मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय १५

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय १५

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

जन्मेजय ह्मणे हो वेदमुनी ॥ बरवें प्रकाशिलें कृपा करोनी ॥ आतां अग्रकथा मांडोनी अग्रकथा मांडोनी ॥ सांगिजोजी ॥१॥

मुनि ह्मणे गा नृपवरा ॥ संबोखोनि गजतरुवरा ॥ अजमीढ चालिला पुढारां ॥ दळभारेंसीं ॥२॥

तंव लागला पुढील सिंधु ॥ तया शरीं घालोनि बंधु ॥ अजमीढ चालिला सन्नद्धु ॥ परद्दीपमाजी ॥३॥

ऐसे सहा समुद्र तत्क्षणी ॥ शिरीं सेतुबंध करोनी ॥ गेला अजमीढ उतरोनी ॥ द्देपद्दीपें ओलांडित ॥४॥

पुढें स्वादोदक सिंधु ॥ सातवा देखिला अगाधु ॥ राव उतरला त्या सन्नद्धु ॥ दळभारेंसीं ॥५॥

तो भव्य देखोनि सागर ॥ रायें मनीं केला विचार ॥ कीं यासि घालिताम शरपंजर ॥ लागेल थोर दोष मज ॥६॥

सात्रवियासि मान देणें ॥ ऐसा हेतु धरिला मनें ॥ तंव देव आले तत्क्षणें ॥ तया ठायां ॥७॥

सुरदुंदुभी लागले ॥ तेणें प्रदीप्तसैन्य गजबजिलें ॥ ह्मणती कीं सुरवर आले ॥ धांवणेया ॥८॥

जाहली उभयसैन्यां दृष्टीं ॥ निशाणें लागलीं अनंतकोटी ॥ खळबळ प्रवर्तला मोठी ॥ पाताळलोकीं ॥९॥

वासुकी थोर गजबजिला ॥ ह्मणे पाताळावरी कोण आला ॥ मग दळभार मेळविला ॥ पन्नगांचा ॥१०॥

इकडे देवीं नारद मंत्रिला ॥ ह्मणती कटक पाहोनि येई वहिला ॥ येरु येवोनि पाहों लागला ॥ अजमीढसैन्य ॥११॥

मग जावोनि ह्मणे देवांसी ॥ गणीत नाहीं जी सैन्यासी ॥ नळानघुकांचे तुलनेसी ॥ अष्टगुण दळभार हा ॥१२॥

संदेहें व्यापोनि त्रिमुर्तीं ॥ ह्मणती आतां काय कीजे गती ॥ मुरडोनि जातां मागुती ॥ हा जाईल पाताळीं ॥१३॥

असो ऐसिये अवसरीं ॥ प्रदिप्तरावो काय करी ॥ सैन्य सन्नद्धाया झडकरी ॥ लाविलें निशाणा ॥१४॥

तेणेंनादें त्रिभुवनीं ॥ भयकंप सुटला ऐकतां कर्णीं ॥ ब्रह्मा विष्णु शूळपाणी ॥ दचकले देखा ॥१५॥

मग सावचित्त हो‍उनी ॥ विष्णु ह्मणे गा शूळपाणी ॥ आतां सैन्य चारिभाग करोनी ॥ झुंजावें यासी ॥१६॥

तें मानवोनि शिवासी ॥ ब्रह्मा पाठविला द्क्षिणेसी ॥ इंद्र पूर्वे विष्णु उत्तरेसी ॥ स्वयें पश्चिमे राहिला ॥१७॥

तव प्रदीप्त उठावला ॥ यावा चौं भोंवता साहिला ॥ उभयां संग्राम थोर जाहला ॥ पडिलें दळ अपार ॥१८॥

सांगतां युद्धाचा विस्तारू ॥ ग्रंथ वाढेल कल्पतरू ॥ देवीं मारिला दळभारू ॥ अजमीढाचा ॥१९॥

तंव क्रौंचद्दीपींचा राक्षसरावो ॥ त्याचा धनुपुत्र महाबाहो ॥ तो उठावला पहाहो ॥ पसरोनि वदन ॥२०॥

तेणें देवसैन्यं गिळिलें ॥ येक दाढां माजी रगडिले ॥ येकां चूर्णभूत केलें ॥ मोडलें देवसैन्य ॥२१॥

शतघुबडे श्वराचा नंदन ॥ जया नाम समरगण ॥ तो पक्षिदळेंसिं आपण ॥ प्रवेशला पाताळी ॥२२॥

तये समरगणाची व्यवस्था ॥ पुढां सांगिजेल गा भारता ॥ इकडे अजमीढसुरनाथा ॥ युद्ध थोर प्रवर्तलें ॥२३॥

इंद्रें धनुष्य ओढिलें ॥ बाण असंख्यात सोडिलें ॥ राक्षसातें भेदिलें ॥ शिरीं सत्राणें ॥२४॥

परि तो गदा भवंडित ॥ उठोनि देवांचा पुरवीं अंत ॥ तंव इंद्रे करोनि वज्रघात ॥ धनु मूर्छित पाडिला ॥२५॥

ऐसा आकांत देखोनी ॥ उठीला प्रदीप्तमुकुटमणी ॥ तेणें समभारें पिटोनी ॥ हटविला इंद्र ॥२६॥

तेथील शस्त्रांची झुंजारी ॥ सांगतां कथा जाईल विस्तारीं ॥ व्यापिन्नला नानाअस्त्रीं ॥ ब्रह्मांडगोल ॥२७॥

इकडे अकराक्षोणी पक्षियेंसीं ॥ समरगण गेला पाताळासी ॥ त्यांही क्षणें पन्नगांसी ॥ विदारिलें ॥२८॥

नखीं पाखीं चंचुवाडीं ॥ विदारिले घडमुंडीं ॥ न लागतां अर्ध घडी ॥ घेतलें पाताळ ॥२९॥

वासुकी सपरिवारीं धरिला ॥ बांधोनि मेळिकारीं आणिला ॥ अजमीढासि भेटविला ॥ तेणें केला सन्मान ॥३०॥

मग राखणाइत देउनी ॥ वासुकी रक्षिला मध्यस्थानीं ॥ पक्षियातें करीं धरोनी ॥ रावो रथीं आरुढला ॥३१॥

तंव इंद्रादिक संसारोनी ॥ उठावले हाहाकरोनी ॥ वर्षोनियां अमितबाणीं ॥ खोंचलें सैन्य ॥३२॥

इंद्रें सत्राणें विंधिला ॥ प्रदीप्त हृदयीं भेदिला ॥ विकळ होवोनियां पडिला ॥ रथावरी तो ॥३३॥

समरगणें पांख फडकारोनी ॥ वरी राहिला छाया करोनी ॥ दोन्हीं सैन्यें सोमावोनी ॥ पांखांतळीं राहिलीं ॥३४॥

अंधकार पडला पाहीं ॥ चारी भाग येके ठायीं ॥ मानिले तयां पुढें कांहीं । दिसेचि ना ॥३५॥

तैं विष्णु ह्मणे वैनतासी ॥ काय गा उगाचि पाहसी ॥ येरू ह्मणे न दिसे हृषीकेशी ॥ अंधकारापुढें ॥३६॥

उपाव करुं काहीं तरी ॥ ऐसें ह्मणोनि चरणचारीं ॥ सैन्य रगडिलें अपारीं ॥ विनतात्मजें ॥३७॥

समरगणें देखिलें वैनता ॥ ह्मणे तूं आलासिरे केउता ॥ येरु ह्मणे अर्भका आतां ॥ जासील कोठें ॥३८॥

येरें गरुड नखीं आसुडिला ॥ तंव तेणें चंचुवें घरिला ॥ आंसुडोनियां पाडिला ॥ भुमीवरी समरगण ॥३९॥

दोघे बैसलेपणें झुंजती ॥ लत्ताप्रहारें हाणिती ॥ उपरी क्षणोक्षणीं फड फडती ॥ पक्ष देखा ॥४०॥

पांख संकोचले झुंजतां ॥ तेणें अंधकार टळला समस्तां ॥ ओसरोनियां उभयतां ॥ राहिलें सैन्य ॥४१॥

दोघें झुंजतां अभंग ॥ युद्ध प्रवर्तलें चांग ॥ तंव ईश्वर करी उपांग ॥ विचाराचा ॥४२॥

ह्मणे दोघे जरी ओसरते ॥ तरी मी पिटितों बाणाघातें ॥ आणि रक्षोनियां गरुडातें ॥ विधितों समरगणासी ॥४३॥

आतां असो हें तिये वेळीं ॥ प्रदीप्ते मूर्छा भंगली ॥ पूर्ण कानाडी ओढिली ॥ विंधावया गरुडातें ॥४४॥

तिकडोनि महारुद्र उठावला ॥ तेणें अग्निबाण मोकलिला ॥ त्या अग्नीनें असे कवळिला ॥ सैन्यभार अजमीढाचा ॥४५॥

मग प्रदीप्तें काय केलें ॥ पर्जन्यास्त्र मोकलिलें ॥ अग्निकल्लोळां निवारिलें ॥ क्षणामाजी ॥४६॥

सवेंचि प्रेरिला मारुतबाण ॥ तेव्हां प्रळय वर्तला जाण ॥ गरुड घातला उडवोन ॥ गगनमाजी ॥४७॥

तैं मारुतास्त्र लागोनि पाठी ॥ गरुडाहिंडाविलें सृष्टीं ॥ देव देखताती दृष्टीं ॥ परि नचले उपाय ॥४८॥

तैं शार्ड्गधरें हातीं वसविलें ॥ पर्वतास्त्र मध्यें टाकिलें ॥ मारुतासी निवारिलें ॥ वांचविलें वैनता ॥४९॥

ऐसें षण्‌मासवरी ॥ राया युद्ध जाहलें भारी ॥ परि न भंगलीं समरीं ॥ दळें उभय ॥५०॥

मग महादेवें काय केलें ॥ पाशुपतास्त्र प्रेरिलें ॥ तंव प्रदिप्तेंही प्रेरिलें ॥ आपुलें पाशुपत ॥५१॥

दोनी शस्त्री खणखणाट जाल ॥ भुगोळ अवघा कांपिन्नला ॥ देवां हाहाःकार वर्तला ॥ ह्मणती मांडला कल्पांत ॥५२॥

उभयद्ळें खळबळलीं अती ॥ अग्निठिणगिया पडती क्षितीं ॥ महाभय वर्तलें त्रिजगतीं ॥ तये बेळीं ॥५३॥

ह्मणवोनि नारद निघाला ॥ तो बद्रिकावनीं पातला ॥ ऋषीश्वरांसी भेटला ॥ येरीं पुसिला वृत्तांत ॥५४॥

नारदें व्यवस्था समस्त ॥ ऋषीश्वरांसी केली श्रुत ॥ ह्मणे आतां होईल अनर्थ ॥ न जातां तेथवरी ॥५५॥

मग चिंतामणी पादुका घालोनी ॥ ऋषीश्वर निघाले तेथुनी ॥ येवोनि पातले तत्क्षणीं पाताळा जवळी ॥५६॥

त्यांहीं दोनीभार देखिले ॥ एकांतीं ब्रह्मया भेटले ॥ श्रीविष्णूसि आलिंगिलें ॥ नमस्कारिलें शंकरा ॥५७॥

स्तुती केली जयजयकारीं ॥ सोमबुध घातले चरणावरी ॥ ह्मणती कृपाळुत्वें त्रिपुरारी ॥ निवारीं पाशुपात आपुलें ॥५८॥

सोमबुध विनंती करिती ॥ कीं आह्मां आज्ञापीं पशुपती ॥ घालूं तुमचिया चरणावरती ॥ अजमीढासी ॥५९॥

तें मानवलें शुळपाणी ॥ मग सोमबुधां पुढें करोनी ॥ ऋषि निघाले तेथुनी ॥ पुढीले भारीं ॥६०॥

ऋषिसमूह येतां देखिला ॥ अजमीढ खालीं उतरला ॥ धांवोनिया भेतताजाला ॥ सोमबुधांसी ॥६१॥

तेव्हां ऋषीश्वरीं वहिले पूर्ण आशिर्वाद दीधले ॥ आणि रजनीतीं प्रबोधिलें ॥ प्रदीप्तासी ॥६२॥

तयासि विचार मानवला ॥ मग शिवाजवळी पातला ॥ चरणावरी धातला ॥ ऋषीश्वरांहीं ।६३॥

शिवें कुपेनें आलिंगिला ॥ येरु विष्णुचरणी लागला ॥ तैसाचि सांष्टांगी वंदिला ॥ चतुरानन ॥६४॥

तिन्हीदेव संतोषले ॥ प्रदीप्तासी बोलिले ॥ आतां आवरीं गा वहिलें ॥ आपुलें पाशुपतास्त्र ॥६५॥

तंव ईश्वरें काय केलें ॥ आपुले पाशुपत आवरिलें ॥ दुसरें प्रदीप्तें सांवरिलें ॥ मंत्रयुक्ती ॥६६॥

दोनी अस्त्रें निवारोनीज ॥ मार्कडेया ह्मणे शूळपाणी ॥ कीं हे नारदाची करणी ॥ आकंतदायक त्रिभुवना ॥६७॥

येणें अजमीढा चेष्टविलें ॥ सोमादिकां तैसेंचि बोधिलें ॥ तेणें अन्योन्य वर्तलें ॥ नातरी हे पूर्णभक्त ॥६८॥

मार्कडेय ह्मणे जगन्नाथ ॥ हा बोल नाहीं ब्रह्मासुता ॥ तया ऋषिप्रणित सर्वथा ॥ करणें लागे ॥६९॥

असो युद्धव्यवस्था राहिली ॥ मग सकळीं सभा केली ॥ स्थानें अनुक्रमें दाटलीं ॥ बैसले सुरनर ॥७०॥

वासुकी शिवासी भेटला ॥ तंव ईश्वरेम करीं धरिला ॥ आश्वसोनि कंठीं घातला ॥ येरु राहिआ जवळिकें ॥७१॥

सभा पाहे प्रदीप्तातें ॥ तंव ब्रह्मा पुसे अजमीढातें ॥ कीं प्रदीप्त ऐसें नाम तूतें ॥ ठेविलें कोणीं ॥७२॥

या नावांचेनि अभिमानें ॥ तुवां आरभिलीं अन्योन्यें ॥ येरु होवोनि सचिंतमनें ॥ उगाचि ठेला ॥७३॥

तंव पक्षिसैनिक ह्मणती ॥ आह्मी आलों पालाशद्दीपाप्रती ॥ तैं हस्तिं आणि वनस्पतीं ॥ ठेविलें नाम ॥७४॥

उपरी ह्मणे पराशर ॥ यासि नामाचा अहंकार ॥ पुर्वी सोमवंशियांचा बडिवार ॥ ऐसाचि होता ॥७५॥

हे सोमवंशीचे भूपती ॥ यांसि पृथकत्वें नावें असती ॥ तुह्मीं न बोलावें प्रजापती ॥ ममोंत्तर ॥७६॥

येरीकडे अवघारावें ॥ प्रदीप्ताचें दळ आघवें ॥ श्रमलेपणें तृषें धांवे ॥ क्षीरसागरा ॥७७॥

अश्वगज आणि पायद ॥ लोक लोकपाळ बहुविध ॥ त्यांही उदकमिषें प्रसिद्ध ॥ शोषिला सिंधु ॥७८॥

तेणें क्षीरसिंधु काकुळती ॥ आला विप्ररूपें शीघ्रगती ॥ विनवोनि प्रजापतीप्रती ॥ वृत्तांत सांगे ॥७९॥

ब्रह्मा ह्मणे गा अजमीढा ॥ कां प्रमाद केला येवढा ॥ येरू बोलिला तयापुढां ॥ कीं हें मज ठाउकें नाहीं ॥८०॥

असो आचरण ऐसें जाहलें ॥ तरी पाहिजे क्षमा केलें ॥ येरीकडे नारायणें पुसिलें ॥ विप्ररूपी समुद्रा ॥८१॥

तुजसी कवणें ग्रासिलें ॥ येरू ह्मणे प्रदीप्तें शोषिलें ॥ देव ह्मणे आतां जाणें उगलें ॥ निजस्थानीं ॥८२॥

ममवरें तूं परिपूर्ण होसी ॥ उपकार केला प्रदीप्तासी ॥ असो विप्र जातां समुद्रासी ॥ क्षीरपूर्ण जाहलें ॥८३॥

विष्णु ह्मणे प्रदीत्पाप्रती ॥ तुह्मी आलेती कवणेंगती ॥ तंव अजमीढ ह्मणे गा श्रीपती ॥ शरीं सेतु बांधोनियां ॥८४॥

आतां जाणेंही ऐशाचि परि ॥ सेतू बांधोनियां शरीं ॥ संघमेळें सपरिवारीं ॥ स्वदेशासी ॥८५॥

वासुकीसि पुसे पशुसती ॥ तुं आलासि कवणेगती ॥ येरू ह्मणे पक्षिपती ॥ घेवोनि आला ॥८६॥

मग प्रदीप्तासि ह्मणे शंकर ॥ मज भेटवीं तो पक्षींद्र ॥ येरें आणिला वेगवत्तर ॥ समरगण ॥८७॥

शिवाचे पायीं घातला ॥ ब्रह्मविष्णुतें भेटाविला ॥ येरीं कृपेनें आश्वासिला ॥ सूष्टुउत्तरीं ॥८८॥

ह्मणती गा झुंजतां गरुडासी । तूं तरी थोर कष्टलासी ॥ पार नाहीं बळासी ॥ तुझिये पैं ॥८९॥

देव ह्मणती राया प्रदिप्ती ॥ या दोहींची बळख्याती ॥ आजि प्रत्ययें करूं निरुति ॥ गतिविशेषें ॥९०॥

मग विष्णु आज्ञापी वैनता ॥ कीं या सुरवरां समस्तां ॥ घेवोनि जाई शीघ्रता ॥ स्वर्गलोकीं ॥९१॥

येरें उभयपक्ष पसरिले ॥ वरी देव सर्व बसविले ॥ मनोवेगें नेवोनि ठेविले ॥ स्वर्गभुवनीं ॥९२॥

मागुणी ह्मणे समरगणा ॥ कीं हे तुमचीच सेना ॥ तरी नेवोनि येचि क्षणा ॥ ठेवीं जंबुद्दीपीं ।९३॥

येरें दोनि पक्ष पसरिले ॥ चातुरंगा वरी बैसविलें ॥ नेवोनि जंबुद्दीपीं ठेविलें ॥ क्षणामाजी ॥९४॥

ऐसी देखोनि बळख्याती ॥ दोघां सन्मानी श्रीपती ॥ आणि वासुकीसी पशुपती ॥ दवडी पाताळा ॥९५॥

येरु सपरिवारीं गेला ॥ देवीं प्रदीप्त सन्मानिला ॥ वस्त्रालंकारी पामकिला ॥ देवत्रयीं ॥९६॥

देव ह्मणती गा प्रदीप्ती ॥ आतां युद्धाचा न करीं ताती ॥ सुखें भोगावी वसुमंती ॥ भुमंडळी ॥९७॥

पुत्रपौत्रीं नांदावें ॥ हस्तनापुरीं राज्य करावें ॥ येरु मानोनि तेम सद्भावें ॥ लागला चरणीं ॥९८॥

सोमबुधांसी भेटला ॥ स्वदेशीं जावों निघाला ॥ समरगणें पक्षीं उचलिला ॥ आपुलीये ॥९९॥

देव विमानीं बैसोनी ॥ प्रवेशले निजस्थानी ॥ आणि जंबुद्दीपीं मुकुटमणी ॥ आला प्रदीप्त ॥१००॥

वैनतें सर्व ऋषीश्वर ॥ पक्षीं वाहोनि नेलेशीघ्र ॥ मग चालिले दळभार ॥ पश्चिमेचे ।१॥

वाराणसीसि पातले ॥ तेथें स्ननविधी सारिले ॥ षोडशोपचारें ऋषि पूजिले ॥ प्रदीप्तरायें ॥२॥

मुनी आशिर्वाद देउनी ॥ स्वयें गेले बद्रिकावनीं ॥ मग भूपाळ पूजिले सन्मानोनीं ॥ अजमीढें पै ॥३॥

सप्तद्दीपींचे नृपवर ॥ पामाकिले सपरिवार ॥ आणि आपण चालिला वेगवत्तर ॥ प्रदीप्तारावो ॥४॥

पुढें भागीरथीच्या तीरीं ॥ राव चालिला सपरिवारीं ॥ तंव देखतां हस्तनापुरी ॥ लाविलीं वाद्यें ॥५॥

लोक अवघे येउनी ॥ ओवाळिती नरकामिनी ॥ मग प्रवेशला नूपमणी ॥ नगरामाजी ।६॥

तो महोत्साह सांगतां ॥ विस्तारा जाईल ग्रंथकथा ॥ ह्मणोनि सार संक्षेपता ॥ सांगीतलें ॥७॥

राव प्रवेशलिया नगरीं श्रृगारिलें संवत्सरभरी ॥ राज्य करीं सपरिवारी ॥ अजमीढ तो ॥८॥

ऐसें प्रदीप्ताचें चरित्र ॥ सोमवंशींचें विचित्र ॥ तुज सांगीतलें पवित्र ॥ जन्मेजया ॥९॥

तये प्रदीप्तापासूनी ॥ वंश विस्तारला मेदिनी ॥ तो ऐकें चित्त देवोनी ॥ संक्षेपता ॥११०॥

प्रथम विष्णुमासोनि चतुरानन ॥ तयाचा अत्रि नंदन ॥ सोम जाहला अत्रिपासोन ॥ त्याचा बुध कुमर ॥११॥

बुधाचा पुत्र पुरूरवा ॥ त्याचा गव्य जाणावा ॥ गव्याचा अल्य जाणावा ॥ परमप्रतापी ॥१२॥

अल्याचा कुमर नळ ॥ नळाचा नघुक प्रेमळ ॥ आणि नघुकाचा बाळ ॥ जातिकर नामें ॥१३॥

अनुसयो जातिकराचा ॥ लघुभृत्य पुत्र त्याचा ॥ तेथोनि उद्भव सुरथाचा ॥ जाहला पैं ॥१४॥

सुरथाचा अजमढि भूपती ॥ जयाचें दुजें नाव प्रदीप्ती ॥ तो विख्यात त्रिजगतीं ॥ पुण्यशीळ ॥१५॥

तयाचा पुरुरवा दुसरा ॥ त्याचा दाक्षिण्य अवधारा ॥ त्याचा अदित्य रावो खरा ॥ सोमवंशीं ॥१६॥

तयाचा पुत्र सुरेंद्र ॥ त्यापासाव मणिपुर ॥ मणिपुराचा कुमर ॥ येळुरावो ॥१७॥

येळाचा सुत आहुती ॥ त्याचा नहुष चक्रवर्तीं ॥ तयापासोनि ययातीं ॥ सोमवंशीं ॥१८॥

ययातीचा पुरु ख्याती ॥ त्याचा जन्मेजय सुवृत्ती ॥ तयापासोनि शर्याती ॥ माहाराजा ॥१९॥

शर्यातीचा हरियाती ॥ त्याचा सर्वभोग्य भूपती ॥ त्याचा महाभोग नृपती ॥ अधोता तत्पुत्र ॥१२०॥

अयोध्याचा अक्रोधे कुमर ॥ तवापासोनि रुचिवीर ॥ तदात्मज मतिनार ॥ महाराजा ॥२१॥

मतिनारचा दूषण ॥ त्याचा पुत्र भारती गहन ॥ तयाचा सुत अभिमन्य ॥ त्याचा सहोत्र ॥२२॥

तेथोनि अस्तिरावो जन्मला ॥ तत्पुत्र अजामेळ जाहला ॥ तयाचे उदरीं जन्मला ॥ श्रवण नामा ॥२३॥

तयाचा सुभुजा भूपती ॥ तदात्मज परिक्षिती ॥ तेथोनि भीमाची उप्तत्तीं ॥ त्याचा प्रतीप ॥२४॥

प्रतीपाचा शंतनु ॥ जो जगाविख्यात गहनु ॥ त्याचें चित्रविचित्र नंदनु ॥ तेथोनि पंडु जाणावा ॥२५॥

पंडुरायाचा धनंजायो ॥ त्याचा अभिमन्यु महाबाहो ॥ तेथोनि परिक्षिती रावो ॥ पिता तुझा ॥२६॥

अगा जन्मेजया अवधारीं ॥ तूं जन्मलासि परिक्षित‍उदरीं ॥ परि कलिदोषें निर्धारी ॥ व्यापिले तुजज ॥२७॥

तुह्मीं सोमवंशीचे भूपती । कलिदोषें व्यापिलेती ॥ यास्तव पातकें कवळिलेती ॥ घडल्या ब्रह्महत्या ॥२८॥

असो भीमचा पुत्र प्रतीप ॥ तयचा शंतनु नामें नृप ॥ त्याचा कथान्वयो अमूप ॥ भारतीं से ॥२९॥

तें आदिपर्वीं अशेष जाण ॥ व्यासमुनीनीं केलें कथन ॥ जें पंचमस्तबकीं गहन ॥ कथिलें असे ॥१३०॥

परि नारदपुराणींचें संमत ॥ आणि भविष्योत्तरीं प्रणित ॥ असे कथण वेगळें अद्भुत ॥ तें सागेन आतां ॥३१॥

ऐसें वैशंपायन बोलिला ॥ तंव जन्मेजयो संतोषला ॥ ह्मणे देह मनोंरि निवाला ॥ तुझेनि वाक्यमृतें ॥३२॥

आतां शंतनूची कथा ॥ मज सांगावी मुनिनाथा ॥ जेणें होय पवित्रता ॥ प्राणिमात्रां ॥३३॥

मग वैशंपायन ह्मणे ॥ राया ऐक सावधानें ॥ जेणें संतोषती मनें ॥ श्रोतयांची ॥३४॥

पुढें पुण्यपावन कथा ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ ते ऐकावी संतश्रोतां ॥ ह्मणे मधुकरकवी ॥३५॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ अष्टमस्तबक मनोहरू ॥ अजमीढचरित्रप्रकारू ॥ पंचदशाऽध्यायीं कथियेला ॥१३६॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP