पञ्चमहाभूतविवेक - श्लोक २१ ते ४०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


हे तीन भेद सद्वस्तुचेठायी मुळीच संभवत नाहींत असें दाखविण्याकरितां ऐक्य, अवधारणा, आणि द्वैतप्रतिषेध हे तीन अथ दाखविणार्‍या तीन पदांनीं श्रुतीनें वरील भेदत्रयाचें निवारण केलें ॥२१॥

तें असें कीं, सद्वस्तूला अवयवाची शंका मुळींच नसल्यामुळें स्वगत भेद संभवत नाहीं. नामरुपें त्याचे अंश आहेत असें कोणी म्हणेल तर सृष्टीपूर्वी त्यांचा उद्भवच नव्हता. ॥२२॥

नामरुपें उद्भवणें यालाच सृष्टि म्हणतात, म्हणून सृष्टीच्यापूर्वी त्या नामरुपांचा उद्भव मुळींच नव्हता, हें उघड आहे. यास्तव, नामरुप हे सद्वस्तचे अंश हें संभवत नाहीं. तस्मात् सद्वस्तु निरंश असल्यामुळे स्वगत भेदशून्य आहे हें सिद्ध झालें. ॥२३॥

स्वगत भेदाप्रमाणेंच सजातीय भेदही सद्वस्तूचेठायीं ठरुं शकत नाही. कारण सजातीय भेदाला दुसरी एक सद्वस्तु पाहिजे. पण तीं तर कोठें दिसत नाहीं. येथें कोणी अशी शंका घेतील कीं घटसत्ता, पटसत्ता, असे सद्वस्तूचे भेद अनेक दृष्टीस पडतात. परंतु हे भेद घटाकाश, मठाकाश इत्यादि आकाशभेदाप्रमाणे केवळ औषाधिक आहेत; वस्तुतः नव्हेत. याकरितां नामरुपसंबंधी उपाधिभेदावांचून सद्वस्तूस वास्तविक सजातीय भेद नाहीं असें सिद्ध झालें. ॥२४॥

आतां तिसरा विजातीय भेद. तो सद्वस्तूस नाहीं असें सांगण्याची मुळींच जरुर नाही. कारण सताला विजातीय काय तें असत. तें आहे असें मुळीच संभव नाहीं. ॥२५॥

याप्रमाणें एकम, एव, आणि अद्वितीय या तीन पदांचा अर्थ झाला. परंतु कित्येक लोक भांवावून या श्रुतीचा अर्थ उलट करितात. । ते म्हणतात की, सृष्टीपूर्वी कांहींच नव्हतें. ॥२६॥

ज्याप्रमाणें समुद्रांत बुडालेल्या मनुष्याचे डोळे भांवावून जातात, त्याप्रमाणें या मूढ लोकांची बुद्धि अखंड एकरसाचें श्रवण करुन तिला आधार कांहींच न सांपडल्यामुळें भांवावून जाते. ॥२७॥

हा अद्वैतविषयच तसा आहे. सगुण ब्रह्याचें ध्यान करणारे योगी निर्विकल्प समाधींत भांवावून जातात असें गौडाचार्यानींही सांगितले आहे. ॥२८॥

त्यांच्या वार्तिकांत असें सांगितलें आहे कीं, हा अस्पर्श योगाख्य समाधि सगुण योग्यांना मोठा कठीण जातो. ज्याप्रमाणें निर्जन अरण्यांत मुलें भितात, त्याप्रमाणें निर्विकल्प समाधींत वस्तुतः भय नसूनही योगी घाबरतात. ॥२९॥

हे शुष्कतर्कपटु जे माध्यमिक ते अर्चित्य ब्रह्मस्वरुपी भांवावून जातात असें आच्यार्यानींही म्हटलें आहे. ॥३०॥

याविषयीं आचार्यांनीं असें म्हटलें आहे कीं, हे तमोगुणी बौद्ध मूर्खपणानें श्रुतीचा अनादर करुन केवळ अनुमानाच्या दृष्टीने शून्यत्व प्रतिपादन करितात. ॥३१॥

या शून्यवाद्यास आम्ही असें पुसतों कीं, सुष्टीपूर्वी शून्य होतें असें जें तूं म्हणतोस तें काय शून्य सद्रूप आहे, की तें सत्तेनें युक्त आहे ? या दोन्ही गोष्टी शून्यास संभवत नाहींत. ॥३२॥

सूर्य तमानें युक्तही नाहीं व तमाचा केलेलाही नाही. प्रकाशतमाप्रमाणें सत्ता आणि शून्य हीं एकमेकांची विरोधी आहेत. तेव्हां शून्य होतें असें कसें म्हणतां येईल ? ॥३३॥

आतां तूं असें कदाचित् म्हणशील कीं, सदूप ब्रह्माचेठायीं आकाशादि पंच भूतांला जशीं मायेनें नामरुपें कल्पिलीं आहेत. तर तें आम्हांला इष्टच आहे ॥३४॥

सतालाही नामरुपें कल्पिलीं अशी जर शंका घेशील तर ती मात्र अगदी बरोबर नाही. कारण सताला नामरुपें कल्पिलीं असें तूं म्हणतोस त्याजवर आम्ही असें विचारतो कीं, तीं नामरुपें कशावर कल्पिली, काय सतावर कीं असतावर कीं जगावर ? पहिला पक्ष मुळींच संभवत नाहीं. कारण कल्पना जी करावयाची ती एका पदार्थावर दुसर्‍या पदार्थाची केली पाहिजे. म्हणून सतावर सताचीच कल्पना म्हणणें योग्य नव्हे. असतावर मूळींच संभवत नाही. तिसरा पक्षही तसाच खंडित होतो. कारण सतापासून उत्पन्न झालेले जग सन्नामरुप कल्पनेस अधिष्ठान कसें होईल ? ॥३५॥

असतच होते असें म्हणण्यास जसा व्याहतिदोष येतो, तसा सत होतें अशा वाक्यांतही एक दोष आमचे प्रतिपक्षी कदाचित् आणतील. तो हा कीं, सत होनें या दोन शब्दांच्या अर्थामध्यें भेद असेल तर अद्वैतहानी होते. आणि अभेद असेल तर पुनरुक्तीचा दोष येतो. ॥३६॥

या पूर्वपक्षावर आमचें असें उत्तर आहे कीं, वरील अर्थामध्यें अभेदच घेतला पाहिजे. असा अर्थ केला असतां जो पुनरुक्तीचा दोष तुम्ही आणूं पाहतां तो येऊं शकत नाही. कारण अशा प्रकारचे प्रयोग लोकरुढींत असून ते दोषास पात्र होत नाहींत. जसें तो कर्तव्य करितो. तो बोलणें बोलतो. धार्याचे धारण असें म्हणण्याचा परिपाठ आहे. व अशी वाक्यें ऐकण्याचा ज्यांच्या कानांस संस्कार आहे त्यांप्रतच श्रुतीनें हें वाक्य सांगितलें. ॥३७॥

या वाक्यावर आणखी एक शंका अशी आहे कीं, अद्वितीय सद्रूप ब्रह्माला कालपरिच्छेद मुळींच नसून आसीत् या भूतकालिक क्रियापदाचा प्रयोग कसा केला ? तर याजवर आमचें असें म्हणणें कीं, ब्रह्माला जरी कालपरिच्छेद नाहीं तरी भूतादि कालाचा संस्कार ज्याच्या मनास झाला आहे अशा शिष्याप्रत श्रुतीनें असें सांगितलें. याजकरितां येथें द्वैताविषयीं अति शंका घेण्याचें कारण नाहीं. ॥३८॥

शंका घेणें किंवा तिचा परिहार करणें झाल्यास द्वैतभाषेचाच उपभोग केला पाहिजे. अद्वैतभाषेनें शंकाही घेतां येत नाहीं, व तिचा परिहारही करितां येत नाहीं. ॥३९॥

अद्वैतदशेमध्यें ब्रह्मतत्त्वाचें वर्णन श्रुतीमध्यें असें केलें आहे कीं, तें निश्चल व गंभीर असून तेथें तेज नाहीं, तेथें तम नाहीं, जें वाणीनें सांगतां येत नाही असें कांहीएक अनिर्वचनीय अव्यक्त बाकी राहतें तें ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP