मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय ११

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय ११

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

प्रधान करी विनंती ॥ ह्मणे ऐकें नळाभुपती ॥ पुसावी नृसिंहा वित्पत्ती ॥ नघुक कुमराची ॥१॥

रायासि दुःख दुणावलें ॥ शोकें हृदय फूटलें ॥ मग नृसिंहासि पुसिलें ॥ पुत्रवृत्त ॥२॥

नृसिंह नळासि बोलिला ॥ जी जी नघुक गरूड नेला ॥ तो इलावृतखंडीं घातला ॥ विष्णुआज्ञेनें ॥३॥

तेव्हां नळ ह्मणें अवधारीं ॥ हें तुह्मी जाणतां कैशियापरी ॥ येरु ह्मणे प्रकाशनेत्रीं ॥ दिव्यचक्षूंच्या ॥४॥

आह्मी पूर्वीं अवधारा ॥ जिंकिलें ब्रह्माहरिहरां ॥ मग स्थापिलें गिरिशिखरा ॥ प्रसन्नत्वें तयांनीं ॥५॥

तैहुंणी कल्पकोटि वरुषें ॥ आह्मी येथें असों संतोषें ॥ परि आजि जाहलें ऐसें ॥ काय महेशें निर्मिलें ॥६॥

नळ ह्मणें हो नृपमणी ॥ तुह्मीं वोखटें न घरा मनीं ॥ ह्मणोनि धरिला कवळोनी ॥ संबोखोनि सुशब्दें ॥७॥

नळ ह्मणें तो गौरीहर ॥ मज दैवत कृपाकर ॥ परि समरंगणीं भिडणें निर्धार ॥ क्षत्रियपणें ॥८॥

असो मग अश्वगजरथ ॥ वस्त्रालंकार सर्व पदार्थ ॥ नळें दीधलें अपरिमित ॥ नृसिहासी ॥९॥

जाहली आरोगणा टिळे विडे ॥ नृसिंह सिंहासनीं कोडें ॥ नळें स्थापिला महाप्रौढें ॥ वाद्यगजरीं ॥१०॥

समस्त भूपाळ आनंदले ॥ ह्मणती अत्यंत बरवे जाहलें ॥ नगरीं मग उत्साह केले ॥ संभ्रमें थोरें ॥११॥

असो नृसिंह ह्मणे नळासी ॥ चला नघुकाचिये शुद्धीसी ॥ तंव नळ ह्मणे समस्तांसी ॥ गति कैसी कीजे आतां ॥१२॥

इलावृत्ती नेला पुत्र ॥ ऐकोनि चिंतावला दळभार ॥ मग नृसिंह ह्मणे विचार ॥ ऐका माझा ॥१३॥

षट्‍पर्वत वायव्यकेणीं ॥ तेथे जावें झडकरोनी ॥ शुद्धी लागेल तेथोनी ॥ ऐकोनि नळ चालिला ॥१४॥

नृसिंह सैन्येंसि होय पुढें ॥ मागें ससैन्य भुप वेंगाढे ॥ सहस्त्र योजनें झडाडें ॥ क्रमिला पंथ ॥१५॥

ऐसे येकविसां दिवशीं ॥ पातलें षट्‍पर्वतापाशीं ॥ तेथें विजयराजा सैन्येसीं ॥ नांदत असे ॥१६॥

गरूडपुराणीं भविष्योत्तरीं ॥ तथा नारद्पुराणीं षट्‍‍गिरी ॥ सांगीतलासे ऋषीश्वरीं ॥ व्यासदिकीं ॥१७॥

तो गिरिवर वेढिला ॥ नळ परिवारें उतरला ॥ तंव दूत सांगों गेला ॥ विजयापुढें ॥१८॥

जीजी परदळ थोर आलें ॥ षट्‌पर्वतासी वेढिलें ॥ रावो कोपोनियां चाले ॥ दळभारेंसी ॥१९॥

निशाणाचा नाद थोर ॥ सन्नद्ध जाहला दळभार ॥ मग दोहीं दळां पुर ॥ पेटला युद्धाचा ॥२०॥

पायद पायदांवरी धांवले ॥ गजांवरी गज लोटले ॥ रथांवरीरथ धावले ॥ राउत राउतांवरीं ॥२१॥

तो संग्राम सकळ सांगतां ॥ येथेंचि होईल विस्तार ग्रंथा ॥ दाटला वसुंधरेचा माथा ॥ धंडमुंडीं शोणितें ॥२२॥

तीनक्षोणी सैन्य पडिलें ॥ नळाचें दळ मोडलें ॥ तंव नॄसिंहें घाइलें ॥ दळ पिटिलें विजयाचें ॥२३॥

पळ सैन्यासि सूटला ॥ देखोनि विजय धाविन्नला ॥ दोघां संग्राम जाहला ॥ घोरदर ॥२४॥

ते शस्त्रास्त्रीं परस्परें ॥ झुंजतां खचलीं गिरिशिखरें ॥ विजयें विधिलें निकरें ॥ नृसिंहासी ॥२५॥

नृसिंह मूर्छित पडतां रणीं ॥ विजय धाविन्नला चरणीं ॥ रथीं वाहिला उचलेनी ॥ केला सिंहनाद ॥२६॥

तेणें सैन्यासि भंग जाहला ॥ ह्मणोनि नळराव उठावला ॥ विजय सत्राणें विंधिला ॥ तंव तो जाहला सन्मुख ॥२७॥

दोघां निर्वाण मांडिलें ॥ सुरवर विमानीं दचकले ॥ आणि भयभीत जाहले ॥ हरिहरब्रह्मा ॥२८॥

ईश्वर ह्मणे गा गोपाळा ॥ आतां काय करणें या नळा ॥ हा संहारील सकळां ॥ याचा यावा थोर दिसे ॥२९॥

तंव विष्णु मरुडासि बोलिला ॥ कीं नधुक कोठें ना सांडिला ॥ येरु ह्मणे नेवोनि घातला ॥ इलावृतखंडीं ॥३०॥

विष्णु ह्मणे आतां अवधारीं ॥ नळ सैन्येंसिं घालीं सागरीं ॥ तंव येरू उडोनियां झडकरी ॥ विस्तारिले पंख ॥३१॥

देव आनंदले अंबरीं ॥ ह्मणती आला आमुचा कैवारी ॥ ये रु येतां सैन्यावरी ॥ पडिला अंधकार ॥३२॥

कुंभकर्ण वरुतें पाहे ॥ तंव गरुड आला आहे ॥ मग नळासि लवलाहें ॥ सांगे भयचकित ॥३३॥

कीं पैल आला तैंचा पक्षी ॥ जेणें नेलें होतें नघुकासी ॥ हे थोर उठली विवशी ॥ काय करील नेणिजे ॥३४॥

नळ ह्मणे कुंभकर्णा ॥ तुह्मी दृढ धरावें मना ॥ सन्नद्धावें विजयसैन्या ॥ मी झुंजेन गरुडासी ॥३५॥

कुंभकर्ण उठावला ॥ विजयासवें झुंजिन्नला ॥ थोर प्रळ्यांत मांडला ॥ तो असो आतां ॥३६॥

नळ उठावला आइणी ॥ पूर्ण कानाडी भरोनी ॥ देव जाहले सभय मनीं ॥ स्वर्ग सांडों पाहती ॥३७॥

तंव त्या गरुडाचा यावा ॥ आणि नळरायाचा उठावा ॥ देखोनि पक्षिकुळा सर्वा ॥ वर्तली चिंता ॥३८॥

मग पक्षिरायें काय केलें ॥ आपुलें सेनापती बोलाविले ॥ त्यांसीं विचार मांडिले ॥ थोर पडलें सांकडें ॥३९॥

ह्मणे हा गरुड स्ववंश ॥ यासी झुंजता थोर दोष ॥ आणि सोमवंशी तामस ॥ राजानळ ॥४०॥

यासी आलों साह्यकारणें ॥ उपेक्षितां नरकीं जाणें ॥ जरीं संकटीं सांडणें ॥ स्वामियासीं ॥४१॥

अवघें गोत्र संहारावें ॥ परि स्वामिवचन पाळावें ॥ तरिच मोक्षपद पावावें ॥ जगीं यशकीर्तीं ॥४२॥

तरी आतां सकळीं उठावें ॥ यया गरुडासिं झुजावें ॥ साह्य सर्वथा करावें ॥ नळरायाचें ॥४३॥

मग उठावला कुशेश्वर ॥ जया नाम शतघुबडेश्र्वर ॥ तो गगनमार्गे सपरिवार ॥ चालिला गरुडावरी ॥४४॥

देव गजबजोनि पळाले ॥ ह्मणती विघ्न थोर उदेलें ॥ अंधकारें झांकोळलें ॥ भुमंडळ ॥४५॥

पक्षीआले धुंधुकारे ॥ ते देखिले खगेश्वरें ॥ मग तये विनताकुमरें ॥ मांडिला विचार ॥४६॥

ह्मणे गगनाच्या पोकळीं ॥ न माय पक्षियांची चांहूळी ॥ काय मज कोपला वनमाळी ॥ ह्मणोनि रचिलें हें ॥४७॥

कीं पूर्वील वैर जाणोनी ॥ कौसल केलें सुरगणीं ॥ ऐसी गरुड शंकला मनीं ॥ तंव आठवला स्वामिशब्द ॥४८॥

कोपें काळरुद्र खवळला ॥ नातरी अग्निकल्लॊळ उठिला ॥ तैसा तेजपुंज चालिला ॥ पक्षिकुळावरी ॥४९॥

देखोनि नळें धनुष्य ओढिलें ॥ बाण असंख्यात सोडिले ॥ आपुलें सैन्य आच्छादिलें ॥ शरजाळेंकरोनी ॥५०॥

गरुडें आंदोळिले उभय पर ॥ तेणें उडाले गिरिवर ॥ भंगोनि गेलें शरपंजर ॥ शक्ति थोर वैनतची ॥५१॥

नळें प्रेरिली महाशक्ती ॥ ते गरुडें देखिली दिव्य दीप्ती ॥ परि मोडोनि शीघ्रगती ॥ सांडिली नळापुढें ॥५२॥

येरें अग्निअस्त्र प्रेरिलें ॥ तें गरुडें फूत्कारें विझविलें ॥ तंव नळें सणसणा विंधिलें ॥ आणि झोंबिन्नले पक्षिवर ॥५३॥

गरुड जाहला दुश्चित ॥ नळाचा पराक्रम अद्भुत ॥ देखोनि ह्मणे उमाकांत ॥ काय निश्चिंत गोविंदा ॥५४॥

ऐकोनि ह्मणे मेघश्याम ॥ कवण नळासी करीं संग्राम ॥ जेणें कासाविस द्विजोत्तम ॥ शरजाळे केला ॥५५॥

ब्रह्मयासि ह्मणे श्रीपती ॥ यासी काहीं सांगे शांती ॥ येरु ह्मणे नाहीं सर्वाथीं ॥ मृत्यु नळासी ॥५६॥

तेव्हां विष्णुप्रमुख समग्र ॥ गजबजोनि गेले सुरवर ॥ इकडे नळें प्रेरिली शीघ्र ॥ ब्रह्मशक्ती ॥५७॥

ते पातली धुंधुवातीं ॥ पक्षी न सांवरत झोंबती ॥ शतघुबडेश्वर ह्मणे खगपती ॥ नघुक कोठें सांडिला ॥५८॥

गरुड कोपोनि बोलिला ॥ अरे नघुकाचा पाड केतुला ॥ तुह्मा ठाव असे निर्मिला ॥ साठवावया समुद्र ॥५९॥

ऐकोनि लोटले पक्षिवर ॥ तेथे संग्राम जाहला थोर ॥ गरुडें संहारिले अपार ॥ झडपोनी नखीं पांखीं ॥६०॥

गरुडा शक्ति बैसली सत्राणें ॥ परि तो सांवरोनि लाठेपणें ॥ पक्षि मारिले तेणें गुणें ॥ दाटलें भूमंडळ ॥६१॥

खालीं सैन्य चूर जाहलें ॥ देखोनि नळें पाशुपत घातलें ॥ तंव जन्मेजयें आक्षेपिलें ॥ कीं हें अस्त्रशिवाचें ॥६२॥

वैशंपायन ह्मणे भूपती ॥ तिन्हीदेव येकमूर्तीं ॥ तरी विधिनें दीधल्या समस्ती ॥ विद्या सोमा ॥६३॥

तें क्रमेंचि नळापें आलें ॥ नळें वैनतावरी घातलें ॥ येरें अद्दष्ट रूप धरिलें ॥ तये वेळीं ॥६४॥

ध्रुवमंडला गेला खगेश्वर ॥ पाठी लागला शतघुबडेश्वर ॥ तीव्रशब्दें हाकिला शीघ्र ॥ येरु मागुता मुरडला ॥६५॥

सामें पाशुपत पातलें ॥ तेणें गरुडासी भेदिलें ॥ वरी पक्षिये झोंबिन्नले ॥ मूर्छित पडिला वैनत ॥६६॥

शतघुबडेश्वर पातला ॥ तेणें स्वपक्षांवरी धरिला ॥ अंतरिक्षीं धरूनि ठेला ॥ तंव येरू जाहला सावध ॥६७॥

शत घुबडेश्वर पातला ॥ तेणें न करावी काहीं चिंता ॥ दोघां वीरांसि झुंजतां ॥ येका निश्चयें पराजय ॥६८॥

असो तें देखोनि सुरगणीं ॥ पलायन केलें तत्क्षणीं ॥ इकडे गरुड आणिला मेदिनीं ॥ घुबडें नळाजवळी ॥६९॥

नळासी शतघुबडेश्वर ह्मणे ॥ घेई आपुल्या अरिकारणें ॥ ऐकोनि नळें तत्क्षणें ॥ आलिंगिला गरुड ॥७०॥

मग पाशुपत आणि ब्रह्मशक्ती ॥ नळें उपडिली शीघ्रगती ॥ कर जोडोनि करी विनंती ॥ नळभूपती गरुडाची ॥७१॥

षोडशोपचारें पूजिला ॥ तंव कुंभकर्णें विजयो आणिला ॥ आणि नृसिंहा सोडविला ॥ जाहला जय ॥७२॥

उभयतां नळें सन्मानोनी ॥ सभा केली तियेस्थानीं ॥ विजयो पुसे विनयवचनीं ॥ कां जी धाडी घातली ॥७३॥

नळ ह्मणे गा भूपाळा ॥ जातहोतों स्वर्गमंडळा ॥ तंव गंधमादनीं नृसिंह भेटला ॥ तो हा जिंकला प्रयासें ॥७४॥

पुढें पुत्रशोधार्थ पंथ धरिला ॥ तंव येथ ऐसा प्रकार जाहला ॥ तोही पुण्यें सिद्धिस गेला ॥ पूर्वजांचे ॥७५॥

आतां नघुक माझा सुत ॥ त्याचा काय जाहला वृत्तांत ॥ तो सांगावा त्वरित ॥ मग जाऊं कैलासा ॥७६॥

गरुड ह्मणे ऐकें नळा ॥ तो म्यां इलावृत्तीं सांडिला ॥ नळ ह्मणे गा भलाभला ॥ द्दिजोत्तमा तुं ॥७७॥

माझा पुत्र सांडिला तेथ ॥ हें कां केलें अघटितातंव गरुड असे बोलत ॥ तो घेवों पाहें कैलास ॥७८॥

ह्मणॊनि नारायणें पाठविलें ॥ येवढें कृत्य करविलें ॥ तुह्मी सोमवंशी राजे भले ॥ विरोधिलेंति शिवासी ॥७९॥

तंव नृसिंह गरुडासी पुसे ॥ कीं तो जिवंत असे की नसे ॥ मग वैनत बोलिला संतोषें ॥ इलावृतखंडीं नांदत ॥८०॥

तेणें जिंकिला तेथील रावो ॥ मग जाहला विवाहो ॥ पुत्र प्रसवला महाबाहो ॥ जातिकर नावें ॥८१॥

ऐसा नघुकाचा वृत्तांत ॥ गरुडें केला समस्तां श्रुत ॥ तेणें हर्ष जाहला बहुत ॥ भूपाळांसी ॥८२॥

मग ह्मणे जन्मेजयो ॥ जेंजें बोलिला पक्षिरावो ॥ तोनघुकाचा कथान्वयो ॥ सांगिजे मज ॥८३॥

वैशंपायन ह्मणे अवधारीं ॥ इलावॄतखंडीं इलावर्त नगरी ॥ तेथें येकाक्ष राज्य करी ॥ परिवारेंसीं ॥८४॥

तंव सैन्यासह नघुक देखा ॥ तेथें गरुडें सांडिला आइका ॥ धाक पडला सकळ लोकां ॥ गजबजिला एकाक्ष ॥८५॥

रायें बंदिजन पाठविले ॥ ते नधुकाजवळी पातले ॥ प्रणाम करोनि जंव ठाकले ॥ तंव देखिले राक्षस ॥८६॥

ह्मणोनि पळाले बंदिजन ॥ एकाक्षासी केलें कथन ॥ जीजी राक्षस आले दारूण ॥ ग्रासावया आपणां ॥८७॥

एकाक्ष विचारीं अंतरीं ॥ यांसीं झुंजावें कवणेपरी ॥ तंव बोलिलें नागरीं ॥ त्यांसवें असती मानव ॥८८॥

ऐकोनि येकाक्ष परिवारें ॥ तयावरी चालिला थोरें ॥ अमितबाणीं सत्वरें ॥ विंधिलें पारकीयां ॥८९॥

इकडुनि उठावला रावण ॥ मोडोनि पाडिला शरगण ॥ ह्मणे येकाक्ष जाहला अज्ञान ॥ नेणे राक्षसां ॥९०॥

तो रावण वोळखिला ॥ ह्मणोनि एकाक्ष धाविन्नला ॥ शस्त्रें सांडोनि नघुका जाहला ॥ शरणागत ॥९१॥

मग करजोडोनि ह्मणे । तुह्मी कोठील कोण राणे ॥ तंव बोलिलें रावणें ॥ हा सोमवंशी भूपाळ ॥९२॥

याचे पित्यानें परिवारीं ॥ वेढिला गंधमादनगिरी ॥ आह्मां पाठविलें मेरूवरी ॥ तंवदेव गजबजिले ॥९३॥

विष्णुनें वैनता पाठविलें ॥ तेणें तुमच्या खंडीं सांडिलें ॥ परि येथें ऐसें वर्तलें ॥ भलें विचारलें येकाक्षा ॥९४॥

येकाक्ष हर्षोनि विनवित ॥ आतां चलाजी नगरांत ॥ मग गेले सैन्यासहित ॥ नगरामाजी ॥९५॥

एकाक्ष रावो नघुका विनवी ॥ माझी कन्या तुवां वरावी ॥ येरें तें मानितां स्वभावीं ॥ संतोषला परिवार ॥९६॥

लग्नविधान सांग करोनी ॥ येकाक्षें दीधलीं नंदिनीं ॥ राज्य भूमी वस्त्रें देउनी ॥ वाहिले सर्व पदार्थ ॥९७॥

ते रुपसुंदरा नामें कामिनी ॥ पुत्र प्रसवली बहुतां दिनीं ॥ रायें महोत्साह करोनी ॥ नांव ठेविलें जातिकार ॥९८॥

नंतरें कितीयेका दिवशीं ॥ न घुक विनवी श्वशुरासी ॥ कीं उच्चाट होतो आह्मासी ॥ कैसें पितया भेटावें ॥९९॥

एकाक्ष ह्मणे न करीं चिंता ॥ मी भेटवीन सर्वथा ॥ मग विमानीं समस्तां ॥ वाहिलें तेणें ॥१००॥

राव बैसला स्त्रीपुत्रेंसीं ॥ विमान उपमलें आकाशीं ॥ तंव जन्मेजय पुसे मुनीसी ॥ यांसी विमानें कोठील ॥१॥

वैशंपायन ह्मणे नृपवरा ॥ येणें जिंकिलें सुरवरां ॥ तैं विमानें येकाक्षवीरा ॥ दीधलीं देवीं ॥२॥

तीं विमानें राया जवळी ॥ हा पूर्वील अतुर्बळी ॥ असो तीं चालिलीं गगनपोकळीं ॥ सैन्यासहित ॥३॥

येकाक्ष विमनीं चालत ॥ तंव देखिला षट्‌पर्वत ॥ तेथें दळभार समस्त ॥ वोळखिला रावणें ॥४॥

मग विमानांतूनि उतरोनी ॥ चालिले भेटाया लागुनी ॥ परि नळाची आज्ञा घेवोनी ॥ गेला गरुड ॥५॥

गरुड गेलियावरी ॥ राव सभेसि विचारीं ॥ तंव नघुक येवोनि परिवारीं ॥ भेटला पितया ॥६॥

एकाक्ष नातुवेंसीं भेठला ॥ समस्तां जयजयकार जाहला ॥ क्षेमालिंगनें भूपाळा ॥ जाहलीं परस्परें ॥७॥

पुढें नळरायें काय केलें ॥ जातिकरासी राज्य दीधलें ॥ तंव विजयासी बोलिलें ॥ नृसिंहरायें ॥८॥

तुझी कन्या जातिकरातें ॥ देवोनि करूं शोभनातें ॥ हें मानवलें विजयातें ॥ मग मांडिला विवाहो ॥९॥

आणोनि सुभुजा नामें कुमरी ॥ लग्न लाविलें मंत्रोज्चारीं ॥ महोत्साह सांगती विस्तारीं ॥ जाईल ग्रंथ ॥११०॥

जातिकराचा विवाह जाहला ॥ सकळां संतोष वर्तला ॥ पुढें काय विचार माडिला ॥ सकळ नृपवरीं ॥११॥

बुध पुरुरवा गव्यवीर ॥ अल्यु नळ नृपवर ॥ नघुक आणि जातिकर ॥ क्रमें वंश विस्तारला ॥१२॥

आतां विचारुनि नळरावो ॥ पुढां काय करील महाबाहो ॥ तो ऐकावा कथान्वयो ॥ ह्मणो मधुकरकवी ॥१३॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ अष्टमस्तबक मनोहरू ॥ नळनघुकपराक्रमप्रकारू ॥ एकादशोध्यायीं कथियेला ॥११४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP