मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|
अभंग ६२१ ते ६३०

विठ्ठलमाहात्म्य - अभंग ६२१ ते ६३०

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


६२१

कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल । कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥

कानडा विठ्ठल नामें बरवा । रुपें विठ्ठल हृदयीं ध्यावा ॥२॥

कानडा विठ्ठल रुपे सावळां । कानडा विठ्ठल पाहिला डोळा ॥३॥

कानडा विठ्ठल चंद्रभागे तटी । कानडा विठ्ठल पहावा उठाउठी ॥४॥

कानडा विठ्ठल कानड बोले । कानड्या विठ्ठलें मन वेधियलें ॥५॥

वेधियेलें मनकानडीयानें माझें । एका जनार्दनीं दुजें नाठवेची ॥६॥

६२२

नाठवेचि दुजें कानड्यावांचुनी । कानडा तो मनींध्यानी वसे ॥१॥

कानडा कानडा विठ्ठल कानडा । कानडा विठ्ठल कानडा ॥२॥

कानाडियांचा वेधमनींतो कानडा । कानडाची कानडा विठ्ठल माझा ॥३॥

एकपणें उभा कानडा विठ्ठल । एका जनार्दनीं नवल कानड्यांचे ॥४॥

६२३

तीर्थ कानडें देव कानडे । क्षेत्र कानडें पंढरीये ॥१॥

विठ्ठल कानडे भक्त हे कानेड । पुंडलीकें उघडें उभे केलें ॥२॥

कानडीया देवा एका जनार्दनीं भक्तें । कवतुकें तयातें उभेंकेलें ॥३॥

एका जनार्दनीं भक्ताचिय चाडा । विठठल कानडा विटेवरी ॥४॥

६२४

उतावेळपणें उभा । त्रैलोक्य शोभा पंढरीया ॥१॥

मना छंद घेई वाचें । विठ्ठल साचे पाहुं डोळां ॥२॥

गळां तुळशीच्या माळा । केशर टिळा लल्लाटी ॥३॥

चंदनाचे शोभे उटी । वैजयंती कंठी मिरवत ॥४॥

दाष्टी धाय पाहतां रुप ।एका जनार्दनीं स्वरुप ॥५॥

६२५

जया कारणें योगयोग तपें करती । ती हे उभी बाळ विठ्ठल मूर्तीं ।

अंगीं तेजाची न माय दीप्ती । कंठीं वैजयंती शोभती गे माया ॥१॥

त्याचा वेधु लागला जीवीं । क्षण परता नोहे देहीं ।

काया वाचा मनें भावी । वेगें वेधकु गे माये ॥२॥

ने माये त्रैलोकीं तो उभा विटों । दोन्हीं कर समपदेम ठेवुनी कटीं ।

सर्वांगी चंदन कस्तुरी उटी । अवामभागी रुक्मीणी गोमटी गे माय ॥३॥

ऐसा सर्व सुखाचा आगरु । उभारुनि बाह्मा देत अभयकरु ।

एका जनार्दनीं निर्धारु । विठ्ठलराज गे माय ॥४॥

६२६

अणुरेणु पासोनि ब्रह्मांडी भरला । तो म्यां देखिला विटेवरी ॥१॥

स्थावर जंगम भरुनी उरला । तो म्यां देखिला पंढरीये ॥२॥

वेदशास्त्र पुराणें गाती जयासाठीं । तो पुंडलिका पाठीं उभा दिसे ॥३॥

वेडावल्या श्रुति न कळे म्हणती । तो उभा श्रीपती वाळुवंटी ॥४॥

संताचा समागम गाती आनंदानें । तो हरी कीर्तने नाचतसे ॥५॥

एका जनार्दनें सुखाचा सागरु । विठ्ठल कल्पतरु वोळला आम्हा ॥६॥

६२७

वैजंयती माळ किरीट कुंडलें । रुप तें सांवळें विटेवरी ॥१॥

वेधलें वो मन तयांच्या चरणीं । होताती पारणीं डोळीयांची ॥२॥

पुराणासी वाड शास्त्रासी तें गुढ । तें आम्हालागी उघड परब्रह्मा ॥३॥

ध्यानी ध्याती मुनी चिंतिती आसनीं । तोहा चक्रपाणी सुलभ आम्हां ॥४॥

सन्मुख भीवरा मध्यें पुंडलिक । एका जनार्दनीं सुख धन्य धन्य ॥५॥

६२८

कमळगर्भींचा गाभा । तोचि उभा पंढरीये ॥१॥

वेधलें चरणीं मन माझें । नावडे दुजें तयाविण ॥२॥

ध्यान बैसलें हृदयीं । तयाविण दुसरे नाहीं ॥३॥

बैसलो तो नुठे मागें । एका जनार्दनीं गूज सांगें ॥४॥

६२९

न कळे जयांचे महिमान । वेदश्रुतीसी पंडिले मौन ।

वेडावलें दरुशन । जयालागीं पाहतां ॥१॥

तोचि उभा विटेवरी । भक्त करुणाकर ।

हरी रुक्मीणी निर्धारी । वामभागीं शोभती ॥२॥

गरुड सन्मुख उभा । शोभे चैतन्याचा गाभा ।

नभी लोपली तेजप्रभा । ऐसा उभा विठ्ठल ॥३॥

मन ध्यातां न धाये । दृष्टी पाहतां न समाये ।

एका जनार्दनीं पाय । वंदु त्याचे आवडीं ॥४॥

६३०

अनादि सांवळा देखियेला डोळां । मनु माझा वेधिला सांगु काय ॥१॥

जीवाविरहित जालें देह हारपलें । शिवपणें गुंतलें गुरुकृपें ॥२॥

जें शब्दासी नातुडे वैखरीयेसी कानडें । तें रुप उघडे पंढरीयें ॥३॥

एका जनार्दनीं जीवींचे जीवन । विठ्ठल निधान विटेवरी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP