मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें|
उन्माद

मज्जवहस्त्रोतस - उन्माद

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


व्याख्या

उन्मादं पुनर्मनोबुद्धिसंज्ञाज्ञानस्मृतिमतिभक्तिशीलवेष्टा-
चारविभ्रमं विद्यात् ॥५॥
च. नि. ७-५ पान ४७३. सटीक.

उन्मादप्रत्यात्मलक्षणमाह - उन्मादं पुनरित्यादि । विभ्रम-
मिति मन:प्रभृतिभि: प्रत्येकं संबध्यते । अत्र मनोविभ्रमा-
च्चिन्त्यानर्थान्न चिन्तयते, अविन्त्यांश्च चिन्तयते; उक्तं
हि ``मनसश्च चिन्त्यमर्थ:'' इति । बुद्धिविभ्रमात्तु नित्व-
मनित्यमिति, प्रियं चाप्रियमिति पश्यति; वचनं हि -
``विषमाभिनिवेशो यो नित्यानित्ये प्रियाप्रिये । ज्ञेय: स
बुद्धिविभ्रंश:, समं बुद्धिर्हि पश्यति'' इति । संज्ञां ज्ञानं,
तद्विभ्रमादग्न्यादिदाहं न बुध्यते; किंवा संज्ञा नामोल्लेखेन
ज्ञानम् । स्मृतिविभ्रमान्तु न स्मरति, अयथावद्वा स्मरति ।
भक्तिरिच्छा, तद्विभ्रमाच्च यत्रेच्छा पूर्वमासीत्तत्रानिच्छा
भवति । शीलविभ्रमादक्रोधन: क्रोधनो भवति । चेष्टा-
विभ्रमादनुचितचेष्टो भवति । आचार: शास्त्रशिक्षाकृतो
व्यवहार:; तद्विभ्रमादशौचाद्याचरति ॥५॥

उन्मादामध्यें मन, बुद्धि, ज्ञान, स्मृति, इच्छा, शील आणि चेष्टा या सर्व गोष्टींच्यामध्यें एकप्रकारचा विकृत, विसंगत, विचित्र, विक्षिप्त असा भाव उत्पन्न होतो.

स्वरुप

चिरकारी दारुण.

मार्ग

मध्यम.

प्रकार

पांच.

इह खलु पञ्चोन्मादा भवन्ति; तद्यथा - वातपित्तकफ-
सन्निपातागन्तुनिमित्ता: ॥३॥
च. नि. ७-३ पान ४७१

उन्मादा: षट्‍ पृथग्दोषनिचयाधिविषोद्भवा: ।
वा. उ. ६-१ पान ७९७

चरकानें वातज, पित्तज, कफज, सान्निपातिक व आगंतुज असे उन्मादाचे पांच प्रकार सांगितले आहेत. वाग्भटानें दोषज चार आधिज - मानसिक कारणांनीं उत्पन्न होणारा पांचवा व विषज सहावा असे सहा प्रकार सांगितले आहेत. सुश्रुतानें सहाच प्रकार सांगितले आहेत. वाग्भटानें त्याचाच अनुवाद केलेला आहे. (सु. उ. ६२-४)

शारीरमानसैर्दुष्टरहितादन्नपानत: ।
विकृतासात्म्यसमलाद्विषमादुपयोगत: ॥२॥
विषण्णस्याल्पसत्त्वस्य व्याधिवेगसमुद्‍गमात् ।
क्षीणस्य चेष्टावैषम्यात् पूज्यपूजाव्यतिक्रमात् ॥३॥
आधिभिश्चित्तविभ्रंशाद्‍ विशेषोपविषेण च ।
वा. उ. ६-२, ३ पान ७९७

अहितकर अन्नपान, विकृत असात्म्य, मलयुक्त विषम अशा आहाराचें सेवन, खिन्नता, मनाचें सामर्थ्य कमी असणें, निरनिराळ्या व्याधींनीं पीडित होणें वा व्याधींचे वेग उत्कट होणें, क्षीण, दुर्बल, कृश झालेल्या व्यक्तीनें विषम स्वरुपाच्या हालचाली करणें, पूजनीय व्यक्तींचा अनादर करणें, मंत्रतंत्रांचे प्रयोग चुकणें, कामक्रोधादि मानसिक विकारांनीं मन चंचल विचलित होणें, विषोपविषांचें सेवन करणें या कारणांनीं मानस व शारीरदोष प्रकुपित होऊन व्याधी उत्पन्न करतात.

एभिर्हि हीनसत्त्वस्य हृदि दोषा: प्रदूषिता: ॥४॥
धियो विधाय कालुष्यं हत्वा मार्गान् मनोवहान् ।
उन्मादं कुर्वते, तेन धीविज्ञानस्मृतिभ्रमात् ॥५॥
देहो दु:खसुखभ्रष्टो भ्रष्टसारथिवद्रथ: ।
भ्रमत्यचिन्तितारम्भ: ।
वा. उ. ६-४,५

तैरल्पसत्त्वस्य मला: प्रदुष्टा ।
बुद्धेर्निवासं हृदयं प्रदूष्य ॥
स्त्रोतांस्यधिष्ठाय मनोवहानि ।
प्रमोहयन्त्याशु नरस्य चेत: ॥५॥
च. चि. ९-५ पा. १०८८-८९. सटीक.

तैरित्यादिना सम्प्राप्तीमाह । अल्पसत्तवस्यं अल्पसत्त्वगुणस्य ।
हृदयं यद्यपि बुद्धिनिवासत्त्वेनार्थेदशमहामूलीयादौ प्रति-
पादितमेव; तथाऽपि बुद्धिनिवासत्वोपदर्शनमिह कृतं,
हृदयोपघाताद्‍बुद्‍ध्यपघातो वक्ष्यमाणो युक्त एव; आश्रयो-
पघातेनाश्रितस्योपघात: सिद्ध एव । स्त्रोतांसि च मनोवहा-
नीत्यनेन हृदयदेशसंबन्धिधमन्यो विशेषेण मनोवहा
दर्शयति; किंवा केवलमेव शरीरं मनोऽभ्यनुस्यूतं जग्राह ।
उक्तं हि - ``देवलमेवास्य मनस: शरीरमधिष्ठानभूतं''
इति । चेत इति मन: ॥५॥

सत्व मुळांतच दुर्बल असलेल्या व्यक्तींमध्यें निदानोक्त कारणांनीं दोष प्रकुपित होऊन बुद्धीचें अधिष्ठान असलेल्या हृदयामध्यें प्रवेश करतात. बुद्धीला मालिन्य आणून मनोवह स्त्रोतसामध्यें विकृती उत्पन्न करुन उन्माद हा व्याधी उत्पन्न करतात. या व्याधीमध्यें, सुखदु:खाचें भान रहात नाहीं. सारथी नसलेल्या रथासारखी देहाची व मनाची स्थिति होते. या व्याधीमध्यें अधिष्ठान म्हणून सांगितलें असलेलें हृदय हें बुद्धीचें निवासस्थान असल्याचें आवर्जून सांगितलें आहे. यावरुन रसरक्ताचें विक्षेपण करणारें उरांतील हृदय, येथें अभिप्रेत नसावें असें वाटतें. भेलानें तर स्पष्टपणेंच दोष, शिरांमध्ये जाऊन विकृति उत्पन्न करीत असल्याचा उल्लेख केलेला आहे.

शिरस्ताल्वंतरगतं सवैंद्रियपरं मन: ।
उर्ध्वप्रकुपिता: दोषा: शिरस्ताल्वंतरे स्थिता: ।
मन: संदूषयत्याशु तत: चित्तं विपद्यते ॥
चित्ते व्यापादमापन्ने बुद्धिर्नाशं नियच्छति ।
ततस्तु बुद्धिव्यापत्तौ कार्याकार्य न बुद्‍ध्यते ।
एवं प्रवर्तते व्याधि: उन्मादो नाम दारुण: ।
भेल उन्माद चिकित्सा पान १४९ - १५०.

योगशास्त्रामध्येंही, भृकुटिमध्यामध्यें असणारे आज्ञाचक्र हेंच मनबुद्धीचें, अधिष्ठान असल्याचें सांगितलें आहे. (गुरुदत्तयोग, परिशिष्ट एक पान २६) महाभारतासारख्या ग्रंथामध्येंही बुद्धि ही भुवयांच्यामध्यें रहाते असें वर्णन आहे. चिकित्सेमध्येंही उन्मादावर नस्य चिकित्सा एक महत्त्वाची चिकित्सा म्हणून सांगितली आहे. नस्याचा उपयोग शिरोगत व्याधींवर होतो हें स्पष्ट आहे. या सर्व वर्णनावरुन व्यावाहारिक दृष्टीनें दोष शिरोगत होतात असें मानणेंच योग्य आहे. (प्राणवह स्त्रोतसांतील वर्णन पहावें.) शिरोमध्येंही कपालास्थिंच्या आंत असलेलें मज्जाधातुमय असें जें मस्तुलंग वा मस्तिष्क तेंच या ठिकाणीं दूष्य असतें. दोष या दूष्याशीं संमूर्च्छित होऊन व्याधी उत्पन्न करतात.

पूर्वरुपें

तस्येमानि पूर्वरुपाणि; तद्यथा - शिरस: शून्यता, चक्षु-
षोराकुलता, स्वन: कर्णयो:, उच्छ्‍वासस्याधिक्यम्, आस्य-
संत्रवणम, अनन्नाभिलाषारोचकाविपाका:, हृद्रह:,
ध्यानायाससंमोहोद्वेगाश्चास्थाने, सततं लोमहर्ष: ज्वरश्चा-
भीक्षणम्, उन्मत्तचित्तत्वम्, उदर्दित्वम्, अर्दिताकृतिकरणं
च व्याधे:, स्वप्ने चाभीक्ष्णं दर्शनं भ्रान्तचलितानवस्थि-
तानां रुपाणामप्रशस्तानां च तिलपीडचक्राधिरोहणं वात-
कुण्डलिकाभिश्चोन्मथनं निमज्जनं च कलुषाणामम्भसा-
मावर्ते चक्षुषोश्चापसर्पणमिति निमज्जनं च कलुषाणामम्भसा-
मावर्ते चक्षुषोश्चापसर्पणमिति (दोषनिमित्तानामुन्मादानां
पूर्वरुपाणि भवन्ति) ॥६॥
च. नि. ७-६ सटीक.

अस्थाने इत्यविषये; तेन अध्यानविषये ध्यानम्, असंमोह-
विषये च मोह इत्यादि ज्ञेयम् । उन्मत्तचित्तत्वमिति
उद्भान्तचित्तत्वम् । उदर्दितत्वमिति ऊर्ध्वकाय पीडितत्वम् ।
अर्दिताकृतिकरणं च व्याधेरिति अर्दितस्य व्याधेराकृति-
करणं; तेनार्धवक्रभ्रमणादि करणमित्यर्थ: । किंवा व्याधे-
रिति प्रथमोक्तेन तस्येतनेन संबध्यते, तेन तस्य व्याधेर्वु-
ध्द्यादिभ्रमरुपस्योन्मादस्य यथोक्तानि पूर्वरुपाणीति योजना ।
चक्षुषोश्चापसर्पणमिति चक्षुर्व्यपगत इत्यर्थ: ॥६॥
टीका.

उन्मादाच्या पूर्वरुपांत पुढीलप्रमाणें लक्षणें होतात. डोकें मोकळें झाल्यासारखें वाटतें. डोळे व्याकुळ होतात, कानामध्यें आवाज होतो. वरचेवर अधिक प्रमाणांत उसासे टाकले जातात, तोंडाला पाणी सुटतें. अन्न नकोसें होणें, अरुचि, अविपाक, हृदयग्रह, कांहींतरी चिंतन करीत बसणें, उगीचच श्रम करणें, जेथें नको तेथें तिटकारा वाटणें; नको त्याचा मोह पडणें, अंगावर रोमांच उभें रहाणें, ज्वर, भ्रमिष्टासारखें वागणें. शरीराच्या वरच्या भागांमध्यें पीडा होणें, तोंड वाकडें करणें, अशीं लक्षणें होतात. स्वप्नामध्यें चंचल, भ्रमिष्ट, अस्थिर, अमंगल अशीं दृश्यें दिसतात. घाण्यावर बसलों आहे, वादळांत सापडलों आहे, घाणेरडया पाण्याच्या भोवर्‍यांत सांपडलों आहे, डोळे नाहींसे झाले आहेत अशीं स्वप्नें पडतात.

रुपे

धी विभ्रम: सत्त्वपरिप्लवश्च
पर्याकुला दृष्टिरधीरता च ।
अबद्धवाक्त्वं हृदयं च शून्यं
सामान्यमुन्मादगदस्य लिड्गम् ॥६॥
स मूढचेता न सुखं न दु:खं
नाचारधर्मौ कुत एव शान्तिम् ।
भ्रमत्ययं चेत इतस्ततश्च ॥७॥
च. चि. ९-६,७ सटीक. पृ. १०८९

धीविभ्रम इत्यादिना सामान्यमुन्मादपूर्वरुपमाहेत्येके ।
धीविभ्रमादि त्विह सामान्यमुन्मादलिड्गमेवोक्तम् । कुत
एव शान्तिमिति कुतोऽपि शान्तिं निवृत्तिं न विन्दति ।
संज्ञा नामोल्लेखेन ज्ञानम् । भ्रमत्ययं चेत इति अश्वान्
रथिरिव भ्रामयति; अत्रणिजर्थोऽन्तर्भूत: ॥६॥७॥
टीका.

बुद्धिभ्रंश होणें, चित्त व्याकुळ चंचल होणें, डोळ्यांना त्रास होणें, कोणत्याही गोष्टीविषयीं धीर नसणें, असंबद्ध बोलणें, डोकें, हृदय शून्य होणें, अशीं लक्षणें होतात. सुखदु:खाचें भान रहात नाहीं. कुळशील परंपरा, आचार व तदनुरुप वर्तन घडत नाहीं. स्मृति, बुद्धिसंज्ञा नाहींशा होतात. चित्त इतस्तत: स्वैरपणें भटकत रहातें. (यांतील आरंभाची कांहीं लक्षणें पूर्वरुपांत सांगितलीं असली तरी तीं रुपावस्थेंमध्यें अधिक व्यक्त होऊन प्रगटतात असें मानावें.) स्वभाव आवडी निवडी पालटतात.

प्रकार वातज

तत्र वातातकृशाड्गता ॥६॥
अस्थाने रोदनाक्रोशहसित स्मितनर्तनम् ।
गीतवादित्रवागड्गविक्षेपास्फोटनानि च ॥७॥
असाम्ना वेणुवीणादिशब्दानुकरणं मुहु: ।
आस्यात्फेनागमोऽजस्त्रमटनं बहुभाषिता ॥८॥
अलड्कारोऽनलड्कारैरयानैर्गमनोद्यम: ।
गृद्धिरभ्यवहार्थेषु तल्लाभे चावमानता ॥९॥
उत्पिण्डितारुणाक्षित्वं जीर्णं चान्ने गदोद्भव: ।
वा. उ. ६-६ ते ९, सटीक पान ७९८

अक्षिर्भुवोष्ठांसहन्वग्रहस्तपादांगविक्षेपणमकस्मात् ।
अनियतानांच सततं गिराउत्सर्ग: ।
तीव्रंमात्सर्यं पारुष्यं ।
च. नि. ७-७.

वातादुन्मादे सति कृशाड्गादिलक्षणं जीर्णे चान्ने गदोद्भव
इत्यन्तम् । अस्थाने - असड्गे, रोदनादीनि । असाम्ना-
औद्धत्येन, पुन: पुन: वेणुवीणादिवाद्यस्यानुकरणम् ।
टीका.

वातज उन्मादामध्यें रोगी कृश होत जातो. रडणें-ओरडणें, खदखदून हंसणें, स्मित करणें, नाचणें या गोष्टी कारण नसतांना उगीचच करतो. गाणें वाजिवणें, बडबडणें, डोळे, भुवयां, ओठ, खांदे, हनुवटी, हातपाय हे अवयव मुरडणें, उडविणें, झाडणें, तालसुराव्यतिरिक्त निरनिराळ्या वाद्यांच्या शब्दांचें अनुकरण करणें, तोंडांतून फेंस येणें, सारखें भटकणें, फार बोलणें, अलंकार न होऊं शकणार्‍या वस्तूही, अलंकार म्हणून धारण करणें, वाहन नसतांनाही वाहनांतून जात आहोंत अशा भावनेनें विशिष्ट अंगविक्षेप करणें, निरनिराळ्या खाण्याच्या गोष्टी हावरेपणानें घेणें, आणि मिळतांच त्या टाकून देणें, डोळे बाहेर आल्यासारखे व काळसर तांबूस होणें, स्वभाव मत्सरी व कठीण होणें अशीं लक्षणें होतात. अन्न पचण्याचे वेळीं व्याधी-लक्षणें वाढणें.

पित्तज

पित्तान्सन्तर्जनं क्रोधो मुष्टिलोष्टाद्यभिद्रव: ॥१०॥
शीतच्छायोदकाकाड्क्षा नग्नत्वं पीतवर्णता ।
असत्यज्वलनज्वालातारकादीपदर्शनम् ॥११॥
वा. उ. ६-१० ते ११ पान ७९८

अमर्ष: संरभश्चास्थाने हननं स्वेषांपरेषां वा ।
संतापो अतिवेलं, ताम्रहारितहारिद्रसंरब्धातक्षिता ॥
च. नि. ७-८.

उगीचच चिडणें, संतापणें, गोंधळ करणें, हातात सांपडेल ती वस्तु घेऊन तिनें स्वत:ला मारुन घेणें वा दुसर्‍याच्या अंगावर मारावयास जाणें, सांवली, शीत अन्नपान यांची अभिलाषा बाळगणें, वरचेवर रागावणें ( वा अंग गरम होणें ), डोळे लाल, पिवळे व प्रक्षुब्ध होणें, नागवें बसणें, कांहीं नसतांना ज्वाला, अग्नि, तारका, दिवे डोळ्यांसमोर दिसणें अशीं लक्षणें पित्तज उन्मादांत होतात.

कफज

कफादरोचकश्छर्दिरल्पेहाहारवाक्यता ।
स्त्रीकामता रह:प्रीतिर्लालासिड्धाणकस्त्रुति: ॥१२॥
वैभत्स्यं शौचविद्वेषो निद्राश्वयथुरानने ।
उन्मादो बलवान् रात्रौ भुक्तमात्रे च जायते ॥१३॥
वा. उ. ६-१२-१३ पान ७९८.

शुक्लस्तिमितमलोपदिग्धाड्गता, अल्पशश्च चंक्रमणम् ।
च. नि. ७-९.

अरुचि, छर्दी अनन्नाभिलाष, एकांतात बसण्याची आवड, स्त्रीविषयक अभिलाषा, नाकातोंडांतून स्त्राव वहाणें, किळसवाणेपणा, स्वच्छतेचा तिटकारा, तोंडावर सूज येणें, हिंडणें फिरणें थोडें असणें, झोंप फार येणें, लक्षणांचें बल रात्रीं व भोजनोतर जास्त असणें, डोळे श्वेतवर्ण, तारवटलेले व मलीन असणें अशीं लक्षणें कफज उन्मादांत असतात.

सान्निपातज

सर्वायतनसंस्थानं सान्निपाते तदात्मकं ।
वा. उ. ६-१४

सान्निपातज उन्मानामध्यें तीनही दोषांचीं लक्षणें दिसून येतात.

चित्तज उन्माद

धनकान्तादिनाशेन दु:सहेनाभिषड्गवान् ।
पाण्डुर्दीनो मुहुर्मुह्यन् हाहेति परिदेवते ॥१५॥
रोदित्यकस्मान्म्रियते तद्‍गुणान् बहु मन्यते ।
शोकक्लिष्टमना ध्यायन् जागरुको विचेष्टते ॥१६॥
वा. उ. ६/१५ पा. ७९८

चौरैर्नरेन्द्रपुरुषरैररिभिस्तथाऽन्यै -
र्वित्रासितस्य धनबान्धवसंक्षयाद्वा ।
गाढं क्षते मनसि च प्रियया रिरंसो -
र्जायेत चोत्कटतमो मनसो विकार: ॥१४॥
चित्रं ब्रवीति च मनोऽनुगतं विसंज्ञो
गायत्यथो हसति रोदिति चापि मूढ: ।
सटीक मा. नि. उन्माद १८२-८३

शोकादिजमाह - चौरेरित्यादि । क्षते उपहते, प्रियया
रिरंसो: कामुकस्य, अप्राप्तया प्रियया क्षते मनसीति
संबन्ध: । तस्य लक्षणमाह - चित्रमित्यादि । चित्रं
विविधम् । मनोऽनुगतं गोप्यमपि । विसंज्ञो विपरीतं
ज्ञानम्:, अत एव मूढ: ॥१४॥

संपत्ती, प्रिय व्यक्ती यांच्या विनाशामुळें किंवा दु:सह आपत्ती कोसळल्यामुळें मनावर आघात होतील अशी अपेक्षा भंग, मानहानि, मृत्युभय इत्यादि कारणांमुळें उन्माद व्याधी उत्पन्न होतो. रोगी पांडुवर्ण, दीन, हाय हाय करणारा, शोकाकुल. असा असतो. मध्येच रडतो, हंसतो, गातो, मध्येच मूर्च्छित होतो. मृत व्यक्तीचें गुण गातो. गुप्त गोष्टी बोलतो. कांहीं तरी चिंतन करीत बसतो, झोप येत नाही विचित्र चाळें करतो, सारखी चिंता करतो अशी लक्षणें या व्याधीमध्यें होतात.

विषज उन्माद

विषेण श्याववदनो नष्टच्छायाबलेन्द्रिय: ।
वेगान्तरेऽपि सम्भ्रान्तो रक्ताक्षस्तं विवर्जयेत् ॥१७॥
सटीक वा. उ. ६/१७ पा. ७९८

विषेणोन्मादे श्याववदन: स्यात् । तं वर्जयेत् - नोपक्रमेत् ।

विषांचा परिणाम होऊन उत्पन्न होणार्‍या उन्मादांमध्यें तोंडावर काळसर छटा येते (काळवंडते), कान्ति नष्ट होते, वेगकाळी (मध्यंतरीच्या कालांतरी) रोग्याचे डोळे तांबडे असतात व तो भ्रमिष्टासारखे वागतो, अशीं लक्षणें होतात.

आगंतुज उन्माद

चरकानें वर्णन केलेला हा आगंतुज उन्माद देवभूत-गंधर्वादि-ग्रह-विशेषांच्या उपसर्गामुळें होतो. चरकानें प्रज्ञापराधजन्य प्राक्तन वा या जन्मीं घडलेलें अधर्माचरण हें त्याचें कारण असतें असें सांगितलें आहे. या उपसर्गाची कांहीं विशिष्ट वेळां व कारणें चरकानें उल्लेखलेली आहेंत. [च.नि.७-१४]. त्यामध्यें निर्मनुष्य घरांमध्यें एकटेच रहाणें, अंधार्‍या रात्रीं भयाण जागेंतून चालणें, पूज्य व्यक्तींची अवहेलना करणें. `घाणेरडया अपवित्र वस्तूंचा स्पर्श होणें ही कारणें विशेष लक्षांत ठेवण्यासारखीं आहेत. चरकानें या उपसर्ग करणार्‍या भूतविशेषांचें उपसर्गाचे भिन्नभिन्न प्रकारही सांगितले आहेत. देवांच्या नुसत्या दृष्टीक्षेपानें उन्माद होतो. कुणाच्या स्पर्शामुळें तर कुणाच्या शरीर-प्रवेशामुळें उन्माद उत्पन्न होतो असें चरक म्हणतो.
(च.नि. ७-१५)
या अगांतुज उन्मादाची पूर्वरुपें म्हणून पुढील लक्षणें सांगितलीं आहेत -
संताप, क्रौर्य, अस्वस्थता, ओजो-नाश, उद्धटपणें वागणें, पूज्य व्यक्तींची निर्भत्सना करणें.
(च. नि. ७-१४)

भूतोन्मादांची सामान्य लक्षणें पुढीलप्रमाणें असतात. -
भूतावेशामुळें या व्यक्तीच्या ठिकाणीं कांहीं अलौकिक असाधारण असें बल, वीर्य, पौरुष, पराक्रम, ग्रहण, धारण, स्मरण, ज्ञान, वचन, विज्ञान यांसंबंधीचें सामर्थ्य प्रगट होतें.
(च. नि. ७-१६)
हे उन्मादविशेष कित्येक वेळीं एकप्रकारचा मनोविकृतीमुळें वा दंभानेंहि संभवतात. हे भूतावेश, त्यांचे प्रकार व लक्षणें यासंबंधी ग्रंथांतरी पुष्कळच विविधता आढळते. उन्मादाचे हे सर्व प्रकार विशेषत: दैव-व्यपाश्रय चिकित्सेच्या प्रकारांत समाविष्ट होणारे असल्यानें आम्हीं येथें त्यांचें विशेष वर्णन केलेलें नाहीं.

चिकित्सा संदर्भानें लक्षणें

अपस्मार, ज्वर, कास, शोष, क्षय, वातरक्त, छर्दी, मूत्रकृच्छ, प्रमेह, अलक्ष्मीता (विरुपता),
(च. चौ. ९-४५ ते ४८)

शूल, गुल्म, अर्श, उदर, पांडु, प्लीहावृद्धि, योनिरोग, ज्वर, कृमि.
(च. चि. ९-३२, ६३)

उन्मादामध्यें हे वरील विकार होतात त्यापेक्षां या विकारांमध्यें अवस्थांच्या गंभीरतेनुरुप उन्माद उत्पन्न होतो असें अधिक वेळां आढळतें.

उपद्रव

कार्श्य, मूर्च्छा, मुखविकृती

उदर्क

बुद्धिमांद्य, स्मृतिभ्रंश, विरुपता हे परिणाम होतात.

साध्यासाध्य विवेक

विषज, सान्निपानिक, चिरोत्पन्न व उग्रलक्षणयुक्त उन्माद असाध्य असतो; इतर प्रकार कष्टसाध्य वा याप्य आहेत.

रिष्ट लक्षणें

अवाञ्च्ची वाऽप्युदञ्ची वा क्षीणमांसबलो नर:
जागरुको हृसंदेहमुन्मादेन विनश्यति ॥१६॥
असाध्यलक्षणमाह - अवाञ्चीत्यादि अवाञ्ची अधोमुख:
उदञ्ची ऊर्ध्वमुख:, अत एवान्ये `अवड्मुखस्तून्मुखो
वा इति पठन्ति । जागरुकोऽनिद्र: ॥१६॥
मा. नि. उन्माद १६ पा. १८३

ज्याचें बलमांस क्षीण झाले आहे, जो ऊर्ध्वमुख वा अधोमुख अशा एकाच स्थितींत पडून आहे व ज्याला मुळींच झोप येत नाहीं असा उन्मादाचा रोगी जागत नाहीं.

चिकित्सासूत्रें

निरुह स्नेहबस्ति: च शिरसश्च विरेचनम् ।
तत: कुर्याद्यथादोषं तेषां भूयस्त्वमाचरेत् ॥
हृदिन्द्रियशिर: कोष्ठे संशुद्धे वमनादिभि: ।
मन: प्रसादमाप्नोति स्मृतिं संज्ञा च विन्दति ॥
शुध्यस्याचारविभ्रंशे तीक्ष्णं नावनमञ्जनम् ।
ताडनं च मनोबुद्धिदेहसंवेजनं हितम् ॥२९॥
च. चि. ९-३४ ते ३६ पान १०९४

वात-पित्त-कफाचीं सामान्य चिकित्सा करुन उन्मादावर शिरोविरेचन व निरुह अनुवासन बस्ती यांचा उपयोग करावा; यामुळें शिरांची व कोष्ठाची शुद्धि होऊन मनाचें प्रसादन होतें. स्मृति व संज्ञा प्राप्त होतात. शोधनानंतरही उन्मादांतील विक्षिप्त चेष्टा उणावल्या नसल्यास त्यास ताडन, पीडन, तीक्ष्ण नस्य इत्यादि उपचारांनीं त्रासन करावें. सिध्द घृतें वापरावींत.

कल्प

सर्पगंधा, जटामांसी, अश्वगंधा, गोरखमुंडी, ब्राह्मी, खुरासनी ओवा, अभ्रकभस्म, रौप्यभस्म, सुवर्णभस्म, उन्मादगजकेसरी, वातविध्वंस, बृहत्वात चिंतामणी.

पथ्य लघु, जीवनीय, मधुर असें अन्न घ्यावें.
तीक्ष्ण, विदाही, अभिष्यंदी रुक्ष अशा गुणांचें अन्न वर्ज्य करावें.
व्यायाम, उन्हांत फिरणें, लंघन, मैथुन वर्ज्य करावें.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP