मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|
अभंग १८४ ते १८८

विटीदांडु - अभंग १८४ ते १८८

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


१८४

आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडुं । खेळे विटिदांडु पोरा खेळे विटिदांडु ॥१॥

सत्व विटी घेउनि हातीं धीर धिर दाडु । भावबळें टोला मारी नको भिऊं गांडु ॥२॥

ब्रीदबळें खेळ खेळूं लक्ष लावीतिसी । मूर्खापाशीं युक्ति नाहीं उडोनि गेली उशी ॥३॥

वकट लेंड मूंड नाल पुढें आणी लेका । भावबळें खेळ खेळ जनार्दन एका ॥४॥

१८५

बारा सोळा अठरा गडियांचा मेळा । मांडियेला डाव कोण आवरीं तयाला ॥१॥

खेळा भाई विटिदांडु । खेळा भाई विटिदांडु । खेळ खेळतां परी बरा नोहे सहज दांडु ॥२॥

पांच सात बारा नव तेरा यांची नका धरुं गोडी । खेळ खेळता दांत विचकुन पडाल घशींतोंडीं ॥३॥

एका जनार्दनीं काय वाचा शरण रिघां पायीं । खेळ तो अवघा सोपा मग प्रेमा उणें नाहीं ॥४॥

१८६

एक पांच सात मिळोनि खेळती विटिदांडु । डाव आलिया पळूणि जातां तया म्हणती गांडु ॥१॥

खेळों विटिदांडु खेळॊं विटिदांडु ॥धृ ॥

मुळींचा दांडुं हातीं धरुनि भावबळें खेळूं खेळा । भक्तिबळें टोला मारुं नभिऊं कळिकाळा ॥२॥

आपुली याची सांडोनि आस जावें गुरुसी शरण । काया वाचा मनें चरणींलोळे एका जनार्दन ॥३॥

१८७

विटिदांडु खेळसी वांया । चौर्‍यायंशी वेरझारा होती पाया ॥१॥

नको विटिदांडु सांडीं हा छंदु । आवडी वदे रामगोविंदू ॥२॥

किती वेरझारी करीसी पा वायां । शरण रिघे एका जनार्दन पायां ॥३॥

१८८

विटिदांडु चेंडु भला रे । मनीं समजोनी मारा टोला रे ॥१॥

खेळूं विटिदाडुं चेंडु । काळा नका भिऊ गांडु रे ॥धृ॥

सहा चारएकत्र करुनी अवघे पुढें रहा । सावध होऊनि धरा चेंडु कोणी कोणाकडे न पहा ॥२॥

प्रपंचाचे घाई धन वित्त म्हनता भाई । हातीचा चेंडु सोडुनी देई पुढें मारील डोई ॥३॥

खेळ खेळा परी मनीं धरा जनार्दन । तेणे चुके जन्ममरण शरण एका जनार्दन ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP