अध्याय चवथा - श्लोक १५१ से २००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


ऐसी वसिष्ठांचीं वचनें ॥ कीं स्वानंदनभींचीं उडुगणें ॥ कीं सत्यवैरागरींचीं रत्नें ॥ निवडोनि दीधलीं दशरथा ॥५१॥

तेणें कर्णद्वारें त्वरित ॥ सांठविलीं हृदयसंदुकेंत ॥ धांवोनि गुरूचे पाय धरित ॥ म्हणे कृतार्थ जाहलों मी ॥५२॥

असो भरलिया नवमास ॥ प्रसूतिसमय कौसल्येस ॥ कवण ऋतु कवण दिवस ॥ सावकाश ऐका तें ॥५३॥

वसंतऋततु चैत्रमास ॥ शुक्लपक्ष नवमी दिवस ॥ सूर्यवंशीं जगन्निवास ॥ सूर्यवासरीं जन्मला ॥५४॥

माध्यान्हा आला चंडकिरण ॥ पुष्य नक्षत्र साधून ॥ अवतरला रघुनंदन ॥ पूर्णब्रह्म जगद्रुरू ॥५५॥

श्रीराम केवळ परब्रह्म ॥ त्यासी जाहला म्हणतां जन्म ॥ संत हांसतील परम ॥ तत्त्वज्ञानवेत्ते जे ॥५६॥

ज्याची लीला ऐकतां अपार ॥ खंडे जन्म मृत्यु दुर्धर ॥ त्या रामासी जन्मसंसार ॥ काळत्रयीं घडेना ॥५७॥

दाविली लोकिक करणी ॥ कीं कौसल्या जाहली गर्भिणी ॥ तो ब्रह्मानंद मोक्षदानी ॥ जन्मकर्म त्या कैंचें ॥५८॥

क्षीरसागरींहून नारायण ॥ येऊन अयोध्येसी जाहला सगुण ॥ शेष लक्ष्मीसहित जगज्जीवन ॥ तैसाचि तेथें संचरला ॥५९॥

जे अनंत कल्याणदायक ॥ अज अजित निष्कलंक ॥ भक्त तारावयासी देख ॥ जगन्नायक अवतरला ॥१६०॥

देव करिती जयजयकार ॥ करोनि राक्षससंहार ॥ म्हणती आतां अवतरेल हा रघुवीर ॥ बंधमुक्त करील आम्हां ॥६१॥

असो अयोध्यापुरीं निराळीं ॥ विमानांची दाटी जाहली ॥ दुंदुभीची घाई लागली ॥ पुष्पें वर्षती अपार ॥६२॥

असो ते कौसल्या सती ॥ बैसली असतां एकांतीं ॥ तों अष्टदश वरुषांची मूर्ति ॥ सन्मुख देखे अकस्मात ॥६३॥

निमासुर वदन सुंदर ॥ तेजें भरलें निजमंदिर ॥ ज्या तेजासी शशी मित्र ॥ लोपोनि जाती विलोकितां ॥६४॥

पदकमलमकरंदसेवना ॥ भ्रमरी जाहली क्षीराब्धिकन्या ॥ कदाही न विसंबे चरणां ॥ कृपण धनालागीं जैसा ॥६५॥

संध्याराग अरुण बालार्क ॥ दिव्य रत्नांचे काढिले रंग देख ॥ तळवे तैसे सुरेख ॥ श्रीरामाचे वाटती ॥६६॥

चंद्र क्षयरोगें कष्टी होऊनि ॥ निजांगाची दश शकलें करोनि ॥ सुरवाडला रामचरणीं ॥ स्वानंदधणी घेतसे ॥६७॥

रमा पदीं रंगली दिवसनिशीं ॥ तों बंधु पाहुणा आला शशी ॥ तोही राहिला अक्षय व्हावयाची ॥ नव जायची माघारा ॥६८॥

ध्वज वज्रांकुश पद्म ॥ ऊर्ध्वररेखा चक्रादि चिन्हें उत्तम ॥ यांचा अर्थ ऐकतां परम ॥ सुख होय भक्तांसी ॥६९॥

सात्त्विक प्रेमळासी देखा ॥ ऊर्ध्व संकेत दावी ऊर्ध्वररेखा ॥ सत्यशील धार्मिकां भाविकां ॥ ऊर्ध्वपंथ दाविती ॥१७०॥

विद्यामंदें मत्त गज ॥ एक भाग्यमंदें डुलती सहज ॥ त्यांसी आकर्षावया सहज ॥ अंकुश पायीं झळकतसे ॥७१॥

पायीं झळके दिव्य पद्म ॥ तें पद्मेचें राहतें धाम ॥ ते जगमाउली सप्रेम ॥ तये पदीं सुरवाडली ॥७२॥

अहंकार जड पर्वत ॥ शरणागतां बाधक यथार्थ ॥ तो फोडावयासी तळपत ॥ वज्र पायीं रामाच्या ॥७३॥

भवसागर तरावया गहन ॥ जहाज अद्भुत रामचरण ॥ त्यावरी ध्वजविराजमान ॥ रात्रंदिन तळपतसे ॥७४॥

काम क्रोध दुर्धर असुर ॥ त्यांचें छेदावया शिर ॥ दैदीप्यमान दिव्य चक्र ॥ रामतळवां झळकतसे ।७५॥

मळरहित प्रपद सुंदर ॥ घोंटीव त्रिकोणयंत्राकार ॥ इंद्रनीळ उपमा साचार ॥ न पुरती कठीण म्हणोनियां ॥७६॥

पदतलें आरक्त साजिरीं ॥ वसे तेथें सरसिजोद्भवकुमरी ॥ विश्रांति घ्यावया अहोरात्रीं ॥ रामचरणीं रंगली हो ॥७७॥

किती पापें हरावीं दिवरजनीं ॥ म्हणोनि श्रमली जन्हुनंदिनी ॥ शुभ वांकी होऊनी ॥ रामचरणीं विराजे ॥७८॥

मांड्या सुकुमार सांवळिया ॥ तेथें सुरवाडली मित्रतनया ॥ कीं यमनुजा अपवाद चुकवावया ॥ महदाश्रय करितसे ॥७९॥

ऐशी रामपदीं त्रिवेणी साचार ॥ प्रयाग तीर्थराज पावन थोर ॥ प्रेमें माघमासीं सभाग्य नर ॥ प्रातःस्नानासी धांवती ॥१८०॥

भक्त मुमुक्षु साधक संत ॥ हेचि राजहंस विराजत ॥ वांकीवरी रत्नें तळपत ॥ तेचि तपस्वी तपताती ॥८१॥

चरणध्वज झळके स्पष्ट ॥ तोच जाणिजे अक्षय वट ॥ जेथें सनकादिक वरिष्ठ ॥ क्षेत्रसंन्यासी जाहले ॥८२॥

प्रयागीं मोक्ष देह त्यागितां ॥ येथें मोक्ष श्रवण करितां ॥ देहीं असतां विदेहता ॥ येते हाता भक्तांच्या ॥८३॥

त्या प्रयागीं कष्ट बहुत ॥ येतां जातां भोगिती अमित ॥ हा प्रयाग ध्यानीं अकस्मात ॥ प्रकटे सत्य भक्तांच्या ॥८४॥

तोडर वांकी नूपुरें ॥ असुरांवरीं गर्जती गजरें ॥। वाटे नभ गाळोनि एकसरें ॥ पोटऱ्या जानू ओतिल्या ॥८५॥

की सरळ कर्दळीचे स्तंभ ॥ कीं गरुडपाचूंचे उगवले कोंभ ॥ कीं इंद्रनीळ गाळोनि सुप्रभ ॥ जानू जंधा ओतिल्या ॥८६॥

मिळाल्या सहस्र चपळा ॥ तैसा कांसे झळके पीतांबर पिवळा ॥ वरी तळपे कटिमेखळा ॥ पाहतां डोळां आल्हाद ॥८७॥

कटिमेखळेवरी महामणी ॥ कीं पंक्ती बैसले वासरमणी ॥ दाहकत्व सांडूनि जघनीं ॥ श्रीरामाच्या लागले ॥८८॥

वेदांतींच्या श्रुति गहन ॥ अर्थ बोलती जेवि शोधून ॥ तैशा क्षुद्रघंटा रुणझुण ॥ शब्द करिती रसाळ ॥८९॥

देखून कटिप्रदेश सुकुमार ॥ लाजोनि वना गेला मृगेंद्र ॥ वाटे त्या दुःखें स्वशरीर ॥ वान केलें दुर्गेचें ॥१९०॥

गंभीरावर्त नाभिस्थन ॥ जेथें जन्मला चतुरानन ॥ सत्व रज तम गाळून ॥ त्रिवळी उदरीं विराजे ॥९१॥

कौस्तुभतेज अपार ॥ पाहतां भुलती शशिमित्र ॥ गुणीं ओंविलीं नक्षत्रे समग्र ॥ मुक्ताहार डोलती तेंवि ॥९२॥

कीं त्या मुक्तांच्या माळा बहुत ॥ रघुपतीच्या गळां डोलत ॥ कीं मुक्तारूपें समस्त ॥ अनंत ब्रह्मांडें गुंफिलीं ॥९३॥

मुक्तामाळांचें तेज गहन ॥ परी त्यांचा पालटला वर्ण ॥ दिसती इंद्रनीळासमान ॥ श्यामलांगीं रघुपतीच्या ॥९४॥

नीळ गगनावरी सुंदर ॥ मंदाकिनीओघ दिसे शुभ्र ॥ तैसा अम्लान सुमनहार ॥ श्यामतनूवरी शोभत ॥९५॥

श्यामलांगी अति निर्मळ ॥ वरी डोले वैजंतीची माळ ॥ पुष्करीं शक्रचाप सुढाळ ॥ सुरंग जैसें मिरवतसे ॥९६॥

मीं मेघीं स्थिरावली क्षणप्रभा ॥ तैशी वैजयंतीची शोभा ॥ सहस्रमुखाच्या जिभा ॥ गुण वर्णितां शिणल्या हो ॥९७॥

अनंत भक्त हृदयीं धरिले ॥ तरीच वक्षःस्थळ रुंदावलें ॥ ब्रह्मानंद मुरोनि ओतिलें ॥ हृदयस्थान सत्य पैं ॥९८॥

श्रीवत्स झळके सव्यांगीं ॥ श्रीनिकेतन वामभागीं ॥ उटी शोभे श्यामलांगीं ॥ कोण्या दृष्टांतें तें ऐका ॥९९॥

मित्रकन्येवरी जान्हवीजळ ॥ कीं राकाइंदुप्रभेनें शोभे निराळ ॥ कीं दैदीप्य मणि इंद्रनीळ ॥ आवरण त्यावरी काश्मिराचें ॥२००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 12, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP