कथाकल्पतरू - स्तबक १० - अध्याय १४

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

धृतराष्ट्र होवोनि शोकाक्रांत ॥ ह्नणे सांगें पुढील वृत्तांत ॥ यावरी संजय ह्नणे यथार्थ ॥ ऐकें राया ॥१॥

पार्थे सैंधव मारिला ॥ तेणें गांधार गहिंवरला ॥ अश्रुपूर्ण जाहला ॥ अंतरीं विचारित ॥२॥

या पार्थासमान वीर ॥ नाहीं आह्मांत झुंजार ॥ आजी भेदोनि दळभार ॥ केली सत्य प्रतिज्ञा ॥३॥

कर्णादिकं पराभविलें ॥ ऐसा दीनवदन बोले ॥ मग द्रोणापें गमन केलें ॥ सांगावय निजदुःख ॥४॥

ह्नणे पुढें करोनि शिखंडींतें ॥ पार्थे वधिलें भीष्मादिकांतें ॥ तुज देखतां सैन्य निरुतें ॥ मारिलें सात अक्षौहिणी ॥५॥

मज पापिया निमित्त ॥ महावीर जाहले मृत ॥ प्राणपरित्यागें निश्वित ॥ मी तयांचा ऋणी ॥६॥

परि गुरो तूं या पांडवां ॥ एकदांचि मारिसी सर्वा ॥ ऐसें वाटे माझिया जीवा ॥ निश्वयपणें ॥७॥

जंव तूं नाहीं कोपलासी ॥ तंवचि जैत्य असे त्यांसी ॥ स्वामी झणी उपेक्षिसी ॥ पार्थ शिष्य ह्नणवोनी ॥८॥

परि मदर्थी पडले रणीं ॥ मी त्यां पाशीं जाईन झणी ॥ द्रोण ह्नणे वागबाणीं ॥ छळिसी मज ॥९॥

हा श्रीकृष्ण साह्य असतां ॥ पार्थ जिकवेना सर्वथा ॥ जेव्हां मारिलें गंगासुता ॥ तेव्हांचि कळला अर्जुन ॥१०॥

तुवां विदुरोक्त ऐकिलें नाहीं ॥ त्याचें फळ हें प्राप्त पाहीं ॥ तथा द्रौपदी आणिली सही ॥ सभेमध्यें ॥११॥

तुह्मी सर्ववीर असतां ॥ पार्थे मारिलें जयद्रथा ॥ श्रीकृष्णाची सदैव साह्यता ॥ अर्जुनासी ॥१२॥

ऐसें नानापरी द्रोणें ॥ निर्भर्त्सिलें गांधाराकारणें ॥ मग तो कर्णापें जावोनि ह्नणे ॥ युद्ध मनीं धरोनी ॥१३॥

तुह्मी सर्ववीर असतां ॥ पार्थे मारिलें जयद्रथा ॥ आणि द्रोणें रचिला होता ॥ दुर्भेद्य व्यूह ॥१४॥

तोही मोडोनि पांडववीर ॥ आले करीत संहार ॥ तुह्मी असतां समग्र ॥ केला मार्ग मोकळा ॥ ॥१५॥

द्रोणें अभयकार देतां ॥ जयद्रथ वारिला घरीं जातां ॥ भीमें मारिले तुह्मांदेखतां ॥ बंधु माझे ॥१६॥

यावरी कर्ण ह्नणे त्यातें ॥ तूं बोल न लावीं आमुतें ॥ श्रीकृष्ण साह्य पांडवांतें ॥ ह्नणोनि ते अजेय ॥१७॥

तरी द्रोणें तयांप्रती ॥ काय करावी निर्गती ॥ मजसीही बाणघातीं ॥ भीमें केलें जर्जर ॥१८॥

आह्मी घोर संग्राम केला ॥ देवें शेवटीं सैंधव मारविला ॥ आतांही संग्राम करुं भूपाळा ॥ मागुतेनी ॥१९॥

ऐसें बोलतां तियेवेळें ॥ पांडवसैन्य चालोनि आलें ॥ नावें सारोनि युद्ध मांडलें ॥ परस्परांसी ॥२०॥

तंव मरणें हे बुद्धि धरोन ॥ सैन्यीं रिघाला दुर्योधन ॥ अपार बाणवृष्टी करोन ॥ पांडवसैन्य आटिलें ॥२१॥

चक्रवत फिरोनि समरीं ॥ प्रत्येका विंधिलें तीनतीनशरीं ॥ तंव पार्थे धनुष्य झडकरी ॥ छेदिलें दुर्योधनाचें ॥२२॥

थोर हाहाःकार वर्तला ॥ तेव्हां द्रोण धांवत आला ॥ संग्राम करिता जाहला ॥ घोरांदर ॥२३॥

तैं सात्यकी आणि द्रोण ॥ झुंजते जाहले दारुण ॥ तंव उठावला भीमसेन ॥ नकुळ सहदेवेंसी ॥२४॥

पांचाळ मत्स्य कैकेय ॥ धृष्टद्युम्न द्रौपदेय ॥ घटोत्कच विराटादि राय ॥ आले द्रोणावरी ॥२५॥

भालुवादि अन्यपक्षी ॥ शब्द करिती तिये निशीं ॥ आणि वाद्यघोष विशेषीं ॥ होता जाहला ॥२६॥

सर्व वाहनें अश्व करी ॥ भयंकर गर्जती भारी ॥ नावें सारुनि शस्त्रास्त्रीं ॥ झुंजती वीर ॥२७॥

बंबाळपोत दिवटिया ॥ उभयदळीं लाऊनियां ॥ युद्ध वर्तलें उभयसैन्यां ॥ घोरांदर ॥ ॥२८॥

द्वंद्वसंग्राम भविन्नला ॥ थोर धडधडाट जाहला ॥ तंव कलिंग उठावला ॥ भीमावरी ॥२९॥

तैं भीमें बंधुंसहित ॥ मारिले विजय आणि रात ॥ मग कर्णेसीं अद्भुत ॥ संग्राम केला ॥३०॥

इकडे घटोत्कचातें द्रौणी ॥ विंधिता जाहला दशबाणीं ॥ तंव शतधारचक्र तत्क्षणीं ॥ घटोत्कचें प्रेरिलें ॥३१॥

तें छेदिलें द्रोणनंदनें ॥ ह्नणोनि घटोत्कचात्मज त्राणें ॥ अंजनपर्वा तेणें दारुणें ॥ केलें घोरयुद्ध ॥३२॥

तो अश्वत्थामें मारिल ॥ देखोनि घटोत्कच बोलिला ॥ आतां तूं कोठें जासील उगला ॥ पाहें प्रौढी माझी ॥३३॥

मग मायारुप शीघ्र ॥ पर्वत जाहला उच्चतर ॥ तेथोनि वरुषला शस्त्रपूर ॥ बाण पाषाण वृक्षांचे ॥३४॥

तंव अश्वत्थामें काय केलें ॥ तें पर्वतास्त्रें निवारिलें ॥ यावरी घटोत्कचें प्रेरिलें ॥ मारुतास्त्र ॥३५॥

तेंही द्रौणीनें निवारिलें ॥ ऐसें घोर युद्ध जाहलें ॥ दुर्योधनें हें देखोनि मानिलें ॥ थोर भय ॥३६॥

तयासि अश्वत्थामा ह्नणे ॥ राया भय न मानणें ॥ मी पराक्रमें दारुणें ॥ निवारीन यासी ॥३७॥

नंतरें तो घटोत्कचावरी ॥ उठावला महामारी ॥ येरें हदयीं ह्नणोनि शरीं ॥ छेदिलें धनुष्य ॥३८॥

येरें खडतर बाण सोडिला ॥ घटोत्कच विंधोनि पाडिला ॥ तैं स्वरथीं वाहोनि नेला ॥ घटध्वज सात्यकीयें ॥३९॥

असो कौरवीं समस्तीं ॥ केली अश्वत्थाम्याची स्तुती ॥ ऐसा विजयी जाहला राती ॥ द्रोणपुत्र ॥४०॥

इकडे धर्मादि धृष्टद्युम्न ॥ कौरवांसीं झुंजती जाण ॥ धर्मे असंख्य वीर मारुन ॥ त्रिगर्तासी पळविलें ॥४१॥

ऐसें देखोनि द्रोणें शीघ्र ॥ वरुण्य याम्य वायव्यास्त्र ॥ आग्नेय त्वाष्ट्र सावित्र ॥ घातलीं धर्मावरी ॥४२॥

धर्मे प्रेरिली आपुलीं ॥ तेणें तियें निवारिरिली ॥ येरें नानाशस्त्रें टाकिलीं ॥ धर्मे केली वाताहत ॥४३॥

हें गांधारें देखोन ॥ कर्णासि ह्नणे आपण ॥ आतां करीं युद्धकंदन ॥ समय प्राप्त जाहला ॥४४॥

येरु ह्नणे पांडवां वधून ॥ निष्कंटक राज्य करीन ॥ ऐसेही वांचती तरी पाठवीन ॥ मागुतेनी वनवासा ॥४५॥

त्वां भय न धरावें चित्तीं ॥ इंद्रदत्त अमोघशक्ती ॥ असे मजपाशीं निरुती ॥ शत्रुक्षयकारक ॥४६॥

तिये सोडोनि धनंजया ॥ प्रथम पाववीन क्षया ॥ तंव ह्नणे कृपाचार्या ॥ राधेया वृथा जल्पसी ॥४७॥

सहाय असतां कृष्णदेव ॥ ब्रह्मादिकां अजित पांडव ॥ कायसी बापुडी गाव ॥ किंमात्र तूं ॥४८॥

तुझा पराक्रम भला ॥ गोग्रहणीं कळोंआला ॥ तेथें पराभविलें सकळां ॥ येकेचि पार्थे ॥४९॥

भीमार्जुन महावीर ॥ साह्य ज्यांसी सकळ नृपवर ॥ तंव कर्ण ह्नणे साचार ॥ कृपाचार्या ॥५०॥

परि मजपाशीं इंद्रदत्त ॥ शक्ती असे तियें पार्थ ॥ आजि मारीन निभ्रांत ॥ रणामाजी ॥५१॥

ऐसें ह्नणोनि उठावला ॥ दळभार सिद्ध जाहला ॥ परि अंधकार असे पडला ॥ न दिसे काहीं ॥५२॥

गांधार ह्नणे सैनिकां ॥ तुह्मी हातीं धरा दीपिका ॥ तैसेचि पांडवदळीं देखा ॥ पाजळिले दीपक ॥५३॥

लखलखाट शस्त्रांचा ॥ आणि प्रकाश दीपकांचा ॥ ते सैन्यशोभा येकी वाचा ॥ न वर्णवे ॥५४॥

प्रतिरथीं दीप दहादहा ॥ गजीं सात शोभती पहा ॥ परस्परें मांडिलें महा ॥ द्वंद्वयुद्ध ॥५५॥

घोरांदर युद्ध जाहलें ॥ अशुद्धांचे पुर चालिले ॥ भीमदुर्योधन झुंजले ॥ अतिनिकरानें ॥५६॥

तेव्हां सहदेवासि कर्णे ॥ पराजित करुनि ह्नणे ॥ बाळा तुझें मजकारणें ॥ काम नाहीं ॥५७॥

मी मारितों आजि तूतें ॥ परि कुंतीनें वर्जिलें मातें ॥ येरें खेद धरोनि चित्तें ॥ मुरडला मग ॥५८॥

तंव गांधार नानापरी ॥ स्ववीरांची स्तुती करी ॥ मग ते पांडव दळावरी ॥ शरधारीं वरुषले ॥५९॥

त्यांहीं पांडवसैन्य पीडिलें ॥ देखोनि कृष्ण पार्था बोले ॥ हे सर्व येकवटले ॥ सैन्यक्षय करितील ॥६०॥

तरी चालपां वेगवंत ॥ मग सात्यकी आणि पार्थ ॥ यांहीं द्रोणकर्णा बहुत ॥ केलें कासाविशी ॥६१॥

यावरी पांडवांचें दळ ॥ कर्णद्रोणीं पळविलें सकळ ॥ तंव धर्म होवोनि व्याकुळ ॥ सांगे दुःख अर्जुनासी ॥६२॥

हें ऐकोनि हषीकेशी ॥ आला घटोत्कचापाशीं ॥ युद्ध करीं ह्नणोनि तयासी ॥ आज्ञापिलें ॥६३॥

ह्नणे गा घटोत्कचा पाहें ॥ आजि तुझा समय आहे ॥ हा कर्ण शांत न होये ॥ तुजवांचोनी ॥६४॥

मग घटोत्कच उठावला ॥ कर्णावरी चालिला ॥ गांधारें दुःशासन धाडिला ॥ कर्णरक्षणार्थ ॥६५॥

इतुक्यांत जटासुराचा पुत्र ॥ अलंबुष नामें निशाचर ॥ तो दुर्योधना ह्नणे शीघ्र ॥ मारीन मी या घटोत्कचा ॥६६॥

तंव धृतराष्ट्र पुसे वाचे ॥ स्वरुप तया घटोत्कचाचें ॥ संजया मज सांगें साचें ॥ विस्तारोन ॥६७॥

येरु ह्नणे तो महाबळी ॥ ऊर्ध्वरोमा दाढी निळी ॥ मोठी हनुवटी निहाळी ॥ लोहिताक्ष ॥६८॥

ऊर्ध्वभ्रुकुटी ताम्रवदन ॥ कराल दाढा दंत तीक्ष्ण ॥ कपाळीं शेंदुर चर्चित जाण ॥ दीर्घनासा ॥६९॥

नीलांग ग्रीवा लोहित ॥ महाबाहु कज्जलपर्वत ॥ भयंकर रुप दिसत ॥ महाकाया ॥७०॥

महाशीर्षा स्थूळास्थी ॥ नाना आभरणें शोभती ॥ नानायुध मंडित हस्तीं ॥ महावीर ॥७१॥

सुवर्णरथीं आरुढला ॥ अनंतायुधीं युक्त जाहला ॥ कर्णासवें झुंजों लागला ॥ माया रचोनी ॥७२॥

पर्वत शिळा तरुवर ॥ वर्षौ लागला अपार ॥ वायु वारुण आग्नेय्यास्त्र ॥ ब्रह्मास्त्रादी प्रयुंजी ॥७३॥

तीं घटोत्कचाचीं अस्त्रें ॥ कर्णे निवारिलीं समग्रें ॥ तंव अलायुधनिशाचरें ॥ प्रार्थिलें दुर्योधनासी ॥७४॥

परमावेशें बोलिलें तेणें ॥ माझे सोइरे भीमसेनें ॥ हिडिंब बक किमीर येणें ॥ मारिले बहुत ॥७५॥

तरी मज द्यावी आज्ञा ॥ मी मारीन भीमसेना ॥ तुह्मी सुखें दुर्योधना ॥ पहावें आजी ॥७६॥

तो युद्धासी प्राप्त जाहला ॥ आधीं घटोत्कचासीं झुंजला ॥ मग भीमावरी चलिला ॥ येरें विंधिला बाणवृष्टीं ॥ ॥७७॥

तेणें बाणीं वृष्टि निवारिली ॥ तंव भीमें गदा प्रेरिली ॥ तेही पराभूत केली ॥ राक्षसें देखा ॥७८॥

ह्नणोनि परिघ मुसळें मुद्नर ॥ भीमें प्रेरिले अपार ॥ तेही अलायुधें समग्र ॥ निवारिले ॥७९॥

मग मुष्टियुद्धा भिडिन्नले ॥ भीमें तयाशिथिल केलें ॥ ऐसें रात्रियुद्ध जाहलें ॥ अलायुधासीं ॥८०॥

अलायुध सरकटला ॥ तेणें भीम व्याकुळ केला ॥ तंव श्रीकृष्ण बोलता जाहला ॥ घटोत्कचासी ॥८१॥

तुज आणि सैन्यादेखतां ॥ व्याकुळ केलें वायुसुता ॥ तरी सांडोनि सूर्यसुता ॥ जाई राक्षसावरी ॥८२॥

मग घटोत्कचें गदाघातीं ॥ तया मूर्छित पाडिलें क्षिती ॥ परि सावधानें शीघ्रगती ॥ अलायुधें रचिली माया ॥८३॥

रुधिर अश्म तये वेळां ॥ नभींहूनि वर्षता जाहला ॥ घटोत्कचही निवारूं लागला ॥ मायेंचि करोनी ॥८४॥

मग परस्पर परिघशूळें ॥ गदामुद्नर आणि मुसळें ॥ पिनाक तोमर करवाळें ॥ झुंजिन्नले ॥८५॥

वृक्ष शिळा पर्वताग्रें ॥ बाहुबळें झुंजती निकरें ॥ महाशब्दयुक्त रुधिरें ॥ जाहली वृष्टी ॥८६॥

मग सक्रोधें घटोत्कचें ॥ शिर पाडिलें अलंबुषाचें ॥ गर्जोनियां सिंहनादाचें ॥ केलें वादन ॥८७॥

पांडव पांचाळ आनंदले ॥ वाद्यनादें गर्जिन्नले ॥ ऐसें बकबंधूसि मारिलें ॥ तिये राती ॥८८॥

येरीकडे झुंजोनि कर्ण ॥ शिखंडी सात्यकी धृष्टद्युम्न ॥ बाणीं आच्छिन्न करोन ॥ पळविले देखा ॥८९॥

आणि कित्येक पांडवसैन्य ॥ देह ध्वज छिन्न करोन ॥ हय रथ सारथी मारोन ॥ पळविता जाहला ॥९०॥

हें घटध्वजें देखोन ॥ अर्धचंद्राकर बाण ॥ वराहपिच्छ सुवर्णवर्ण ॥ प्रेरिले असंख्यात ॥९१॥

आणि आपण अदृश्य जाहला ॥ कौरवां भयकंप वर्तला ॥ ह्नणती हा कूटयुद्धीं कर्णाला ॥ मारील समरीं ॥९२॥

मग कर्णे बाण प्रेरिले ॥ त्याहीं आकाशमंडळ व्यापिलें ॥ तेसमयीं नाही देखिलें ॥ कोणीं कवणा ॥९३॥

तेव्हां बाण शक्ति प्रास ॥ मुसळें तोमर फरश ॥ खङ्गें गदा आणि पट्टीश ॥ परिघ शिळाचक्रें ॥९४॥

ईहीं घटोत्कच वरुषला ॥ तेणें कर्ण विकळ जाहला ॥ कौरवदळा पळ सुटला ॥ हाहाःकारें ॥९५॥

कितीयेक मृत्यु पावले ॥ कितीयेक बोलते जाहले ॥ कीं पांडवां साह्य आले ॥ स्वर्गस्थ देव ॥९६॥

अरे हा देवीं वर्षाव केला ॥ ऐसा महा आवर्त जाहला ॥ तिये वृष्टीमध्यें राहिला ॥ एकलाचि कर्ण ॥९७॥

मग बाल्हीकादि कौरववीर ॥ शस्त्ररथरहित समग्र ॥ कर्णाप्रति काय उत्तर ॥ बोलते जाहले ॥९८॥

अगा कर्णा अवधारीं ॥ इंद्रशक्ती असे तवकरीं ॥ ती सोडानि यासी मारीं ॥ वांचवीं प्राण आमुचे ॥९९॥

हें ऐकोनि कर्ण ते क्षणीं ॥ सैन्य आक्रंदतां देखोनि ॥ शक्ति सोडावी ऐसें मनीं ॥ धरिता जाहला ॥१००॥

मग ते शक्ती दैदीप्यमान ॥ काढोनि विद्युल्लतेसमान ॥ जैसी यमाची बहीण ॥ प्रेरिली ते ॥१॥

तियां हदयीं भेदला ॥ घटोत्कचें शब्द केला ॥ तेणें भूगोल कांपिन्नला ॥ त्यजितां प्राण ॥२॥

कौरवीं नानावाद्यें लाविलीं ॥ कर्णाची स्तुति पूजा केली ॥ मग दुर्योधन कर्णाजवळी ॥ आला हरुषें ॥३॥

असो घटोत्कचा पाडिलें ॥ पांडव शोकाक्रांत जाहले ॥ परि कृष्णें हर्षोनि केलें ॥ सिंहनादा ॥४॥

आणि अर्जुनाची पाठी ॥ वारंवार कृष्ण थापटी ॥ विपरीतार्थ देखोनि किरीटी ॥ पुसता जाहला ॥५॥

ह्नणे आह्मी सर्व सैनिक ॥ पावलों असों महादुःख ॥ आणि तुज जाहला हरिख ॥ कोणें निमित्तें ॥६॥

ऐकोनि यादवराय ह्नणत ॥ पार्था घटोत्कचा निमित्त ॥ शक्ति वेंचली हें बहुत ॥ बरवें जाहलें ॥७॥

कर्ण शक्तियुक्त असता ॥ तरी अजिंक्य देवां समस्तां ॥ शक्ति तुजवरी टाकिता ॥ अथवा मजवरी ॥८॥

तेणें निश्वयें संहार होता ॥ ह्नणोनि तुज निमित्त पार्था ॥ याचीं कवचकुंडलें सुरनाथा ॥ करवीं हरिलीं ॥९॥

तुमचिया हितालागोनी ॥ म्यां घटोत्कच प्रेरिला रणीं ॥ शक्तिरहित केला जाणीं ॥ कर्णवीर ॥११०॥

घटोत्कच कर्णासि मारील ॥ तरी पांडवां लाभचि होईल ॥ कीं कर्णाची वासवी वेंचेल ॥ तरीही भलें ॥११॥

हें म्यां मनीं विचारिलें ॥ ह्नणोनि त्यासी युद्ध लाविलें ॥ ऐसें देवें गुह्य कथिलें ॥ पार्थालागीं ॥१२॥

संजय ह्नणे धृतराष्ट्रासी ॥ तो सर्वातरात्मा हषीकेशी ॥ संकटांपासोनि भक्तांसी ॥ रक्षीतसे सर्वदा ॥१३॥

असो ऐसा घटोत्कच मेला ॥ कौरवांसी हर्ष जाहला ॥ इकडे धर्म कृष्णासि बोलिला ॥ दैन्यभूत ॥१४॥

मग तयासि ह्नणे हरी ॥ राया उठें युद्ध करीं ॥ तूं झुंजसी ना तरी ॥ नाहीं जयो आपणां ॥१५॥

धर्म ह्नणे गा हषीकेशी ॥ हा घटोत्कच आह्मासी ॥ कामा आला होता वनासी ॥ बहुतांपरी ॥१६॥

गंधमादनीं पांचाळी ॥ मार्ग क्रमितां असे भागली ॥ ते पाठकुळीये घेतली ॥ घटोत्कचें येणें ॥१७॥

याच्या ठायीं तरी बहुती ॥ मज बंधुपरीस प्रीती ॥ अरिदळ मेळविलें प्रस्तुती ॥ धूळीस जेणें ॥१८॥

यातें मारुनि कर्णादिक ॥ पाहें कैसे पावले सुख ॥ आणि सौभद्रही विशेष ॥ पडिला रणीं ॥१९॥

तरी कर्ण आणि गुरु ॥ पहिले आतां दोनी मारुं ॥ मग मारवेल गांधारु ॥ क्षणामाजी ॥१२०॥

चला समस्त आपण ॥ ह्नणोनि केलें शंखवादन ॥ निघाला धनुष्यभाता घेवोन ॥ रथारुढ ॥२१॥

तैं एकसहस्त्र रथ ॥ वारण सहस्त्र मदोन्मत्त ॥ वारु सहस्त्र पांचयुक्त ॥ धर्मासवें निघाले ॥२२॥

तंव पार्थासि ह्नणे अनंत ॥ धर्म सक्रोध असे जात ॥ तरी आपणही त्वरित ॥ चला जाऊं ॥२३॥

तंव तेसमयीं व्यास तेथें ॥ येवोनि ह्नणती धर्मातें ॥ कीं शक्ति पार्थवघातें ॥ कर्णे होती रक्षिली ॥२४॥

ह्नणोनि आजवरी पार्था ॥ देव त्यापुढें न होता दवडिता ॥ आतां जाहली निष्कंटकता ॥ सर्वत्र तुज ॥२५॥

यतो धर्मस्ततो जय । ऐसें बोलोनि पाराशर्य ॥ अदृष्ट होतांचि धर्मराय ॥ संतोषला मानसीं ॥२६॥

वैशंपायन ह्नणती भारता ॥ येथें पुराणांतरप्रणीता ॥ येकी असे आडकथा ॥ ते अपूर्वता ऐकें ॥२७॥

घटोत्कचासीं झुंज मांडलें ॥ तंव कृष्णें काय केलें ॥ निर्वाण पांचबाण देखिले ॥ कर्णाजवळी ॥२८॥

तैं दूत धाडोनि हस्तनापुरीं ॥ कुंती आणविली झडकरी ॥ ते धर्माचिये शिबिरीं ॥ रक्षिली देवें ॥२९॥

जेव्हा घटोत्कच निमाला ॥ तेव्हां कौरवां हर्ष जाहला ॥ आणि दळभार मुरडला ॥ स्वस्थानकीं ॥१३०॥

धर्म दुःखें गेला शिबिरीं ॥ मग विचार करी श्रीहरी ॥ कीं कर्णे घटध्वजावरी ॥ सोडिली शक्ती वासवी ॥३१॥

आतां बाण उरले असती ॥ तरी मागों पाठवूं कुंती ॥ ते आलिया आपुले हातीं ॥ नाहीं भीती पार्थासी ॥३२॥

असो झडकरी जावोनि हरी ॥ ह्नणे कुंतिये अवधारीं ॥ पांचबाण कर्णाकरीं ॥ असती जाण ॥३३॥

त्यांहीं पार्थाचा घेईल प्राण ॥ परि मग मी कर्णासि मारीन ॥ एवं तुज दोनी नंदन ॥ अंतरतील ॥३४॥

तरी ते बाण मागोनि आणीं ॥ येरी ह्नणे गा चक्रपाणी ॥ मज पुत्र सारखे दोनी ॥ हे निंद्य करणी न करवे ॥३५॥

यावरी कृष्ण ह्नणे माते ॥ तूं शिकविलें करीं निरुतें ॥ सांगेन एतदर्थी तूतें ॥ कथा येकी ॥३६॥

कोणीयेक पारधी होता ॥ तो दोघां पुत्रांसमवेता ॥ गेला मृगयेसि वनप्रांत ॥ तंव न मिळेचि पारधी ॥३७॥

असो नदीतीरीं तरुवर ॥ एक होता उंचतर ॥ तयाखाली ठेवोनि पुत्र ॥ पारधी गेला उदकपाना ॥३८॥

उदक घेवोनि वरुतें पाहे ॥ तंव मोहाळ लागलें आहे ॥ आणि दोघेही पुत्र लांहें ॥ वेंधले त्यावरी ॥३९॥

वडील पुढें धाकुटा मागें ॥ दोघे मोहाळ पावले वेगें ॥ मधु भक्षिती अवघें ॥ खादाडपणें ॥१४०॥

तंव धाकुट्याचे पायांखालीं ॥ वृक्षडाहळी मोडली ॥ तो वळंधला तत्काळीं ॥ चरणीं वडिलाचे ॥४१॥

वडिलें सबळ दोहीं हाती ॥ डाहळी धरिली असे वरुती ॥ ऐसे दोघे ओळकंबती ॥ परि न सोडिती आधार ॥४२॥

तत्समयी वडील पित्यासि बोले ॥ माझे हात ओळकंबले ॥ क्षणांती दोघेही पडूं खालें ॥ डोहाआंत ॥४३॥

तेथें मगर सुसरें असती ॥ तीं उभयांतेंही भक्षिती ॥ तुझिये हातोनियां जाती ॥ दोघे पुत्र ॥४४॥

तरी तुवां संधान करावें ॥ यासी हात तोडोनि पाडावें ॥ मातें जीवें वांचवावें ॥ उपाय आन नसेची ॥४५॥

तें सत्य भासलें पारधिया ॥ मग संधान साधोनियां ॥ पाडिला कर छेदोनियां ॥ धाकुटा पुत्र ॥४६॥

यत्नें वडील उतरविला ॥ येके पुत्रेंसीं घरा गेला ॥ येक मगरानें गिळिल ॥ पडतां जळीं ॥४७॥

यास्तव माते कुंतिये ॥ तूं मनीं विचारुनि पाहें ॥ मग येरी चालिली लाहें ॥ कर्णशिबिरीं ॥४८॥

ते कर्णे येतां देखोनी ॥ धांवोनि लागला चरणीं ॥ विनवीतसे पूजा करोनी ॥ कां आलीस येधवां ॥४९॥

येरी ह्नणे पुत्रा अवधारीं ॥ मी मागेन तें देई झडकरी ॥ येरु ह्नणे अर्थे शरीरीं ॥ न वंचीं माते ॥१५०॥

कुंती ह्नणे ऐक वचन ॥ देई निर्वाणींचे पंचबाण ॥ येरें काढोनि भात्यांतून ॥ दीधले करीं तात्काळ ॥५१॥

ह्नणे माते मज हें कळलें ॥ तुज गोविंदें पाठविलें ॥ तेणें पार्थासि वांचविलें ॥ करोनि उपाव ॥५२॥

आतं पार्थासि निर्वाणीं ॥ मृत्यु नाहीं कोणाचेनी ॥ ह्नणोनि लागला चरणीं ॥ बाण घेवोनि आली येरी ॥५३॥

ते दीधले श्रीकृष्णकरीं ॥ देवो आनंदला अंतरीं ॥ मग धर्मादि सहपरिवारीं ॥ झुंजो रात्रीं चालिले ॥५४॥

हे पुराणांतर कथा ॥ परि नमिळे संस्कृतभारता ॥ पुढील ऐकावी व्यवस्था ॥ संजयो ह्नणे ॥५५॥

घटोत्कच कर्णे मारिला ॥ धर्म समभारें चालिला ॥ तो बोलता जाहला ॥ धृष्टद्युम्ना शिखंडीसी ॥ ॥५६॥

तूं अग्निसंभूत शस्त्रसहित ॥ जालासि द्रोणगुरुवधार्थ ॥ तरी समय असे प्राप्त ॥ दावीं पुरुषार्थ आपुला ॥५७॥

यावरी शिखंडी दौर्मुखी ॥ नकुळ विराट द्रुपद सात्यकी ॥ कैकेय्य पांडवीं सकळिकीं ॥ केली चाली द्रोणावरी ॥५८॥

अवघे कौरव मिळाले ॥ गांधारें मनीं विचारिलें ॥ कीं द्रोणा रक्षोनि वहिलें ॥ मारावें पांडवांसी ॥५९॥

ह्नणोनि द्रोणापें आला शीघ्र ॥ तंव ते श्रमले सर्ववीर ॥ निद्रपीडित समग्र ॥ जाहले रात्रीं ॥१६०॥

काहींचि तयां परस्परें ॥ निद्राभरास्तव न स्मरे ॥ तंव बीभत्सु शब्दें थोरे ॥ सांगे हाका मारोनी ॥६१॥

अरे वीरहो समस्त ॥ तुह्मी असा निद्राभूत ॥ अंधकार रजें आवृत ॥ जालेति असा ॥६२॥

तरी उदेजतां अमृतकरु ॥ मग समस्त युद्ध करुं ॥ ऐसें सांगोनि दळभारु ॥ परतविला आपुला ॥६३॥

मग तें दळ विश्राम पावलें ॥ युद्धआस्थानींचि निजेलें ॥ तंव उदयाचळीं आलें ॥ चंद्रबिंब ॥६४॥

क्षणयेक विश्रामोनी ॥ वीर सन्नद्ध होवोनी ॥ मागुते उठले समरंगणीं ॥ आयणीसी ॥६५॥

तैं द्रोणासि स्वभावीं ॥ गांधार हर्षतेज उपजवी ॥ अहो आचार्य माझे जीवीं ॥ ऐसें कळत असे ॥६६॥

तुह्मी संग्रामीं सम्यक ॥ झुंजाल अंतःकरणपूर्वक ॥ तरी साउमा प्रत्यक्ष अंतक ॥ उभा राहूं शकेना ॥६७॥

तुह्मां जवळी नानाविध ॥ शस्त्रास्त्रें असती अगाध ॥ मी तरी असें भाग्यमंद ॥ शिष्य तुमच ॥६८॥

ऐसा द्रोण कोपविला ॥ मग तो गांधारासि बोलिल ॥ ह्नणे मी तरी अस्त्रकळा ॥ जाणें सकळ ॥६९॥

हे अन्यवीर समस्त ॥ अस्त्रें नेणती यथार्थ ॥ ते मजसी मारणें उचित ॥ नव्हे जाण ॥१७०॥

तरीही गा तुजनिमित्त ॥ मी हे वीर मारीन समस्त ॥ परि हा अजिंक्य असे पार्थ ॥ देवांदानवां ॥७१॥

जेणें खांडववन जाळिलें ॥ सुरवर गंधर्व जिंकिले ॥ यक्ष नाग आकळिले ॥ ऐसा जगविख्यत ॥७२॥

ऐसा द्रोण नानापरी ॥ पार्थाचा पराक्रम उच्चारी ॥ तंव गांधार या उपरी ॥ बोलता जाहला ॥७३॥

मी कर्ण दुःशासन शकुनी ॥ पार्थासि धरुं समरंगणीं ॥ तंव द्रोण हास्य करोनी ॥ बोलता जाहला ॥७४॥

अरे गांडीवधन्वा अर्जुन ॥ त्यासी संग्रामा न टिके कोण ॥ तो ह्नणतां जीवंत धरुन ॥ आणूं आह्मीं ॥७५॥

तुह्मी कुबुद्धी समग्र ॥ शेवटीं पावाल संहार ॥ पांडवां छळिलें वारंवार ॥ त्याचें फळ हें असे ॥७६॥

असो आतां तुह्मीच त्यांसी ॥ युद्ध करावें नेमें सीं ॥ मग द्विधा करोनि सैन्यासी ॥ आरंभिलें द्वंद्वयुद्ध ॥७७॥

ऐसी चतुर्थदिनरात्रीं ॥ आरंभिलीसे झुंजारी ॥ कथा ऐकावी पुढारीं ॥ दिन प्राप्त पांचवा ॥७८॥

संजयें धृतराष्ट्रा सांगीतलें ॥ तेंचि वैशंपायनें कथिलें ॥ श्रोती संक्षेपें आयकिलें ॥ जन्मेजयादिकीं ॥७९॥

आतां पंचमदिनकथा ॥ वैशंपायन सांगेल भारतां ॥ ते ऐकावी अपूर्वता ॥ ह्नणे मधुकरकवी ॥१८०॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ दशमस्तबक मनोहरु ॥ घटोत्कचनिधनप्रकरु ॥ चतुर्दशाध्यायीं कथियेला ॥१८१॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP