अध्याय चवथा - श्लोक २५१ से २८३

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


द्वादश वर्षे यासी भरतां ॥ एक द्विज येईल अवचिता ॥ प्रार्थोनियां दशरथा ॥ घेऊन यासी जाईल ॥५१॥

आरंभीं सोडोनि एक बाण ॥ राक्षसी वधील दारुण ॥ गोब्राह्मणमाखपाळण ॥ करील जाण पुत्र तुझा ॥५२॥

कृशान प्रवेशे शुष्कविपिनीं ॥ तैसा जाळील राक्षस मुखरक्षणीं ॥ पुढें चरणस्पर्शेकरूनी ॥ एक ललना उद्धरील ॥५३॥

परम प्रचंड कोदंड ॥ तें स्वदंडबळें करील दुखंड ॥ एकपत्नीव्रत प्रचंड ॥ वीर होईल त्रिभुवनीं ॥५४॥

महायोद्धा एक ब्राह्मण ॥ त्यास जिंकील न लगतां क्षण ॥ बंधुसहित परतोन ॥ अयोध्येसी येईल ॥५५॥

राज्यीं बैसतां हा वरिष्ठ ॥ एक होईल महा अरिष्ट ॥ नगरलोक पावतील कष्ट ॥ खेद उत्कट करितील ॥५६॥

हा नरवीर पंचानन ॥ प्रेमें पाळील पितृवचन ॥ मग स्त्रीसमवेत ॥ कानन ॥ चतुर्दश वर्षें सेवील ॥५७॥

हा नसतां आश्रमांत ॥ एक राक्षस येईल अकस्मात ॥ याचे स्त्रियेस नेईल सत्य ॥ षण्मासपर्यंत निर्धारें ॥५८॥

मग हा स्त्री शोधित अरण्यांत ॥ वानर मिळतील अकस्मात ॥ एक वानर उन्मत्त ॥ त्यास मारील हा न कळतां ॥५९॥

ब्रह्मांड नाचवील नखाग्नीं ॥ ऐसा एक वानरकेसरी ॥ जाऊन समुद्रसंभवपुरीं ॥ महाप्रळय करील तो ॥२६०॥

शुद्धि आणितां राघवेंद्र ॥ पाषाणीं पालाणील समुद्र ॥ शरण येईल एक रजनीचर ॥ चिरंजीव त्यासी करील हा ॥६१॥

मारूनि राक्षसां सकळां ॥ सोडवील सुरांच्या बंदिशाळा ॥ मागुती येईल स्वस्थळा ॥ अयोध्यापुरा गजरेंसीं ॥६२॥

अकरा सहस्र संवत्सर ॥ राज्य करील हा राजेंद्र ॥ पुढें पुत्रासी युद्ध थोर ॥ करील कौतुकें करूनियां ॥६३॥

शेवटीं अयोध्या विमानीं घालोनी ॥ नेऊन ठेवील वैकुंठभुवनीं ॥ ऐसें जातक ऐकोनि कर्णीं ॥ राव दशरथ तोषला ॥६४॥

स्तनपान करितां रघुनंदन ॥ पाहे वसिष्ठाकडे परतोन ॥ कीं वाल्मीकभाष्य संपूर्ण ॥ कथिलें येणें अवलीलें ॥६५॥

तों सुमित्रेसी जाहला पुत्र ॥ म्हणोनि धांवत आले विप्र ॥ क्षीरसागरींहूनि श्रीधर ॥ कौसल्येमंदिरी पातला ॥६६॥

तंव तो भोगींद्र पाळती घेत ॥ पाठिराखा पातला त्वरित ॥ सुमित्रेचे शेजे रिघत ॥ बाळदशा धरोनियां ॥६७॥

सुमित्रा स्वप्न देखत ॥ कीं मज जाहला सुलक्षण सुत ॥ सावध होवोनियां पाहत ॥ पुढें खेळत बाळक तो ॥६८॥

ऐसा जन्मला सुमित्रानंदन ॥ विप्रांसहित दशरथ येऊन ॥ तात्काळ केलें पुण्याहवाचन ॥ जातकर्मादि सर्वही ॥६९॥

कैकयीस जाहले दोन कुमर ॥ ते विष्णूचे शंखचक्र अवतार ॥ परी कैसे जन्मले तो विचार ॥ कैकयीस नेणवे ॥२७०॥

सुषुप्तीमाजी कैकयी निमग्न ॥ जैसा पंकगर्तेत पाषाण ॥ पुत्र येऊनि दोघेजण ॥ दोहींकडे खेळताती ॥७१॥

दासी येऊन कैकयीप्रति ॥ थापटोनि जागी करिती ॥ दोघे पुत्र जन्मले निश्र्चितीं ॥ सावध होऊन पाहें पां ॥७२॥

कैकयी पाहे पुत्रमुख ॥ तों मित्र आणि मृगांक ॥ तेंवि दोघे खेळती बाळक ॥ देखतां सुख वाटलें ॥७३॥

रायें तेथेंही येऊन ॥ अवलोकिले दोघे नंदन ॥ सुखी केले याचकजन ॥ वस्त्राभरणें करूनियां ॥७४॥

बारा दिवसपर्यंत ॥ महोत्साह राव करित ॥ मंगळतुरे गर्जत ॥ रात्रंदिवस राजगृहीं ॥७५॥

तेरावे दिवशीं वसिष्ठऋषि ॥ नामकरण ठेवी चौघांसी ॥ कौसल्येचा राम तेजोराशी ॥ जो वैकुंठवासी जगदात्मा ॥७६॥

सुमित्रेचा नंदन ॥ त्याचें नाम ठेविलें लक्ष्मण ॥ जो काद्रवेयकुलभूषण ॥ विष्णु शयन ज्यावरी करी ॥७७॥

कैकयीचे जे कां सुत ॥ भरत शत्रुघ्न निश्र्चित ॥ चौघे दशरथी जगविख्यात ॥ ऐका चरित्र तयांचें ॥७८॥

ज्यांची जन्मकर्मलीला ऐकतां ॥ पळ सुटे सर्व दुरितां ॥ जैसा महाप्रभंजन सुटतां ॥ जलदजाळ वितळे पैं ॥७९॥

श्रीरामकथा मानससरोवर ॥ तुम्ही संत श्रोते राजहंस चतुर ॥ साहित्य मुक्तें सुढाळ थोर ॥ सेवा निरंतर आदरें ॥२८०॥

श्रीरामकथा सुधारस ॥ तुम्ही पंडित श्रोते त्रिदश ॥ प्राशन करा सावकाश ॥ अति सुरस ग्रंथ हा ॥८१॥

पुराणपुरुष परात्पर ॥ तो ब्रह्मानंद श्रीधरवर ॥ अयोध्येंत अवतरला साचार ॥ त्याचें चरित्र परिसा पुढें ॥८२॥

स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥

चतुर्थाध्याय गोड हा ॥२८३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 12, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP