लक्ष्मणहंसाख्यान - लक्ष्मणहंसांची कुलकथा

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति, युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे. 

जय जय सदगुरु अविनाशा । परात्परा परमेश्वरा परेशा । सच्चिदानंदा निरंशा । अमूर्तिरुपा ॥१॥

तोचि तूं शिष्याचेंनि जालेपणें । निर्गुणत्त्वें सहज गुणा येणें । शेखीं गुण निर्दाळून अभेद होणें । नामत्यागें ॥२॥

शिष्यत्त्वें जरी आदिनारायण । तरी तूं ब्रह्मरुप गुरुत्त्वें आपण । जरी शिष्य निजांगें ब्रह्म पूर्ण । तरी तूं निजगुरु गुरुत्त्वें ॥३॥

पंचम अष्टकीं हंस नागनाथ । जयाचा विहार तो शुध्द परमार्थ । किती झालें असती सनाथ । हा अंत न लगे ॥४॥

जे जे ज्ञानी पूर्णत्त्वा पावले । ते ते निजांगेंचि हंसराज झाले । इतुक्यांचेंहि माहात्म्य वर्णिलें । न जाय माझेनी ॥५॥

परी लक्ष्मणहंसांचें चरित्र । बोलूं पाहे माझें वक्त्र । तेणें उद्वारें सज्जनांचें श्रोत्र । परिपूर्ण होती ॥६॥

नागनाथ चित्तीं विचारिती । म्यां धरिल्या असती अनंत व्यक्ति । परी प्रपंच असून परमार्थसंपत्ति । केवी अनुभविली नाहीं ॥७॥

तरी हाहि विलास आपुला आपण । साकल्य पहावें उमानून । आणि आपण जो असे परिपूर्ण । तो तरी संचला असे ॥८॥

ऐसा अंतरीं उद्वार होतां । लक्ष्मणहंस प्रगटले तत्त्वतां । तेचि कथा सावधान श्रोता । रहस्यात्मक ऐकावी ॥९॥

अमृतराय औरंगजेबाचा । दिवाण जो विख्यात साचा । तयाचे वंशीं कुलदीप मुळिचा । मूळरुपें प्रगटला ॥१०॥

अंतरीं उदास आणि राजभार । ऐसाचि रायजीपासून ओघ सधर । चालिला असे निरंतर । माधवराया पावेतों ॥११॥

परी रायजीस सगुण साक्षात्कार । माधवराया प्रगटला ज्ञानप्रकार । तेथें त्रिपुटी उरलीसे कर्तृतंत्र । वस्तुतंत्र नव्हे ॥१२॥

यास्तव माधवरायाचें उदरीं । हंसराज प्रगटले आवेशें थोरी । तेथें न राहे त्रिपुटीसि उरी । वस्तुतंत्र होतां ॥१३॥

असो माधवराव दहावें वर्षांपासून । मामलती करिती यथान्यायेकडून । प्रजाहि पालिती अनुदिन । पुत्राचे परी ॥१४॥

गंगेचिये तीन योजना अंतरीं । एक हटे नामें सानसी नगरी । तेथें राहोनि राजधानीपरी । वहिवाट होतसे ॥१५॥

पुढें राजेंद्र जाले यवनाचे दिवाण । तयाचीहि कृपा संपादून । तेंचि आधिपत्य घेतलें करुन । आपणाकडे ॥१६॥

ऐसा उदंड दिवस राजभार चालत । संपत्तीसि नाहीं गणित । उदंड स्वजनसमुदायहि मिळत । कवणा नाहीं न म्हणे ॥१७॥

जे जे दीनरुप खंगले भंगले । तेहि येउनि सदनीं राहिले । निजपुत्रापरी पाळिते झाले । ते उभयतांही ॥१८॥

येसूबाइ तयाची पत्नी । जयेची अति उत्तमोत्तम करणी । स्वकीय आणि परकीय भाव मनीं । नाहीं जयेच्या ॥१९॥

ऐसी ते पुण्यराशी उभयतां । हटेग्रामामाजीं असतां । साधुसंत योगीहि तत्त्वतां । सदनासी येती ॥२०॥

सर्वाचा सत्कार सेवा करिती । कदा आळस न ये उभयतांप्रति । वडिला वडिलीं ऐसी रीति । चालत आली ॥२१॥

पुत्रें बापाचा उपदेश घ्यावा । ऐसा रायजीपासून चालत मार्ग यावा । तेणेंचि रीती उपदेश माधवरावा । असे नारायणपंतांचा ॥२२॥

परी आणीक जे जे साधु सांगती । त्यांची त्यांची स्वीकारावी वृत्ति । हटयोगादिही क्रिया समस्ती । केली असे सर्व ॥२३॥

आणि श्रवण मनन अभ्यास । चालत असे रात्रंदिवस । इकडे राज्यभाराचाहि विलास । चालत असे ॥२४॥

प्रपंचीं परमार्थी खबरदार । उणें पडोंचि नेदी अणुमात्र । ज्ञानहि जालें ऐक्याविचार । परी त्रिपुटी मात्र उरली ॥२५॥

असो येसूबाईसि सुमुहूर्तावरी । पहिलाच गर्भ राहिला उदरीं । तोचि लक्ष्मणहंस निर्धारी । नागनाथरुपें ॥२६॥

तें पाहोनि माधवराव । बहुत करितसे उत्सव । जन्मकाळादि पुढील प्रकरणीं सर्व । चिमणें बाळ बोलेल ॥२७॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्द्ति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । श्रीलक्ष्मणहंसाख्यान निगुती । प्रथम प्रकरणीं ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP