मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह ८३

ओवीगीते - संग्रह ८३

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


येईन माहेराला बसाया टाकीन चवळं

भाचे मांडीवर बंधू बसले जवळ ।

सरलं दळानं निधळानं मोतीयाचं

अवघ्या गोतात ऊंच नांव पतियाचं ।

जातं वढूं वढूं माझ्या बाह्या लोखंडाच्या

आईनं दिल्या गुटी जाईफळ येखांडाच्या ।

जातं वढूं वढूं माझी तळांत पिवळी

आईनं दिली गुटी केली लवगांची गरदी ।

जातं वढायला नको करु कुचराई

आई तुजं दूध मी पेलें चतुराई ।

जातं कां ओढावं चावरीच्या बैलावानी

आईच्या दूधाला नाही पडलं धारवानी ।

जातं कां ओढावं नखाबोटाच्या अगरी

आई तुझं दुध पिले मधाच्या घागरी ।

जातं कुरुंदाचं याला खुंटा चकमकी

चल माझे मैना आपुन दळूं माललेकी ।

जातं कुरूंदाचं याला खुंटा आवळीचा

मैनाचा माझ्या वर गळा सावळीचा ।

सरलं दळण तोंडीं ठेवीलं झांकण

बंधु तुझ्या वाडया चंद्रसूर्याचं राखण ।

भावजय नारी माझ्या पायावरुन गेली

बंधवानं माझ्या कोन्या आवकाळ्याची केली ।

भावजय नारी माझं पाय धुऊन पाणी प्याली

बंधवानं माझ्या कोन्या असिलाची केली ।

भावजय नारी तुझा पलंग पारुसा

तुझ्या पलंगावरी माझा कलीजा आरसा ।

भावजय नारी तुला झोप आली कशी

शिणला माझा बंधू पाणी मागं आईपाशी ।

भावजय नारी लाव कुंकवाचं बोट

भरल्या सभेत चुडा तुझा उजवाट ।

भावजय नारी लाव कुंकवाची चिरी

भरल्या सभेत भाऊ माझा शिरीहरी ।

सरल दळान सरलं म्हणूं नाही

सासर माहेर भरलं आहे सई ।

सरलं दळान सुपा व्हई पलीकडं

सासरी माहेरी आऊक मागं दोहीकडं ।

लिंबाच्या लिंबोळ्या लिंबाखाली पसरल्या

बंधूला झाल्या लेकी आम्ही बहिणी विसरल्या ।

सासरी जाते कोणाची लाडकी लेक

सांगत्यें बाळा माझ्या घाल घोडयावरी लेप ।

बाप म्हणे लेकी माझी हरबर्‍याची डाळ

जाशील परघरां होईल तुझी राळ ।

बाप म्हणे लेकी माझी तांब्याची परात

जाशील परघरां सुनं लागेल घरात ।

घाटावरला सोयरा घाट उतरुन खाली आला

बाईचं माझ्या रुप पाहून दंग झाला ।

काळी चंद्रकळा ईच्या पदरी रामबाण

सांगते सईला नेस तुला माझी आण ।

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP