श्रीदुर्गासप्तशती - द्वितीयोऽध्याय:

श्रीदुर्गासप्तशती - द्वितीयोऽध्याय:
Durga Saptashati


द्वितीयोऽध्याय:
मध्यमचरित्र
ध्यानम्
ॐ अक्षस्रक्‌परशुं गदेषुकुलिशं पद्‌मं धनुष्कुण्डिकां
दण्डं शक्तिमसिं च चर्म जलजं घण्टां सुराभाजनम् ।
शूल पाशसुदर्शने च दधतीं हस्तै: प्रसन्नाननां
सेवे सैरिभमर्दिनीमिह महालक्ष्मीं सरोजस्थिताम् ॥
'ॐ र्‍हिं' ऋषिरुवाच ॥१॥
देवासुरमभुद्युद्धं पूर्णमब्दशतं पुरा ।
महिषेऽसुराणामधिपे देवानां च पुरन्दरे ॥२॥
तत्रासुरैर्महावीर्यैर्देवसैन्यं पराजितम् ।
जित्वा च सकलान् देवानिन्द्रोऽभून्महिषासुर: ॥३॥
तत: पराजिता देवा: पद्‌मयोनिं प्रजापतिम् ।
पुरस्कृत्य गतास्तत्र यत्रेशगरुडध्वजौ ॥४॥
यथावृत्तं तयोस्तद्वन्महिषासुरचेष्टितम् ।
त्रिदशा: कथयामासुर्देवाभिभवविस्तरम् ॥५॥
सूर्येन्द्राग्न्यनिलेन्दूनां यमस्य वरुणस्य च ।
अन्येषां चाधिकारान् स स्वयमेवाधितिष्ठति ॥६॥
स्वर्गान्निराकृता: सर्वे तेन देवगणा भुवि ।
विचरन्ति यथा मर्त्या महिषेण दुरात्मना ॥७॥
एतद्व: कथितं सर्वममरारिविचेष्टितम् ।
शरणं व: प्रपन्ना: स्मो वधस्तस्य विचिन्त्यताम् ॥८॥
इत्थं निशम्य देवानां वचांसि मधुसूदन: ।
चकार कोपं शम्भुश्र्च भ्रुकुटीकुटिलाननौ ॥९॥
ततोऽतिकोपपूर्णस्य चक्रिणो वदनात्तत: ।
निश्‍चक्राम महत्तेजो ब्रह्मण: शंकरस्य च ॥१०॥
अन्येषं चैव देवानां शक्रादीनां शरीरत: ।
निर्गतं सुमहत्तेजस्तच्चैक्यं समगच्छत ॥११॥
अतीव तेजस: कूटं ज्वलन्तमिव पर्वतम् ।
ददृशुस्ते सुरास्तत्र ज्वालाव्याप्तदिगन्तरम् ॥१२॥
अतुलं तत्र तत्तेज: सर्वदेवशरीरजम्।
एकस्थं तदभून्नारी व्याप्तलोकत्रयं त्विषा ॥१३॥
यदभूच्छाम्भवं तेजस्तेनाजायत तन्मुखम् ।
याम्येन चाभवन् केशा बाहवो विष्णुतेजसा ॥१४।
सौम्येन स्तनयोर्युग्मं मध्यं चैन्द्रेण चाभवत् ।
वारुणेन च जङ्‍घोरू नितम्बस्तेजसा भुव: ॥१५॥
ब्रह्मणस्तेजसा पादौ तदङ्‌गुल्योऽर्कतेजसा ।
वसूनां च कराङ्‌गुल्य: कौबेरेण च नासिका ॥१६॥
तस्यास्तु दन्ता: सम्भूता: प्राजापत्येन तेजसा ।
नयनत्रितयं जज्ञे तथा पावकतेजसा ॥१७॥
भ्रुवौ च संध्ययोस्तेज: श्रवणावनिलस्य च ।
अन्येषां चैव देवानां सम्भवस्तेजसां शिवा ॥१८॥
तत: समस्तदेवानां तेजोराशिसमुद्‌भवाम् ।
तां विलोक्य मुदं प्रापुरमरा महिषार्दिता: ॥१९॥
शूलं शूलाद्विनिष्कृष्य ददौ तस्यै पिनाकधृक् ।
चक्रं च दत्तवान् कृष्ण: समुत्पाद्य स्वचक्रत: ॥२०॥
शङ्‌खं च वरुण: शक्तिं ददौ तस्यै हुताशन: ।
मारुतो दत्तवांश्‍चापं बाणपूर्णे तथेषुधी ॥२१॥
वज्रमिन्द्र: समुत्पाद्य कुलिशादमराधिप: ।
ददौ तस्यै सहस्राक्षो घण्टामैरावताद् गजात् ॥२२॥
कालदण्डाद्यमो दण्डं पाशं चाम्बुपतिर्ददौ ।
प्रजापतिश्‍चाक्षमालां ददौ ब्रह्मा कमण्डलुम् ॥२३॥
समस्तरोमकूपेषु निजरश्मीन् दिवाकर: ।
कालश्‍च दत्तवान् खड्‌गं तस्याश्‍चर्म च निर्मलम् ॥२४॥
क्षीरोदश्‍चामलं हारमजरे च तथाम्बरे ।
चूडामणिं तथा दिव्यं कुण्डले कटकानि च ॥२५॥
अर्धचन्द्रं तथा शुभ्रं केयूरान् सर्वबाहुषु ।
नूपुरौ विमलौ तद्वद् ग्रैवेयकमनुत्तमम् ॥२६॥
अङ्‌गुलीयकरत्‍नानि समस्तास्वङगुलीषु च ।
विश्‍वकर्मा ददौ तस्यै परशुं चातिनिर्मलम् ॥२७॥
अस्त्राण्यनेकरूपाणि तथाभेद्यं च दंशनम् ।
अम्लानपङकजां मालां शिरस्युरसि चापराम् ॥२८॥
अददज्जलधिस्तस्यै पङ्‌कजं चातिशोभनम् ।
हिमवा‍न् वाहनं सिंहं रत्‍नानि विविधानि च ॥२९॥
ददावशून्यं सुरया पानपात्रं धनाधिप: ।
शेषश्‍च सर्वनागेशो महामणिविभूषितम् ॥३०॥
नागहारं ददौ तस्यै धत्ते य: पृथिवीमिमाम् ॥
अन्यैरपि सुरैर्देवी भूषणैरायुधैस्तथा ॥३१॥
सम्मानिता ननादोच्चै: साट्टहासं मुहुर्मुहु: ।
तस्या नादेन घोरेण कृत्स्नमापूरितं नभ: ॥३२॥
अमायतातिमहता प्रतिशब्दो महानभूत् ।
चुक्षुभु: सकला लोका: समुद्राश्र्च चकम्पिरे ॥३३॥
चचाल वसुधा चेलु: सकलाश्‍च महीधरा: ।
जयेति देवाश्‍च मुदा तामूचु: सिंहवाहिनीम् ॥३४॥
तुष्टुवुर्मुनयश्‍चैनां भक्तिनम्रात्ममूर्तय: ।
दृष्ट्‌वा समस्तं संक्षुब्धं त्रैलोक्यममरारय: ॥३५॥
संनद्धाखिलसैन्यास्ते समुत्तस्थुरुदायुधा: ।
आ: किमेतदिति क्रोधादाभाष्य महिषासुर: ॥३६॥
अभ्यधावत तं शब्दमशेषैरसुरैर्वृत: ।
स ददर्श ततो देवीं व्याप्तलोकत्रयां त्विषा ॥३७॥
पादाक्रान्त्या नतभुवं किरीटोल्लिखिताम्बराम् ।
क्षोभिताशेषपातालां धनुर्ज्यानि:स्वनेन ताम् ॥३८॥
दिशो भुजसहस्त्रेण समन्ताद् व्याप्य संस्थिताम् ।
तत: प्रववृते युद्धं तया देव्या सुरद्विषाम् ॥३९ ॥
शस्त्रास्त्रैर्बहुधा मुक्‍तैरादीपितदिगन्तरम् ।
मिहिषासुरसेनानीश्‍चिक्षुराख्यो महासुर: ॥४०॥
ययुधे चामरश्‍चान्यैश्‍चतुरङ्‌गबलान्वित: ।
रथानामयुतै: षड्‌भिरुदग्राख्यो महासुर: ॥४१॥
अयुध्यतायुतानां च सहस्त्रेण महाहनु: ।
पंचाशद्‌भिश्‍च नियुतैरसिलोमा महासुर: ॥४२॥
अयुतानां शतै; षड्‌भिर्बाष्कलो युयुधे रणे ।
गजवाजिसहस्रौघैरनेकै: परिवारित: ॥४३॥
वृतो रथानां कोट्या च युद्धे तस्मिन्नयुध्यत ।
बिडालाख्योऽयुतानां च पञ्चाशद्भिरथायुतै: ॥४४॥
युयुधे संयुगे तत्र रथानां परिवारित: ।
अन्ये च तत्रायुतशो रथनाहगयैर्वृता: ॥४५॥
युयुधु: संयुगे देव्या सह तत्र महासुरा:
कोटिकोटिसहस्त्रैस्तु रथानां दन्तिनां तथा ॥४६॥
हयानां च वृतो युद्धे तत्राभून्महिषासुर: ।
तोमरैर्भिन्दिपालैश्‍च शक्तिभिर्मुसलैस्तथा ॥४७॥
युयुधु: संयुगे देव्या खड्‌गै: परशुपट्टिशै: ।
केचिच्च चिक्षिपु: शक्ती: केचित्पाशांस्तथापरे ॥४८॥
देवीं खड्‍गप्हारैस्तु ते तां हन्तुं प्रचक्रमु: ।
सापि देवी ततस्तानि शस्त्राण्यस्त्राणि चण्डिका ॥४९॥
लीलयैव प्रचिच्छेद निजशस्त्रास्त्रवर्षिणी ।
अनायस्तानना देवी स्तूयमाना सुरर्षिभि: ॥५०॥
मुमोचासुरदेहेषु शस्त्राण्यस्त्राणी चेश्‍वरी ।
सोऽपि क्रुद्धो धुतसटो देव्या वाहनकेशरी ॥५१॥
चचारासुरसैन्येषु वनेष्विव हुताशन: ।
नि:श्‍वासान् मुमुचे यांश्र्च युध्यमाना रणेऽम्बिका ॥५२॥
त एव सद्य: सम्भूता गणा: शतसहस्रश: ।
युयुधुस्ते परशुभिर्भिन्दिपालासिपट्टिशै: ॥५३॥
नाशयन्तोऽसुरगणान् देवीशक्‍त्युपबृंहिता: ।
अवादयन्त पटहान् गणा: शङ्‌खांस्तथापरे ॥५४॥
मृदङ्‌गांश्‍च तथैवान्ये तस्मिन् युद्धमहोत्सवे ।
ततो देवी त्रिशूलेन गदया शक्‍तिवृष्टिभि: ॥५५॥
खड्‌गादिभिश्‍च शतशो निजघान महासुरान् ।
पातयामास चैवान्यान् घण्टास्वनविमोहितान् ॥५६॥
असुरान् भुवि पाशेन बद्‌ध्वा चान्यानकर्षयत् ।
केचिद् द्विधा कृतास्तीक्ष्णै: खड्‌गपातैस्तथापरे ॥५७॥
विपोथिता निपातेन गदया भुवि शेरते ।
वेमुश्‍च केचिद्रुधिरं मुसलेन भृशं हता: ॥५८॥
केचिन्निपतिता भूमौ भिन्ना: शूलेन वक्षसि ।
निरन्तरा: शरौघेण कृता: केचिद्रणाजिरे ॥५९॥
श्येनानुकारिण: प्राणान् मुमुचिस्त्रिदशार्दना: ।
केषांचिद् बाहवश्छिन्नाश्छिन्नग्रीवास्तथापरे ॥६०॥
शिरांसि पेतुरन्येषामन्ये मध्ये विदारिता: ।
विच्छिन्नजङ्‌घांस्त्वपरे पेतुरुर्व्यां महासुरा: ॥६१॥
एकबाह्‌वक्षिचरणा: केचिद्देव्या द्विधा कृता: ।
छिन्नेऽपि चान्ये शिरसि पतिता: पुनरुत्थिता: ॥६२॥
कबन्धा युयुधुर्देव्या गृहीतपरमायुधा: ।
ननृतुश्‍चापरे तत्र युद्धे तूर्यलयाश्रिता: ॥६३॥
कबन्धाश्छिन्नशिरस: खड्‌गशक्त्यृष्टिपाणय: ।
तिष्ठ तिष्ठेति भाषन्तो देवीमन्ये महासुरा: ॥६४॥
पातितै रथनागाश्‍वैरसुरैश्‍च वसुन्धरा ।
अगम्या साभवत्तत्र यत्राभूत्स महारण: ॥६५॥
शोणितौघा महानद्य: सद्यस्तत्र प्रसुस्रुवु: ।
मध्ये चासुरसैन्यस्य वारणासुरवाजिनाम् ॥६६॥
क्षणेन तन्महासैन्यमसुराणां तथाम्बिका ।
निन्ये क्षयं यथा वह्‌निस्तृणदारुमहाचयम् ॥६७॥
स च सिंहो महानादमुत्सृजन्धुतकेशर: ।
शरीरेभ्योऽमरारीणामसूनिव विचिन्वति ॥६८॥
देव्या गणैश्‍च तैस्तत्र कृतं युद्धं महासुरै: ।
यथैषां तुतुषुर्देवा: पुष्पवृष्टिमुचो दिवि ॥ॐ॥६९॥
इति श्रीमार्कण्डेयपुराणे सार्वर्णिके मन्वन्तरे देवीमाहात्म्ये
महिषासुरसैन्यवधो नाम द्वितीयोऽध्याय: ॥२॥
उवाच १, श्‍लोका: ६८, एवम् ६९, एवमादित: १७३ ॥
श्री चंडिका विजयते


जिच्या हाती अक्षमाला, परशु, रत्‍नजडित गदा, कमळपुष्प, वज्र, धनुष्य, दण्ड, निरनिराळ्या शक्‍ती, चर्मढाल, शंख, (जळज) घंटा आणि सुरापात्र, शूळ आणि फास इतकी आयुधे शत्रूच्या झुंजीसाठी आहेत, जी सुदर्शना तर आहेच, पण चेहेर्‍यावर मोहक आणि सुप्रसन्न भावही आहेत त्या महिषासुरमर्दिनी महालक्ष्मी कमलवासिनीचे मी भजन, पूजन आणि प्रार्थना करतो.
ॠषी म्हणाले, "शेकडो वर्षांपूर्वी देव-दानवांचे युद्ध झाले. त्यात देवांच्या बाजूने देवांचा राजा इंद्र आणि राक्षसांच्या बाजूने राक्षसांचा राजा महिषासुर होता. ॥१॥२॥
या युद्धांत असुरांच्या महाप्रतापी वीरांनी देवसैन्याचा पराभव केला. देवांना संपूर्णपणे जिंकून इंद्राचे इंद्रपद हिसकावून घेऊन महिषासुर इंद्रपदी बसला. ॥३॥
याप्रमाणे राक्षसांकडून संपूर्णपणे पराजित झाल्याने सर्व देव कमलनिवासी ब्रह्मदेवाकडे गेले आणि गरुड-वाहनावर आरूढ होणार्‍या श्री विष्णूंकडे नेण्याची देवांनी त्यांना गळ घातली. ॥४॥
युद्धात घडलेल्या घटनांचा वृत्तांत- देवांचा पराजय आणि महिषासुराच्या पराक्रमाची विजयकथा- देवांनी ब्रह्मदेव व श्रीविष्णू यांना सांगितली आणि दुर्दशा साद्यंतपणे सांगितली. ॥५॥
इंद्र, सूर्य, चंद्र, अग्नी, यम आणि वरुण यांचे अधिकार राक्षसांनी काढून घेऊन त्या रिकाम्या जागांवर आपल्या अधिकार्‍यांची नेमणुक करून टाकली. ॥६॥
पराजयाने अशा प्रकारे फजिती पावलेले देवगण स्वर्गातून महिषासुराने हाकलून दिल्याने मानवांप्रमाणे पृथ्वीवर इतस्तत: भटकू लागले आहेत. ॥७॥
दैत्यांनी केलेली आमची दुर्दशा आम्ही आपणापुढे सांगून आम्ही आपणास शरण आलो आहोत. आता महिषासुराचा पराभव करून त्याला नष्ट करण्यासाठी काहीतरी मार्ग काढावा. अशी देवांनी प्रभूंना विनवणी केली. ॥८॥
देवांचे हे गार्‍हाणे ऎकून मधुराक्षसाला ठार मारणारे श्री विष्णू व भगवान् शंकर अतिशय संतापले. अत्यंत रागाने त्यांच्या भिवया वक्र झाल्या. मुख क्रोधाने संतप्त झाले. ॥९॥
अतिशय रागाने संतप्त झालेल्या चक्रधारी श्री विष्णूंच्या मुखातून एक महान् तेज बाहेर पडले, तसेच तेज ब्रह्मा आणि शिवशंकराच्या मुखातूनही बाहेर पडले. ॥१०॥
इंद्रादि अन्य देवांच्या मुखातूनही (शरीरांतून) असेच विलक्षण तेज बाहेर पडले आणि या सर्व तेजशलाका एकत्रित होऊन त्या सर्वांचे एक महातेज निर्माण झाले. ॥११॥
पाहता पाहता या देवतेजांचा, एक तेजस्वी ज्वालापर्वत तयार झाला व त्या तेजाने दाही दिशांतील परिसर व्यापून टाकल्याचे देवांनी पाहिले. ।१२॥
सर्व देवांच्या शरीरांतून निर्माण झालेल्या त्या तेजाशी कशाचीच तुलना होत नव्हती. मात्र सर्व तेजोरेखा एकमेकांत मिसळण्याचे कार्य संपुष्टात आल्यावर एका नारीरूपाने आकार घेऊन तिन्ही लोक आपल्या तेजाने व्यापून टाकले. ॥१३॥
भगवान् शिवशंकरांच्या तेजाने मुखाचा एक अप्रतिम आकार घेतला. यमतेजाने लांबसडक व काळ्याभोर केसांचा आकार घेतला आणि विष्णूतेजाने बाहूंचा आकार घेतला. ॥१४॥
चंद्रम्याच्या तेजाने स्तनांचा आकार घेतला. इंद्रतेजाने मध्य कटिभाग तयार झाला. वरुणतेजाने जंघा आणी पृथ्वीतेजाने नितंब आकारित झाले. ॥१५॥
ब्रह्मदेवांच्या तेजाने नारीस्वरूपाच्या पायाच्या कृती आणि अर्क - (सूर्य) तेजाने पायांना बोटे तयार झाली. अष्टवसूंच्या तेजाने हातांना बोटे प्रदान केली. कुबेर- तेजाने एक अति सौंदर्यमय नासिका (नाक) तयार झाली. ॥१६॥
प्रजापतीच्या तेजाने दात प्रदान केले आणि पावकाच्या (अग्नीच्या) तेजाने अत्यंत तेजस्वी तीन नेत्र तयार झाले. ॥१७॥
सुषमा - (संध्या) तेजाने बाकदार भिवया मिळाल्या आणि वायुतेजाने दोन्ही कान उत्पन्न झाले. या प्रकारे इतर देवांनी निर्माण केलेल्या तेजाने सर्वावयव एकवटून एक अत्यंत तेजस्वी मंगलदायी शिवा (महादेवी) अवतीर्ण झाली. ॥१८॥
अशा प्रकारे सर्व देवतांचे तेज एकत्र होऊन 'तेजोराशिसमुद्‌भवा' अशी एक अत्यंत लावण्यमयी देवी अवतीर्ण झालेली पाहून महिषासुरांनी पराजित केलेले सर्व देव संतोषले. आणि या देवीला शस्त्र-अस्त्र-धारी करून आपापली संहारक शस्त्रास्त्रे बहाल केली. ॥१९॥
आपल्या शस्त्रसंभारातून भगवान् शंकरांनी देवीला मूळ दिला. श्रीविष्णूंनी आपल्या चक्रातील काही तेज वेगळे काढून एक नवीन चक्र तयार करून दिले. ॥२०॥
वरुणराजाने शंख दिला, अग्नीने एक अजिंक्य व अचूक मार टाकणारी दिव्य शक्ती दिली. पवनाने धनुष्य दिले आणि तेजस्वी बाण देवीला समर्पण केले. ॥२१॥
इंद्राने एक तेजस्वी बाण आपल्या बाणापासून निर्माण करून देवीला दिला व आपल्या ऎरावत हत्तीच्या गळ्यातील घंटा रणगर्जनेसाठी देवीला दिली. ॥२२॥
यमाने कालदण्डामधून दण्ड (काठी), वरुणाने पाश (फास) प्रजापतीने स्फटिकाची माळ आणि ब्रह्मदेवांनी कमंडलू देवीला भेट केला. ॥२३॥
सूर्याने देवीच्या त्वचेवरील रोम-छिद्रांत आपली प्रकाशकिरणे पसरवून तेज प्रस्थापित केले. काळाने एक अजिंक्य तलवार आणि ढाल दिली. ॥२४॥
क्षीरसागराने दिव्य हार, जीर्ण न होणारी दिव्य वस्त्रे, एक अत्यंत तेजस्वी लखलखीत हिरा चूडामणी, हातांत रत्‍नजडित काकणे आणि कानांतील रत्‍नांनी जडविलेली कुंडले दिली. ॥२५॥
आभूषणांपैकी रत्‍नांनी सजविलेली चंद्रकोर, सर्व हातांना शुभ्र केयूर, पायांसाठी पवित्र नूपुरांची जोडी, गळ्यात मणिमाला, जी उत्तम रत्‍नांनी जडविलेली होती अशी प्रदान केली. ॥२६॥
विश्‍वकर्म्याने हाताच्या सर्व बोटांना रत्‍नांनी मढविलेल्या सर्व अंगठ्या दिल्या अणि त्याबरोबरच अत्यंत धारदार शुभ्र फरशी दिली. ॥२७॥
त्या शिवाय बहुविध शस्त्रास्त्रे, अभेद्य कवच आणि कधीही न कोमेजणार्‍या कमलांच्या माळा गळ्यात आणि मस्तकी धारण करावयास दिल्या. ॥२८॥
सागर व विस्तीर्ण तडागासारख्या जलधींनी अत्यंत मनोहर व शोभिवंत पद्‌मपुष्पांचा उपहार दिला. हिमालयाने वाहन म्हणून अत्यंत उमदा सिंह व विविध रत्‍ने देवीला अर्पण केली. ॥२९॥
कुबेराने सुरापान करण्यासाठी सोम भरलेले एक दिव्य भांडे दिले, तर शेषनागराजाने बहूमूल्य माणकांचा नागहार अर्पण केला. ॥३०॥
पृथ्वीमोलाचा बहुमूल्य नागहार देवीला दिल्यानंतर इतर देव-देवतांनी आपल्या जवळची अत्यंत दुर्मिळ अशी रत्‍नाभूषणे देवीला दिली व तिचा सन्मान केला. ॥३१॥
अशी शस्त्रसंभार व रत्‍नालंकारासहित परिपूर्ण व लावण्यवती देवी देवगणांनी पाहिल्यावर त्यांना हर्ष झाला व त्यांनी गगनभेदी आरोळ्यांनी देवीचा जयजयकार केला. या जयजयकाराचे पडसाद आकाशापार पोहोचले. ॥३२॥
देवीच्या जयगर्जनेचे पडसाद केवळ आकाशातच नव्हे तर तिन्ही लोक आणि समुद्रतळाशी पाताळलोकात पोहोचले आणि प्रचंड उन्माद-नादांनी समुद्रातील लाटा पर्वतप्राय उसळल्या. ॥३३॥
या जयजयकार प्रतिध्वनीमुळे पृथ्वी डोलू लागून भूकंप झाले. पर्वताला हादरे बसून ज्वालामुखी उसळले आणि संपूर्ण विश्‍वात कोलाहल माजला. अत्यंत प्रसन्न भावनेने देवानी सिंहवाहिनी देवीचा पुन: पुन्हा जयजयकार केला. ॥३४॥
ऋषीमुनींनीही अत्यंत संतोषाने देवीच्या या अवताराचे स्वागत करून देवीला नम्रपणाने वंदन केले. त्रैलोक्यात चाललेला हा प्रमत्त आनंदोत्सव पाहून राक्षसांच्या गोटात संतापाच्या लाटा उसळल्या व संपुर्ण असुरगण अस्वस्थ झाले. ॥३५॥
आपल्या सैन्यासमोर सेनापती, सरदार, घोडेस्वार व पायदळ एकत्रित करून महिषासूर म्हणाला, "हे काय चालले आहे? आम्ही पराक्रमी असुर, इंद्रादी देव गणांना जिंकणारे, आमच्या अजिंक्य सैन्यासमोर हा जयोन्माद कोणाचा?" बोलत बोलता तो रागाने थरथरत होता. ॥३६॥
महिषासुर राक्षसाचे हे बोलणे संपते न संपते तोच त्याचे अनुचर देवीचा शोध घ्यायला गेले व त्यांनी त्रिलोकात अद्‌भुत अशी निर्भयपणाने देवांसमोर उभी असलेली दुर्गा पाहिली. ॥३७॥
दुर्गेच्या पावलाखाली धरती नतमस्तक झालेली, शिरावरच्या अप्रतिम मुकुटाची प्रभा अंबर तेजाशी स्पर्धा करणारी, धनुष्याच्या टणत्कारांनी सप्तपाताळांचा थरकाप उडविणारी, गर्वोन्नत. ॥३८॥
देवी आपल्या हजारो बाहूंनी सर्व दिशा व्यापून टाकीत आहे, हे पाहाता पाहाता चिडून दैत्यगण देवीशी युद्ध करायला प्रवृत्त झाले. आजपर्यंत असुरांना आव्हान देणारी शक्‍ती अस्तित्वात नव्हती, ती निर्माण झाल्याने असुर चिडले. ॥३९॥
दिशांचे अंतर कापीत कापीत भयंकर शस्त्र-संभार, प्रचंड सैन्य, घेऊन पूर्वीच्या यशाने उन्मत्त झालेला दैत्य-सेनापती चिक्षुर अत्यंत उतावळेपणाने देवीचा पाडाव करण्याच्या हेतूने रणात उतरला. ॥४०॥
चतुरंग सैन्य, ढाल, तलवार, रथ, गज, अश्वदळ आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असे न थकणारे पायदळ घेऊन महाबलाढ्य उदग्र नावाचा दैत्यही देवीशी लढण्यासाठी रणात उतरला. ॥४१॥
कोट्यवधी सैनिक, रथदल, अश्वदल, महाहनु या राक्षसाने आणले. पाच कोटी तलवारधारी सैन्य घेऊन असिलोमा राक्षस देवीशी युद्धाला ठाकला. ॥४२॥
साठ लक्ष रथ शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेला महावीर बाष्कल आपल्या सेनासंभारांनी वेढलेल्या स्थितीत रणभूमीत येऊन दाखल झाला. ॥४३॥
कोट्यवधी रथ, घोडेस्वार, गजवीर आपल्याबरोबर घेऊन महाप्रतापी सेनानी बिडाल पाच हजार रथांसह देवीशी युद्धाला आला. ॥४४॥
परिवारित हा बलवान असुर सेनानी आपले सैन्य शस्त्र अस्त्रादी आयुधे, घोडेस्वार, रथ घेऊन आपल्या प्रचंड सैन्यासह महिषासुराचे मदतीस युद्धभूमीवर आला. ॥४५॥
या शिवाय अनेक राक्षस-सेनानी आपापल्या बलाढ्य सैन्य, हत्ती, घोडे, रथांसह, कोट्यवधी सैनिकांसह भगवती दुर्गेशी संग्रामास रणात उतरले. ॥४६॥
या शिवाय स्वत: महिषासुर, असुरांचा राजा, देवांचा विजेता म्हणून अश्व, रथ, शस्त्रास्त्रे, शक्‍ती तोमर, गोफणी शक्‍ती, मुसळे आदी साधने दैत्यवीरांजवळ देऊन रणभूमीत प्रवेश करू लागला. ॥४७॥
कॊणी भगवती देवीशी लढण्यासाठी तलवार, परशु, (फरशी) पट्टा या शस्त्रांनी देवीवर चाल करून आले. कोणी देवीवर शक्ती, फास आणि इतर अस्त्रांनी मारा करू लागले.
आपल्या खड्‌गाच्या मारांनी देवीने चहूबाजूंनी येणारे शत्रूचे सर्व आघात परतवून लावले आणि रणचंडिका बनून अत्यंत त्वेषाने निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी चढाई करून ती शत्रूचा धुव्वा उडवू लागली, ॥४९॥
शत्रूने केलेले हल्ले दुर्गादेवीने अत्यंत सहजतेने व युक्तीने परतवून तर लावलेच, पण चालून येणार्‍या शत्रूला ती जागीच ठेचीत होती. हे सर्व न थकता होत असल्याने देवांनाही आश्चर्य वाटून त्यांनी देवीची स्तुती केली. ॥५०॥
असुरांच्या शस्त्रांचा नाश करून त्यांना जागीच कंठस्नान घालणारी ईश्वरीदेवी तुंबळ युद्धात मग्न असता देवीचे वाहन असलेला सिंहही युद्धात झालेल्या धुमश्चक्रीने क्रुद्ध झाला आणि दैत्य-सैन्यात संहारासाठी घुसला. ॥५१॥
रणभूमीत असुरांशी युद्ध करताना देवीने त्वेषाने टाकलेल्या फुत्कारांनी दैत्य-सैन्यात जणू वणवा पेटल्यासारखी स्थिती निर्माण झाली आणि त्या निश्वासांतून तात्काळ हजारो, लाखो देवीगण उत्पन्न झाले व ते राक्षसांशी लढू लागले. ॥५२॥
असे दुर्गेच्या त्वेषाच्या श्वासातून उत्पन्न झालेले कोट्यवधी देवीगण फरशी, गोफण, पट्टा, हाती सापडेल त्या शस्त्रास्त्रांनी असुरांशी लढून त्यांचा संहार करीत होते. ॥५३॥
देवीच्या शक्तीने निर्माण झालेले देवगण राक्षसांचा धुव्वा उडवीत उडवीत जयघोष म्हणून रणभेरी, नगारे आणि शंखनाद करीत होते आणि शत्रूच्या ह्रदयात एक धाक निर्माण करीत होते. ॥५४॥
या युध-महोत्सवात शस्त्रास्त्रांच्या खणखणाटाबरोबरच रणवाद्यांच्या निनादांनी कोलाहल माजला होता. काही देवगण मृदुंग वाजवीत होते. इकडे देवी दुर्गा मात्र आपली गदा, शक्ती, त्रिशूळाचा मार घालून शत्रूंना मारीतच होती. ॥५५॥
हजारो राक्षसांना आपल्या तलवारींनी याप्रमाणे मारीत, मारीत, दैत्यसैन्याचा समाचार घेत घेत, महाअसुर, महाप्रतापी महिषासुरापर्यंत देवी जात होती. वाटेत तिच्या मारांनी व देवीगणांनी केलेल्या प्रचंड घंटानादांनी कित्येक शत्रू मेले. ॥५६॥
शत्रूच्या सैनिकांना आपल्या हातातील फास त्यांच्या मानेभोवती टाकून त्यांना बांधून फरफटत ओढले; तर अन्य शत्रुसैन्यावर तीक्ष्ण शस्त्रांनी, तलवारीने आघात केले. त्यामुळे शत्रुसैन्याची मन:स्थिती द्विधा झाली. ॥५७॥
कित्येक राक्षसांना देवीने गदेच्या टोल्यांनी भूमीवर लोळवले, कित्येकांना मुसळाच्या मारांनी रक्तबंबाळ करून घात केला, तर कित्येकांच्या छातीवर आघात करून रणभूमीत रक्ताचे पाट वाहविले. ॥५८॥
कित्येक राक्षसवीरांना त्यांच्या छातीत शूळ भोसकून मारले व अखंड बाणवर्षावाने कित्येक रणवीर राक्षसांना रणजर्जर केले. ॥५९॥
आपल्या जखमांनी तडफडणारे राक्षसवीर देवीच्या अचूक आणि आकस्मिक मारांनी मरण पावले. कित्येकांच्या माना कापल्या गेल्या, कित्येकांचे हातपाय तुटले, कित्येकांना देवीने कमरेत मार देऊन तुकडे केले. ॥६०॥
कित्येकांच्या जांघांवर झालेल्या आघातांनी राक्षसांकडील बलाढ्य असुर मेले, कित्येकांनी शिरे गमावली आणि या युद्धात दैत्यांना देवी करीत असलेल्या प्रचंड पराक्रमाची जाणीव झाली. ॥६१॥
राक्षसवीरांपैकी ज्यांच्यावर आघात झाले ते पण निर्धाराने लढत असल्याने आपल्या जखमांकडे दुर्लक्ष करून काढले. काही शत्रूशी चिवटपणाने लढता लढता मस्तके गमावली तरी लढत राहिले. पडल्यानंतर पुन्हा उठत, पुन्हा लढत आणि पुन्हा होणार्‍या मारांनी धरतीवर पडत. ॥६२॥
मस्तकविहीन झालेले वीर मात्र समोर काही दिसत नसल्याने आवेशाने लढून आपल्याच असुरपक्षात उत्पात मांडीत होते, तर काही जण त्याच आवेशाने रणवाद्यांच्या तालावर थैमान घालून थयथय नाचत होते. ॥६३॥
ज्यांची शिरे कापली गेली आहेत, ज्यांना देवीच्या शस्त्रांचा प्रसाद (मार) मिळाला आहे, त्यांच्याशिवाय इतर राक्षसवीर थांबा! मारा! कापा! देवीला जिवंत सोडू नका अशा मोठमोठ्या गर्जना करीत होते. ॥६४॥
या युद्धात इतकी मारहाण, कापाकापी आणि रक्तपात झाला की, पृथ्वीवर व या रणभूमीच्या अवतीभोवती रक्तमासांचा चिखल झाला. रक्ताचे पाट वाहू लागले व एका बीभत्स दृश्याने रणभूमी भेसूर दिसू लागली. ॥६५॥
रक्तांच्या महानद्यांनी सर्व भूमीवर ओघळ पसरविले. त्यांत राक्षसवीर, हत्ती, घोडे, रथी-सारथी, मोठे-लहान या सर्वांच्याच रक्तमांसाचा एकत्रित सागरच दिसू लागला. ॥६६॥
हे पाहून जगदम्बेने त्या सेनासागरांपैकी उरलेल्या जिवंत राक्षसवीरांना गवताची पाती तोडावी त्याप्रमाणे कापून काढले. अग्नी ज्याप्रमाणे वाळलेले गवत, लाकूड क्षणात नष्ट करतो त्या प्रमाणे राक्षससैन्याचा संपूर्ण नाश झाला. ॥६७॥
देवीच्या सिंहानेही वेचून वेचून भल्याभल्या वीरांना आपली आयाळ हलवून घाबरवून त्यांच्या माना तोडल्या आणि देवीच्या बरोबरीने अखंडपणे लढून पराक्रम गाजविला. ॥६८॥
देवीचे गणही पराक्रमाची शर्थ करण्यात मागे नव्हते त्यांचा पराक्रम देवीच्या प्रेरणेने असल्याने अप्रतिम आणि अद्वितीय होता. हा युद्धसोहळा देव मोठ्या उत्सुकतेने पहात होते. देवीने राक्षससैन्यावर मिळवलेल्या अद्वितीय विजयामुळे देव आनंदित झाले व त्यांनी देवीवर आकाशातून फुलांचा वर्षाव केला.
असा हा श्रीमार्कण्डेय पुराणातील सावर्णिक मन्वंतर- काळी घडलेल्या देवीमाहात्म्य- स्तोत्रातील महिषासुर- सैन्यवधाचा दुसरा अध्याय.
श्रीचंडिका विजयते-

References : N/A
Last Updated : September 25, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP