श्रीदुर्गासप्तशती - दशमोऽध्याय:

श्रीदुर्गासप्तशती - दशमोऽध्याय:


दशमोऽध्याय:
ध्यानम्
'ॐ' उत्तप्तहेमरुचिरां रविचन्द्रवन्हि नेत्रा
शनुश्शरयुता- ङ्‌कुशपाशशूलम् ।
रम्यैर्भुजैश्‍च दधतीं शिवशक्तिरूपां
कामेश्वरीं ह्रदि भजामि धृतेन्दुलेखाम् ॥
'ॐ' ऋषिरुवाच ॥१॥
निशुम्भं निहतं दृष्ट्‌वा भ्रातरं प्राणसम्मितम् ।
हन्यमानं बलं चैव शुम्भ: क्रुद्धोऽब्रवीद्वच: ॥२॥
बलावलेपाद् दुष्टे त्वं मा दुर्गे गर्वमावह ।
अन्यासां बलमाश्रित्य युद्ध्यसे यातिमानिनी ॥३॥
देव्युवाच ॥४॥
एकैवाहं जगत्यत्र द्वितीया का ममापरा ।
पश्यैता दुष्ट मय्येव विशन्त्यो मद्विभूतय: ॥५॥
तत: समस्तास्ता देव्यो ब्रह्माणीप्रमुखा लयम् ।
तस्या देव्यास्तनौ जग्मुरेकैवासीत्तदाम्बिका ॥६॥
देव्युवाच ॥७॥
अहं विभूत्या बहुभिरिह रूपैर्यदास्थिता ।
तत्संह्रतं मयैकैव तिष्ठाम्याजौ स्थिरो भव ॥८॥
ऋषिरुवाच ।।९॥
तत: प्रववृते युद्धं देव्या: शुम्भस्य चोभयो: ।
पश्यतां सर्वदेवानामसुराणां च दारुणम् ॥१०॥
शरवर्षे: शितै: शस्त्रैस्तथास्त्रैश्‍चैव दारुणै: ।
तयोर्युद्धमभूद्‌भूय: सर्वलोकभयड्‌करम् ॥११॥
दिव्यान्यस्त्राणि शतशो मुमुचे यान्यथाम्बिका ।
बभञ्ज तानि दैत्येन्द्रस्तत्प्रतीघातकर्तृभि: ॥१२॥
मुक्‍तानि तेन चास्त्राणि दिव्यानि परमेश्‍वरी ।
बभज्ज लीलयैवोग्रहुङ्‌कारोच्चारणादिभि: ॥१३॥
तत: शरशतैर्देवीमाच्छादयत सोऽसुर: ।
सापि तत्कुपिता देवी धनुश्‍चिच्छेद चेषुभि: ॥१४॥
छिन्ने धनुषि दैत्येन्द्रस्तथा शक्तिमथाददे ।
चिच्छेद देवी चक्रेण तामप्यस्य करे स्थिताम् ॥१५॥
तत: खड्‌गमुपादाय शतचन्द्रं च भानुमत् ।
अभ्यधावत्तदा देवीं दैत्यानामधिपेश्‍वर: ॥१६॥
तस्यापतत एवाशु खड्‌गं चिच्छेद चण्डिका ।
धनुर्मुक्‍तै: शितैर्बाणैश्‍चर्म चार्ककरामलम् ॥१७॥
हताश्व: स तदा दैत्यश्‍छिन्नधन्वा विसारथि: ।
जग्राह मुद्‌गरं घोरमम्बिकानिधनोद्यत: ॥१८॥
चिच्छेदापततस्तस्य मुद्‌गरं निशितै: शरै: ।
तथापि सोऽभ्यधावत्तां मुष्टिमुद्यम्य वेगवान् ॥१९॥
स मुष्टिं पातयामास ह्रदये दैत्यपुङ्‌गव: ।
देव्यास्तं चापि सा देवी तलेनोरस्यताडयत् ॥२०॥
तलप्रहाराभिहतो निपपात महीतले ।
स दैत्यराज: सहसा पुनरेव तथोत्थित: ॥२१॥
उत्पत्य च प्रगृह्योच्चैर्देवीं गगनमास्थित: ।
तत्रापि सा निराधारा युयुधे तेन चण्डिका ॥२२॥
नियुद्धं खे तदा दैत्यश्‍चण्डिका च परस्परम् ।
चक्रतु: प्रथमं सिद्धमुनिविस्मयकारकम् ॥२३॥
ततो नियुद्धं सुचिरं कृत्वा तेनाम्बिका सह ।
उत्पात्य भ्रामयामास चिक्षेप धरणीतले ॥२४॥
स क्षिप्तो धरणीं प्राप्य मुष्टिमुद्यम्य वेगित: ।
अभ्यधावत दुष्टात्मा चण्डिकानिधनेच्छया ॥२५॥
तमायान्तं ततो देवी सर्वदैत्यजनेश्‍वरम् ।
जगत्यां पातयामास भित्त्वा शूलेन वक्षसि ॥२६॥
स गतासु: पपातोर्व्यां देवीशूलाग्रविक्षत: ।
चालयन् सकलां पृथ्वीं साब्धिद्वीपां सपर्वताम् ॥२७॥
तत: प्रसन्नमखिलं हते तस्मिन् दुरात्मनि ।
जगत्स्वास्थ्यमतीवाप निर्मलं चाभवन्नभ: ॥२८॥
उत्पातमेघा: सोल्का ये प्रागासंस्ते शमं ययु: ।
सरितो मार्गवाहिन्यस्तथासंस्तत्र पातिते ॥२९॥
ततो देवगणा: सर्वे हर्षनिर्भरमानसा: ।
बभूवुर्निहते तस्मिन् गन्धर्वा ललितं जगु: ॥३०॥
अवादयंस्तथैवान्ये ननृतुश्चाप्सरोगणा: ।
ववु: पुण्यास्तथा वाता: सुप्रभॊऽभूद्दिवाकर: ॥३१॥
जज्वलुश्‍चाग्नय: शान्ता: शान्ता दिग्जनितस्वना: ॥ॐ॥३२॥
इति श्रीमार्कण्डेयपुराणे सावर्णिके मन्वन्तरे
देवीमाहात्मये
शुम्भवधो नाम दशमोऽध्याय: ॥१०॥
उवाच ४, अर्धश्लोक: १, श्लोका: २७,
एवम् ३२, एवमादित: ५७५ ॥
 -श्री अम्बिकादेवी विजयते -


तापलेल्या सोन्याच्या कांतीसारखा जिचा रंग आहे, रविशशीसारखे तेजस्वी तीन डोळे आहेत, हाती धनुष्य-बाण, अंकुश-पाश, शूळ असता जी देवी रम्य व सुदर्शन आहे, जी शिवशक्‍तीस्वरूप असून भक्तांचे संकटनिवारिणी आहे, त्या कामेश्वरी देवीला मी माझ्या ह्रदयात सतत स्मरणाने ठेवीत आहे.
ऋषी म्हणाले, "देवीने निशुंभाला, आपल्या भावाला याप्रकारे रणांगणावर आडवा करून ठार मारल्यावर, व निशुंभसेनेचा मोठा पराभव झाला, हे समजल्यावर शुंभ रागाने थरथरत देवीला म्हणाला, ॥१।२॥
"हे दुष्टे, देवी दुर्गे ! आपल्या शक्‍तीच्या व विजयाच्या उन्मत्तपणाने शेफारून जाऊन तू गर्व करू नकोस; कारण तू एकटी आहेस, असा अभिमान करून इतर स्त्रियांच्या मदतीने तू लढलीस. (हे धर्मयुद्ध नव्हे!)." ॥३॥
देवी म्हणाली, "हे दुष्ट दैत्या, अधमा ! मी एकटीच आहे. या त्रिखंडात माझ्याशिवाय इतर कोण आहे? बघ, नीट डोळे उघडून बघ, ही सारी माझी रूपे, आता माझ्यातच सामावली जाणार आहेत."॥४।५॥
त्यानंतर ब्रह्माणी आदि मुख्य देवीस्वरूपांची अंबिकास्वरूपांत विलीनता झाली, व उरली फक्त एक देहधारिणी अम्बा. हे दृश्य राक्षसराज शुंभाने पाहिले.॥६॥
देवी त्यानंतर म्हणाली, "मूर्खा, मी माझ्या अनेक शक्‍तींसह येथे रणांगणात लढाईला उतरले होते. त्या सर्व मी माझ्यात विलीन केल्यात व एकटीच उरले आहे. तूसुद्धा आता स्थिर मनाने बघ आणि युद्धाला तयार हो!"
ऋषी म्हणाले, "तदनंतर देव-दानवांच्या उपस्थितीतच देवी आणि राक्षसराज शुंभ या दोघांमध्ये प्रचंड युद्ध झाले. या युद्धात विजय कोणाचा होईल या विचाराने देवांची व दानवांची आतुरता वाढली. ॥९।१०॥
दोन्ही बाजूंनी बाणांचा वर्षाव, शस्त्रास्त्रांचे आघात, युक्‍तीप्रयुक्ती या सर्व बाह्य आणि आंतरिक ईर्षा, आवेश, त्वेष, साधनांनी यापूर्वी या त्रिलोकी असे तुंबळ युद्ध झाले नव्हते. ॥११॥
देवी अंबिकेने शेकडो दिव्य अस्त्रे व शक्‍ती असुरांवर सोडल्या. दैत्यराज शुंभही सावध व चिवट होता. त्याने देवीला केलेले आघात व शक्‍ती यशस्वीपणे परतविल्या. ॥१२॥
शुंभ दैत्यानेही देवीवर वारंवार लागोपाठ अविरत शस्त्राघात केले. देवी परमेश्वरीने त्याचे आघात, वार आणि शक्‍ती अति सहजपणाने तिरस्काराच्या हुंकारांनी नष्ट केल्या. ॥१३॥
शेकडो बाणवर्षावांनी शुंभराजाने देवीला झाकून टाकले, व हतबल करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी देवीने अत्यंत क्रोधाने व त्वेषाने राक्षसाच्या हातातील धनुष्य मोडून टाकले. ॥१४॥
दैत्यराजाच्या हातातील धनुष्य याप्रकारे मोडल्याने त्याने हाती शक्‍ती घेतली, पण दैत्याने ती देवीवर फेकण्यापूर्वीच देवीने आपल्या हातातील चक्राने ती शक्‍ती नष्ट केली. ॥१५॥
राक्षसाने आता शंभर चंद्राच्या दिव्य तेजापेक्षाही दिव्य धारेची तलवार हाती घेतली व मारण्यासाठी तो देवीच्या अंगावर धावून आला. ॥१६॥
तो आपल्याकडे धावून येतो आहे हे पाहून देवीने बाणांनी त्याची तळपती तलवार व सूर्यप्रकाशाप्रमाणे असलेली तेजस्वी रत्‍नजडित ढाल तात्काळ मोडून टाकली. ॥१७॥
त्यानंतर त्याचे (राक्षसाचे) हत्ती, घोडे, रथी व सारथीही मारले. आत कोणतेही शस्त्रे न उरल्याने राक्षसाने लढण्यासाठी मुद्‌गर हाती घेतले व तो धावून आला. ॥१८॥
तो अंगावर येतो आहेसे पाहून देवीने पुन्हा दिव्य बाण टाकून त्याच्या हातातील मुद्‌गर फोडून टाकले व त्याला नि:शस्त्र केले. राक्षस रागाने तापलेला होता. त्याने आपल्या हातांनी देवीवर मुष्टिप्रहार करायला सुरुवात केली. ॥१९॥
देवीच्या छातीवर शुंभाने शेकडो प्रहार आपल्या वज्रमुष्टीनी केले. देवीही त्याला त्याचप्रकारे भयानकपणे प्रत्युत्तर देत, ठोसे मारीत राहिली. ॥२०॥
देवीने शेवटी एक प्रचंड ठोसा शुंभाच्या छातीत मारून त्याला भुईवर पाडले. थोड्याच वेळात स्वत:ला सावरून राक्षस पुन्हा युद्धास तयार झाला. ॥२१॥
त्याने देवीला उचलले व देवीसह आकाशात उडी मारली आणि निराधार स्थितीत युद्ध करू लागला. देवी चण्डिकाही आकाशात कोणत्याही भूमी-आधाराशिवाय त्याच्याशी झुंज देऊ लागली. ॥२२॥
आकाशात असे कोणत्याही आधाराविरहित अवस्थेत देवी आणि शुंभ यांचे भयंकर युद्ध झाले; जे पाहून देव-देवता, ऋषीमुनी, सिद्धपुरुष यांना अतिशय आश्चर्य व विस्मय वाटला. ॥२३॥
त्यानंतर बर्‍याच झुंझीनंतर अंबिकेने शुंभ दैत्याला पकडून उचलले व प्रचंड वेगाने गरगरा फिरवून जमीनीवर भयानकरीतीने आपटले (आदळले).
जमिनीवर आदळला गेला तरी दैत्यराज शुंभ देवीला मारण्यासाठी वळवळत पुन्हा उठे पुन्हा पडे. पण अशा त्वेषातच तो लढत राहिला व भयंकर वेगाने धावतच राहिला. ॥२५॥
त्यानंतर मात्र त्या दैत्यराज शुंभावर देवीने तो आपल्या अंगावर चाल करून येतो आहे, असे पाहून आपल्या हातातील तेजस्वी त्रिशूळ खूपसून त्याला पाडला. ॥२६॥
देवीने केलेल्या या महाभयंकर त्रिशूळमाराने शुंभ भूमीवर पडला व त्याचे प्राण उडून गेले. कोसळता कोसळतानाही त्याने सागर, द्वीप, धरती आणि चराचरांना घाबरवून सोडले व भयभीतीने कापविले. ॥२७॥
अशा प्रकारे दुष्ट दुराचारी शुंभाचा देवीने मोठ्या पराक्रमाने व शौर्याने वध केल्यावर सारे जग स्थिर व शांत झाले. आकाशात जी मलीनता आली होती ती  जाऊन आकाश स्वच्छ झाले. ॥२८॥
युद्धकाळातील उत्पातांनी मेघांची उलथापालथ होऊन जे उल्कापात होत ते शांत झाले. पाण्याच्या वेगात जी अस्थिरता युद्धने आली होती, ती संपून सरिता शांत व स्वच्छंदपणे वाहू लागल्या. ॥२९॥
शुंभ-वधानंतर देव-देवतांच्या आनंदाला तर सीमाच उरली नाही. गंधर्वलोकी गंधर्वांनी स्तुतिगान गायिले व देवीची मुक्त कंठाने स्तुती केली. ॥३०॥
सूर्याची प्रभा प्रसन्नदायी झाली. अग्निशाळेतील अग्नी जगत्पालनासाठी ज्वलित होऊन आपले कार्य करू लागला. देव गाऊ नाचू लागले व अप्सरावृंदांनी नृत्यांनी आपला आनंद प्रकट केला. ॥३१॥
भडकलेला अग्नी पुन्हा शांत रीतीने प्रकट होऊन कल्याण करू लागला व रणातील रणधुमाळी, कोल्हेकुई संपली. ॥३२।
असा हा श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतर काळी घडलेल्या देवी महात्म्य कथांमधील शुंभाचा वध नावाचा दहावा अध्याय असे.

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP