मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|
अभंग ४७१ ते ४७९

पंढरी माहात्म्य - अभंग ४७१ ते ४७९

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


४७१

मोकळा मार्ग पंढरीचा । नाहीं साधन करणें साचा । योग अभ्यासाचा । श्रमाचि नको ॥१॥

जाय जाय पंढरपुरा । पाहे दीनांचा सोयरा । पुंडलिकें थारा । दिधला जाय आवडीं ॥२॥

तेथें करितां वसती । नाहीं तया पुनरावृत्ती । जन्ममृत्युची खंती न करी कांहीं ॥३॥

पावन तीर्थ महिवरी । समान या नाहीं दुसरी । एका जनार्दनीं निर्धारी । प्रेमे वारी करिती ॥४॥

४७२

पुंडलीक म्हणतां वाचें । पाप जाते रें जन्माचे । जिहीं देखिलें पद यांचे । धन्य भग्याचे नर ते ॥१॥

जाती पंढरीसी आधीं । तुटे तयांची उपाधी । ऋद्धी सिद्धी मांदी । तिष्ठतसे सर्वदा ॥२॥

भुक्ति मुक्ति धांवती मागें । आम्हां अनुसारा वेगें । ऐसें म्हणोनि वेगें । चरणीं मिठी घालिती ॥३॥

शरण एका जनार्दनीं । विटें उभा मोक्षदानी । लागतां तयांचे चरणीं । पुनरावृत्ति न येतीं ॥४॥

४७३

विठ्ठल देवाधिदेवो । भक्तजनांचें निवारी बिहो । तो पंढरीचा रावो । विटे उभा ठाकला ॥१॥

मना लागो त्याचा छंद । निरसोनि भेदाभेद । अवघाचि गोविंद । ठसावें हदयीं ॥२॥

स्नान केया चंद्रभागें । पातकें नासतील वेगें । संकल्प विकल्प त्याग । दरुशन घेतांची ॥३॥

ऐसा घडतां हा नेम । तयापाशी पुरुषोत्तम । एका जनार्दनीं काम । देव करी स्वयं अंगे ॥४॥

४७४

जाणत्या नेणत्या एकचि ठाव । तेणेंहि भजावा पंढरीराव ॥१॥

एका पंडुं आणिका भरीं । तेणें फेरी चौर्‍याशींची ॥२॥

लागा पंढरीच्या वाटे । तेणें तुटें बंधन ॥३॥

अनुभवें अनुभव पाहां । येच देहीं प्रत्यक्ष ॥४॥

एका जनार्दनीं प्रचीत । विठ्ठलनामें मुक्त सत्य ॥५॥

४७५

रमेसह पंढरी आला । येऊनि भेटला पुंडलिका ॥१॥

म्हणे उभारुनि बाह्मा हात । तरतील नामें महापतित ॥२॥

नका कांहीं आटाआटी । योग यागांची कसवटी ॥३॥

ब्रह्माज्ञान नसाधे लोकां । मुखीं घोका विठ्ठला ॥४॥

शरण एका जनार्दनीं । सांगे वचनीं पुंडलीक ॥५॥

४७६

प्रेमळांसी विश्रांतिस्थान । महा मुक्ति कर जोडोनी । ऋद्धि सिद्धि वोळंगण । तिष्ठती जाण पंढरीये ॥१॥

धन्य धन्य विठ्ठलराव । उभा देवांचा तो देव । दरुशनेम निरसे भेव । यम काळ दुतांचें ॥२॥

नाम न विटेवरी रसना । सुलभ हा पंढरीराणा । एका शरण जनार्दना । सदा वाचे उच्चारी ॥३॥

४७७

प्रभातेसी उठोनी । स्नान करिती अनुदिनीं । विठ्ठल दरुशनीं । प्राणी मुक्त संसार ॥१॥

धन्य पंढरीचा वास । सुख मिळे अविनाश । कुळीं वैष्णव निःशेष । रामकृष्ण उच्चार ॥२॥

करें नेमें एकादशे । जाय नेमें पंढरीसी । ऐसें या तीर्थासी नेमे करितां जोडें ॥३॥

सर्व पर्वकाळ घडे । कोटी अश्वमेध जोडे । पुण्य ते उघडें । विठठल रुपडे पाहतां ॥४॥

ऐसा जया नेमधर्म । न चुके वाचा नामस्मरण । एका जनार्दनीं स्मरण । विठ्ठलदेवी आवडी ॥५॥

४७८

नरनारी जातां पंढरीसी । सुकृतांची रासी ब्रह्मा नेणें ॥१॥

अभाव भावना न धरी कल्पना मस्तक चरणावरी ठेवी ॥२॥

एका जनार्दनीं पंढरी माहेर । आम्हांसी निर्धार देवें केली ॥३॥

४७९

उभारुनी बाह्मा सकळां आश्वासन । या रे अठरा वर्ण पंढरीसी ॥१॥

दरुशनें एकामुक्ति जोडे फुका । साधनांचा धोका करुं नका ॥२॥

माया मोह आशा टाकुनि परती । चरणीं चित्तवृत्ति जडों द्यावी ॥३॥

एका जनार्दनीं सांगे लहान थोरां । पंढरीस बरा कृपाळु तो ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP