अध्याय सहावा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


प्रधानादि अष्टाधिकारी ॥ स्त्रीपुरुष ते अवसरीं ॥ भस्म जाहले अग्निभीतरीं ॥ बाळें नगरीं उतलीं तैं ॥१॥

ऐसें कंटजें देखिलें ॥ म्हणे थोर पाप मज घडलें ॥ तेणेंहि तेव्हां सरण रचिलें ॥ वरी आपण निजेला ॥२॥

तों अग्निशिखा ते वेळीं ॥ वामंगीं येऊन झगटली ॥ कंटजें हांक फोडिली ॥ उडी घातली खालती ॥३॥

तों इकडे गाधिब्राह्मण ॥ बाहेर निघाला हांक फोडून ॥ फोड आला तरतरोन ॥ वामांगासी देखिला ॥४॥

म्हणे मी गाधिब्राह्मण ॥ जान्हवींत करितां स्नान ॥ करीत असतां अघमर्षण ॥ दुःखें दारुण भोगिलीं ॥५॥

सूर्यसुतें मज गांजिलें ॥ चांडाळयोनींत जन्मविलें ॥ सहा वरुषें राज्य केलें ॥ लोक भ्रष्टविले सर्वही ॥६॥

मृत्यु पावले असंख्य जन ॥ जरी हें असत्य म्हणावें स्वप्न ॥ तरी फोड आला तरतरोन ॥ करी रुदन विप्र तो ॥७॥

विसरला तप अनुष्ठान ॥ नाठवे संध्या वेदाध्ययन ॥ आश्रमासी आला परतोन ॥ चिंतार्णवीं पडिलयेला ॥८॥

स्त्री विनवी भ्रतारालागून ॥ तुमचे वामांगीं कां झोंबला अग्न ॥ तंव तो विलापें ब्राह्मण ॥ म्हणे माझेनि हें न सांगवे ॥९॥

तों गाधीचा गुरुबंधु अकस्मात ॥ आला तीर्थे करित करित गाधि तयासी क्षेम देत ॥ म्हणे कृश कां बहुत जाहलासी ॥११०॥

तेणें सांगितलें वर्तमान ॥ मज एक पाप घडलें दारुण ॥ केरळदेशीं एक नगर संपूर्ण ॥ बाळेंचि तेथें नांदती ॥११॥

एकाचे घरीं म्यां घेतलें अन्न ॥ मग त्यांसी पुसिलें वर्तमान ॥ ते म्हणती कंटज महार येऊन ॥ ग्राम आमचा भ्रष्टविला ॥१२॥

समस्तांचे घेऊन प्राण ॥ मग तो गेला येथून ॥ ऐसें पापी नगर तें पूर्ण ॥ तेथें भोजन घडलें मज ॥१३॥

तो दोष जावया संपूर्ण ॥ द्वादश वर्षें करितों तीर्थाटण ॥ ऐसें तो गुरुबंधु सांगोन ॥ गेला पुढें वाराणसी ॥१४॥

प्रचीत पहावया समस्त ॥ गेला आपण गधि तेथ ॥ तो अवघ्या खुणा यथार्थ ॥ प्रत्यया आल्या सर्वही ॥१५॥

आपण जेथें जन्मला होता महार ॥ तेथेंहीं घेतला समाचार ॥ तंव ते अनामिक सांगती समग्र ॥ कंटज येथेंचि जन्मला ॥१६॥

तेणें सहा वरुषें राज्य करोनी ॥ केरळ नगर भ्रष्टवुनी ॥ मग काळें तोंड घेवोनी ॥ गेला नेणों कोणीकडे ॥१७॥

गाधि आश्रमासी आला परतोन ॥ घेतलें क्षितीवर घालून ॥ म्हणे आतां कैंचें ब्राह्मणपण ॥ गेलों बुडोन रौरवीं ॥१८॥

शोकें कपाळ आदळी क्षितीं ॥ म्हणे मी गौतमशिष्य विख्यात जगतीं ॥ मज हें कैशी घडली गती ॥ कोणासी स्थिति पुसों हे ॥१९॥

असत्य जरी म्हणावें वहिलें ॥ तरी सर्वही प्रत्ययास आलें ॥ जन्मकर्म दुष्कृतफळें ॥ पाहोनि आलों स्ववनयनीं ॥१२०॥

सत्य कीं असत्य पूर्ण ॥ मज कोण सांगेल उकलोन ॥ कोणासी मी जाऊं शरण ॥ कैचें ब्राह्मण्य मज आतां ॥२१॥

म्हणे धांव धांव इंदिरावरा ॥ वैकुंठवासिया करुणाकरा ॥ पतितपावना सर्वेश्र्वरा ॥ राजीवनेत्रा जगद्रुरू ॥२२॥

तात्काळ प्रगटला जगज्जीवन ॥ म्हणे रे गाधि सावधान ॥ माझी माया परम गहन ॥ ब्रह्मादिकां अतर्क्य ॥२३॥

तूं म्हणविशी सर्वज्ञ जाणता ॥ सत्य कीं असत्य माया सांग आतां ॥ बहुत ऋषी तर्क करितां ॥ निर्वाह सर्वथा नव्हेचि ॥२४॥

जे कथिती सदा सर्वदा ज्ञान ॥ सांगती माया लटकी म्हणोन ॥ तेही मायेंत गेले गुंफोन ॥ जाहले दीन सर्वही ॥२५॥

तुज माया दाविली किंचित ॥ पुढें आणिक पाहें अद्भुत ॥ गाधि धांवोनि चरण धरित ॥ सोडवीं मज म्हणे येथुनी ॥२६॥

मग गाधि भगवंतें हृदयीं धरिला ॥ वरदहस्तमस्तकीं ठेविला ॥ निजात्मबोध प्रकट केला ॥ सावध जाहला ब्राह्मण ॥२७॥

जैसा स्वप्न देखतां जागा होय ॥ कीं यामिनीअंतीं उगवे सूर्य ॥ तैसा बोध प्रकटतां मोहभय ॥ विरोन गेलें सर्वही ॥२८॥

असो गाधीचा उद्धार जाहला ॥ आपुले स्वरूपीं मेळविला ॥ हा इतिहास सांगितला ॥ मायेनिमित्त श्रीरामा ॥२९॥

मग बोले रघुनंदन ॥ माया व्हावया काय कारण ॥ स्वरूप निर्विकार निर्गुण ॥ तेथें स्फुरण कां जाहलें ॥१३०॥

पिंड ब्रह्मांड नानायोनी ॥ नानावर्ण नानाखाणी ॥ हे मुळींहून मायेची करणी । मिथ्याभूत सर्वही ॥३१॥

कीं निर्गुणा सगुण लाभलें ॥ अव्यक्त तें व्यक्तीस आलें ॥ अनामास नाम ठेविलें ॥ कां अंग लाविलें अनंगा ॥३२॥

ऐकोन श्रीरामाचा प्रश्र्न ॥ आनंदला ब्रह्मनंदन ॥ म्हणे बारे तूं परिपूर्ण चैतन्यघन ॥ जाणोन प्रश्र्न करितोसी ॥३३॥

रामा तुझेंचि दिव्य ज्ञान ॥ तुजचि सांगतों परतोन ॥ जैसें सुरतरूचें फळ घेऊन ॥ त्यासचि नैवेद्य दाविजे ॥३४॥

कीं कनकाद्रीचें सुवर्ण घेऊन ॥ त्यावरीच अलंकार घातले घडून ॥ कीं क्षीरसिंधूचें दुग्ध घेऊन ॥ त्यासीच समर्पिलें ॥३५॥

कीं सागरींचें उदक मेघ नेती ॥ मागुतीं सरिता आणूनि समर्पिती ॥ तैसा श्रीरामा तुजप्रती ॥ तुझेंच ज्ञान सांगतों ॥३६॥

तरी तुवां केला जो प्रश्र्न ॥ स्वरूपीं कां जाहलें स्फुरण ॥ तरी येविषयीं दृष्टांत सांगेन ॥ ऐक रामा निर्धारें ॥३७॥

जैसा कोणी पुरुष निद्रिस्थ ॥ पहुडला असे चिंतारहित ॥ तो स्वईच्छें होऊन जागृत ॥ कार्य कांहीं आठवी ॥३८॥

कीं समुद्रीं उठे लहरी ॥ तैसी ध्वनि उठे चिदंबरी ॥ मी ब्रह्म म्हणोनि निर्धारीं ॥ हाक थोर जाहली ॥३९॥

एक असतां ब्रह्मानंद ॥ निःशब्दीं उठिला शब्द ॥ ते ध्वनि मायानाम प्रसिद्ध ॥ वेदांतशास्त्र गर्जतसे ॥१४०॥

जिचें नाम मूळप्रकृति ॥ जी आदिपुरुषाची चिच्छक्ति ॥ तिणें शेजे निजवोनि पति ॥ सृष्टिकार्य आरंभिलें ॥१४१॥

येवढें ब्रह्मांड केलें निर्माण ॥ परि पतीस कळों नेदी वर्तमान ॥ ते परम कवटाळीण ॥ नसतींच दैवतें उभीं केलीं ॥४२॥

विधि विष्णु उमाकांत ॥ हीं तिन्ही बाळें जिचे आज्ञेंत ॥ नेत्र उघडोन निश्र्चित ॥ पाहों नेदी स्वरूपाकडे ॥४३॥

ब्रह्मसुखाचें समुद्रांत ॥ बुडाले हे जीव समस्त । परी तेथींची गोडी किंचित ॥ चाखों नेदी कोणातें ॥४४॥

चैतन्य इनेंचि झांकिलें ॥ इने अरूप रूपासी आणिलें ॥ अनंत ब्रह्मांडींचे पुतळे ॥ एक्याचि सूत्रे नाचवी ॥४५॥

इनें निर्गुणास गुण लाविले जाण ॥ अनामासी ठेविर्ले नामकरण ॥ निराकारासी आकारून ॥ जीवित्वासी आणिलें ॥४६॥

हे परमपतिव्रता साचार ॥ पतीस न कळतां जाहली गरोदर ॥ ब्रह्मांड रचिले समग्र ॥ नानाविकारें करूनियां ॥४७॥

नानायोनि विकार भाव ॥ इनें फांसां पाडिले अवघे जीव ॥ गाधीस कैसें दाविलें लाघव ॥ मिथ्या कर्तृत्व नसतेंचि ॥४८॥

कोणी मुरडे स्वरूपाकडे ॥ त्यासी नसतेंचि घाली सांकडें ॥ अथवा स्वर्गसुख रोकडें ॥ पुढें दावून भुलवी कीं ॥४९॥

निजात्मसुखगोडी निःसीम ॥ ती जीवासी केली कडू परम ॥ विषयविषरूप मोहभ्रम ॥ तेथें गोडी आणिली ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP