तत्वविवेक - श्लोक ४१ ते ६५

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


याप्रमाणें स्थूळ व सूक्ष्म या दोन शरीरांच्या विवेचनानें अन्नमयापासून विज्ञानमयापर्यंत चार कोशीचें विवेचन झालें. आतां आनंदमय कोशरुप जें कारणशरीर त्याचे विवेचनाचा विचार करुं. समाधींत सुषुप्तीचें अभान असून आत्म्याचें भान आहे. म्हणून येथें कारणशरीराचा व्यतिरेक आणि आत्म्याचा अन्वय आहे. याकरितां आत्मा नित्य आणि कारणशरीर ( आनंदमय कोश ) अनित्य असें सिद्ध झाले. ॥४१॥

ज्याप्रमाणें मुंजा नांवाच्या गवताच्या काडींतून कोमल तंतू युक्तीनें काढावा, त्याप्रमाणें अन्वय व्यतिरेकाच्या योगानें वैराग्यादि साधनसंपन्न पुरुषानें तीनही शरीरांपासून आत्म्याचें पृथकरण केलें असतां तो ब्रह्मच होतो असें कठश्रूतींत सांगितलें आहे. ॥४२॥

याप्रमाणें तत्त्वज्ञान म्हणजे काय ? आणि त्यापासून फल कोणतें मिळतें, हें सांगितलें. तसेच, तत्पदवाच्य परमात्मा आणि त्वंपदवाच्य जीवात्मा या दोघाचें लक्षण एकच असल्यामुळें ते अभिन्न आहेत असेंही सिद्ध झालें. हें दोघाचें ऐक्य, भागत्यागलक्षणावृत्ति लावुन, तत्त्वमस्यादि महावाक्याचा अर्थ केला असतां स्पष्टपणें ध्यानांत येईल. ॥४३॥

" तत्त्वमसि " या वाक्याचा अर्थ करण्याकरितां पूर्वी तत्पदाचा व त्वंपदाचा वाच्यार्थ केला पाहिजे म्हणून तो येथें सांगतों. जें ब्रह्म तमोगुण प्रधानमायेचा स्वीकार करुन जगाचें विवर्तोपादान कारण झालें, व जें ब्रह्म शुद्धसत्वप्रधान मायेचा स्वीकार करुन जगाचें निमित्त कारण बनलें तें ब्रह्म येथें तत्पदानें सांगितलें. ॥४४॥

आणि तेंच ब्रह्म जेव्हां मलिनसत्वप्रधान म्हणजे रजस्तममिश्रित व कामकर्मादिकेंकरुन दूषित, अशा अविद्येचा स्वीकार करितें तेव्हां तें त्वंपदानें दर्शविलें जातें. ॥४५॥

तमः प्रधान, विशुद्धसत्वप्रधान आणि मलिनसत्वप्रधान अशी परस्पर विरुद्ध जी तीन प्रकारची माया ती गळून बाकी राहिलेलें अखंड सच्चिदानंद ब्रह्मच " तत्त्वमसि " वाक्याचा विषय अथवा लक्ष्य होय. ॥४६॥

ज्याप्रमाणें "‘ सोयंदेवदत्तः " ( तोच हा देवदत्त ) या वाक्यांत तो आणि हा अशीं भिन्न देशकालदर्शकें टाकून त्या दोन्ही दर्शकांस आश्रयभूत जो एक देवदत्त तो मात्र घ्यावयाचा. ॥४७॥

त्याप्रमाणें परमात्म्याची उपाधी माया व जीवाची अविद्या असें दोन विरुद्धांश वर्ज्य करुन बाकीचे केवळ अखंड सच्चिदानंद ब्रह्म मात्र महावाक्याचें लक्ष्य होतें. ॥४८॥

याज्वर प्रतिपक्षाची एक चमत्कारीक कोटी आहे ती अशी. महावाक्यास लक्ष्य जें ब्रह्म तें काय सविक्ल्प कीं निर्विकल्प ? तें सविकल्प जर म्हणाल तर मिथ्या होईल. कारण, ज्याचा विकल्प करितां येतो ती वस्तु सत्य नव्हे असें तुम्हीच म्हणतां. बरें, तें ब्रह्म निर्विकल्प म्हणावें तर तें वाक्यास लक्ष्य कसें झालें ? कारण, ज्याची कल्पना करितां येत नाहीं ती वस्तु वाक्यानें कशी सांगतां येईल ? ॥४९॥

याप्रमाणें दोहोंकडून अडविणारा जो वादी त्यास आम्ही उलट असें पुसतों कीं, तुम्ही जो विकल्प केला तो सविकल्पाविषयीं कीं निर्विकल्पाविषयीं ? जर निर्विकल्पाविषयीं केला असेल तर तुमच्याच बोलण्यामध्यें विरोध येतो. कारण निर्विकल्पाचा विकल्प केला असें म्हणणे म्हणजे आंधळा पाहतो, मुका बोलतो असें म्हटल्यासारखें होईल. बरें, सविकल्पाचा विकल्प म्हणाल तर आत्माश्रय, अन्योन्याश्रय, चक्रिकापत्ति आणि अनवस्था असे चार दोष येतात. ते असे कीं, " सविकल्पाचा विकल्प " या वाक्यांत पहिला विकल्प आणि दुसरा विकल्प हे दोन नसून एकच जर असतीत, तर आश्रित आणि आश्रय एकच होऊन स्वस्कंधारोहण न्यायानें आत्माश्रय दोष येतो. आतां ते दोनही विकल्प भिन्न असें म्हटलें तर पहिल्या विकल्पानें दुसर्‍या विकल्पाची सिद्धि होते कीं दुसर्‍यानें पहिल्याची होते. हें सांगता येत नाही. म्हणून येथें अन्योन्याश्रय दोष येतो. बरें, तो दोष उडविण्याकरिता त्या दोन विकल्पांखेरीज तिसर्‍या एका विकल्पापासून त्याची सिद्धि होते असें जर म्हणशील तर चक्रिकापत्ति दोष येतो. बरे, तोही उडविण्याकरितां तिसर्‍यास चवथा कारण, चवथ्यास पांचवा, पांचव्यास सहावा असें सांगत बसणें हाच अनवस्था दोष. ॥५०॥

जेथें गुण, क्रिया, जाती, द्रव्य आणि संबंध या पांच गोष्टी आहेत तेथें वरील दोष लागावयाचेच. उदाहरण - गुण निर्गुणी राहतो कीं सगुणी राहतो ? यांत पहिल्या पक्षी व्याहतिदोष म्हणजे विरोध येतो. दुसर्‍या पक्षी आत्माश्रयादि दोष येतात. त्याचप्रमाणें क्रिया, जाती इत्यादिकांस लावून पहावें. ॥५१॥

जेथें विकल्पाचाही स्पर्श नाहीं व त्याच्या अभावाचाही स्पर्श नाहीं अशी जी आत्मवस्तू तिचेठायी कल्पितत्त्व, लक्ष्यत्व संबंध, द्रव्य इत्यादि कल्पित आहेत. असेनात बापडे !! ॥५२॥

असोयाप्रमाणें वाक्याचा अर्थ करुन त्याचें जें अनुसंधान राखणें यालाच श्रवण असें म्हणतात, व तोच अर्थ साधक व बाधक प्रमाणांनी मनांत घोळवून त्याची उपपत्ति युक्तीनें बसविणें, त्याला मनन असें म्हणतात. ॥५३॥

श्रवण आणि मनन या दोहोंच्या योगें निःसंशयपणें जो सिद्धांत ठसला त्या चेठायी एकसारखें जें चित्ताचें स्थापन, त्याला निदिध्यासन असें म्हणतात. ॥५४॥

या निदिध्यासाची जी परिपाकदशा तीच समाधि होय. तो समाधि असा. वर जो निदिष्यास सांगितला त्यामध्यें ध्याता, ध्यान आणि ध्येय ही त्रिपटी भासते. तेथील ध्याता व ध्यान योगाभ्यासानें क्रमानें परित्यागून चित्त जेव्हां केवळ ध्येयरुपच होऊन निर्वातस्थळी ठेवलेल्या दिव्याप्रमाणें निश्चळ राहतें त्यास समाधि असें म्हणतात. ॥५५॥

या समाधिकाळीं मनाच्या वृत्ति आत्मगोचर असतात; म्हणून लक्ष्यांत येत नाहींत. परंतु त्या अगदीं नाहींत असें समजूं नये. कारण, समाधींतून उठलेला मनुष्य " मी इतका वेळ समाहित होतों " असा आपला अनुभव सांगतों. यावरुन समाधिकालीं वृत्ति असतात असें अनुमान होतें. ॥५६॥

या आत्मगोचर वृत्ति एकामागून एक अशा आपोआप उठतात, त्यास विशेष प्रयत्नाची गरज नाहीं. कारण, पूर्वीचा निदिध्यास वारंवार दृढ होत असल्यामुळें व वृत्तीस आत्मसुखाची एकदां लालच लागल्यानें ती पुनः पुनः आत्म्यालाच व्यापावयास जाते. ॥५७॥

" यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमास्मृता, " इत्यादि श्लोकांनी भगवंतांनी अर्जुनास जो निर्विकल्पसमाधि सांगितला त्याचाहि अभिप्राय हाच आहे. ॥५८॥

आतां या समाधीचें प्रथम अवांतर फल सांगून नंतर मुख्य फळ सांगतो. या अनादि संसाराचेठायीं अनेक जन्मांपासून केलेलें अनंत संचित कर्म या समाधीच्या योगानें सर्व नाशाप्रत पावतें, आणि साक्षात्कारास साधनभूत असा शुद्ध धर्म अधिकाधिक वाढतो. ॥५९॥

या निर्विकल्प समाधीस मोठमोठ्यांनी धर्ममेघ असें नांव ठेविलें आहे. कारण, या मेघांतून धर्मामृताच्या धारा सहस्त्रशः वाहतात. ॥६०॥

हे अवांतर फल झालें. आतां मुख्य फल ऐका. या समाधीचे योगानें " हा मी " " हे माझे " इत्यादिक ज्या अनेक वासना त्या सर्व जळून जाऊन व ज्ञानाला आड येणारीं पुण्यपापाख्य कर्मे त्यांचें उन्मूलनं होऊन, ॥६१॥

पूर्वी परोक्षत्वेंकरुन समजलेलें जें तत्त्वमस्यादि वाक्य तेंच प्रतिबंधरहित तळहातींच्या आंवळ्याप्रमाणें स्पष्टपणें अपरोक्श ज्ञान करुन देतें. ॥६२॥

आतां परीक्ष व अपरोक्ष ज्ञानाचें फळ सांगून हें प्रकरण आटपतों. गुरुमुखापासून प्राप्त झालेलें जें महावाक्यजन्य परोक्षज्ञान तें उत्तम रीतीनें झालें असतां बुद्धिपूर्वक केलेलें पाप जळून जातें. हें फळ केवळ श्रद्धाजन्य परोक्षज्ञानाचें नव्हे; तर श्रवणमननापासून झालेलें जें दृढ परोक्षज्ञान त्याचें हें फल आहे हें पक्कें भ्यानांत ठेवावें. ॥६३॥

तसेंच, सद्गुरुच्या मुखापासून व त्याच्या कृपेनें प्राप्त झालेलें महावाक्यजन्य संशयविपर्यरहित असें अपरोक्ष ज्ञान झालें असतां, सूर्योदयानें जसा काळोख अगदीं नाहींसा होतो, त्याप्रमाणें, संसाराला कारणीभूत जें अज्ञान तें समूळ नष्ट होतें. ॥६४॥

॥ आर्या ॥ यापरि तत्त्वविवेका करुनि विधीनें मनासि शांत करी ॥

॥ संसृतिबंधन तुटुनी मोक्षाची तुज मिळेल पदवि खरी ॥६५॥

तत्वविवेक समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 13, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP