श्रीदुर्गासप्तशती - चतुर्थोऽध्याय:

श्रीदुर्गासप्तशती - चतुर्थोऽध्याय:


चतुर्थोऽध्याय:
ध्यानम्
ॐ कालाभ्राभां कटाक्षैर्रिकुलभयदां मौलिबद्धेन्दुरेखां
शड्‌खं चक्रं कृपाणं त्रिशिखमपि करैरुद्वहन्तीं त्रिनेत्राम् ।
सिंहस्कन्धाधिरूढां त्रिभुवनमखिलं तेजसा पूरयन्तीं
ध्यायेद् दुर्गां जयाख्यां त्रिदशपरिवृतां सेवितां सिद्धकामै: ॥
'ॐ' ऋषिरुवाच ॥१॥
शक्रादय: सुरगणा निहतेऽतिवीर्ये
तस्मिन्दुरात्मनि सुरारिबले च देव्या ।
तां तुष्टुवु: प्रणतिनम्रशिरोधरांसा
वाग्भि: प्रहर्षपुलकोद्‌गमचारुदेहा: ॥२॥
देव्या यया ततमिदं जगदात्मशक्त्या
निश्‍शेषदेवगणशक्तिसमूहमूर्त्या ।
तामम्बिकामखिलदेवमहर्षिपूज्यां
भक्त्या नता: स्म विदधातु शुभानि सा न: ॥३॥
यस्या: प्रभावमतुलं भगवाननन्तो
ब्रह्मा हरश्‍च न हि वक्तुमलं बलं च ।
सा चण्डिकाखिलजगत्परिपालनाय
नाशाय चाशुभभयस्य मतिं करोतु ॥४॥
या श्री. स्वयं सुकृतिनां भवनेष्वलक्ष्मी:
पापात्मनां कृतधियां ह्रदयेषु बुद्धि: ।
श्रद्धा सतां कुलजनप्रभवस्य लज्जा
तां त्वां नता: स्म परिपालय देवि विश्‍वम् ॥५॥
किं वर्णयाम तव रूपमचिन्त्यमेतत्
किं चातिवीर्यमसुरक्षयकारि भूरि ।
किं चाहवेषु चरितानि तवाद्‌भुतानि
सर्वेषु देव्यसुरदेवगणादिकेषु ॥६॥
हेतु: समस्तजगतां त्रिगुणापि दोषैर्न
ज्ञायसे हरिहरादिभिरप्यपारा ।
सर्वाश्रयाखिलमिदं जगदंशभूत-
मव्याकृता हि परमा प्रकृतिस्त्वमाद्या ॥७॥
यस्या: समस्तसुरत समुदीरणेन
तृप्तिं प्रयाति सकलेषु मखेषु देवि ।
स्वाहासि वै पितृगणस्य च तृप्तिहेतु-
रुच्चार्यसे त्वमत एव जनै: स्वधा च ॥८॥
या मुक्तिहेतुरविचिन्त्यमहाव्रता त्व-
मभ्यस्यसे सुनियतेन्द्रियतत्त्वसारै: ।
मोक्षार्थिभिर्मुनिभिरस्तसमस्तदोषै-
र्विर्द्यासि सा भगवती परमा हि देवी ॥९॥
शब्दात्मिका सुविमलर्ग्यजुषां निधान-
मुद्‌गीथरम्यपदपाठवतां च साम्नाम् ।
देवी त्रयी भगवती भवभावनाय
वार्त्ता च सर्वजगतां परमार्तिहन्त्री ॥१०॥
मेधासि देवि विदिताखिलशास्त्रसारा
दुर्गासि दुर्गभवसागरनौरसङ्‌गा ।
श्री: कैटभारिह्रदयैककृताधिवासा
गौरी त्वमेव शशिमौलिकृतप्रतिष्ठा ॥११॥
ईषत्सहासममलं परिपूर्णचन्द्र-
बिम्बानुकारि कनकोत्तमकान्तिकान्तम् ।
अत्यद्‌भुतं प्रह्रतमत्तरुषा तथापि
वक्त्रं विलोक्य सहसा महिषासुरेण ॥१२॥
दृष्ट्‌वा तु देवि कुपितं भ्रुकुटीकराल-
मुद्यच्छशाङ्‌कसदृशच्छवि यन्न सद्य: ।
प्राणान्मुमोच महिषस्तदतीव चित्रं
कैर्जीव्यते हि कुपितान्तकदर्शनेन ॥१३॥
देवि प्रसीद परमा भवती भवाय
सद्यो विनाशयसि कोपवती कुलानि ।
विज्ञातमेतदधुनैव यदस्तमेत-
न्नीतं बलं सुविपुलं महिषासुरस्य ॥१४॥
ते सम्मता जनपदेषु धनानि तेषां
तेषां यशांसि न च सीदति धर्मवर्ग: ।
धन्यास्त एव निभृतात्मजभृत्यदारा
येषां सदाभ्युदयदा भवती प्रसन्ना ॥१५॥
धर्म्याणि देवी सकलानि सदैव कर्मा-
ण्यत्यादृत: प्रतिदिनं सुकृती करोति ।
स्वर्गं प्रयाति च ततो भवतीप्रसादा-
ल्लोकत्रयेऽपि फलदा ननु देवि तेन ॥१६॥
दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तो:
स्वस्थै: स्मृता मतिमतीव शुभां ददासि ।
दारिद्र्यदु:खभयहारिणि का त्वदन्या
सर्वोपकारकरणाय सदाऽऽद्रिचित्ता ॥१७॥
एभिर्हतैर्जगदुपैति सुखं तथैते
कुर्वन्तु नाम नरकाय चिराय पापम् ।
संग्राममृत्युमधिगम्य दिवं प्रयान्तु
मत्वेति नूनमहितान् विनिहंसि देवी ॥१८॥
दृष्ट्‌वैव किं न भवती प्रकरोति भस्म
सर्वासुरानरिषु यत्प्रहिणोषि शस्त्रम् ।
लोकान् प्रयान्तु रिपवोऽपि हि शस्त्रपूता
इत्थं मतिर्भवति तेष्वपि तेऽतिसाध्वी ॥१९॥
खड्‌गप्रभानिकरविस्फुरणैस्तथोग्रै:
शूलाग्रकान्तिनिवहेन दृशोऽसुराणाम् ।
यन्नागता विलयमंशुमदिन्दुखण्ड-
योग्याननं तव विलोकयतां तदेतत् ॥२०॥
दुर्वृत्तवृत्तशमनं तव देवि शीलं
रूपं तथैतदविचिन्त्यमतुल्यमन्यै: ।
वीर्यं च हन्तृ ह्रतदेवपराक्रमाणां
वैरिष्वपि प्रकटितैव दया त्वयेत्थम् ॥२१॥
केनोपमा भवतु तेऽस्य पराक्रमस्य
रूपं च शत्रुभयकार्यतिहारि कुत्र ।
चित्ते कृपा समरनिष्ठुरता च दृष्टा
त्वय्येव देवि वरदे भुवनत्रयेऽपि ॥२२॥
त्रैलोक्यमेतदखिलं रिपुनाशनेन
त्रातं त्वया समरमूर्धनि तेऽपि हत्वा ।
नीता दिंवं रिपुगणा भयमप्यपास्त-
मस्माकमुन्मद्सुरारिभवं नमस्ते ॥२३॥
शूलेन पाहि नो देवि पाहि खड्‌गेन चाम्बिके ।
घण्टास्वनेन: पाहि चापज्यानि:स्वनेन च ॥२४॥
प्राच्यां रक्ष प्रतीच्यां च चण्डिके रक्ष दक्षिणे ।
भ्रामणेनात्मशूलस्य उत्तरस्यां तथेश्वरि ॥२५॥
सौम्यानि यानि रूपाणि त्रैलोक्ये विचरन्ति ते ।
यानि चात्यर्थघोराणि तै रक्षास्मांस्तथा भुवम् ॥२६॥
खड्‌गशूलगदादीनि यानि चास्त्राणी तेऽम्बिके ।
करपल्लवसङ्‌गीनि तैरस्मान् रक्ष सर्वत: ॥२७॥
ऋषिरुवाच ॥२८॥
एवं स्तुता सुरैर्दिव्यै: कुसुमैर्नन्दनोदऽऽभवै: ।
अर्चिता जगतां धात्री तथा गन्धानुलेपनै: ॥२९॥
भक्त्या समस्तैस्त्रिदशैर्दिव्यैर्धूपैस्तु धूपिता ।
प्राह प्रसादसुमुखी समस्तान् प्रणतान् सुरान् ॥३०॥
देव्युवाच ॥३१॥
व्रियतां त्रिदशा: सर्वे यदस्मत्तोऽभिवाच्छितम् ॥३२॥
देवा ऊचु: ॥३३॥
भगवत्या कृतं सर्वं न किंचिदविशष्यते ॥३४॥
यदयं निहत: शत्रुरस्माकं महिषासुर: ।
यदि चापि वरो देयस्त्वयास्माकं महेश्‍वरि ॥३५॥
संस्मृता संस्मृता त्वं नो हिंसेथा: परमापद: ।
यश्‍च मर्त्य: स्तवैरेभिस्त्वां स्तोष्यत्यमलानने ॥३६॥
तस्य वित्तर्द्धिविभवैर्धनदारादिसम्पदाम् ।
वृद्धयेऽस्मत्प्रसन्ना त्वं भवेथा: सर्वदाम्बिके ॥३७॥
ऋषिरुवाच ॥३८॥
इति प्रसादिता देवैर्जगतोऽर्थे तथाऽऽत्मन: ।
तथेत्युक्त्वा भद्रकाली बभूवान्तर्हिता नृप ॥३९॥
इत्येतत्कथितं भूप सम्भूता सा यथा पुरा ।
देवी देवशरीरेभ्यो जगत्त्रयहितैषिणी ॥४०॥
पुनश्‍च गौरीदेहात्सा समुद्‌भूता यथाभवत् ।
वधाय दुष्टदैत्यानां तथा शुम्भनिशुम्भयो: ॥४१॥
रक्षणाय च लोकानां देवानामुपकारिणी ।
तच्छृणुष्व मयाऽऽख्यातं यथावत्कथयामि ते ॥र्‍हीं ॐ ॥४२॥
इति श्रीमार्कण्डेयपुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवीमाहात्मये
शक्रादिस्तुतिर्नाम चतुर्थोऽध्याय: ॥४॥
उवाच ५, अर्धश्‍लाकौ २, श्‍लोका: ३५, एवम ४२, एवमादित: २५९ ॥


साधनेने सिद्धी मिळविणार्‍या साधकांनी सर्व देव-देवतांना नेहमीच मदत करणार्‍या जया नामे देवीची सेवा, भक्‍ती करावी. कृष्ण मेघासारखा तिचा वर्ण, आपल्या नजरेनेच शत्रूच्या उरात धडकी भरविणारी जरब, धाक, मस्तकावर बद्ध अशी अर्धचंद्राकृती रेखा, हाती त्रिशूळ, तेजस्वी तीन डोळे, सिंहाच्या पाठीवर बसून रण गर्जविणारी रणरागिणी आणि आपल्या तेजस्वीपणाने त्रिखंडात प्रसिद्धी पावलेली ही जया देवी-भक्तांच्यापाठी राहून रक्षण करो.
ऋषी म्हणाले, "अत्यंत पराक्रमी पण अन्यायी राक्षसराजास चंडिकेने रणात मारल्यानंतर इंद्रादी देवांनी देवी चंडिकेची अत्यंत नम्रपणे स्तुती करून तिला वंदन केले. ते उत्तम मधुर स्वरांनी गायिलेले स्तवनगान ऎकून देवी संतुष्ट झाली आणि आनंदाने तिच्या सुंदर अंगावर रोमांच उभे राहिले व आनंद आणि अभिमानाने ती प्रसन्न झाली." ॥१॥२॥
आपल्या स्तवनगानात देव म्हणाले, "सर्व देव-देवतांच्या शक्ति-प्रकृतीच्या समूहाने अवतीर्ण झालेली ही अंबिका संपूर्ण जग व्यापून अजिंक्य झालेली असल्याने आम्ही तिला नतमस्तक होऊन वंदन करतो. ही अंबिका आपल्या उदारतेने परिपूर्ण असल्याने अखिल देवगण, मुनी, ऋषी यांना वंदनीय आणि पूजनीय आहे. ॥३॥
जिच्या अतुल पराक्रम आणि शक्‍तीचे वर्णन खुद्द ब्रह्मदेव, श्रीविष्णू व महेश यांनाही शब्दांनी वर्णन करण्याच्या पलीकडे आहे, अशी ही चंडिका देवी जगाचे भले व्हावे, संरक्षण व्हावे, व संकटमुक्‍त व्हावे, भक्तांचे अशुभ भय यांचा नाश व्हावा या साठीच झटते व अभयदायिनी वरदा झाली आहे. ॥४॥
ही जगदम्बा भाग्यवंताच्या घरी लक्ष्मीरूपाने वास करते आणी पापी माणसाच्या घरी दरिद्रता-रूपाने राहते. शुद्ध अंत:करण असलेल्या सज्जनांचे घरी बुद्धिरूपाने, संत-सज्जनाचे घरी श्रद्धा-रूपाने, कुलीन सज्जनांचे घरी विनयारूपाने निवास करते. ती निरनिराळ्या रूपाने वेगवेगळ्या ठिकाणी वास करीत असली तरी ती मूळची भद्रकाली भक्तांचे मंगल करणारीच आम्ही देवीला वंदन करतो. हे देवी या संपूर्ण जगताचे पालन रक्षण कर. ॥५॥
हे देवी, तुझ्या या अनाकलनीय रूपगुणांचे मी वर्णन तरी कसे करू? राक्षसांचा रणक्षेत्रात नाश करण्याचे तुझे कार्य जे देव व दैत्यांच्या साक्षीनेच घडलेले आहे, त्या अद्‌भुत पराक्रमांची लीला वर्णन करण्यास आमच्याकडे शब्दही अपुरे पडत आहेत. ॥६॥
हे जगदंबे, या सृष्टीची तू माता आहेस. सत्व, तम, रज, हे तिन्ही गुण तुझ्या ठायी प्रसंगवशात् भक्तांच्या कल्याणासाठी पोषण आणि संरक्षणासाठीच असूनही तू त्रिगुणातीत आहेस. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिमूर्तीही तुझ्यापुढे शक्तिहीन होतात, कारण सर्व देवदेवतांसह या त्रिमूर्तींना तू अभय दिले आहेस. तू आदिम आहेस, स्थैर्य आहेस आणि अंत असूनही अनंत शक्तिशाली आहेस. तुझ्या शक्तिबलाची व्याख्या होऊ शकत नाही. ॥७॥
जिच्या उच्चारणाने सर्व देवतागण यज्ञभोग घेऊन संतुष्ट होतात ती स्वाहा देवी तू आहेस. तू फक्त देवदेवतांनाच तृप्ती देतेस असे नव्हे, तर सामान्य जनांच्या स्वर्गवासी पितरांना सुद्धा तुझ्या भक्तांवरील भक्तिप्रेमाने संपूर्ण मुक्‍ती देणारी तू स्वधा आहेस. ॥८॥
मोक्षप्राप्तीसाठी खडतर व्रत, कठोर तप साधन आणि अखंड परिश्रम (अभ्यास) जे ऋषीमुनी करतात त्यांना दोष-रहित करून तपसाधनेत संयमी, निश्‍चयी बनवून त्यांच्या प्रयत्‍नांना सुफल करणारी तू जगज्जननी आहेस. तू परमदेवता परम माता विद्यादात्री अशी पराविद्या तूच आहेस. ॥९॥
तू शब्दस्वरूप आहेस, तशी शब्दातीत आहेस. चारी वेद ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद व सामवेद या वेदांना शब्दाकृती देणारी स्फूर्ती आहेस. या विश्‍वाची उत्पत्ती पालनकार्यासाठी लागणार्‍या कृषी अथवा यंत्र सामुग्री साधनांना देऊन तृप्त केले आहेस आणि संपूर्ण विश्‍वातील जीवांची पीडा हरण करण्यास तत्पर आहेस. ॥१०॥
या जगातील सर्व शास्त्रे, विद्या, विज्ञानासाठी लागणारी प्रज्वलंत मेधा (तर्क) बुद्धी तूच आहेस. या अत्यंत कठीण अशा भवसागरातून दुर्गम वाटेने जाताना वाट सुलभ करून दाखविणारी दुर्गा माता तूच आहेस. तू स्वत:साठी काहीही न ठेवता श्रीविष्णूला मधुकैटभ मारण्यास उद्युक्त करून त्यांच्या मनात आदराने स्थान मिळविले आणि श्रीशंकराची गौरवशालिनी गौरी तूच आहेस. ॥११॥
पूर्णचंद्राच्या मनोहर चांदण्यासारखी तुझी निर्मळ आणि स्वच्छ कांती जी सोन्यापेक्षाही उजळ आहे, त्यातही तुझ्या अत्यंत सुंदर मुखकमलावर विलसणारे किंचित् मधुस्मित, तुझ्या देहाची लावण्यप्रभा पाहून त्या अरसिक महिषासुराने तुझ्यावर मोहून जाण्याऎवजी तुझ्याशी युद्ध करावे, शस्त्राघात करावेत हे अद्‌भुत आणि विपरीत नव्हे काय? ॥१२॥
परन्तु तुझ्या मुखावरील ती लावण्यप्रभा, ते स्मित, राक्षसाशी लढतांना संध्यासमयीच्या सूर्यबिंबाप्रमाणे लाल झाले, तुझ्या कमनीय धनुष्याकृती भिवया ताणल्या जाऊन त्यांनी त्वेष प्रकट केला व त्या आवेशानेच तू शस्त्राघाताने महिषासुरास मारले. अंतकाळि यमदर्शनाने कॊण जिवंत राहू शकेल? ही तुझी दोन्ही रूपे, हे दुर्गे! सौम्य आणि कठोर हेही आश्‍चर्यच आहे. ॥१३॥
हे देवी, तू प्रसन्न झालीस तर परमात्मा-स्वरूप प्रसन्नतेचे फळ मिळते, तुझ्या कोपाने कित्येक कुटूंबे धुळीस मिळतात हे प्रत्यक्ष अनुभवस आले आहे. महिषासुराची विशाल सेना तुझ्या अवकृपेने नष्ट झालेली प्रत्यक्ष देवांनी पाहिलेली आहे. ऋषीमुनींनी त्यांच्या स्तोत्र गायनांनी तुझा तो पराक्रम अमर केला आहे. ॥१४॥
तू ज्यांच्यावर प्रसन्न असतेस ते या देशातील सर्वोच्च सन्मानाला पात्र ठरतात. त्यांना यश, धनादिकांचा लाभ होतो. त्यांची कीर्ती वाढते. तुझे सन्मानित भक्‍त कधीही धर्माचरण सोडून अनाचाराकडे वळत नाहीत. आपल्या कुटुंबियांना, पत्‍नी, पुत्र, सेवक, दास-दासी यांना सर्वार्थांनी संतुष्ट ठेवीत असल्याने आपल्या कर्तव्यदक्षतेने व प्रेमळपणाने सन्मानित होतात. ॥१५॥
तुझ्या आशीर्वादरूप प्रसादाने, हे देवी, हे सर्व भक्त अहोरात्र तुझ्याविषयी श्रद्धा ठेवून कर्माचरण करीत असतात. त्यांची कर्तव्यदक्षता तुझ्याविषयाच्या प्रगाढ विश्‍वासानेच जागृत असते. त्यामुळे जीवनाच्या सायंकाळी त्यांना मृत्यूचे भय न वाटता मोक्षाच्या दाराशी गेल्याचा आनंद होतो. या भूतलावर असे अनेक पुण्यात्मे हा भवसागर पार करून गेले आहेत. कारण तू त्यांना त्यांचे मनोवांछित फल मिळवून दिलेले आहेस. ॥१६॥
हे दुर्गे देवी, तुझे फक्त स्मरण केले तरी या जगातील जीवांची भीती नाहीशी होते. जे निर्भय आहेत त्यांनी स्मरण केले असता त्यांना प्रखर बुद्धी आणि मांगल्य तू प्रदान करतेस. आमची गरीबी, दु:ख आणि संकटे नष्ट करण्यास तुझ्याशिवाय अन्य कोणताही आश्रय नाही कारण तू अतिशय सह्रदय अंत:करणाची व परोपकारी माता आहेस. ॥१७॥
या राक्षसांना मारून तू सर्वांना संकटमुक्त करून सुखी केलेस. ज्या राक्षसांना मारलेस ते एरवी या नरककुंडात पापाचरण करीत जगले असते. त्यांना तुझ्या हातांनी मरण आल्याने स्वर्गाचे दार आपोआप उघडले गेले, व त्यामुळे त्यांचा उद्धार झाला. याच मंगलमय हेतूने तू त्यांच्याशी युद्ध करून भक्त व शत्रू या दोघांचेही कल्याण केलेले आहेस. ॥ १८॥
हे मंगलदायी अंबे, तुला असुरांचा एका फंकरीने निमिषार्धात वध करणे शक्य असताना तू त्यांच्यावर शस्त्र चालविलेस व त्यांनाही रणात झुंजण्याची संधी दिलीस. आपल्या शस्त्राघातांनी शत्रूंना मरण येऊन त्यांना उत्तम लोक मिळावा हा तुझा उदात्त हेतू असल्याने तू फक्त भक्तांचीच नव्हे, तर शत्रूंची व असूरांचीही कल्याणकर्ती झालीस. ॥१९॥
तुझ्या असिलतेच्या धारेच्या तेजाने किंवा तुझ्या हातातील दिव्य व तेजस्वी त्रिशूळाने शत्रूवर आघात करताना, त्या तेजोमय दीप्तीने शत्रूंचे डोळे फुटले नाहीत. कारण त्या शस्त्रांत चंद्राच्या चांदण्याची शीतलता होती आणि ते घाव करणारे तुझे हात आणि तुझ्या मुखावरची आभा मंगल आशीर्वाद देणारी होती. ॥२०॥
जे दुर्गुणी, दुराचारी आहेत, त्यांनी आपले अवगुण सोडावे असे तुझे शील आहे (व्रत आहे). त्याचप्रमाणे तुझे अतुल्य लावण्यमय स्वरूप ध्यानधारणा करूनही न लाभणारे आहे. तुझा पराक्रम, धैर्य तर इतके अवर्णनीय आहे की, माता सरस्वतीही भक्तांना तुझ्या प्रशंसेचे शब्द देऊ शकत नाही. तू ज्या शत्रूंना मारलेस त्यांनी इंद्रादी देवांनाही पराजित करून आपले दास करून बंदी बनवले होते. यामुळे तुझा पराक्रम एकमेवाद्बितीय आहे. ॥२१॥
हे दुर्गे! तुझ्या पराक्रमाला कोणतीही उपमा देणे शक्य नाही. त्याची कोठेही तुलना होऊ शकणार नाही. रूप अजोड आहेच. तुझ्या झुंजीत निष्ठुरता आणि ह्रदयात वात्सल्य तुझ्या कृतीने दिसते. या सर्व गोष्टी एकवटलेल्या, त्रिखंडात शोधूनही सापडत नाहीत. असे गुण फक्त तुझ्या एकटीजवळच आहेत आणि तूच फक्त वरदायिनी मंगला आहेस. ॥२२॥
शत्रूंचा नाश झाल्याने हे तिन्ही लोक तू संकटमुक्त करून तारलेस, शत्रूंचे रणात पारिपत्य करून त्यांचा वध केलास व त्यांना स्वर्गाचे दार उघडून दिलेस, त्याचप्रमाणे त्या दैत्य- लोकांपासून आम्हा तुझ्या भक्तांना, आई ! तू संकटमुक्त करून निर्भय केलेस, या तुझ्या कार्याने आम्ही तुझे कायमचे ऋणी असून तुला वंदन करतो. ॥२३॥
अंबिके, तुझ्या हातातील शूळाने तू आमचे रक्षण कर. तुझ्या हातातील तलवार आमचे रक्षण करो. समरभूमीत तू वाजविलेला घंटानाद व तुझ्या हातातील धनुष्याची प्रत्यंचा आमचे सदैव रक्षण करो. ॥२४॥
हे चंडिके, तू पूर्व, पश्‍चिम, दक्षिण दिशांना आमची संरक्षक बनून रहा आणि आपल्या हातातील शूळ गरगरा फिरवून उत्तर दिशेला संकट, भय, बाधा, पीडा, आक्रमण यापासून रक्षण कर. ॥२५॥
या तिन्ही लोकांत तुझी जी जी सात्त्विक रूपे प्रस्थापित आहेत त्यांच्याद्वारे तू आमचे रक्षण कर. त्याचप्रमाणे तू संग्रामात घोर रूप भक्तांच्या रक्षणासाठीच घेतलेले आहेस. त्यामुळे आमच्या रक्षणाचे कार्य अविरत कर. ॥२६॥
हे अंबिके! तुझ्या हातात तलवार, त्रिशूळ, गदा आदी शस्त्रे, भक्तरक्षणासाठीच असल्याने शोभिवंत दिसतात. आमच्या संकटकाळी त्या शस्त्रांचा उपयोग करून आमच्या बाधा, पीडा नाहीशा करून आमचे रक्षण कर. ॥२७॥
ऋषी म्हणाले, "अशा प्रकारे जगन्माता दुर्गेची देव देवतांनी स्तुती-स्तोत्रे गायिली. तिला दिव्य वाटिकंतील फुले अर्पण केली. चंदनादी सुगंधी द्रव्यांनी तिचे पूजन केले. दिव्य धूप, दीप, निरांजन, समयांनी ओवाळून प्रणाम केला. ॥२९॥
अशा प्रकारे भक्तांनी नम्रतेने पूजिलेली, दिव्य धूप, दीप, आदींणि पूजा करून सत्कारिलेली देवी स्तुतीने प्रसन्न झाली व अत्यंत मधुर आणि वत्सल स्वरांनी (शब्दांनी) देवांना म्हणाली. ॥३०॥
देवी म्हणाली, "हे देवगणांनो! तुमच्यावर मी अतिशय प्रसन्न झाले आहे. तुम्ही काय पाहिजे ते मागावे. मी तुम्हाला वर देईन. " ॥३१॥
देव म्हणाले, "हे भगवती, तू आमच्यासाठी करण्याचे काहीही ठेवलेले नाहीस. आमची संकटे दूर केलीस, आम्हाला निर्भय केलेस. आम्ही तुझे कृतज्ञ आहोत. ॥३३॥३४॥
कारण आमचा जबरदस्त शत्रू महिषासुर याचा तू वध केलास. त्यातच सर्व मिळाले. तरी सुद्धा आमच्यासाठी तुला काही करण्याची, वर देण्याची इच्छा असेल तर हे महेश्वरी आमच्यासाठी इतकेच कर. ॥३५॥
ज्या ज्या वेळी आम्ही तुझे स्मरण करू त्या वेळी हे सुदर्शन, प्रसन्न मुखदर्शन दे; आणि जो मानव तुझ्या स्तुति-स्तोत्रांनी तुझी प्रार्थना करील त्याला संकटमुक्त कर. ॥३६॥
त्यांना धन, संपत्ती, वैभव, समृद्धी, सुशील पत्नी सौख्य, आरोग्य देऊन भक्तांविषयी हे अंबिके! महामाये नेहमी आशीर्वाद व मंगल भावना असू दे." ॥३७॥
ऋषी म्हणाले, "हे राजा ! देवतांनी ज्या वेळी आपल्या आणि जगाच्या कल्याणासाठी भद्रकालीची प्रार्थना केली व तिला प्रसन्न करून संतुष्ट केले, 'तथास्तु' म्हणून देवी अंतर्धान पावली. ॥३८॥३९॥
हे राजा! अशा प्रकारे पूर्व काळी तिन्ही लोकांची हितकर्ती देवी, जी देवांच्याच शरीरापासून उत्पन्न झालेली होती तिची समग्र कथा मी तुम्हाला सांगितली आहे. ॥४०॥
ती पुन्हा गौरी स्वरूपाने देव-देवतांच्या रक्षणासाठीच आणि दुष्ट दैत्यांच्या संहारासाठी प्रकट झाली. आणि तिने शुंभ-निशुंभ असुरांशी रणात लढून त्यांचा वध केला. ॥४१॥
अशी गौरी-स्वरूपाने प्रकट झालेली देवी देवांच्या उपकारासाठी व हितासाठी झुंजली, ते प्रसंग जसजसे घडले तसे मी सांगतो ते तुम्ही लक्षपूर्वक ऎकावे. ॥४२॥
 र्‍हीं ॐ -
असा हा श्री मार्कंडेय-पुराणातील सावर्णिक मन्वंतराचे वेळी देवी माहात्म्यातील शक्रादी (इंद्रादी) देवांनी केलेली स्तुती नावाचा चवथा अध्याय.
श्री भद्रकाली विजयते -

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP