TransLiteral Foundation

स्वात्मसौख्य - प्रस्तावना

श्री स्वात्मसौख्य ग्रंथात कर्म, उपासना आणि ज्ञान या त्रिकांडात्मक विज्ञानांतील मुख्य सर्व गोष्टी सूत्ररुपाने दाखविल्या आहेत


प्रस्तावना

श्री स्वात्मसौख्य हा एक ग्रंथ अद्भुत ग्रंथ आहे.

स्वात्मसौख्य = स्व + आत्मा + सौख्य ' स्व ' म्हणजे ' उ ' आणि ' अ ' यांच्या पलीकडील ' जीव '' कित्येक संस्कृत शब्दांत असा ' स ' न अर्थी असतो. उ० ' स्मृ ' मूळ ' ऋ ' धातू गत्यर्थ आहे. मनुष्याची सारी वाणी उच्चारली जाते ती कंठापासून तो ओठापर्यतच्या भागांत. ' म ' काराचा उच्चार करतांना ओठ मिटले जातात आणि वाणीची समाप्ति होते म्हणून ' म ' शब्द समाप्ति किंवा शेवट यांचा द्योतक आहे. मृत्यूने सर्व हालचाल बंद होते, म्हणून ' मृ ' शब्दाला संस्कृतमध्ये ' मरणे ' असा अर्थ आहे. त्याच्यामागे नञर्थ ' स ' लागला म्हणजे अर्थातच जिवंत होणें, असा अर्थ होतो. ज्याप्रमाणे ' म ' त्याचप्रमाणे ' उ ' हा स्वरहि ओठाच्या साह्यानेच उच्चारला जातो, म्हणून ' अ ' आणि ' उ ' या दोन स्वरांत सारी वाणी आली. तिच्या पलीकडचा जो मूलतत्त्वाचा अंश त्याचें नांव ' स्व '. ' आत्मा ' म्हणजे सर्वत्र व्यापून असलेला याचा कांही अंश सगुणरुपाने प्रगट होतो म्हणून ' स्व ' म्हणजे सगुण असा जीव. ' आत्मा ' म्हणजे त्यालाहि व्यापून असणारा ' परमात्मा ' अथवा ' सदाशिव ' आणि सौख्य म्हणजे शरीर. या ग्रंथांत ' सुख ' हा शब्द ' इंद्रिय ' अशा अर्थाने वापरला आहे. सुख म्हणून जें समजलें जातें तें केवळ स्वसंवेद्य आहे. वाणीने त्याचें वर्णन करावयाचें म्हटलें तर तें त्याच्या परिणामावरुन करावें लागतें. ' ख ' शब्दाचे संस्कृतांत अनेक अर्थ आहेत. त्यांपैकीच ' ख ' म्हणजे ' इंद्रिय ' हाहि आहे. इंद्रियें प्रकृतिस्थ असलीं व आपले व्यापार पूर्ण जोमदारपणाने करीत असलीं तर जो अनुभव येतो, त्यांचे नांव ' सुख '. अशीं प्रकृतिस्थ इंद्रियें ज्यांत आहेत तें शरीर म्हणजे ' सौख्य.' म्हणून जीव अर्थात् त्याचें शरीर पिंड आणि त्या जीवात्म्यापलीकडे जो सदाशिव ' परमात्मा ' त्याचे शरीर ब्रह्मांड. म्हणून, आत्मा, परमात्मा आणि पिंडब्रह्मांडरुप शरीर यांच्याविषयी जें शास्त्र तें ' स्वात्मसौख्य. '

सांप्रदायिक माहिती व पूर्वपीठिका

हा ग्रंथ अनादि कालचा, मूळ संस्कृतांत विशिष्ट सांप्रदायकार्य करण्याकरितांच प्रगट केला जातो. आजपावेतों निरनिराळ्या रीतीने तो १५ वेळा प्रगट झाला व प्रस्तुत प्रसंगी सोळाव्या वेळीं, श्रीसदगुरुनरसिंव्ह सरस्वती या स्वयंभू अवताराने तो करंज ग्रामी नारायणस्वामीस महाराष्ट्र भाषेच्या द्वारें प्रगट केला. म्हणून याची मूळ मंत्रमयता तशीच जागृत आहे. हा मराठींत प्रगट झाला, हें तिचें परमभाग्य. हा संबंध एक मंत्र आहे. मंत्राचें सर्व नियम यास लागू आहेत. याचें पुरश्चरण व हवन होऊं शकते. मंत्राप्रमाणेच हा गुप्त ठेविला पाहिजे. केवळ सांप्रदायिक रीत्याच दिला पाहिजे. बाहेरच्या माणसाने निदान गुरुचरित्राची पारायणें तरी केली असलीं पाहिजे. श्रीमहाराजांच्या ' जयदेवा गुरुमूर्ती । ' या आरतीखेरीज याची सांगता होत नाही. ( कोणत्याहि प्रासादिक ग्रंथ आरतीशिवाय पुरा होत नाहीं, असें शास्त्र आहे. )

परंपरा

' श्रीनरसिंव्ह सरस्वती यति नामीं । नारायणासी बोधिला ॥ ' हे नारायण म्हणजे धुळ्याचेच; पण या जन्मीचें नव्हत. मागचे जन्मीहि त्यांचे नांव नारायणच व पुढील जन्म जो, ते धर्मशास्त्राची अव्यवस्था मोडून शास्त्र व आचार यांची घडी बसवून देण्याकरिता घेणार आहेत, त्या जन्मीहि त्यांचे नांव नारायणच राहणार आहे. त्यांना हा ग्रंथ स्वतः देवाने सांगितला. त्यावर ते कारंजाहून नरसोवाचे वाडीस जाऊन तप करीत राहिले. प्रगट न होतां गुप्त राहण्याचा त्यांचा फार कटाक्ष होता. अतिवृद्ध असतां एका महारोगी सेवकांस दृष्टांत झाला की, त्यांचे पादोदक घ्यावें. त्याप्रमाणे त्याने प्रार्थना केली. परंतु त्यांनी उडवून दिलें. तेवढ्यावर निराश न होतां त्याने प्रयत्न चालूंच ठेवला. वृद्धपणाने हे नदींत न उतरतां, कांठावर बसून कमंडलूने स्नान करीत. एकदा त्याने मुकाट्याने मागे येऊन अंगावरुन आलेल्या ओघळाचें पाणीच प्राशन केलें व सर्व अंगावरुन घेतलें. त्याने त्याचा रोग बरा झाला. पण या रीतीने आता आपण प्रगट होतों, असें पाहून नारायणांनी देह ठेविला. तेच पुनः रुद्र घराण्यांत नारायण नांवाने जन्मास आले.

स्वात्मसुखाचे विशेष

एकंदर मराठी वाड्मयांत ' स्वात्मसौख्य ' हा अपूर्व ग्रंथ आहे. त्याची अपूर्वता अनेक प्रकारांनी लक्षांत येते. अगदी प्रथम जी गोष्ट लक्षांत येते ती ही की, त्याचे दोन अर्ध असून त्यांची रचना एकजात अशी नाही. पहिल्या अर्धात कर्म व उपासना हीं दोन कांडें असून, त्यांची ओवी ही मोठी म्हणजे एकनाथी भागवताची ओवी आहे. याच्या उलट दुसरें अर्ध ज्ञानकांडाचे आहे व त्याची ओवी ज्ञानेश्वरी वळणाची असून त्यांत पुष्कळ ठिकाणी ' माला - अलंकार ' साधला आहे. असा ओव्यांत फरक असल्यामुळेच, हे दोन विभाग वेगळॊए आहेतसें वाटतें, व ते दोन्हीहि एकाच्या हातचे नाहीत की काय, अशी अर्वाचीन संशोधकबुद्धीस शंका येते; परंतु त्यांची रचना श्रीमहाराजांनीच केलेली आहे. ओव्यांत फरक पडण्याचे कारण असें समजते कीं, ज्ञानकांड सांगितले त्या वेळेला कांही कारणामुळे श्रीमहाराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनांत गढून गेले होते. त्यामुळे साहजिकच, ज्ञानेश्वरी वळणाचीच ओवी त्यांच्या तोंडून बाहेर पडली. पंतांच्या ' निरोष्ठरामायणा ' सारखाच तो प्रकार आहे. त्याप्रमाणेच, या ग्रंथामध्ये कृष्णानंद, कृष्णचैतन्य, व्यंकटेश इ० कित्येक शब्द विशेष पारिभाषिक अर्थाने वापरले आहेत. ते अर्थ जर लक्षांत न आले तर पुष्कळ गैरसमज होण्याचा संभव आहे. त्याचप्रमाणे, पंचदशीची रचना ज्याप्रमाणे उपनिषदांतील प्रतीकवाक्यें घेऊन केली आहे, त्याप्रमाणे ज्ञानकांडांतील रचना पुष्कळशी उपनिषदवाक्यें घेऊन केलेली आहे. मधून मधून कांही ओव्यांना स्वतंत्र अशी मंत्रमयताहि असावी. उ० ज्ञानकांडांतील ' त्रिपद गायत्री ब्राह्मणा । चतुष्पाद ओंकार जाणा । प्रत्यगात्मा आणोनि ध्याना । शापमोचन पैं कीजे ॥ ' या ओवींत ब्रह्मास्त्र आहे असें श्रीअण्णासाहेब म्हणत असत एकंदर ५१५ ओव्यांत कर्म, उपासना आणि ज्ञान या त्रिकांडात्मक विज्ञानांतील मुख्य सर्व गोष्टी आपण सूत्ररुपाने दाखविल्या आहेत व प्रत्येक ठिकाणी मूळ मुद्दयाकडे लक्ष दिलें आहे, असें श्रीमहाराजांनी स्वतः च म्हटले आहे. ( अनंत वेद अनंत शास्त्रे । स्वतः बोललों मूळ सूत्रें । ) या तीनहि कांडांच्या रचनेचा एक विशेष असा आहे की, प्रत्येक कांड स्वतः च्या ठिकाणी परिपूर्ण असून साधकास शेवटच्या मुक्कामास नेऊन पोचवितें. अथवा एकाच विशाल साधन - मार्गाच्या त्या पायर्‍याहि होऊं शकतात. तसाच या ग्रंथाचा आणखी एक विशेष आहे आणि तो म्हणजे यामध्ये ' तांत्रिक साधनांचा ' हि समावेश केलेला आहे. तंत्रमार्गाचा अनाधिकारी लोकांनी दुरुपयोग केल्यामुळे महाराष्ट्रांतील सर्व संतांनी, सामान्यतः त्याची निदांच केली आहे. परंतु कांही झालें तरी तो एक सशास्त्र मार्ग आहे. अनाधिकारी लोकांनी केलेल्या दुरुपयोगामुळे त्याची किंमत कांही कमी होऊं शकत नाही, हें लक्षांत घेऊन त्याचीहि योग्य ती संभावना येथे केली आहे. कुळार्णवाचा स्पष्ट उल्लेखच आहे. ' त्या कवळाचे महिमान । कुळार्वण बोले आपण । वदता झाला गौरीरमण । जेणें दूषण न बाधीं ॥ ' ( उ० कां० . ) याच्या एकूण ओव्या ५१५ आहेत. परंतु सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी जशी आपली एक ओवी लिहिलेली आहे तशीच यालाहि, ज्यांना हा मूळ ग्रंथ सांगितला गेला त्या नारायणांनी आपली एक ओवी जोडली आहे. ' पूर्ण झाला करंजग्रामी । विदर्भ देशामाजीं स्वामी । नरसिंव्ह सरस्वती यति नामीं । नारायणासी बोलिला ॥' ( ' बोधिला ' असाहि पाठ आहे. ) म्हणून आज याच्या एकंदर ओव्या ५१६ आहेत.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2009-10-09T23:15:24.3700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

reduced division

  • Cyt.(meiosis) न्यूनकारी विभाजन (अर्धसूत्रण) 
RANDOM WORD

Did you know?

केस काढण्यासंबंधी विशेष माहिती द्यावी.
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.