मार्च ११ - प्रपंच

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.

प्रपंच हा परमेश्वरप्राप्तीच्या आड कधीही येऊ शकत नाही. आपण पाहतोच की प्रपंचात आपला कितीतरी लोकांशी निरनिराळ्या स्वरुपांत संबंध येतो. आई-वडील, बायको-मुले, बहीण-भाऊ, इतर सगेसोयरे, मित्र आणि इतर जन, या सर्वांचा उत्तम उपयोग करायचा असेल तर या सर्वांशी व्यवहार करताना आपण आपली सर्व कर्मे एका हरिस्मरणाच्या धाग्यात जोडून करावीत, म्हणजे सर्वांशी संबंध सलोख्याचे राहून प्रपंच फारच सुखकर होईल; निदान तो तापदायक तरी खचितच होणार नाही. या सर्वांशी संबंध बिघडायला आपला अभिमान, अहंपणा, विशेषकरुन कारणीभूत होत असतो. हा अभिमान श्रीमंतालाच असतो असे नव्हे, तर गरिबालाही तो सोडत नाही. आपण पुराणात वाचले आहेच की, हिरण्यकश्यपूला जेव्हा भगवंतांनी मांडीवर घेऊन पोट फाडायला सुरुवात केली, तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला, प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही त्याने काही हात जोडले नाहीत. केवढा हा अभिमानाचा जोर ! गरीब लोकसुध्दा या अभिमानाच्या आहारी किती गेलेले असतात ! एकदा एक भिकारी एकाच्या दाराशी येऊन भिक्षा मागू लागला, तेव्हा तो गृहस्थ त्या भिकार्‍याला म्हणाला, “ अरे ! तुला काही काळवेळ समजते की नाही? ” त्यावर तो भिकारी म्हणाला, “ जा जा ! मला काही तुमचे एकट्याचेच घर नाही, गावात अशी शंभर घरे आहेत ! ” पाहा, अभिमानाचे तण किती खोल गेलेले असते ते ! अभिमान हा शेतात उगवणार्‍या हरळीसारखा आहे. ही हरळी समूळ नाहीशी केल्याशिवाय चांगले पीक हाती लागत नाही, त्याप्रमाणे, अभिमान संपूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वरी कृपेचे पीक येणेच शक्य नाही. फणस चिरताना एक काळजी घ्यावी लागते; हाताला तेल लावून तो कापावा लागतो आणि त्यातले गरे काढावे लागतात, म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन निघतात. त्याप्रमाणे, नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केला, तर अभिमानाचा किंवा विषयवासनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत करता येतात. हा अहंपणा, हा देहाभिमान टाकला तर प्रपंचातली लाभ-हानी हसतखेळत झेलता येईल. लहान मुले पावसाळ्यात कागदाच्या लहान लहान होड्या करुन पाण्यात सोडतात, त्यांतली होडी तरली तरी हसतात, बुडाली तरी हसतात; त्याप्रमाणे प्रपंचातली सुखदु:खे हसतखेळत झेलावीत; आणि हे एका नामानेच साधते.

N/A

References : N/A
Last Updated : May 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP