मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय ८

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय ८

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥ जन्मेजयें प्रश्न कीजे ॥ कीं देवां गिळिलें पक्षिराजें ॥ तयाचें आतां नांव सांगिजे ॥ आणि कवणहेतु मिळाला ॥१॥

वैशंपायन ह्मणे गा भूपती ॥ आइकें पूर्वजांची ख्याती ॥ पूर्वी ब्रह्मयाचा पुत्र पुलस्ती ॥ तयापासोनि विश्रवा ॥२॥

कुशद्दीपीं तप मांडिलें तेणें ॥ तेथ पक्षियांसी राज्य करणें ॥ तंव निमाला काळगुणें ॥ पक्षिराज ॥३॥

मग राज्यधर नाहीं देखा ॥ पक्षी झोंबती येकमेकां ॥ राज्य करूं पाहती ऐका ॥ आपुलाले ठायीं ॥४॥

तंव पक्षिराजाची अंतुरी ॥ घुबडादेवी नामें सुंदरी ॥ ते जावोनि विश्रव्या समोरी ॥ केलें दंडवत ॥५॥

ऋषि होता ध्यानस्थ ॥ येरीनें प्रार्थला बहुत ॥ ह्मणे जी निमाला माझा कांतें ॥ गेला राज्यार्थ हातींचा ॥६॥

ऐसी ग्लानी ऐकिली ॥ ऋषीश्वरें दृष्टी उघडिली ॥ तंव पुढा कामिनी देखिली ॥ द्रवला वीर्य लोचनीं ॥७॥

येरीनें झेलोनि वरिच्यावरी ॥ तें वार्य घेतलें जठरीं ॥ तो पुत्र जाहला सुंदरीं ॥ आजानुबाहु ॥८॥

कटिसुत्रा खालता नर ॥ वरती पक्षियाचा आकार ॥ नांव ठेवोनि शतघुबडेश्वर ॥ बैसविला राज्यीं ॥९॥

तेरासहस्त्र योजनें थोर ॥ येकयेका पक्षाचा विस्तार ॥ असो तेथोनि गेला ऋषीश्वर ॥ क्रौचद्दीपासी ॥१०॥

हे कृतयुगींची कथा ॥ तुज सांगीतली भारता ॥ पुढें विश्रवा जाहला प्रसवता ॥ तिघे पुत्र ॥११॥

ते रावण कुंभकर्ण बिभीषण ॥ तो थोर असे कथाप्रश्न ॥ तृतीय स्तबकीं संपूर्ण ॥ सांगीतला बालकांडीं ॥१२॥

असो ऐसा तो पक्षिराज ॥ अविनश आणि तेजःपूंज ॥ साह्य करावया सहज ॥ आला सोमासवें ॥१३॥

सप्तद्दीपींचे भूपती ॥ सोमेश्वरा वोळंगती ॥ ह्मणोनि तयासवें प्रीतीं ॥ आले अमरावतीसी ॥१४॥

असो राज्य घेतलें सोमेश्वरें ॥ तंव त्रिदेव आले समभारें ॥ युद्ध मांडलें असे दुसरें ॥ देवांनिमित्त ॥१५॥

ब्रह्मा पहिलेन उटावला ॥ त्यावरी पुष्करेश्वरं चालिला ॥ परस्परें थोर जाहला ॥ संग्राम देखा ॥१६॥

तो पुष्करद्दीपींचा रावो ॥ वेसर नामें महाबाहो ॥ कोणी न साहे तयाचा घावो ॥ तेणें ब्रह्मा हकिला ॥१७॥

तंव चतुर्मुखें तत्क्षणीं ॥ सोडिली दर्भमृष्टी ॥ अभिमंत्रोनी ॥ तयेनें टाकिला उचलोनी ॥ मेरुतळीं जंबुद्दीपीं ॥१८॥

आणि संहारिला त्याचा दळभार ॥ तंव मूर्छा सांवरूनि वेसर ॥ नावला मागुती वेगवत्तर ॥ युद्धालागीं ॥१९॥

संग्राम जाहला अति नेटें ॥ आंदोळलीं गिरिकुटें ॥ मग श्वास घालोनि नासापुटें ॥ उडविला ब्रह्मा ॥२०॥

मागुती श्वास ओढिला ॥ ब्रह्मा उतछासें आसुडिला ॥ वेगें नासिकापाशीं आणिला ॥ थोर झाला कासाविसी ॥२१॥

देखोनि उठिला शारंगधरु ॥ ह्मणे पशुवा राहें समोरु ॥ तंव येरें घालोनि फूत्कारू ॥ तोही उडविला त्यांचपरी ॥२२॥

दोघे पडिले थोर वळसां ॥ वेसर महावीर परियेसा ॥ तंव जन्मेजय करी पृच्छा ॥ कीं वेसर कायसा बळिवंत ॥२३॥

वैशपायन ह्मणती भारता ॥ आधीं ऐकें मांडिली कथा ॥ मग सांगेन वेसरकथा ॥ तो सर्वथा विष्णुअंश ॥२४॥

तेणें दोघे आवतीं पाडिले ॥ थोर खस्तावस्त जाहले ॥ ते महारुद्रें देखिले ॥ ह्मणोनि उठला आयणी ॥२५॥

धनुष्या वोढोनि कानाडी ॥ बाण सोडले लक्षकोडी ॥ आकाश व्यापिलें प्रौढीं ॥ पडिला अंधकार ॥२६॥

तये रुद्रबाणांच्या घाई ॥ सैन्य पळालें दिशा दाहीं ॥ तंव सोम उठावला लवलाहीं ॥ करीत युद्ध ॥२७॥

शौर्यं रुद्रबाण तोडिले ॥ सर्वेंचि गजास्त्र प्रेरिलें ॥ मग मदोन्मत्त उठावले ॥ अनंतहस्ती ॥२८॥

त्या गजांवरीं केसरीबाण ॥ प्रेरिता जाहला त्रिनयन ॥ तेणें नेले सकळ पिटोन ॥ भद्रजातीं ॥२९॥

तंव सोमरायें शीघ्र ॥ त्वरें घातलें शार्दूळस्त्र ॥ ह्मणोनि रुद्रें वेगवत्तर ॥ पाशुपतास्त्र प्रेरिलें ॥३०॥

सोमें दोन बाण सोडिले ॥ एकें पाशुपत निवारलें ॥ एकें विद्यामंत्रें आकारलें ॥ मोहनीरूप ॥३१॥

देखोनि भुलला शंकरु ॥ मोहें विसरला युद्ध करूं ॥ येरीनें व्यापिला दळभारु ॥ सदाशिवाचा ॥३२॥

करींचीं शस्त्रें गळालीं ॥ निश्चेतनें रणीं पडिली ॥ ऐसी नवलपरी केली ॥ सोमरायें ॥३३॥

एकला नारद असे उरला ॥ येर सकळांचा अंत पुरला ॥ तेव्हा मनीं चिंतावला ॥ ब्रह्मकुमर ॥३४॥

ह्मणे इतुका अनर्थ जाहला ॥ त्यासी कारण मीचि भला ॥ तरी आतां प्राण दीजे आपुला ॥ थोर जाहला अपवाद ॥३५॥

मग मंदाकिनीचे तीरीं ॥ येरु अग्निप्रवेश करी ॥ तंव वाचा जाहली अंबरीं ॥ कीं न करीं देहनाश ॥३६॥

आतां जावोनि झडकरी ॥ आणीं लक्ष्मी पार्वती सावित्री ॥ त्या सोडवितील अवधारीं ॥ सोमा विनवूनी ॥३७॥

ऐकोनि नारद उपमला ॥ वेगें कैलासासि गेला ॥ अवघा वृत्तांत सांगितला ॥ पार्वतीसी ॥३८॥

मग ते झडकरी निघाली ॥ वेगें वैकुंठीं प्रवेशली ॥ लक्ष्मीयेसी भेटली ॥ नारदें कथिली व्यवस्था ॥३९॥

तेथोनि दोघी निघालिया ॥ सत्यलोका शीघ्र आल्या ॥ सावित्रीसीं भेटलिया ॥ गोष्टी नारदें कथियेली ॥४०॥

मग सखिया गुढियेसी ॥ तिघी चालिल्या मार्ग क्रमित ॥ कनकपरियेळीं शोभत ॥ दीपातिया ॥४१॥

पुढां नारद गुढियेसी ॥ येरी चालती अतिउल्हासीं ॥ तें देखोनियां सोमासी ॥ जाणविलें प्रधानीं ॥४२॥

ह्मणती तुह्मांसि वोंवाळाया ॥ तिघी माता आलिया ॥ येरु ऐसें ऐकोनियां ॥ चालिला चरणचालीं ॥४३॥

साष्टांग दंडवत घातलें ॥ सावित्रियां उठविलें ॥ आलिंगन दीधलें ॥ नातु ह्मणवोनी ॥४४॥

पार्वतीनें वोंवाळिला ॥ लक्ष्मीनें कपोलीं स्पर्शिला ॥ ह्मणती सोमा तुं बहृभला ॥ ब्रह्मा पराभविला पूर्वज ॥४५॥

खेदक्षीण ब्रह्माविष्णु ॥ वेसर घेऊं पाहे प्राणु ॥ तंव मोहिला त्रिनयनु ॥ हा पुरुषार्थ थोर तुझा ॥४६॥

ऐशी ऐकोनि विनवणी ॥ काढिलें मोहनास्त्र तत्क्षणीं ॥ तंव रुद्र उठिला गजबजोनी ॥ सैन्यासहित ॥४७॥

रुद्र मनांत लाजिन्नला ॥ तंव सोम लोटांगणीं गेला ॥ शिवें कृपाकरें स्पर्शिला ॥ येरु जाहला विनविता ॥४८॥

शंकर ह्मणे सोमासी ॥ बोलावीं तया वेसरासी ॥ येरें पाठवोनि दूतासी ॥ हकारिला वेसर ॥४९॥

येवोनि लागला रुद्रचरणीं ॥ तंव बोलिला शूळपाणी ॥ ह्मणे भले त्वां गांजिले रणीं ॥ ब्रह्मविष्णु ॥५०॥

आतां सोडीं तयां वहिलें ॥ येरें नासापुटोनि काढिले ॥ मग क्षेमालिंगन जाहलें ॥ आनंदले परस्पर ॥५१॥

विष्णु ह्मणे जी शंकर ॥ अद्भुत शक्ति यया वेसरा ॥ आह्मां करविल्या येरझारा ॥ श्वासोच्छासीं ॥५२॥

मग प्रसन्नवदनें त्रिपुरारीं ॥ वेसर घातला विष्णुचरणावरी ॥ तंव ब्रह्मा बोले तिये अवसरी ॥ सोमाप्रती ॥५३॥

भला जन्मोनि आमुच्या वंशीं ॥ तुवां मेळविलें वेसरासी ॥ येरु लागोनि चरणासी ॥ ह्मणे अपत्यासी क्षमा कीजे ॥५४॥

ताता तुमचे प्रसन्नपणें ॥ म्यां जिंकिलें देवां कारणें ॥ तरी हा बोल न ठेवणें ॥ सेवकासी ॥५५॥

ऐसें ह्मणोनि लागला चरणीं ॥ येरें आलिंगिला प्रसन्नमनीं ॥ असो ऐसे देव तिन्ही ॥ संतोषले सोमेश्वरा ॥५६॥

मागुता वेसर झडकरी ॥ घातला विष्णुचे चरणावरी ॥ तो विष्णुअंश अवधारी ॥ जन्मेजया गा ॥५७॥

आतां वेसराची उत्पत्ती ॥ ऐकें जन्मेजया भूपती ॥ पूर्वी प्रसन्न केला पशुपती ॥ भस्मासुरें ॥५८॥

ते भस्मासुराची कथा ॥ तृतीयस्तबकीं असे समूळता ॥ पृथ्वी फिरिन्नला समस्ता ॥ महेश्वर ॥५९॥

परि पाठी न सोडी दैत्य ॥ मग स्मरिला वैकुंठनाथा ॥ तंव येरू पातला त्वरित ॥ घांवणेया ॥६०॥

नटला मोहिनी मनोहर ॥ कटाक्षबाणीं विंधिला असुर ॥ नर्तनीं शिरीं ठेवितां कर ॥ भस्मासुर भस्म जाहला ॥६१॥

तेथोनि पुष्कर द्वीपीं आला हरी ॥ तेथें वेसरु नामें राजा परिवारीं ॥ तो गेला असे वनांतरीं ॥ गॄहीं अंतुरी कामव्याप्त ॥६२॥

ते वेसरी विनवीतसे देवा ॥ ह्मणे मनोरथ माझा पुरवावा ॥ मज अनुसरू द्यावा ॥ शांत करावा कंदर्प ॥६३॥

मग प्रसन्न होवोनि अनंतु ॥ तिये दृष्टिद्दारें दीधला ऋतु ॥ गर्भ संभवला उदरातु ॥ विष्णुपासोनी ॥६४॥

तो तात्कळ जन्मला वेसर ॥ येरीनें विनविला सर्वेश्वर ॥ कीं हा तुह्मापासोनि कुमर ॥ तरी ठेविजे नाम याचें ॥६५॥

विष्णु ह्मणे हो परियेसीं ॥ ठेवीं वेसरचि नाम यासी ॥ हा अजित होईल सर्वांसी ॥ ऐसें ह्मणोनि निघाला ॥६६॥

यापरी वेसराची उप्तत्ती ॥ तुज कथिली संक्षेपोक्ती ॥ मग सभा करिती पशुपती ॥ तिये स्थानीं ॥६७॥

आणि रुद्रें सोमासि पुसिलें ॥ कीं सुरवर अवघे काय जाहले ॥ तंव सोम राव बोलिले ॥ थोर जाहलें आश्चर्य ॥६८॥

विष्णुह्मणे सखया सोमा ॥ तुझें चरित्र सांगावें आह्मां ॥ येरु कर जोडोनि सप्रेमा ॥ बोलता जहला ॥६९॥

आपुलें जन्म आणि राज्यस्थिती ॥ नारंदे सांगितली पद्मावती ॥ तेथोनि घेतली अमरावती ॥ तों परियंत कथियेलें ॥७०॥

तरी पक्षिराजें अवधारा ॥ गिळिलें असे सुरवरां ॥ इद्रसहिता उदरा ॥ माजि असती ॥७१॥

मग संतोषलें देव तिन्ही ॥ ह्मणती धन्य राया मुकुटमणी ॥ आतां बोलावीं झडकरोनी ॥ पक्षींद्र तो ॥७२॥

रायें दूत पाठविलें ॥ त्यांहीं पक्षियासि ह्मणितलें ॥ कीं तुह्मा सोमेश्वरें बोलाविलें ॥ चला वहिलें पक्षींद्रा ॥७३॥

परि तो दूतांसी न बोले ॥ करें उदर दाखविलें ॥ मग दुत मागुते आले ॥ श्रुत केलें सोमेश्वरा ॥७४॥

जीजी पक्षियाचें जळोदर ॥ वाढिन्नलें असे थोर ॥ तया न बोलवे उत्तर ॥ खुणे उदर दाविलें ॥७५॥

ऐकोनि अवघे विस्मित जाहले ॥ मग पक्षियाजवळी पातले ॥ तंव ते दळभार देखिले ॥ पक्षिदूतीं ॥७६॥

त्याहीं पक्षिराजा ह्मणिवलें ॥ जी जी परदळ थोर आलें ॥ ऐसें वचन ऐकिलें ॥ मग उठिला संसारोनी ॥७७॥

तंव सोम चरणचालीं धांवला ॥ पक्षियाजवळी पातला ॥ अवघा वृत्तांत सांगितला ॥ तिहीं देवांचा ॥७८॥

हातीं धरूनि पक्षियासी सोमें आणिला देवांपाशीं ॥ मग तो लागळीं चरणांसी ॥ तिघांचिया ॥७९॥

देवीं उठवोनि आलिंगिला ॥ त्याचा पराक्रम वानिला ॥ ह्मणती आतां उगळीं वहिला ॥ सुरवरांसी ॥८०॥

येरें उगळिले समग्र ॥ तेतोसकोटी सुरवर ॥ वाजंत्री गर्जलें अंबर ॥ परस्परें वंदिलें ॥८१॥

असो आनंदले समस्त ॥ तें सांगतां वाढेल ग्रंथ ॥ मग प्रवेशले नगरींत ॥ वाद्यगजरें ॥८२॥

श्रृंगारिली अमरपुरी ॥ अनुक्रमें बैसले भद्रीं ॥ तंव ब्रह्मा ह्मणे अवधारीं ॥ सोमेश्वरा गा ॥८३॥

आतां निर्माल्य राव त्वरित ॥ सकुंटुबे आणावा येथ ॥ येरें पाठवोनियां दूत ॥ तो आणविला तत्‌क्षणीं ॥८४॥

मग तो निर्माल्य समस्तांचरणीं ॥ आला साष्टांग लोटांगणीं ॥ प्रीतींने जवळी आश्वासोनी ॥ बैसविला सुरवरीं ॥८५॥

उत्साहें तिन्ही देव ह्मणती ॥ आतां करूं आनंदस्थिती ॥ मग पाट मांडिले विप्तत्तीं ॥ चतुराननें ॥८६॥

सोम बैसविला पाटावरी ॥ पद्मावती अर्पिली करीं ॥ ते वामांगीं बैसली नोवरी ॥ शोभा थोरी वधुवरां ॥८७॥

लक्ष्मी पार्वती सावित्री ॥ अणिक देवांगना समग्रीं ॥ करिती अक्षयवाणें वेदमंत्री ॥ मंगळोज्चारी ॥८८॥

वाधांवणीं लागली देखा ॥ जाहली सोमाची वर्‍हाडिका ॥ महाआनंद तिहीं लोकां ॥ वर्तलासे ॥८९॥

वधुवरें उठोनि तत्क्षणीं ॥ लागलीं सुरवरांचे चरणीं ॥ प्रसन्न होवोनि देव तिन्हीं ॥ बोलिले सोमासी ॥९०॥

कीं तुझा वंश हस्तनापुरी ॥ राज्य करील ख्याति थोरी ॥ आह्मी होवोनि साह्यकारी ॥ करूं प्रतिपाळ ॥९१॥

जें जयासि पडेल सांकडें ॥ तें सिद्धीसि नेवोनि निवाडें ॥ तीनही युगेंज वाडेंकोडें ॥ करुं साह्य ॥९२॥

परि कलियुग लागल्यावरी ॥ आह्मी नेणो गा निर्धारीं ॥ जेधवां सांडितील नगरी ॥ तेघवां उणें येईल ॥९३॥

हे भाष देवोनि तिघांजणीं ॥ मग इंद्र स्थापिला अमरभुवनीं ॥ सोम निघाल घेवोनि कामिनी ॥ पद्मावती ते ॥९४॥

अष्टदिक्पाळ गेले स्वस्थानीं ॥ हरिहर ब्रह्मा निजभुवनीं ॥ ऐसा महाराजा मेदिनीं ॥ सोमेश्वर ॥९५॥

हे नारदपुराणींची कथा ॥ सोमवंशोत्पत्ती भारता ॥ पराशर जाहला निरुषि ॥ ऋषीश्वरांसी ॥९६॥

तेंचि हें कथिलें व्यासोक्त ॥ तुज म्यां केलें असे श्रुत ॥ ओंवीप्रबंधें संकलित ॥ प्राकृतभाषा ॥९७॥

विष्णुपासोनि जाहला ब्रह्मा ॥ तयाचा पुत्र अत्रि नामा ॥ तया पासोनि जन्म सोमा ॥ तो राजा हस्तनापुरींचा ॥९८॥

सोमापासोनि राज्यव्यवस्था ॥ ह्मणोनि सोमवंश गा भारता ॥ ते अग्रकथा ऐकावी श्रोतां ॥ ह्मणे मधुकरकवी ॥९९॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबक मनोहरू ॥ सोमराजयुद्धप्रकारु ॥ अष्टमोऽध्यायीं कथियेला ॥१००॥

॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP