मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह ८९

ओवीगीते - संग्रह ८९

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


माखणीचे पाणी कोणाच्या वाडया जाते

भाऊराया माझा वाक्या बिंदल्याचे तान्हे न्हाते ।

माहेरुन जाता घरी मना लागते हुरहूर

अंगणात उभे वाट पाहत माझे दीर ।

सासूबाई ग प्रेमळ मामंजी शांत मूर्ती

त्यांच्या सहवासांत सुख झाले ग किती किती ।

घागर्‍याचा नाद येई माझ्या कानी

माझ्या वन्सबाई खेळती वृंदावनी ।

उंचशा ओसरीचा केर लोटतां लोटेना

माझ्या ग मामंजीची सभा बसली उठेना ।

माझ्या माहेराला नाही कोणाचा सासुरवास

सुना लेकींच्यापरीस वागविती ।

पाऊसपाण्याची धरणीमाय वाट पाहे

तशी मला आस आहे माहेराची ।

दिवस मावळला कर्दळी आड झाला

मला माघारा न आला माहेरीचा ।

माझ्या माहेराला डोलती मोठी बाग

वाटेल ते तू माग वैनीबाई ।

माहेरी जाईन बसेन अंगणी

जशा लवती कामिनी भावजया ।

अंगणात खेळे दणदणली माझी आळी

लेकुरवाळी आली माहेराला ।

जेवण मी जेवी भाजी भाकरीचे

मायेच्या हातीचे गोड लागे ।

जेवण मी जेवी जेवण जेवते पोळीचे

पाणी माहेराचे गोड लागे ।

माझ्या माहेराला राही सदा उघडे दार

आल्या गेल्याचा पाहुणचार होतसे ।

माझ्या माहेराला नकार नाही कोणा

आला गेला पाहुणा नित्य असे ।

माझ्या माहेराची सांगू मी कीर्ति किती ?

लाज वाटे सखी कशी सांगू माझ्या ओठी ? ।

सासू-सासरा भाग्याच्या नारीला

नित माहेर अस्तुरीला ।

सासू-सासर्‍याची पुण्याई घ्यावी सूनं

पोटी फळाला नाही उणं ।

लाल पिंजरीचं कुंकू एका करंडी सासू सुना

असं दैव नाही कुणा ।

माझी सासू मला माय धडयानं तूप घेती

लेकी-सुनाला रोज देती ।

सकाळच्यापारी वाडा लोटते वासराचा

दारी पलंग सासर्‍याचा ।

सासू मालनीचा कुसवा नवसाचा

चुडा लेते मी नवसाचा

नदीच्या पल्याड माझं सासर कशी जाऊ ?

'त्येनी' हातांची केली नाऊ

थोरला माझा दीर, दीर वाडयाचा कळस

थोरली माझी जाऊ परसदारीची तुळस

भावाभावाचं भांडण जावाजावांचं एक चित्त

दीर राजसा किती सांगू नका घालू आड-भिंत

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP