मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय ३०

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय ३०

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मुनीसि ह्नणे जन्मेजयो ॥ वैशंपायना तूं मतीचा डोहो ॥ तरी पुढील कथान्वयो ॥ सांगिजे मज ॥१॥

मग ह्नणती वैशंपायन ॥ राया ऐकें चित्त देवोन ॥ अग्रकथा संकलोन ॥ सांगों तुज ॥२॥

पांडव इंद्रप्रस्थीं स्थापिले ॥ हें संस्कृतआदिपर्वी कथिलें ॥ परि ग्रंथांतरीं दीधलें ॥ खांडवप्रस्थ ॥३॥

वारुणावत खांडवप्रस्थ ॥ हीं संस्कृतभारतीं नसतीसत्य ॥ परि ग्रंथांतरीं ऋषिमत ॥ वर्णिलें प्राकृतकवीनीं ॥४॥

असो पांडवां राज्य करितां ॥ येणें जाहलें विधिसुता ॥ भेटले परस्परें वार्ता ॥ पुसिलें क्षेमकुशळ ॥५॥

नारद ह्नणती धर्मासी ॥ एकी पत्नी पांचांजणांसी ॥ हें मूळ होईल अनर्थासी ॥ तरी करावा दिवसनेम ॥६॥

पूर्वी येके स्त्रिये कारणें ॥ सुंदोपसुंद गेले प्राणें ॥ मग तें सविस्तर ब्रह्मनंदनें ॥ कथिलें पांडवां ॥७॥

ते संपूर्णकथा वित्पती ॥ पंचम स्तबकीं असे भूपती ॥ ते येवोनि पांडवांचित्तीं ॥ केलें दिवसप्रणाम ॥८॥

नेमें बहात्तरी दिवस ॥ नारदें वांटोनि दिले पंचांस ॥ जयाची पाळी येईल विशेष ॥ तेणेंचि द्रौपदी भोगावी ॥९॥

शेवटीं पाळी पुरल्यावरी ॥ न्हावोनियां अग्निमाझारी ॥ जाईल दुजाचे मंदिरीं ॥ तेणें तियेसि भोगावें ॥१०॥

इये अग्निगर्भी उत्पत्ती ॥ हे पतिव्रता महासती ॥ जयाची पाळी तयासि रती ॥ येरा माते समान ॥११॥

हे असतां पतिगृहीं ॥ जयाची दृष्टी पडेल पाहीं ॥ तेणें करावीं तीर्थे सर्वही ॥ तैं तो होईल पुनीत ॥१२॥

हें सांगोनि गेला ब्रह्मनंदन ॥ मग पांचही चालविती तो पण ॥ याचिये पुढील वृत्तकथन ॥ ऐकें राया भारता ॥१३॥

नववरुषें परियंत ॥ पांडवी द्रव्य मेळविलें बहुत ॥ भूपाळां जिणोनि करभार घेत ॥ भीमार्जुनादी ॥१४॥

एकदा बंधूसि ह्नणे युधिष्ठिर ॥ कीं द्रव्यार्थ जोडला अपार ॥ मागां कष्टलों तो विचार ॥ ऐका माझा ॥१५॥

पंडूसि गती कीं अवगती ॥ जाहली ते नकळे स्थिती ॥ तरी कष्टलों हे फळश्रुती ॥ तज्जनित भासतसे ॥१६॥

आतां बाहूनि शारंगधरु ॥ कांहीं करावा विचारु ॥ पितयाचें श्राद्ध करुं ॥ स्वहिता लागीं ॥१७॥

भीम गेला द्वारकेसी ॥ तेथें भेटला श्रीकृष्णासी ॥ ह्नणे बोलाविलें तुह्मासी ॥ धर्मरायें ॥१८॥

तेव्हां कृष्ण बैसोनि रथीं ॥ वेगें आला इंद्रप्रस्थीं ॥ धर्मादिकां अतिप्रीतीं ॥ भेटला कुंती द्रौपदीये ॥१९॥

आनंदें आरोगणा सारोनी ॥ धर्म ह्नणे गा चक्रपाणी ॥ थोरकष्टलों हिंडतां वनीं ॥ आणि राहिलें पितृश्राद्ध ॥२०॥

तरी विधिपूर्वक श्राद्ध करावें ॥ हा मनोरथ पुरावावा देवें ॥ ऐकोनि कृष्ण ह्नणे ॥ सद्भावें ॥ ऐकें धर्मा ॥२१॥

ब्रह्महत्या असे पंडुवीरा ॥ तरी आणावें सकळ ऋषीश्वरां ॥ गंगा क्कारें सुवर्ण अवधारा ॥ आणि गरुवें सावज ॥२२॥

नंतर श्राद्धविधी करुं ॥ हें सांगोनि गेला श्रीधरु ॥ तंव धर्मे केला विचारु ॥ बंधुवर्गासीं ॥२३॥

भीम ह्नणे युधिष्ठिरा ॥ मी आणि तों गंगाऋषीश्वरां ॥ पार्थही ह्नणे अवधारा ॥ आणितों गरुवें सावज ॥२४॥

नकुळ बोलिला आपण ॥ मी आणीन क्कारें सुवर्ण ॥ मग निघाले तिघेजण ॥ करावया चारी कार्ये ॥२५॥

भीम पातला गंगेसी ॥ तेथ असती सकळ ऋषी ॥ येरें नमूनि समस्तांसी ॥ सर्व वृत्त निवेदिलें ॥२६॥

धर्मे पंडूचिये श्राद्धासी ॥ बाहिलें गंगे आणि तुह्मासी ॥ तरी चलावें वेगेंसीं ॥ ऐकोनि मुनी बोलिले ॥२७॥

कीं गंगावोध कवणिये गतीं ॥ नेशील तरी इंद्रप्रस्थीं ॥ येरु ह्नणे तयांप्रतीं ॥ नेईन बाहुबळेंसी ॥२८॥

ऋषि ह्नणती आधीं नेई ॥ मग आह्मी येऊं सर्वही ॥ ऐसी धरोफरी करितां पाहीं ॥ क्रोध आला वृकोदरा ॥२९॥

तेणें कवळोनि अवघे ऋषी ॥ घातले डाविये कांखेसी ॥ गदा टेंकिली गंगेसी ॥ ओघ न्यावयाकारणें ॥३०॥

हा नेईलचि ऐसें जाणोनी ॥ गंगा करीतसे विनवणी ॥ कीं चालें मार्ग सम करोनी ॥ मग मी मागोनी येईन ॥३१॥

येरें मंत्रोनि गदा सोडिली ॥ तियें वाटेसम भूमिका केली ॥ तंव पाठोपाठीं चालिली ॥ गंगा देखा ।३२॥

कांखे ऋषीश्वर दडपिले ॥ ते कोपें भीमासि बोलिले ॥ कीं आह्मां सोडी वहिलें ॥ नाहींतरी शापो तुज ॥३३॥

भीम ह्नणे जी भलें महंता ॥ जेऊं घालितां शाप देतां ॥ ऐसी देखिली नाहीं व्यवस्था ॥ आजिवरी कोठें ॥३४॥

तुह्मां मानेल तें करणें ॥ परि मी न सोडीं तुह्माकारणें ॥ धर्मे आज्ञापिलें वचनें ॥ तें जाणवेल आतांची ॥३५॥

ऋषी भिवोनि उगेचि ठेले ॥ येरें नावेक दडपिले ॥ ऋषीश्वर काकुळती आले ॥ ह्नणती गेले प्राण भीमा ॥३६॥

तेव्हां समस्त सोडिले ॥ पुढां करोनि चालविले ॥ ह्नणती भोजन घातलें भलें ॥ कांखे माजी दडपोनी ॥३७॥

आतां असो हे गंगेसहित ॥ सकळ पावले इंद्रप्रस्थ ॥ तंव धर्म आला त्वरित ॥ देखोनि तयां सामोरा ॥३८॥

साष्टांग दंडवतें घातलीं ॥ येरीं भीमाची करणी कथिली ॥ मग धर्मे स्तुति केली ॥ सर्वमुनींची ॥३९॥

गंगा नानास्तुतीं विनविलीं ॥ ह्नने तूं आमुची माउली ॥ मग अवघीं संतोषलीं ॥ धर्मरायासी ॥४०॥

असो रथीं बैसोनि पार्थ ॥ गेला ब्रह्मवना त्वरित ॥ गरुवे सावजासि पाहत ॥ चौं भोंवता ॥४१॥

तंव येक भिल्ल देखिला ॥ तयासि पार्थ पुसों लागला ॥ ह्नणे मज सांग गा वहिला ॥ गरुवें साज ॥४२॥

तों भिल्ल ह्नणे अर्जुनासी ॥ तें सावज दुर्लभ देवांसी ॥ तयाचिया खुणा परियेसीं ॥ विशाल नेत्र ॥४३॥

एक श्रृंग आखृड मान ॥ वज्रपाय चर्म जाण ॥ सुवर्णखुर शोभायमान ॥ पुच्छीं चामर ॥४४॥

तया आधारचक्रीं मरण असे ॥ येर्‍हवीं शस्त्र न रुपे भरंवसे ॥ गाडेसावज विशेषें ॥ ह्नणती तया ॥४५॥

महाबलिष्ठ नावरे देवां ॥ धराया उपाय येक बरवा ॥ अचूकपणें विंधावा ॥ उजवा चरण ॥४६॥

तेणें करुनि मूर्छा पावे ॥ मग जावोनि तोंड धरावें ॥ आकळोनियां बांधावें ॥ बहुतीं मिळोनी ॥४७॥

तें अंवसे कीं पौर्णिमेसी ॥ निघे प्यावया उदकासी ॥ मानससरोवरीं परियेसीं ॥ लागेल हाता ॥४८॥

मग अर्जुन गेला झडकरी ॥ रथसेवक ठेवोनि दूरी ॥ आपण राहिला सरोवरीं ॥ रात्री अमावास्येचे ॥४९॥

निरुतें लक्ष धनुषीं लाविलें ॥ तंव तें सावज तेथ आलें ॥ पर्वतप्राय देखिलें ॥ कंठीं घागरमाळा ॥ ॥५०॥

चरणी तोडर घवघवीत ॥ तंव पुसता जाहला भारत ॥ कीं हा सांगिजे वृत्तांत ॥ वैशंपायना ॥५१॥

मुनि ह्नणे ऐकें भूपती ॥ पूर्वी यज्ञ केला सुरपती ॥ तैं वरदान दीधलें तये जाती ॥ पवित्रपणास्तव ॥५२॥

कीं तुझिये वांचोनि श्राद्धयज्ञ ॥ नव्हती फलदायक पावन ॥ तयाचें श्रृंगपात्र तरी जाण ॥ असावें क्रियाकर्मीं ॥५३॥

असो अवचितां देखिलें ॥ मग पार्थे संधान केलें ॥ उजवे चरणीं विंधिलें ॥ दर्भचरतां ॥५४॥

घायें पाडिलें मूर्छित ॥ तंव धावले पार्थदुत ॥ आकळोनि बांधिलें त्वरित ॥ घातलें रथावरी ॥५५॥

त्यासी अर्जुन घेवोनि आला ॥ धर्मादि कीं आलिंगिला ॥ आतां नकुळ रथेंसीं गेला ॥ सिंदूरगिरीपर्वती ॥५६॥

तो उदयाचळीं गिरिवर ॥ तेथ कुंडलें ठेवी भास्कर ॥ तयांचिये द्रवाचा पूर ॥ चाले महोदकाचा ॥५७॥

त्यासी आटविती सूर्यकळा ॥ होती पर्वतप्राय हेमशिळा ॥ तेथें सूर्यदूतांचा मेळा ॥ रक्षण असे ॥५८॥

कुबेराची धनसंपत्ती ॥ जनांसि देतसे पशुपती ॥ तेणें सर्वलोक व्यापारती ॥ ह्नणोनि उच्छिष्ट सुवर्ण तें ॥५९॥

तैसें हें नव्हे सुवर्ण ॥ तया कवणी न पवती जन ॥ तेथें नकुळ जावोनि आपण ॥ उचलिता होय हेमशिळा ॥६०॥

तंव रक्षक धाविन्नले ॥ नकुळा बाणीं विंधिलें ॥ ह्नणती अरे सुवर्ण नेलें ॥ कोठें जासी मानवा ॥६१॥

मग संसारोनि नकुळें ॥ अमित मोकलिलीं शरजाळें ॥ धडमुंडेंसीं निवटिलें ॥ सूर्यदूता ॥६२॥

येक जावोनि सांगती सूर्या ॥ तंव तो आला धांवणेया ॥ संग्रम जाहला उभयां ॥ नकुळाकासी ॥६३॥

नकुळें ज्वाळा बाण सोडिला ॥ सूर्यतेजा पळ सूटला ॥ मग नकुळ अर्कासि बोलिला ॥ कीं हेम नेतों धर्मकार्या ॥६४॥

उगाचि ठेला दिनमणी ॥ तया नकुळें नमस्कारोनी ॥ सुवर्ण रथीं घालोनी ॥ आला घेवोनि इंद्रप्रस्था ॥६५॥

समस्तां उत्साहो जाहला ॥ धर्मे सहदेवो पाचारिला ॥ ह्नणे त्वां गोपालकृष्ण वहिला ॥ वाहोनि आणीं सकुटुंब ॥६६॥

ते स्वामिआज्ञा मानोनी ॥ येरु निघाला रथीं बैसोनी ॥ परि ज्योतिषीयांसी न गणोनी ॥ जात भद्राअमावस्ये ॥६७॥

तो मार्गी चालतां सहदेवो ॥ तया घडला होता अपावो ॥ परि घेवोनि आला वासुदेवो ॥ हें कथिलें षष्ठस्तबकीं ॥६८॥

असो सकळ यादवांसहित ॥ सकुटुंब आला अनंत ॥ सकळ होवोनि आनंदचित्त ॥ भेटते जाले परस्परें ॥६९॥

सोळासहस्त्र अंतःपुरें ॥ आणिके यादवांचीं अपारें ॥ भेटतीं जाहली परस्परें ॥ कुंतीद्रौपदीसी ॥७०॥

मग कृष्ण ह्नणे धर्मासी ॥ आतां आणावें दुर्योधनासी ॥ धृतराष्ट्र आणि गांधारीसी ॥ विदुरादिकां ॥७१॥

भीम पाठविला सैन्येंसी ॥ तो भेटला दुर्योधनासी ॥ मग धृतराष्ट्र गांधारीसी ॥ अनुक्रमें वंदिलें ॥७२॥

क्षेमकुशल विचारिलें ॥ यावरी भीमें विनविलें ॥ कीं बिजें करावें जी वहिलें ॥ श्राद्धा पंडूचिये ॥७३॥

धृतराष्ट्र ह्नणे वृकोदरा ॥ आह्मी श्राद्ध केलें अवधारा ॥ येरु ह्नणे हो तुह्मी दातारा ॥ वडील आह्मां सर्वासी ॥७४॥

परि धर्माचेनि सद्भावें ॥ तेथवरी सकुटुंब यावें ॥ मग तें मानोनि आघवें ॥ धृतराष्ट्र निघाला सपरिवार ॥७५॥

सकळ इंद्रप्रस्था पावले ॥ अपूर्व उभवणी देखते जाहले ॥ तंव दुर्योधन कर्णासि बोले ॥ पहा नांदणुक ययांची ॥७६॥

यांहीं येकाचि गांवावरी ॥ येवढी केली समृद्धिपरी ॥ आह्मी भोगितों सकळ धरत्री ॥ परि यांची सरी न ये कीं ॥७७॥

असो पांडव येवोनि सामोरे ॥ कौरवां भेटले परस्परें ॥ तैसेचि सखे सोयरे युधिष्ठिरें ॥ पाचारिले सन्मानें ॥७८॥

देशोदेशींचे द्विजवर ॥ ऋषी तापसी दिगंबर ॥ इंद्रप्रस्थीं आणिले समग्र ॥ प्रार्थोनियां ॥७९॥

धर्मे देखिले अवघ्यांसी ॥ परि न देखे दधिचिऋषी ॥ मग पाठविलें भीमासी ॥ वेगवत्तर आणावया ॥८०॥

भीम तयाचे स्थानीं गेला ॥ तंव तेणें नांगर असे जुंपिला ॥ पानगे खातां देखिला ॥ हाकीतसे आउत ॥८१॥

असे संध्यास्त्रानरहित ॥ पाई वाहाणा हल खेडित ॥ देखोनि भीम विचार करीत ॥ कैसा महंत हा ह्नणों ॥८२॥

त्या धर्मासि कैसें वाटलें ॥ जे यासी बोलावूं पाठविलें ॥ पितर काय क्षुधें पीडले ॥ ग्रास घेती याच्या पात्रीं ॥८३॥

आतां भलतैसें होवो ॥ परि आज्ञामात्रें घेवोनि जावों ॥ मग वंदूनि ह्नणे चलाहो ॥ श्राद्धालागीं पंडूच्या ॥८४॥

येरें ऐकतां आउत सोडिलें ॥ वेगवत्तरीं गमन केलें ॥ जे पानगे होते उरले ॥ ते भक्षिले चालतां ॥८५॥

गंगेसि पावले दोघेजण ॥ तेथें ऋषीनें सारिलें स्त्रान ॥ भीम ह्नणे आधीं अशन ॥ मग कर्म कर्मातर ॥८६॥

हा कैसा शुचितत्पर ॥ काय वेडा युधिष्ठिर ॥ कीं पंडुपित्यासि उपहार ॥ करवी याच्या ठायीं ॥८७॥

असो नगर प्रवेशले ॥ धर्मे दधीचीसि वंदिलें ॥ तंव भीमसेनें सांगीतलें ॥ वर्तन तयाचें ॥८८॥

धर्म ह्नणे भीमा परियेसी ॥ यांचें सामर्थ्य तूं नेणसी ॥ येणें रक्षिलें देवांसी ॥ वेचोनि स्वदेह ॥८९॥

मग तें समग्र आख्यान ॥ धर्मे भीमासि केलें कथन ॥ जें सांगीतलें असे पूर्ण ॥ द्वितीयस्तबकीं ॥९०॥

देवीं याजवळी शस्त्रें ठेविलीं ॥ येणें उदक करोनि प्राशिलीं ॥ वज्रमय हाडें जाहलीं ॥ शस्त्ररसें करोनी ॥९१॥

मागुती देव मागाया आले ॥ तेव्हां कामधेनूसि पाचारिलें ॥ शरीर चाटोनि वेगळें केलें ॥ अस्थिमांसादिक ॥९२॥

मग ती हाडें घेवोनि सुरवरीं ॥ दैत्य मारिले शस्त्रास्त्रीं ॥ पुढें वृहस्पतीनें यावरी ॥ घातली अमृतसंजीवनी ॥९३॥

तेणें हा वांचला ऋषी ॥ उपकार केला सुरवरांसी ॥ ह्नणोनि सकळ देव ययासी ॥ असती वश्य ॥९४॥

अनाचारी भलतैसा आहे ॥ परि सकळविद्यांचा समुद्र पाहें ॥ मग वंदिला महोत्साहें ॥ भीमसेनें ॥९५॥

असो सकळ पदार्थ आणोनी ॥ आयती केली तत्क्षणी ॥ गंगोदकें कलश भरोनी ॥ चरण क्षाळिले ऋषीचे ॥९६॥

तेणें जळें युधिष्ठिरा न्हाणिलें ॥ सावज अलंकारीं पूजिलें ॥ मग श्राद्ध संकल्पिलें ॥ सुवर्ण दिधलें वांटोनी ॥९७॥

पत्रावळी मांडोनि धर्मे ॥ ऋषि बैसविले अनुक्रमें ॥ वाढिला शिरा संभ्रमें ॥ पात्रोपपात्रीं ॥९८॥

सोमवंशीचि समग्र ॥ पृथक् ताटीं कल्पिले पितर ॥ दधीचिताटीं पंडुवीर ॥ अक्षता मंत्रें घातल्या ॥९९॥

येरें करीं घेवोनि जीवन ॥ केलें पंडूचें आवाहन ॥ तेथें प्रत्यक्ष पंडू येवोन ॥ बैसला दधीचिताटी ॥१००॥

कौरव माथा तुकाविती ॥ भलें आश्वर्य केलें श्रीपती ॥ आजि कैसे भूतळी तपताती ॥ पांडव हे ॥१॥

मृतमनुष्य आजि परियंत ॥ कवणें आणिलें नाहीं व्यक्त ॥ हें लाधव केलें सत्य ॥ कौशाल्यमल्ले ॥२॥

असो जेवितां ऋषिजन ॥ भीम वाढित असे अन्न ॥ नकुळसहदेव दोघेजण ॥ विंझणा जाणविताती ॥३॥

गंगा प्रत्यक्षरुपें होउनी ॥ पात्रीं उदक देत भरोनी ॥ ऋषि जेवविले आकंठपणी ॥ मग आपोशन जाहले ॥४॥

सकर्पूर ताबूलें दिलीं ॥ पंडु अदृश्य जाहला तत्काळीं ॥ मग कौरवांदिकां सकळीं ॥ जेवविलें अनुक्रमें ॥५॥

वस्त्रालंकार सुवर्णे ॥ देवोनियां अष्टविध दानें ॥ पूजोनि धर्मे मानसन्मानें ॥ पामकिले ऋषीश्वर ॥६॥

धृतराष्ट्र ह्नणे धर्मासी ॥ पंडु आला असतां भोजनासी ॥ तरी तुं कां पां आह्मांसी ॥ भेटविला नाहीं ॥७॥

ऐकोनि धर्म ह्नणे ताता ॥ तो देखिला भोजन करितां ॥ परि पंक्ति सरलिया अवचितां ॥ जाहला अदृश्य ॥८॥

मग पांचबंधु विदुर कृष्ण ॥ जेविले पंक्तीस बैसोन ॥ नानापक्कान्नें आणोन ॥ वाढीतसे द्रौपदी ॥९॥

कुंती गांधारी द्रौपदी सती ॥ रुक्मिणी सुभद्रा भानुमती ॥ राणिया रायांच्या युवती ॥ पंक्ती जेविल्या ॥११०॥

वस्त्रालंकार देउनी ॥ राजें पाठविलें सन्मानोनी ॥ दुर्योधन खेद करोनी ॥ बोले कौरवांसी ॥११॥

यांहीं गंगा आणि ऋषिजन ॥ गरुवें सावज क्कारें सुवर्ण ॥ आणोनि केलें श्राद्ध पूर्ण ॥ हें हीनपण आपणां ॥१२॥

कर्ण ह्नणे करुं आपण ॥ यांचें नवल तें कवण ॥ तंव अश्वत्थामा बोले वचन ॥ पाहूं पूर्ण करीं कां ॥१३॥

तुह्मी बोलोनि फार करितां ॥ नाडोनि दुर्योधनासि खातां ॥ परि येखादें करोनि दावितां ॥ आह्मी नाहीं देखिलें ॥१४॥

तेव्हां दुर्योधन ह्नणे ॥ आपुल्यांचें न बोलावें उणें ॥ येखादा दृढ विचार करणें ॥ जेणें कार्य साधेल ॥१५॥

असो कौरव गेले हस्तनापुरीं ॥ तंव यादवां देखतां मुरारी ॥ धर्मासि ह्नणे ते अवसरीं ॥ सुभद्रा पार्था दीधली ।१६॥

भाषानिश्वयो जाहले ॥ लग्न वैशाखीं निर्धारिलें ॥ परि बळिभद्रें मनी धरिलें ॥ कीं दुर्योधना देयावी ॥१७॥

असो श्राद्धविधी सारोनी ॥ द्वारके गेला चक्रपाणी ॥ पांडव परम सुखी होवोनी ॥ राज्य करिती इंद्रप्रस्थीं ॥१८॥

हा श्राद्धविधी ऐकतां ॥ पूर्वज उद्धरती सर्वथा ॥ पुढें ऐकावी अपूर्व कथा ॥ ह्नणे मधुकरकवी ॥१९॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबक मनोहरु ॥ पंडुश्राद्धविधिप्रकारु ॥ त्रिंशोऽध्यायीं कथियेला ॥१२०॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP