अध्याय सहावा - श्लोक १५१ ते २००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


असो ऐशी ते आदिशक्ति ॥ तिनें इच्छा धरिली चित्तीं ॥ तिसीच गुणक्षोभिणी म्हणती ॥ त्रिगुण निश्र्चिती केले इनें ॥५१॥

सत्व रज तम जाण ॥ तेचि विधि विष्णु ईशान ॥ त्रिशक्तिरूपें धरून ॥ तिहीं ठायीं आपण जाहली ॥५२॥

ज्ञानशक्तीच्या आधारेंकरून ॥ ज्ञानपंचक केलें निर्माण ॥ तें अंतःकरणचतुष्टय पूर्ण ॥ तत्वविद म्हणती ते ॥५३॥

क्रियाशक्तीच्या आधारें रजोगुण ॥ प्रसवला तो पंचकें तीन ॥ एक ज्ञानेंद्रियपंचक पूर्ण ॥ कर्मेंद्रियपंचक दुसरें ॥५४॥

तिसरें जाणावें वायुपंचक ॥ आतां तमद्रव्यशक्तिआधारें देख ॥ विषयपंचक निर्मिलें सुरेख ॥ पंचतन्मात्रा म्हणती ज्यातें ॥५५॥

ऐसीं पंचवीस तत्त्वें निःशेष ॥ मग केला परस्परानुप्रवेश ॥ कर्दम करूनि विशेष ॥ ब्रह्मांड हें रचियेलें ॥५६॥

ब्रह्मांड ही पेठ पूर्ण ॥ नाना रीतीं रची कमलासन ॥ चहूं खाणींचीं केणीं आणून ॥ चौऱ्यांशीं लक्ष जीव केले ॥५७॥

ऐसा ब्रह्मा पेठा भरित ॥ विष्णु तयांचा प्रतिपाळ करीत ॥ दहा अवतारांच्या घिरट्या घेत ॥ संकटीं तारित भक्तांतें ॥५८॥

सृष्टींत दोष होतां अपार ॥ परम क्रोधी तो अपर्णावर ॥ तात्काळ करी संहार ॥ टाकी सर्व मोडोनियां ॥५९॥

विराट जें रचिलें ढिसाळ ॥ हें शिवाचें देह स्थूळ ॥ पायांचे तळवे तें पातळ ॥ प्रपद रसातळ जाणिजे ॥१६०॥

याचा सांगतों निर्णय ॥ ज्ञान जेणें प्राप्त होय ॥ सकळ संतांचे समुदाय ॥ ऐकोन बहुत आनंदती ॥६१॥

गुल्फद्वय तें महातळ ॥ पोटरिया जानुयुगुळ ॥ तें तळातळ आणि वितळ ॥ विराटाचें जाण पां ॥६२॥

कटिप्रदेश तें महीतळ जाण ॥ जाण नैऋतयलोक तें गुदस्थान ॥ दक्षप्रजापति तो शिश्र ॥ विराटाचें जाण पां ॥६३॥

जठरामाजी पोकळ ॥ तें हें अवघें नभमंडळ ॥ जठराग्नि तो वडवानळ ॥ महाकल्लोळ धडकतसे ॥६४॥

सप्तसमुद्र उदरीं सकळ ॥ ज्योतिर्लोक तें वक्षःस्थळ ॥ महर्लोक तें कंठनाळ ॥ वदनकमळ जनलोक ॥६५॥

वरुणलोक ते जिह्णा जाण ॥ यमलोक त्या दंतदाढा तीक्ष्ण ॥ अश्र्विनौदेव तें घ्राण ॥ भ्रुकुटिस्थान भूर्लोक ॥६६॥

तपोलोक तें कपाळ ॥ मस्तक ब्रह्मभुवन निर्मळ ॥ वासरमणि तें नेत्र तेजाळ ॥ प्रकाशकल्लोळें ब्रह्मांड भरी ॥६७॥

पातीं उघडी त्या नांव दिवस ॥ झांकितां रात्र म्हणती त्यास ॥ उभयहस्तरूपें अमरेश ॥ कर्तव्य करी सर्वही ॥६८॥

चंद्रमा तयाचें मन ॥ वनस्पति रोमावळी पूर्ण ॥ त्वचा ते जाण प्रभंजन ॥ कर्दम पूर्ण मांस तें ॥६९॥

नाडीचक्र गंगा निश्र्चिती ॥ पृष्ठी तिकडे अर्धर्मरीतीं ॥ कनकाचळतो सुमती ॥ शिरोभाग जाणिजे ॥१७०॥

अस्थि त्या जाण पाषाण ॥ फेण ती लाळ ओळखें खूण ॥ दहिंवर ते मूत्र पूर्ण ॥ जळ तें रक्त जाणिजे ॥७१॥

पाषाणगर्भ मज्जा सत्य ॥ पर्जन्य तें शिवाचें रेत ॥ दुर्भिक्ष ती क्षुधा अद्भुत ॥ जलशोष अत्यंत तृषा पूर्ण ॥७२॥

आळस तो शीतकाळ ॥ पर्जन्यकाळ ती निद्रा सबळ ॥ उष्णकाळ तें मैथुन केवळ ॥ वृष्टि व्हावया तावीतसे ॥७३॥

झुंझाट वायु तें धांवणें ॥ वाहाटुळी तयांचें वळण ॥ दशदिशा पसरल्या संपूर्ण ॥ तें पसरण तयाचें ॥७४॥

स्तब्ध वायु तें आकुंचन ॥ उकाडा तो निरोधन ॥ जलवृष्टीची इच्छा काम पूर्ण ॥ सृष्टिसंहारण क्रोध तो ॥७५॥

शोक तो महा अनर्थ ॥ मोह सृष्टिपालन यथार्थ ॥ भय तो मृत्यु ओळख सत्य ॥ विराटपुरुषाचें राघवा ॥७६॥

पतवसन तें अंतःकरण ॥ रमाबंधु तयाचें मन ॥ विरिंचि बुद्धि संपूर्ण ॥ चित्त नारायण जाणिजे ॥७७॥

देवदत्त तो मुख्य प्राण ॥ धनंजय पाताळीं आपण ॥ दिशा तयाचे कर्ण ॥ पावन संपूर्ण त्वचा त्याची ॥७८॥

अग्नि तयाचें वदन ॥ चरण पाताळीं वामन ॥ ऐसा विराटपुरुष संपूर्ण ॥ सप्तावरणमय असे ॥७९॥

भूगोल दशगुणें प्रबळ ॥ बाह्य ओळखें पृथ्वीमंडळ ॥ त्या दशगुणें समुद्रजळ ॥ असंभाव्य पसरलें ॥१८०॥

उदकाचे दशगुण ॥ धडाडीत महाअग्न ॥ त्या दशगुणें प्रभंजन ॥ आवरण पैं जाणिजे ॥८१॥

समीरा दशगुणें साचार ॥ वाड असे हें अंबर ॥ नभा दशगुणें अहंकार ॥ वेष्टिलासे सघन पैं ॥८२॥

अहंकारा दशगुणें निश्र्चित ॥ व्यापिलें असे महतत्त्व ॥ त्या दशगुणें अद्भुत ॥ माया आवरण शेवटीं ॥८३॥

मायेपलीकडे जें उरलें जाण ॥ तें केवळ स्वरूप निर्वाण ॥ तें इतुकें तितुकें थोर लहान ॥ व्यक्तिवर्ण नाहीं तेथें ॥८४॥

ऐसा मायेचा खेळ अचाट ॥ आतां ऐके इचा शेवट ॥ पंचप्रळय स्पष्ट ॥ वेदांतशास्त्रीं निवडिले ॥८५॥

पिंडीं नित्यप्रळय संपूर्ण ॥ निद्रा म्हणती तयालागून ॥ तत्त्वांसमवेत स्थूळलिंगदेह जाण ॥ बुडोन जाय निद्रार्णवीं ॥८६॥

हा नित्यप्रळय जाण ॥ आतां महाप्रळय तें मरण ॥ जाय स्थूळदेह संहारून ॥ सर्व जन देखती ॥८७॥

आतां ब्रह्मांडीचा प्रळय निश्र्चित ॥ चारी युगें सह्त्र वेळां जात ॥ तोंवरी ब्रह्मा होय निद्रिस्थ ॥ मग राहतो सृष्टिक्रम ॥८८॥

अवघी सृष्टि जाय संहारुनी ॥ सर्व जळमय होय ते क्षणीं ॥ बत्तीस लक्ष गांव चढे पाणी ॥ जाय बुडोनी ब्रह्मांड ॥८९॥

सप्तचिरंजीव बुडोन जात ॥ सत्यलोकीं पाणी आदळत ॥ तेव्हां वटप्रत्रशायी भगवंत ॥ ब्रह्मा निद्रिस्थ नाभिकमळीं ॥१९०॥

मग कमलोद्भव होय जागृत ॥ जळ आटोनि समस्त ॥ यथापूर्वक कल्प येत ॥ वेद निश्र्चित बोल तसे ॥९१॥

पूर्विल्यासारखें होय सकळ ॥ मागुती अवतार धरी घननीळ ॥ अवतार चरित्र सकळ ॥ पूर्विल्याऐसें दावित ॥९२॥

हा नित्यप्रळय संपूर्ण ॥ आतां महाप्रळय ऐक दारुण ॥ आधीं शतसंवत्सर घन ॥ न वर्षेंचि कदापि ॥९३॥

तेणें जीवसृष्टीचा संहार ॥ सवेंच उगवती द्वादश मित्र ॥ वडनावळ तो महातीव्र ॥ भूमंडल जाळीत पैं ॥९४॥

तापतांचि उर्वीमंडळ ॥ भोगींद्रमुखींचे निघती ज्वाळ ॥ तेणें सप्तपाताळ सकळ ॥ भस्म होती एकदांचि ॥९५॥

मग शतसंवत्सरपर्यंत ॥ शुंडाधारी मेघ वर्षत ॥ जैसी जळगार जळीं विरत ॥ जगती समस्त वितळे तेविं ॥९६॥

उपरी महातेज अग्न ॥ जळ शोष्ज्ञी न लागतां क्षण ॥ तया तेजासी प्रभंजन ॥ टाकील ग्रासून क्षणमात्रें ॥९७॥

मग तो अद्भुत अनिळ ॥ क्षणें गिळील निराळ ॥ त्या गगनासी समूळ ॥ तमोगुण ग्रासील पैं ॥९८॥

तमासी ग्रासील रजोगुण ॥ रज सत्वीं होईन लीन ॥ सत्वास महतत्त्व मिळोन ॥ समरसेल मायेंत ॥९९॥

माया होय स्वरूपीं लीन ॥ स्वरूप स्वरूपीं समाधान ॥ जे ब्रह्मानंद परिपूर्ण ॥ बोलतां मौन वेदशास्त्रां ॥२००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP