ब्रम्हस्तुति - चरण २ - भाग ११

कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.

N/Aसर्वात्मबोध गुरु वांचुनि हा कळेना
ब्रम्हात्मता गुरुकृपेविण आकळेना
तूं श्रीगुरु प्रकटसी रविरुप जेव्हां
अज्ञानरुप तम होइल दूर तेव्हां ॥३०१॥
गुरुवर रविरुपें भेटसी ज्यांस जेव्हां
निज - उपनिषदार्था दृष्टि देसील तेव्हां
तव - किरण समूहीं मृत्यु संसार - सिंधू
मृगजळ मग होतो तूं असा दीनबंधू ॥३०२॥
उमजलें गुरु तत्वचि जेधवां अनृत हा भव - सागर तेधवां
उदक - भासक भानु कळे जयीं उदकतें तरणें नलगें तयीं ॥३०३॥
तरणि भेटलिया किरणीं जळें उतरणें तरणें नलगे बळें
गुरु - रवी निज - दृष्टिस भेठि दे मग मृषा न तृषा जळसृष्टि दे ॥३०४॥
जरि मृषा - उदकीं न तृषा जना गुरुकृपेस्तव नासति वासना
जितचि मुक्त विरक्त असे सुधी नतरतां तरले अनृतां बुधी ॥३०५॥
म्हणुनियां वदतो विधि येस्थळीं लटकिया भव - सागरिंच्या जळीं
तरलियाचपरी तरती तयीं गुरु दिवाकर लोचन दे जयीं ॥३०६॥
बळखती जरि आपलि आत्मता तरति तेचि भवां बुधि अच्युता
अनृतसिंधुहि ते तरल्यापरी नतरतां तरती जन हे हरी ॥३०७॥
श्लोकांत हें पहिलिया वदला विधाता
श्लोकद्वयें करुनि साधिल हेंचि आतां
ज्ञानेंचि कां तरति यासि निमित्त येथें
आधीं वदेल मननार्थ अपूर्व जेथें ॥३०८॥
जे आत्मतेकरुनि नेणति आपणाला
त्यांला प्रपंच जड त्याकरितांच झाला
तें आत्मतत्त्व कळतां मग विश्व कैसें
रज्जूंत जन्म मरणें भुजगासि जैसें ॥३०९॥
श्लोकार्थ हाचि परि भाव बरा पहातां
जो यांत तोविनविजेल विचार संतां
कीं दोर जो नकळतांचि भुजंग होतो
तो जाणतां अनृत - सर्प नसोनि जातो ॥३१०॥
रज्जूंत सर्प दिसतो परि रज्जु दृष्टी
आधीं दिसे तरि दिसे वरि सर्प - सृष्टी
मिथ्या भुजंग परि झांकुनि सत्य दोरी
दोरी करुनिच दिसे लटिका विकारी ॥३११॥
आत्माचि रज्जु जड देह भुजंगरुपें
पाहे अहंमति धरुनि निजस्वरुपें
आत्म प्रतीति पहिली मन देह पाहे
नेणोनि देह निजरुपचि मानिताहे ॥३१२॥
मिथ्याच देह परि झांकुनि आत्मयाला
दृष्टीस दृश्यहि तया करितांचि झाला
तैसाचि देह सचराचर विश्व तैसें
याला दिसे अनृत सर्प शरीर जैसें ॥३१३॥
रज्जूस नेणति तयां भय कंप देहीं
मिथ्या - भुजंग करि जाणति त्यांस नाहीं
आत्माचि नेणति निजात्मपणें तयांतें
संसार दुःख भव बंधन रुप होतें ॥३१४॥
रज्जूच सर्प दिसतो परि सर्प नाहीं
जाणे असें तरि तयां भय तें न कांहीं
ते जीत - मुक्त जन येरिति सर्व सृष्टी
ब्रम्हीं नसोनि अवलोकिति ब्रम्ह - दृष्टीं ॥३१५॥
आत्मा असा नकळतां भवबंध झाला
आत्माच ज्यांस कळला मग मोक्ष त्यांला
ज्ञानाविणें इतर मुक्तिस मार्ग कांहीं
वेदस्मृती म्हणति याकरितांच नाहीं ॥३१६॥
मी देह येरिति जडात्मपणांत आत्मा
तोचि स्फुरे परि न हा निज - बोध - वर्त्मा
सर्पाकृती करुनि दोरचि दृश्य हो तो
देखोनि नेणति तयां भय कंप होतो ॥३१७॥
श्लोकांत याचि म्हणऊनि विरंचि युक्ती
कीं आत्मतेकरुनियां कळतांच मुक्ती
आत्मज्ञतेंकरुनि जाणति मोक्ष त्यांला
श्लोकांत त्या पहिलियांतहि बोलियेला ॥३१८॥
सिद्धांत युक्तिबळ देउनि सिद्ध केला
ते आत्मतेकरुनियांच जनास मुक्ती
श्लोकांतही पहिलियांत विरंचिउक्ती ॥३१९॥
भय समुद्रहि हा लटिका तयां कळलि शुद्ध - चिदात्मकता जयां
तरलि याचपरी अनृतां बुधी तरति ते नतरोनि म्हणे विधी ॥३२०॥
असें पूर्वपद्योत जें बोलियेला तया बाध येऊनियां प्राप्त झाला
मृषा बंध तेव्हां मृषा मोक्षहीतो मृषा मानितां नित्यता भंग होतो ॥३२१॥
असत्यत्व बंधास तैसेंचि मोक्षा असें स्थापुनी वारितो पूर्वपक्षा
पुढें श्लोक बोलेल तेथेंचि ऐसें पहा बोलतो भारती कांत कैसें ॥३२२॥
मोक्ष स्वरुप तरि केवळ तत्व त्याला
मिथ्या म्हणाल तरि मोक्ष अनित्य बोला
शंका असी परि तिचा परिहार आतां
श्लोकांत या करिल केविं पहा विधाता ॥३२३॥
मायाच बंध तरि नाशक मोक्ष त्याचा
मायाच जो म्हणति तो म्हणवे न साचा
सत्य स्वयें सहज तें उभय प्रकाशी
सर्प - प्रकाशकर रज्जु न सर्प नाशी ॥३२४॥
बिंबरुपिणि जसीच अविद्या मोक्ष रुपिणिहि येरिति विद्या
बंधकारक अनित्य उपाधी मोक्ष नित्य जगदीश - समाधी ॥३२५॥
नित्यमुक्त जगदीश - उपाधी मोक्षजी बहि तयास्तव साधी
तो असत्य परि नित्य अनादी येरिती विशद बोलति वेदीं ॥३२६॥
बंध मोक्ष उभय प्रतिबिंबी तें असत्य दिसतें निजबिंबीं
त्यांत बंधचि अनित्य अविद्या मोक्ष नित्य परमेश्वर विद्या ॥३२७॥
मृषा बंधही मोक्षही हे तथापी फळ प्राप्ति देहींचिही जीवरुपीं
सुखें आणि दुःखें जसीं हीं असत्यें तथापि प्रतीतीस येती अगत्यें ॥३२८॥
ही प्रतीति नचुके प्रतिबिंबी ऐक्य त्यासहि जया निजबिंबीं
हे असत्यपण त्यांतचि साहे तेंचि पद्मभव बोलत आहे ॥३२९॥
जया बंधही मुक्तिही त्याच अज्ञा म्हणूनीच दोंहींस अज्ञान संज्ञा
जरी आत्मबोधाविणें बंध झाला तया नाशतां मोक्ष तो बोलियेला ॥३३०॥

N/A

References : N/A
Last Updated : July 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP