-
स्त्री. संवय ; खोड . तरुणपणाची ऐट आणण्याची विलक्षण हात होती . - महाराष्ट्रशारदा , नोव्हेंबर १९३६ .
-
पु.
- हस्त ; बाहु ; खांद्यापासून बोटांपर्यंत शरीराचा भाग . कोपरापासून बोटांपर्यंतचा भाग .
- कोपरापासून मधल्याबोटाच्या टोकापर्यंतचें माप . हा पंचा साडेचार हात भरला .
- उजवी किंवा डावी बाजू . तरफ . आमचें घर वाडयाचे उजव्या हातास आहे .
- ताबा ; आटोका ; अधिकार ; खातें . तुझें काम करणें माझ्या हातीं नाहीं . ( कारक विभक्तींत प्रयोग ).
- स्वतः व्यक्तिगत मनुष्य . अपराधावांचून शिवी देणें हें माझ्या हातानें घडणार नाहीं .
- स्वामित्व ; कबजा ; मालकी ; ताबा . सांप्रत माझ्या हातीं पैसा नाहीं .
- हातानें वाजविण्याच्या वाद्यावर मारलेली हाताची थाप .
- डाव ; खेळ ( काठी , लाठी , पट्टा इ० शस्त्रांचा ). पट्टयाचे दोन हात करून दाखव .
- कर्तृत्वशक्ति ; अंग ; हस्तकौशल्य ( एखाद्या विषयांतील , कलेंतील ). त्याचा चित्र काढण्याचा हात चांगला आहे .
- कुलुपाची किल्ली ; चावी . कुलपाचा हात इकडे दे बघूं .
- सोंगटया , पत्ते इ० खेळांतील डाव , खेळण्याची पाळी , खेळ ; खेळणारा गडी . अजून आमच्यांतील एक हात खेळावयाचा आहे .
- हस्तक ; मदतनीस ; साहाय्यक ; हाताखालचा मनुष्य .
- ज्यावर दंड , जोर काडावयाचे तो लांकडी , दगडी ठोकळा ; हत्ती
- ( रंग देणें , सारवणें इ० कामीं ) वरून हात फिरविणें ; हातानें दिलेला थर , लेप .
- ठोंसा ; तडाखा ; हस्तक्रिया ( भिन्नभिन्न प्रसंगीं त्या त्या अर्थांनीं ).
- ( तेली - घाणा ) कातरीस जोडलेला वांकडा लाकडी तुकडा .
- हात टेकावयासाठीं , हातानें धरावयाचा कोणताहि पदार्थाचा भाग . खुर्चीचे - रहाटाचे - हात .
- हाताच्या आकाराची कोणतीहि वस्तु .
- ( सोनारी ) हातांतील दागिना सैल करण्याचें एक हत्यार .
- ( नृत्य ) दोन हातांनीं मिळून करावयाचे अभिनयाचे प्रकार . हे ४० प्रकारचे आहेत .
- ( शिंपी ) कापड मोजण्याचें बारा तसूंचें एक माप ; गज .
- पान्हा ( नटबोलट फिरविण्याचा ). [ सं . हस्त ; प्रा . हत्थ ; हिं . गु . हाथ ; बं . हात ; आर्मे . जि . हय , अथ ; पॅलेस्टाईनजि . हस्त ; पोर्तुजि . बस्त ]
म्ह०
- हात ओला तर मैत्र भला - नाहींतर पडला अबोला - जोपर्यंत माणूस दुसर्यास देत असतो तोंपर्यंत त्याच्याशीं सगळे मित्रत्वानें वागतात.
- हात घशांत घातला तरी कोरडाच = कितीहि मदत केली तरी बेइमान राहणारा .
- हातपाय रोडया , पोट लोडया ; हातपाय काडया , पोट ढेर्या = पोटाचा तटतटीतपणा व अवयवांचा रोडकेपणा .
- हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे , तोंड फिरे तेथें अवदसा फिरे = उद्योगी माणसाचा हात श्रीमंती आणतो तर नुसत्या बडबडयाच्या हातून कांहींच होत नाहीं उलट दारिद्रय येतें .
- आपला हात जगन्नाथ ( जगन्नाथपुरीस आपल्या हातानें वाटेल तेवढा प्रसाद घेतां येतो त्यावरून ) वाटेल तेवढें व तसें घेणें ; प्राचुर्य .
- हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये = जें खात्रीनें आपलें आहे ( आपणांस मिळावयाचेंच आहे ) तें सोडून जे अनिश्चित आहे तें मिलविण्याच्या नादीं लागूं नये .
- हातच्या कांकणास आरसा कशाला ? ( हातांतील कांकण डोळयानें दिसण्यासारखें आहे , आरसा आणणें वेडेपणा )= जी गोष्ट उघड सिध्द आहे ती दाखविण्यास पुराव्याची जरूरी नाहीं .
- हातपाय र्हावलें काम करूं वायले = नाइलाज होणें .
- हातपाय लुले तोंड चुरचुरां चाले = अशक्त पण तोंडाळ , मुजोर माणूस .
- हातभर लांकूड नऊ हात ढलपी = अतिशयोक्ति करणें .
- हातांत नाहीं अडका बाजारांत चालला धडका = जवळ कवडी नाहीं पण डौल बादशहाचा . ( वाप्र . )
-
०आंखडणें देण्यासाठीं पुढें केलेली वस्तु एकदम मागें घेणें ; देण्याचें प्रमाण कमी करणें , बंद करणें .
-
०आटोपणें मारणें इ० हातांनीं करावयाची कोणतीहि क्रिया बंद करणें .
Site Search
Input language: