला इंद्रजित ॥ होम विध्वंसिला त्या विषादें बहुत ॥ दांत खात करकरां ॥९२॥

लातेनें ताडितां उरग ॥ कीं खवळे शुंडा पिळितां मातंग ॥ कीं नासिकीं ताडितां सवेग ॥ महाव्याघ्र जेवीं खवळे ॥९३॥

कीं महातपस्वी अपमानिला ॥ कीं हुताशन घृतें शिंपिला ॥ तैसा इंद्रजित क्षोभला ॥ वेगें लोटिला रथ पुढें ॥९४॥

दृष्टीं देखतां वारण ॥ खवळे जैसा पंचानन ॥ तैसा क्षोभला लक्ष्मण ॥ जो भोगींद्र पूर्ण अवतरला ॥९५॥

विद्युत्प्राय चाप चढवून ॥ त्यावरी योजिला दिव्य बाण ॥ सिंहनादें गर्जोन ॥ रामानुज सरसावला ॥९६॥

मांडिलें तेव्हां वज्रठाण ॥ कौतुक पाहती सुरगण ॥ सौमित्रासी होवो कल्याण ॥ हेंच देव चिंतिती ॥९७॥

इंद्रजित म्हणे सौमित्रासी ॥ मजसी युद्ध करूं पाहसी ॥ जैसा हरिण शार्दूलासी ॥ झोंबी घ्यावया पातला ॥९८॥

सुपर्णावरी धांवे अळिका ॥ कीं मातंगावरी गोवत्स देखा ॥ कीं बळें धांवे पिपीलिका ॥ कनकाचळ उचलावया ॥९९॥

ऊर्णनाभी भावी मनीं ॥ स्वतंतूंनीं झांकीन ॥ मेदिनी ॥ वृश्चिक नांगी उभारूनी ॥ ताडीन म्हणे खदिरांगारा ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP