मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय १२

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय १२

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

मुनीसि ह्मणे जन्मेजयो ॥ वैशंपायना तूं मतीचा डोहो ॥ तरी पुढील कथान्वयो ॥ सांगिजे मज ॥१॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ राया तूं श्रोता विचक्षण ॥ आतां अग्रकथाप्रश्न ॥ दत्तचित्तें अवधारीं ॥२॥

नळें जातिकरा राज्य दीधलें ॥ समग्र सभेमाजी बैसले ॥ तंव सप्तद्दीपींचि राजे आले ॥ नमस्करा ॥३॥

रावण कुंभकर्ण विभीषण ॥ शतघुबडेश्वर पक्षिगण ॥ समस्त राजे येऊन ॥ नमस्कारिलें जातिकरा ॥४॥

सकळ सभेमाजी बैसले ॥ तंव नळरायें ह्मणितलें ॥ कीं स्वर्गासि जाणें राहिलें ॥ मध्येंचि लागले वाडदिवस ॥५॥

चातुर्यं बोलिले रायराणे ॥ मेरुसि सव्य घालणें ॥ उत्तरेकडोनि पूर्वेसि जाणें ॥ शीघ्र घेणें अमरावती ॥६॥

ऐसा विचार ऐकोनि रावो ॥ निशाणीं देववीतसे घावो ॥ सुरवरां उपजला भेवों ॥ तयेवेळीं ॥७॥

इकडे नृसिंह ह्मणे नळासी ॥ राया विचार परियेसीं ॥ आणावें आपुलें अंतःपुरासी ॥ जावों स्वर्गासी सकुंटुब ॥८॥

येरें दूत पाठविले ॥ ते कुटुंबासी घेवोनि आले ॥ मग शीघ्र दळ चालिलें ॥ स्वर्गमार्गें ॥९॥

सुचना अपूर्व करोनी ॥ मेरूनि सव्य घालोनि ॥ गिरिकंदरें वोलांडुनी ॥ चालिले उत्तरदिशे ॥१०॥

ते उत्तरदिशाही सांडोनी ॥ सैनिक गेले ईशान्यकोणीं ॥ तंव उदयाचळ नयनीं ॥ देखोनियां वेधंती ॥११॥

षट्‌पर्वताहूनि उदयगिरी ॥ अठरासहस्त्र योजनें दूरी ॥ क्रमोनि गेले सपरिवारीं ॥ दिवसां अठ्ठाविसां ॥१२॥

तो उदयाचळ उंचतर ॥ येककोटी योजनें थोर ॥ तेथें राजा महावीर ॥ चंद्र मौळी नामें ॥१३॥

तेणें पूर्वीं देव जिंकिले ॥ अमरमुवन घेतलें ॥ तिन्हीदेव आकर्षिले ॥ ह्मणोनि नाम चंद्रमौळी ॥१४॥

वरुषें सहस्त्र येक्यापाशी ॥ तेणें राज्य केलें अमरावतीसी ॥ मग राहिला उदयाचळासी ॥ स्वेच्छाचारें ॥१५॥

तयाचें सैन्य अवधारा ॥ रहंवर क्षोणी अकरा ॥ कुंजर क्षोणी अठरा ॥ पायभारां मिती नाहीं ॥१६॥

एकवीस क्षोणी असिवार ॥ सतराक्षोणी धनुर्धर ॥ येकवीस क्षोणी उष्ट्रवीर ॥ एकी क्षोणी वाजंत्रे ॥१७॥

इतुकें दळ घरींचें ॥ वरी तेतीसकोटी स्वर्गींचें ॥ दुसरें तदुपरि इंद्राचें ॥ सोयरीकपण ॥१८॥

पूर्वील काळीं उदयाचळीं ॥ होता निर्माल्य महाबळी ॥ हा चंद्रमौळी त्याचे कुळीं ॥ जाहली पिढी पांचवी ॥१९॥

तयापरिस प्रतापी जाहला ॥ अगणित दळभार ॥ मेळविला ॥ असो तो उदयाचळ वेढिला ॥ नळें दळभरिंसीं ॥२०॥

तेव्हां वाजंत्रांच्या गजरीं ॥ ब्रह्मांड थरारिलें भारी ॥ ध्यानस्थ होता त्रिपुरारी ॥ तोहि अंतरीं गजबजिला ॥२१॥

नाद वाजंत्रांचा ऐकिला ॥ अनुहातध्वनी विसरला ॥ गजबजोनियां उठिला ॥ ह्मणत रामराम ॥२२॥

तंव नारद तेथ गेलाहोता ॥ तेणें ऐकिलें उच्चारितां ॥ मग पुसिलें जगन्नाथा ॥ येरें श्लोक सांगीतला ॥२३॥

नारदें ताडपत्री लिहिला ॥ मग तो ब्रह्मयाजवळी नेला ॥ तेणें तयाचा विस्तार केला ॥ शतश्र्लोक ॥२४॥

ते घेवोनि ब्रह्मकुमर ॥ गेला बद्रिकाश्रमीं शीघ्र ॥ देखिला वाल्मीक ऋषीश्वर ॥ तया श्लोक निरूपिले ॥२५॥

त्यावरूनियां वाल्मीकें ॥ रामायण भाषिलें हरिखें ॥ जें शतकोटी संख्या निकें ॥ रामनसतांची ॥२६॥

येककोटी आगळें केलें ॥ तें बद्रिकाश्रमीं ठेविलें ॥ येर शतकोटी वांटिलें ॥ तिहींलोकीं ॥२७॥

तें संकलितमार्गें संपूर्ण ॥ ऋषींनीं केलें कथन ॥ तेथील गव्हरकथा कारण ॥ परियेसी जन्मेजया ॥२८॥

ऋषीनें अनागत भाषिंले ॥ तयाचें फळ कैसें जाहलें ॥ तेंही आतां ऐकें वहिलें ॥ संक्षेपमार्गें ॥२९॥

उदयाचळीं वेढा पडिला ॥ तेथं रावणा उच्चाट सुटला ॥ मग बंधुवासि बोलिला ॥ कीं चलावें येथोनियां ॥३०॥

मजसी वाटतसे मनीं ॥ राज्य करीन नवखंडमेदिनी ॥ तरी आतां सुरगण बांधोनी ॥ नेवों लंकेसी ॥३१॥

काय पुसाव या भूपाळां ॥ ह्मणोनि दळभारेंसीं चालिला ॥ तो स्वर्गभुवनीं पावला ॥ इंद्र जिंकिला संग्रामीं ॥३२॥

तेतीसकोटी सलोकपाळ ॥ ते बांधोनियं सकळ ॥ घेवोनि गेला उताविळ ॥ लंकेमाजी ॥३३॥

अमित मेळविला दळभार ॥ राज्य करी दशशिर ॥ तो समूळ सांगतां विस्तार ॥ होईल ग्रंथा ॥३४॥

कीं जें बालकांड विशेषें ॥ तृतीय स्तबकीं कथिलें असे ॥ उरलें रामायण सर्वाशें ॥ सप्तमस्तबकीं ॥३५॥

ह्मणोनि खंडिली पुनरुक्ती ॥ कथा परियेसीं भुपती ॥ असो उदयाचळपर्वतीं ॥ पडिला वेढा ॥३६॥

तंव देव नेले रावणें ॥ तें मध्येंचि जाहलें घालणें ॥ असो जातिकरें नृपनंदनें ॥ कायकेलें परियेसा ॥३७॥

राजे समस्त बोलाविले ॥ ह्मणे कष्ट तुह्मांसि जाहले ॥ स्वल्पकर्य असे उरलें ॥ रहावें सावधान ॥३८॥

हा पारकियांचा देश ॥ कवणाचा न मानावा विश्वास ॥ ऐसा करोनियां सौरस ॥ संबोखिले मेळिकार ॥३९॥

तंव दूतद्दारें वृत्तांत ॥ जाहला चंद्रमौळीसि श्रुत ॥ ह्मणे येवढा कोण नृपनाथ ॥ ते करा शुद्धी ॥४०॥

ऐंकोनि दूत धाविन्नले ॥ समाचार घेवोनि आले ॥ रायासि वृत्त जाणविलें ॥ कीं हा सोमवंशीय ॥४१॥

यासी हस्तनापुरीं वसणें ॥ वोळंगती रावराणे ॥ आतां स्वर्ग घ्यावया कारणें ॥ पातला येथ ॥४२॥

मग कोपोनियां दळभारेंसीं ॥ चंद्रमौळीं चालिला वेगेंसीं ॥ ऐसें देखोनि रायांसीं ॥ हाकारिलें जातिकरें ॥४३॥

सप्तद्दीपींचि राव आले ॥ तया सन्माने विडे दीधले ॥ तंव तेथे गिवसिते जाहले ॥ रावणकुंभकर्णा ॥४४॥

तेव्हा समस्त राजे ह्मणती ॥ त्यांहीं लुटोनि अमरावती ॥ बंदी घातला सुरपती ॥ देवांसहित ॥४५॥

जातिकार विस्मित जाहला ॥ नळा नघुकासी बोलिला ॥ जीजी स्वर्गाचा ठावो फोडिला ॥ आतां कैसें करावें ॥४६॥

नळ ह्मणे वोखटें जाहलें ॥ देव रावणें बंदीं घातले ॥ आतां स्वर्गीं जाणें राहिलें ॥ परि जिंकिजे चंद्रमौळीसी ॥४७॥

नंतरें स्थापोनि मागुता ॥ आपण नगरासि जावों सर्वथां ॥ ऐसी आज्ञा होतां समस्तां ॥ वाजिन्नलें निशाणा ॥४८॥

जातिकर रथीं आरुढला ॥ चातुरंगभार उठावला ॥ नृसिंहरावो चालिला ॥ देवोनि हाक ॥४९॥

चंद्र्मौळीही उठावला ॥ सिंहनादें गर्जिन्नला ॥ अमितबाणीं वर्षताजाहला ॥ सैन्यावरी ॥५०॥

इकडूनि नृसिहें तत्क्षणीं ॥ तयाचे तोडिले बाण बाणीं ॥ संग्राम जाहला आयणीं ॥ उभयवीरां ॥५१॥

नृसिंहें चंद्रमौळीं विंधिला ॥ बाणें मूर्छागत पाडिला ॥ परि तो सांवरूनि घांवला ॥ शरीं भेदिला नृसिंहा ॥५२॥

पळ काढिला नृसिंहें ॥ तंव धावणें केलें येकाक्षरायें ॥ परस्परें जाहले घाये ॥ चंद्रमौळीसी ॥५३॥

चंद्रमौळीनें शीघ्रगती ॥ अभिमंत्रोनि सोडिली शक्ती ॥ ते बैसली निर्घातीं ॥ एकाक्षासी ॥५४॥

तेणें अंबर गर्जिन्नलें ॥ सैन्य तीनक्षोणी पडलें ॥ तंव जन्मेजयें आक्षेपिलें ॥ कीं हें कळे केवीं ॥५५॥

सैन्य तीनक्षोणी पडलें ॥ हें कोणी सांगितलें ॥ मग वैशंपायन बोलिले ॥ ऐकें राया ॥५६॥

जैं एकलक्ष सैन्य पडेला ॥ तैं शिरेंविण घड नाचेल ॥ आणि तेंचि संग्राम करील ॥ रणामाजी ॥५७॥

मागुती जन्मेजया ह्मणे ॥ लक्षक्षोणी केवीं गणण ॥ येरू ह्मणे ऐकें बोलणें ॥ भविष्योत्तरींचे ॥५८॥

जरी शिरंविण पायाळवीर ॥ नाचतां देखिजे भुचर ॥ तरी ह्मणिजे साचार ॥ पडिला लक्षयेक ॥५९॥

शिरेंविण असिवारू ॥ जरी नाचतां देखिजे वीरू ॥ तरी कोटियेक संहारू ॥ जाहला सत्य ॥६०॥

शिरेंविण वांरु नाचे ॥ तरी प्रमाण अर्बुदाचें ॥ आणि शिरेंविण नृत्य उष्ट्रांचें ॥ तरी पडलें खर्वयेका ॥६१॥

जरी शिरेंविण डोले हत्ती ॥ तरी एकपद्मा जाहली शांती ॥ अंतराळीं रथ भ्रमतीं ॥ तैं पतित क्षोणियेक ॥६२॥

तरीं ऐकें गा नृपनाथा ॥ कंठनाळेंविण भ्रमतां ॥ देखिलें गगनीं तीनी रथां ॥ तिये रणीं ॥६३॥

हें भविष्योत्तरींचे मत ॥ लक्षोनि सांगीतलें गणित ॥ तंव जन्मेजय विनवित ॥ कीं सांगें अग्रकथा ॥६४॥

मुनि ह्मणे येकाक्ष रणीं पडला ॥ तैं सैन्या हाहाःकार जाहला ॥ ह्मणती महाराजा निमाला ॥ इलावतींचा ॥६५॥

मग षट्‌पर्वतीचा महाबळी ॥ विजय चालिला समद्ळीं ॥ तंव पातल चंद्रमौळीं ॥ पाचारित ॥६६॥

तया संसाणोनि विजय ॥ संग्रामासि सन्मुख राहे ॥ हें नघुकें देखोनि लाहें ॥ प्रेरिला रथ ॥६७॥

नळही चालिला देखोनि तया ॥ घुबडेश्वर सहित पक्षिया ॥ तैं कानाडी भरोनियां ॥ विधिलें चंद्रमौळीतें ॥६८॥

घाई पडलें पक्षि देखा ॥ एक घेवोनि पळाले शिलीमुखा ॥ तंव शस्त्र प्रेरिले वन्हिमुखा ॥ चंद्रमौळियें ॥६९॥

इकडूनि विजयनृपवरें ॥ वन्हिविझविला वरूणास्त्रें ॥ जळधारी वर्षला थोरें ॥ मेघसमूह ॥७०॥

चंद्रमौळीचे सैन्य अशेष ॥ रणीं पडलें बारालक्ष ॥ तंव मारुतास्त्रें निःशेष ॥ निवारिलें येरें ॥७१॥

मग मळ नघुक अंतराळीं ॥ रथप्रेरित पातले बळी ॥ त्यांहीं पाचारिला चंद्रमौळीं ॥ उतरोनि रथ ॥७२॥

आणि शतघुबडेश्वर पक्षियेंसी ॥ पुनरपि उठाला आवेंशीं ॥ तेणेंही पाचारिलें चंद्रमौळीसी ॥ साहें साहें ह्मणोनियां ॥७३॥

तंव जन्मेजय प्रश्न करीं ॥ कीं नळनघुक जावोनि अंबरीं ॥ मागुते आले भूमीवरी ॥ कवण हेतु ॥७४॥

मग वैशंपायन ह्मणे ॥ मेळिकारहूनि येक्यायशीं योजनें ॥ दळीं दाटले रायराणे ॥ तेणें मार्ग न सांपडे ॥७५॥

तेथ सैन्याची दाटी थोरी ॥ ह्मणोनि रथ प्रेरिले अंतरी ॥ मग उतरोनि रनक्षेत्रीं ॥ चंद्रमौळी पाचरिला ॥७६॥

येरें पांच बाण प्रेरिलें ॥ दोनी नळासी लागले ॥ येकें पक्षियासी उडविलें ॥ दोन खोंचले नघुकासी ॥७७॥

नघुक घुबडेश्वर गजबजिले ॥ ह्मणोनि प्लक्षद्दीपपती आले ॥ असंख्यात गज लोटिले ॥ वेढिलें चंद्रमौळीसी ॥७८॥

येरें असंख्यात बाणीं ॥ गज भेदिले सत्राणीं ॥ तंव उठावलीं दोनी ॥ महासैन्यें ॥७९॥

उसणघाई धडधडाट ॥ जाहला शस्त्रास्त्रीं भडभडाट ॥ थोर जाहली आटाआट ॥ उभय सैन्यां ॥८०॥

तंव तो नामें जातिकार ॥ रथ प्रेरूनि आला शीघ्र ॥ आणि धांवला नघुकवीर ॥ पिता मूर्छित देखोनी ॥८१॥

तैसाचि शतघुबडेश्वर ॥ धाविन्नला वेगवत्तर ॥ करिती भोंवता घेघेकार ॥ तेणें घाबरला चंद्रमौळीं ॥८२॥

सैन्यें उठावलीं संसारोनी ॥ तेथ जाहली झोटधरणी ॥ अशुद्धें रांपली मेदिनी ॥ पूर समुद्रीं मिळाला ॥८३॥

तयेवेळीं जातिकरें ॥ युद्ध मांडिलें दुसरें ॥ वीर असंख्य भेदिले शरें ॥ तें गिरिकंदरी पळाले ॥८४॥

मग नळाजवळी गेले ॥ नेत्र परिमार्जुन सावध केलें ॥ तेथोनि मेळिकारासि आले ॥ बांधोनि चंद्रमौळीतें ॥८५॥

तंव येक नवलावो जाहला ॥ येकाक्ष रणीं होता पडला ॥ तयावरी उजेड पडला ॥ दिव्य‍औषधींच ॥८६॥

येकाक्ष सजीव हो‍उनी ॥ आला मेळिकारीं तत्क्षणीं ॥ नळानघुका नमस्कारूनी ॥ भेटला जातिकार ॥८७॥

सभा केली तियेवेळीं ॥ बंधन सांडोनि आणिला चंद्रमौळी ॥ वस्त्रालंकार वाहिले भूपाळी ॥ संबोखिला नळरायें ॥८८॥

ऐसा समारंभ जाहला ॥ चंद्रमौळी संतोषला ॥ पुढें बहुत काळ क्रमिला ॥ तिये स्थानीं ॥८९॥

जातिकारासि पुत्र जाहला ॥ दूतद्दारें वाघावा आला ॥ तेणें वृत्तांत सांगितला ॥ कीं पुत्रवंती सुमुजाराणी ॥९०॥

ऐकोनि सभा हरिखली ॥ नघुक महादानें दीधलीं ॥ मग पुत्राचे मुख कमळीं ॥ पाहिलें देखा ॥९१॥

नळनधुकें पुत्र देखिला ॥ तो अनुसयो नाम पावला ॥ दिवसमाशीं वाढिन्नला ॥ आजानुबाहू ॥९२॥

नृसिंह ह्मणे चंद्रमौळीतें ॥ त्वां कन्या द्यावी अनुसयातें ॥ येरु पावोनि संतोषातें ॥ जाहला पुसता ॥९३॥

ह्मणे तुह्मी कां आलेति येथें ॥ संग्रामीं जिंकिलें आह्मातें ॥ तंव नळ ह्मणे तयातें ॥ जातहोतों मेरुप्रांतीं ॥९४॥

हस्तनापुराहोनि निघालों ॥ ते येथ परियंत पातलों ॥ पश्चिममार्गें लागलों ॥ कष्ट जाहले ह्मणोनियां ॥ ९५॥

ऐकोनि चंद्रमौळी ह्मणे ॥ कीं पश्निममार्ग कोणी नेणे । परि तुह्मी भले राणे ॥ कीं आलेति येथवरी ॥९६॥

नळ ह्मणे गा चंद्रमौळी ॥ राजे जिंकोनि महाबळी ॥ आह्मी आलों तुमच्या स्थळीं ॥ तंव नवल येक वर्तलें ॥९७॥

रावणें स्वर्ग घेवोनी ॥ देव घातले बंदिखानीं ॥ आतां कार्य नाहीं तेथें जाउनी ॥ ह्मणोनि युद्धा प्रवर्तलों ॥९८॥

पुढें ऐसें येथें वर्तलें ॥ मग चंद्रमौळीनें ह्मणितलें ॥ कीं तुमच्या द्दीपीं नवल जाहलें ॥ अयोध्ये अवतरला श्रीराम ॥९९॥

तेणें रावनादिकां मारिलें ॥ देव बंदीचे सोदविले ॥ लंकेचें राज्य दीधले ॥ बिभीषणासी ॥१००॥

तुमची हस्तनावती घेतली ॥ हे कथा नारदें सांगितली ॥ ह्मणोनि आह्या श्रुत जाहली ॥ ऐसें नळें ऐकिलें ॥१॥

नळ बोलिला जातिकरा ॥ यासी प्रतिकार विचारा ॥ येरु ह्मणे अनुसयाचा विवाह करा ॥ मग जावों स्वर्गासी ॥२॥

उपरी नघुक राव ह्मणे ॥ आतां स्वर्गा काय हो जाणें ॥ नगर आपुलें सोडवणें ॥ युद्ध करणें रामासीं ॥३॥

हें नघुकवाक्य ऐकोनी ॥ अवघीं संतोषली वाहिनीं ॥ मग ह्मणे नृसिंहराजमणी ॥ चंद्रमौळीसी ॥४॥

कीं अनुसयासी आपली कुमरी ॥ तुं देई गा बरवियापरी ॥ येरु ह्मणे तुमच्या विचारीं ॥ वर्तणें मज ॥५॥

मग ते निर्धता नामें बाळा ॥ दीधली अनुसया भूपाळा ॥ जाहला महोत्साह सोहळा ॥ चारी दिवस ॥६॥

निघावयाची मांडिली आयती ॥ तंव चंद्रमौळी करी विनंती ॥ कीं कन्येसि पुत्र जहल्यावरती ॥ जावें तुह्मीं स्वदेशा ॥७॥

तें समग्रां मानवलें ॥ ह्मणोनि तेथें नगर उभविलें ॥ दिवस आनंदेम क्रमिलें ॥ विनोदलीला ॥८॥

निर्धनेसी पुत्र जाहला ॥ रायें महोत्साह केला ॥ नळनघुकां संतोष जाहला ॥ जातिकरादिकां ॥९॥

नांव ठेविलें लघुभृत्य ॥ तो आजानुबाहू लक्षणयुक्त ॥ मग नृसिंहासि ह्मणत ॥ चंद्रमौळी ॥११०॥

तुवां केली हे सोयरिक ॥ तरी आमुचें ह्मणितलें ऐक ॥ आपुली कन्या सम्यक ॥ द्यावी लघुभृत्यासी ॥११॥

नृसिंहें कन्या दीधली ॥ लघुभृत्याची वर्‍हाडिका जाहली ॥ पर्णोनि मेळिकारा आणिली ॥ कामिनी नामें ॥१२॥

असो हें नळें विचारिलें ॥ राज्य लघुभृत्या दीधलें ॥ तेणे भूपाळ संतोषले॥ मग बोलिला नळराव ॥१३॥

आतां स्वदेशा चलाजावों ॥ चंद्रमौळी ह्मणे याहो ॥ येरां जाहला उत्साहो ॥ घावो निशाणी दीधला ॥१४॥

तेणें गजबजिले सुरवर ॥ ह्मणती आले सोमवंशी वीर ॥ यास्तव मांडिला विचार ॥ नारदेंसीं ॥१५॥

नारद ह्मणे सुरनाथा ॥ मी तेथ गेलों होतों आतां ॥ चंद्रमौळीं तयां समस्तां ॥ जाहलें सख्य ॥१६॥

ते जाताति स्वदेशासी ॥ तुं चिंता नकरीं मानसीं ॥ सुखें राज्य अमरावतीसी ॥ करीं इंद्रा ॥१७॥

ऐकोनि आनंदले सुरवर ॥ लागले दुंदुभी डमर ॥ इकडे चालती दळभार ॥ लघुभृत्यापुढें ॥१८॥

साठी क्षोणी गजर लागले ॥ समस्त भूपाळ चालिले ॥ मार्गीं आडवस्ती पावले ॥ हिमाचळासी ॥१९॥

लघुभूत्या ह्मणे नृपवरां ॥ हिमाचळ घेवोनि जाऊं नगरा ॥ मग वेढा घालोनि गिरिवरा ॥ पडिला पाढा ॥१२०॥

तें दूत्रीं हरिहरी जाणविलें ॥ कीं उत्तरेकडोनि राजे आले ॥ त्याहीं पर्वता वेढिलें ॥ तंव रायें दूत पाठविले ॥२१॥

त्यांहीं जावोनि पुसिलें वीरांसी ॥ तें ह्मणती हे राजे सोमवंशीं ॥ मग भेटले लघुभृत्यांसी ॥ स्तुतिपाठक ॥२२॥

राव संतोषोनि भाटांसी ॥ त्यागं दीधला तयांसी ॥ तंव ते ह्मणती तयासी ॥ कां पां पर्वता वेढिलें ॥२३॥

येरु ह्मणे अवधारा ॥ जात‍आहों हस्तनापुरा ॥ परि देखतां या गिरिवरा ॥ घ्यावा ऐसें वाटलें ॥२४॥

आतां तुह्मीं आपुले रायासी ॥ आणा आह्मां भेटावयासी ॥ मग येरीं जावोनि हरिहरासी ॥ केलें श्रुत ॥२५॥

कीं हा सोमवंशीय भूपाळ ॥ येणें जिंकिलें दिग्मंडळ ॥ मेरुप्रदक्षिणा करोनि सबळ ॥ जातो हस्तनापुरासी ॥२६॥

तुह्मां भेटावया बोलाविलें ॥ ऐकतां मन संतोषलें ॥ मग चातुरंगाचेनि मेळें ॥ भेटला हरिहर येवोनि ॥२७॥

परस्परें क्षेम पुसिलें ॥ अवघे स्वस्थानीं बैसले ॥ तंव दूत सभे आले ॥ अकस्मात ॥२८॥

ह्मणती लघुभुत्या पुत्र जाहला ॥ ऐकतांअनुसयो संतोषला ॥ तैं महोत्साहो वर्तला ॥ सकळ जनासी ॥२९॥

तो द्वादशादिवसांचा जाहला ॥ मग सभेमाजी आणिला ॥ आजनुबाहो देखिला ॥ नळादिसमस्तीं ॥१३०॥

अनुसयो होवोनि हर्षित ॥ पुत्रा नांव ठेविलें सुरथ ॥ द्खोनि हरिहर जाहला विस्मित ॥ मग विनवी समस्तां ॥३१॥

आमुची कन्या देवों सुरथा ॥ तें मानवलें नूपा समस्तां ॥ मग लीलावती स्वरूपवंत ॥ दीधली सुरथासी ॥३२॥

विवाह जाहला महोत्साहें ॥ बारावरूषें राहविले राये ॥ तंव पुत्र जाहला लीलावतीये ॥ नांव ठेविलें अजमीढ ॥३३॥

नळादिकीं विचारिलें ॥ राज्य अजमीढा दीधलें ॥ पुढील कथा ऐका वहिलें ॥ ह्मणे मधुकरकवी ॥३४॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ अष्टमस्तबक मनोहरू ॥ नघुकजातिकरविवाहप्रकारू । द्वादशोऽध्यायीं कथियेला ॥१३५॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP