तत्वविवेक - श्लोक २१ ते ४०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


पंचभूतांच्या सत्त्वांशानीं जशी ज्ञानेद्रियें बनलीं. तशीच आकाशापासून पृथ्वीपर्यंत प्रत्येक भूतांच्या रजोंशापासून क्रमानें वाणी, हस्त, पाद, गुद आणि उपस्थ हीं कर्मेद्रियें बनलीं. ॥२१॥

आणि सर्वाच्या सत्त्वांशाच्या मिश्रणानें असें अंतः करण बनलें तसाच सर्वाच्या रजोगुणांशाच्या मिश्रणानें प्राण बनला. या प्राणाचेही पुनः स्थानभेदेंकरुन पांच प्रकार झाले; ते हे, - प्राण, अपान, व्यान, उदान, आणि समान. ॥२२॥

याप्रमाणें पांच ज्ञानेंद्रियें, पांच कर्मेद्रियें, पंच प्राण, मन आणि बुद्धि हीं सत्रा मिळून एक सूक्ष्म शरीर झालें आहे. यालाच वेदांती लिंगशरीर असें म्हणतात. ॥२३॥

पूर्वी सांगितलेला जो प्राज्ञ तो जेव्हां या लिंगशरीरास मी मी असें म्हणतो, तेव्हां त्यासच तैजस असें नांव प्राप्त होतें. यास तैजस म्हणण्याचें कारण हेंच कीं, अंतः करण स्वतः तेजोमय आहे. तें अंतः करण या शरीरामध्यें मुख्य असल्यामुळें त्याच्या अभिमानी जीवास तैजस हें नांव दिलें. पूर्वोक्त जो मायाप्रतिबिंबित ईश्वर तो जेव्हां अशा शरीराचा अभिमानी होतों, तेव्हां त्यास हिरण्यगर्भ असें म्हणतात. तैजस आणि हिरण्यगर्भ या दोहोंमधील भेद इतकाच कीं, तैजस हा व्यष्टिरुप आहे, आणि हिरण्यगर्भ समाष्टिरुप आहे. ॥२४॥

सर्व लिंग शरीराचा अभिमान ईश्वरास असल्यामुळें तो समाष्टिरुप आहे. आणि जिवास केवळ एकच व्यक्तीचा अभिमान असल्यामुळें तो व्यष्टि ( व्यक्ती ) होय. ॥२५॥

याप्रमाणें लिंग शरीर व त्याचे अभिमानी तैजस आणि हिरण्यगर्भ क्रमेंकरुन सांगितलें. आतां स्थूलशरीराचा विचार करुं. सूक्ष्म पंचभूतांपासून जसें सूक्ष्म शरीर झालें, तसें स्थूळ पंचभूतांपासून स्थूळ शरीर झालें. सूक्ष्मापासून स्थूळ होण्याचा जो प्रकार त्यांस वेदांतात पंचीकरण अशी संज्ञा आहे. जिवांना सुखदुःखाचा भोग व्हावा, म्हणून भोग्य म्हणजे विषय व भोगायतन म्हणजे शरीरें हीं परमेश्वरानें पंचीकरणाचे योगानें उत्पन्न केलीं. ॥२६॥

पंचीकरण म्हणजे सूक्ष्म किंवा शुद्ध पंचभूतांपैकी प्रत्येक भूतांत, इतर चार भूतांचे कांही नियमित अंश घालून तयार झालेलें मिश्रण. यांचा प्रकार असा - पहिल्यानें प्रत्येक भूताचे बरोबर दोन दोन भाग केले. त्या दोन दोन भागांपैकी एक एक तसाच ठेवून बाकी प्रत्येक अर्ध्या भागाचे पुनः चार चार समभाग पाडले; तेव्हा अर्थातच हा एक भाग एक अष्टमांश झाला. मग प्रत्येक भूताचें अर्ध्या भागांत दुसर्‍या प्रत्येक अर्धुकाचा चौथा भाग म्हणजे पूर्वोक्त एक अष्टमांश मिसळून पांचा पांचावें असें प्रत्येक भूत तयार केले. यालाच पंचीकरण असें म्हणतात. हें खालीं लिहिलेल्या कोष्टकावरुन स्पष्ट ध्यानांत येईल. ॥२७॥

अशा पंचीकृत भूतांपासून ब्रह्मांडें व त्यांतील चतुर्दश भुवनें व त्या त्या भुवनांतील प्राण्यांनी खाण्याची अन्नें व त्या त्या लोकांस योग्य अशीं शरीरें ईश्वराचे आज्ञेने निर्माण झालीं. या सर्व स्थूल सृष्टीचा जो एक अभिमानी त्यास वैश्वानर असें म्हणतात. पूर्वोक्त जो हिरण्यगर्भ तोच येथें वैश्वानर होतो. ॥२८॥

आणि प्रत्येक सूक्ष्म देहाचे निरनिराळे अभिमानी तैजस तेच येथें विश्व होतात. या विश्वकोटींत देव, मनुष्य, पशु व पक्षी यां सर्वांचा समावेश होतो. हे सर्व देवादिक जीव बहिर्मुख आहेत. त्यामुळें त्यांना स्वस्वरुपाचें ज्ञान नाही. ॥२९॥

म्हणूनच सुखदुःख भोगण्याकरितां मनुष्यादि शरीरें धारण करुन ते जीव त्या त्या शरीरास योग्य अशीं कर्में करितात, आणि देवादि शरीरें धारण करुन त्या त्या कर्माचीं फळें भोगतात. भोगानंतर पुनः कर्म करावेंसें वाटतें, पुनः तें भोगावे लागतें. याप्रमाणें कर्मानंतर भोग व भोगानंतर पुनः कर्म करावेंसें वाटतें, पुनः तें भोगावें लागतें. याप्रमाणे कर्मानंतर भोग व भोगानंतर कर्म असें एक सतत रहाटगाडगें चाललें आहे. नदीच्या भोंवर्‍यांत पडलेल्या कीटकाप्रमाणें, या जन्ममरणाच्या फेर्‍यांत पडल्यामुळें जीवास शांति मिळत नाहीं. ॥३०॥

मग ज्याप्रमाणें नदीतील कीटक सुदैर्वेकरुन एकाद्या दयाळू पुरुषाचें हातून त्या प्रवाहांतून सुटका पावून तीरों असणार्‍या वृक्षाचे छायेंत येऊन विश्रांति पावतात. ॥३१॥

त्याप्रमाणें जीवही ब्रह्मवेत्त्या सत्पुरुषाची गांठ पडून त्याच्या उपदेशानें पंचकोशांचा विवेक करुन उत्तम मोक्षमुख पावतात. ॥३२॥

ते पंचकोश अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि, आनंदमय, या नांवानें प्रसिद्ध आहेत. या पांच वेष्टनांत आत्मा गुंडाळला असल्यामुळें आपल्या स्वरुपाला विसरुन जन्ममरणरुप संसार पावतो. कोशांत सांपडलेला कीटक नैसा आंतल्याआंत धडपडतो, त्याप्रमाणें आत्म्याचीही अवस्था झाल्यामुळें वरील अन्नादि आच्छादनांस कोश असें म्हणतात. ॥३३॥

आतां त्या कोशाची स्वरुपें क्रमेंकरुन सांगतों. पंचीकृत भूतांपासून झालेला जो रथूल देह त्यासच अन्नमय त्यासच अन्नमय कोश म्हणतात. लिंगशरीरीं असलेले जे रजोगुणात्मक पांच प्राण व पांच कर्मेद्रियें इतकी मिळून प्राणमय कोश होतो. ॥३४॥

पंचभूतच्या मत्त्वांशानें बनलेलें संशयात्मक मन व पांच ज्ञानेद्रियें मिळून मनोमय कोश समजावा, व त्याच ज्ञानेंद्रियांसहित निश्चयात्मिका जी बुद्धि ती विज्ञानमय कोश. याप्रमाणें प्राणादिक तीनही कोश एका लिंगशरीरांतच मावले गेले. ॥३५॥

कारण शरीरांत जो मलिन सत्त्वांश आहे, तोच आनंदमय कोश. याच्या वृत्ति तीन आहेत. प्रिय, मोद आणि प्रमोद. प्रियवृत्ति म्हणजे - इष्टदर्शनापासून होणारी. सोदवृत्ति म्हणजे - इष्टवस्तूच्या लाभापासून होणारी; आणि इष्टविषयाच्या भागापासून उत्पन्न होणारी ती प्रमोदवृत्ति होय. आत्मा त्या त्या कोशाच्या तादात्म्यानें त्या त्या कोशाशीं तन्मय होऊन गेला आहे. ॥३६॥

याप्रमाणें स्थूल शरीरांत एक, सूक्ष्म शरीरांत तीन आणि कारण - शरीरांत एक असें पांच कोश झाल. या पंच काशांपासून अन्वयव्यतिरेकाचे योगानें आत्म्याचें विवेचन ( पृथक्करण ) करुन, तो सच्चिदानदरुप आहे, असा मनुष्याच्या बुद्धीस निश्चय झाला असतां तो ब्रह्मच होतो. ॥३७॥

अन्यव व्यतिरेकाचे योगानें असें जें आम्ही म्हटलें त्याचा अर्थ येथें सांगणें अवस्थ आहे. अन्वय म्हणजे ण्खाद्या गोष्टीचें किंवा स्थितीचें दुसर्‍याबरोबर असणें आणि व्यतिरेक म्हणजे तिच नसणें. ‘ अमुक गोष्ट असली तर अमुक असलीच पाहिजे ’ असा जो नियम त्यास अन्वय असें म्हणतात. आणि ‘ एक नसेल तर दुसरीही असणार नाहीं ’ या नियमास व्यतिरेक असें म्हणतात. हे दोन नियम लावून पाहिले असतां दोन गोष्टीचें साहचर्य किंवा कार्यकारणभाव चांगला समजतो. आतां हे नियम आत्मविवेचनास लावून दाखवितों. स्वप्नावस्थेंत स्थूल देह जो अन्नमय कोश याचें मुळींच भान नसून स्वप्न पाहणारा जो साक्षी आत्मा त्याचें भान असतें. म्हणून येथें स्थूल देहाचा व्यतिरेक असून आत्म्याचा अन्वय आहे. म्हणून आत्मा नित्य आणि स्थूल देह अनित्य असें अन्वयव्यतिरेकानें सिद्ध झालें. ॥३८॥

तसेंच, सुषुप्तीमध्यें लिंगदेहाचें मुळींच भान नाहीं म्हणून येथें लिंगदेहाचा व्यतिरेक आहे आणि अभावसाक्षित्वें करुन आत्म्याचें येथेंही स्फुरण आहे, म्हणून त्याचा येथें अन्वय आहे; म्हणून त्याचा नियमावरुन आत्मा नित्य आणि लिंगदेह अनित्य असें ठरलें. ॥३९॥

वर आम्ही पंचकोशविवेचन करण्याचा उपक्रम करुन, अन्नमय कोशाच्या विवेचनानंतर दुसरा जो प्राणमय कोश तो येथें सांगणें योग्य असून मध्येंच लिंगदेह कोठून आणिला, अशी कोणी शंका घेईल, तर तिचें समाधान असें आहे कीं, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय या तीनही कोशांचा समावेश एका लिंगदेहांतच होतो असें आम्हीं पूर्वीच सांगितलें आहे, तेव्हां त्या लिंगशरीराचें विवेचन केलें असतां अर्थातच गुण आणि अवस्थाभेदेंकरुन, प्राणादिक तीन कोशाचें विवेचन झाल्यासारखेंच आहे. ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 13, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP