मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|
अभंग १२७३ ते १२८१

नामपाठ - अभंग १२७३ ते १२८१

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


१२७३

नामपाठ करा नामपाठ करा । चवर्‍याशींचा फेरा चुकवा जगीं ॥१॥

नामपाठ गाये नामपाठ गाये । पुनरपी नये संसारासी ॥२॥

एका जनार्दनाचा नामपाठ गाय । आनंदी आनंद होय तयालागीं ॥३॥

१२७४

नामपाठ गाये संतांचे संगती । नाही पुनरावृत्ति तया मग ॥१॥

नामपाठ गाय सर्व भावें मनीं । चुकेल आयणी गर्भवास ॥२॥

जनार्दनीचा एका नामपाठ गायें । जनार्दनीं पाहे जनीं वनीं ॥३॥

१२७५

नामपाठ सार सर्वामाजीं श्रेष्ठ । जो गाये तो वरिष्ठ कलियुगीं ॥१॥

चुकेल यातना नाना गर्भवास । भय आणि त्रास नव्हे मनीं ॥२॥

जनार्दनाचा एका नामपाठ भावें । आदरें गात आहे सदोदित ॥३॥

१२७६

नामपाठ गाये सदोदित मनीं । यमाची जाचणी नोहे तया ॥१॥

नामपाठ भावें आदरें जो गाये । सर्व सुख पाहे तया होय ॥२॥

जनार्दनाचा एका नामीं धरी आवडी । सर्वभावें जोडी नामपाठ ॥३॥

१२७७

नामपाठ सार वेदांचें तें मूळ । शास्त्रांचे तें फळ नामपाठ ॥१॥

योगयाग विधि न लगे खटपट । नामपाठें स्पष्ट सर्व कार्य ॥२॥

जनार्दनाचा एका नामपाठ घोकी । गुढीं तिहीं लोकीं उभारिली ॥३॥

१२७८

नामपाठ ब्रह्मा उघड बोले वाचा । वेदांतीं तो साच निर्णय असे ॥१॥

नामपाठ भावस भक्ति तें कारण । आणिक साधन नाहीं दुजें ॥२॥

जनार्दनाचा एक गाये तो आवडी । तोडियेली बेडी संसाराची ॥३॥

१२७९

नामपाठ किती सर्वात वरिष्ठ । नको साधन कष्ट आणिक कांहीं ॥१॥

नामपाठमाला हृदयीं ध्याई भावें । उगेंचि जपावें मौन्यरुप ॥२॥

जनार्दनाचा एक नाम गाय फुका । साधन तिहीं लोकां वरिष्ठ तें ॥३॥

१२८०

नामपाठ कालीमाजीं सोपें वर्म । साधन तो श्रम न करीं वायां ॥१॥

नामपाठ गाये नामपाठ गाये । वायां तूं न जाय खटपटा ॥२॥

जनार्दनाचा एका नामपाठ गाये । जनार्दना पाहे काया वाचा ॥३॥

१२८१

नामपाठ श्रेष्ठ नामपाठ श्रेष्ठ । पावें तो वैकुंठकलीमाजीं ॥१॥

नामपाठें गेलें नामपाठें गेले । जडजीव उद्धरिलें नामपाठें ॥२॥

जनार्दनाचा एका आणिक नेणें वर्म । सोपें होय कर्म नामपाठें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP