कथाकल्पतरू - स्तबक १० - अध्याय १२

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

ऐकोनि षोडशराजआख्यान ॥ मुनीसि पुसे नृपनंदन ॥ पूर्ण जालिया दिवस तीन ॥ पुढें काय वर्तलें ॥१॥

मुनि ह्नणे दिनांतीं शिबिरीं येतां ॥ पार्थ कृष्णासी जाहला बोलता ॥ अगा तळमळ बहुत चित्ता ॥ वाटे मज ॥ ॥२॥

उच्चाट सुटला मानसा ॥ तरी धर्म असेल कैसा ॥ सुखी कीं दुःखीं सर्वेशा ॥ कळत नाहीं ॥३॥

आजि देखोनियां मातें ॥ योद्धे पाहती खालते ॥ नित्य साउमे येती मातें ॥ ते कां नयेती ॥४॥

पांचाळ आणि सौभद्र ॥ हे दिसत नाहीं वीर ॥ ऐशा वार्ता करीत शीघ्र ॥ आले शिबिराप्रती ॥५॥

तंव दुःखी जाहले सर्वही ॥ अभिमन्यु देखिला नाहीं ॥ पार्थ ह्नणे तत्समयीं ॥ कांरे अभिमन्यु नयेची ॥६॥

परम दुःखें येक ह्नणत ॥ जी तो सांपडला व्यूहांत ॥ हें ऐकतांचि मूर्छागत ॥ पार्थ जाहला ॥७॥

मग सांवरुनि ह्नणे सहसा ॥ तो महावीर सिंह जैसा ॥ उपेंद्रसदृश असोनि कैसा ॥ पडला समरीं ॥८॥

थोर करुणा आळवोनी ॥ वर्णिता जाहला गुणलक्षणीं ॥ ह्नणे सुकुमार बाळ नयनीं ॥ मागुता कैं देखेन ॥९॥

तयानिमित्त त्रैलोक्यासी ॥ मी संहारितों आवेशीं ॥ मग देवें धरुनि पोटासी ॥ जाहला प्रबोधिता ॥१०॥

पार्था हा मार्ग क्षत्रियासी ॥ ऐसाचि असे परियेसीं ॥ युद्धीं मरण शूरासी ॥ उचित होय ॥११॥

ऐसा नानापरी उपदेशिला ॥ तंव तो बांधवांसि बोलिला ॥ कीं बालक कैसा दवडिला ॥ संग्रामासी ॥१२॥

मीचि मूर्ख निश्वयेंसीं ॥ जै तो ठेविला तुह्मांपाशीं ॥ ऐसें बोलिला ॥ कीं बालक कैसा दवडिल ॥ संग्रामासी ॥१२॥

परि धर्मकृष्णावेगळे ॥ त्यासी कोणी नाहीं बोलिले ॥ धर्मे तयांसि ह्नणितलें ॥ ऐकें अर्जुना ॥१४॥

तूं समसप्तकांवरी गेलासी ॥ इकडे मातें धरावयासी ॥ यत्न केला परियेसीं ॥ द्रोणाचार्ये ॥१५॥

गुरुनें चक्रव्यूहा रचिलें ॥ म्यां सौभद्रासि ह्नणितलें ॥ कीं तूं व्यूह भेदीं बळें ॥ आह्मीं साह्य होतों तुज ॥१६॥

मग तेणें तो व्यूह फोडिला ॥ मध्यें जावोनि झुंजिन्नला ॥ आह्मीं जावें तंव त्या वेळां ॥ द्वार रोधिलें जयद्रथें ॥१७॥

आह्मां बाहेरचि कोंडिलें ॥ युद्ध घोर प्रवर्तलें ॥ भीतरीं पुत्रासि मारिलें ॥ साहीजणीं आइक ॥१८॥

अश्वत्थामा कृप द्रोण ॥ शल्य कृतवर्मा कर्ण ॥ ऐसें ऐकोनि वर्तमान ॥ पार्थ मनीं खवळला ॥१९॥

मग चोळोनि हातपाय ॥ अलोट प्रतिज्ञा करिता होय ॥ उद्यां पुसेन जयद्रथठाय ॥ संध्याकाळा आरुता ॥२०॥

जरी न मारीं सूर्य मावळतां ॥ तरी हीं पापें माझे माथां ॥ ह्नणोनि उच्चार करिता ॥ जाहला पार्थ ॥२१॥

जे मातापितरां वधिती ॥ पंचमहापापें आचरती ॥ विश्वासघात करिती ॥ गोघात मात्रागमन ॥२२॥

वृद्धांची अवज्ञा करिती ॥ ब्राह्मणा निंदिती वधिती ॥ वेदशास्त्रमार्ग खंडिती ॥ हरिती वृत्तिदान ॥२३॥

अथवा आत्मघात करिती ॥ ब्रह्मद्रोहें साधूंसि छळिती ॥ तीं सर्व पापें शिरीं बैसती ॥ करीन अग्निप्रवेश ॥ ॥२४॥

ह्नणोनि गांडीव टाकिलें मेदिनीं ॥ तेथ उठली सिंहध्वनी ॥ तेणें कंप जाहला त्रिभुवनीं ॥ ऐसी पार्थप्रतिज्ञा ॥ ॥२५॥

तो शब्द आणि वृत्तांत ॥ जासुदीं कथिला समस्त ॥ तंव कौरव आणि जयद्रथ ॥ महात्रास पावले ॥२६॥

जयद्रथें प्रार्थिला दुर्योधन ॥ ह्नणे मज रक्षिता नाहीं कोण ॥ तरी मी पार्थभयेंकरुन ॥ पळोनि जातों ॥२७॥

याउपरी दुर्योधन ह्नणे ॥ आह्मीं रक्षूं तुजकारणें ॥ मिळोनि सकळ रावराणे ॥ सैन्येंसहित ॥२८॥

आमुचे वीर बळगहन ॥ तुज रक्षितील निश्वयेंकरुन ॥ काइसें बापुडें अर्जुन ॥ मग गेले द्रोणाजवळी ॥२९॥

सर्व तयासि निवेदिलें ॥ तेणेंहि तैसेंचि आश्वासिलें ॥ इकडे श्रीकृष्णें ह्नणितलें ॥ अर्जुनासी ॥३०॥

तुवां प्रतिज्ञा केली पार्था ॥ हे दुर्घट वाटते सर्वथा ॥ जे सहावीर पुढें असतां ॥ केविं मारवे जयद्रथ ॥३१॥

येरु ह्नणे सकळां मारुनी ॥ जयद्रथा लोळवीन धरणीं ॥ आश्वर्य लाहिजे सुरगणीं ॥ तरीच दास श्रीकृष्णाचा ॥३२॥

तूं सारथी जगज्जीवन ॥ आणि मी गांडीवधन्वा अर्जुन ॥ असतां संदेह तो कवण ॥ मारावया जयद्रथा ॥३३॥

इकडे कौरवदळाभीतरीं ॥ अपशकुन जाहले भारी ॥ भालुवा बोभाती चौफेरी ॥ वन्हिवदना ॥३४॥

असो सुभद्रेनें तये वेळां ॥ पुत्रवृत्तांत आयकिला ॥ परमदुःखें विलाप केला ॥ ते आश्वासिली श्रीकृष्णें ॥३५॥

चिंता वर्तली सकळ वीरां ॥ रात्रीं न करितीचि निद्रा ॥ ह्नणती जयद्रथा शूरा ॥ पार्थे कैसें मारिजेल ॥३६॥

जरी त्याचा वध न होय ॥ तरी अग्निप्रवेशेल धनंजय ॥ मग केविं घडे धर्मकार्य ॥ ऐसें मनीं चिंतिती ॥३७॥

कृष्णें दारुक बोलाविला ॥ त्यापें रथ सज्ज करविला ॥ शस्त्रास्त्रें मंडित शोभला ॥ लाविला ध्वज ॥३८॥

शोकें प्रतप्त अर्जुन ॥ जाणोनि तया ह्नणे कृष्ण ॥ मज असतां चिंताशिण ॥ काय सा गा ॥३९॥

मी ऐसाचि करीन उपाय ॥ जेणें जयद्रथा मृत्यु होय ॥ परि तूं स्मरें मृत्युंजय ॥ अंतरामाजी ॥४०॥

यावरी प्राप्तकाळीं पार्थ ॥ होवोनियां शुचिष्मंत ॥ ध्यानीं चिंती उमाकांत ॥ तंव जाहलें आश्वर्य ॥४१॥

आपणासहित गोपाळा ॥ आकाशीं देखता जाहला ॥ पुढां श्वेतपर्वत देखिला ॥ उत्तरदिशेसी ॥४२॥

नानावृक्ष लता तेथ ॥ फळीं पुष्पीं शोभिवंत ॥ अप्सरा किंन्नर समस्त ॥ नानावाद्यें ॥४३॥

नद्या सरोवरें संयुक्त ॥ तेथ शंकर पार्वतीसहित ॥ देखोनि घातलें दंडवत ॥ केली नानास्तुती ॥४४॥

तंव ह्नणितलें उमाकांतें ॥ तुह्मी जिये कार्यानिमित्तें ॥ येथें प्राप्त जाहले असा तें ॥ सिद्ध करीन मी ॥४५॥

मग तो श्रीकृष्णार्जुनीं ॥ स्तविन्नला शूळपाणी ॥ ते शतरुद्रीय जाणीं ॥ शतनामार्थी ॥४६॥

भवाय शर्वाय रुद्राय ॥ भीमाय पशुपतये उग्राय ॥ कपर्दिने त्र्यंबकाय ॥ मृडाय तुज नमो ॥४७॥

दक्षमखघ्ना महादेवो ॥ ईशाना पार्वतीशा शिवा ॥ तुजकारणें देवदेवा ॥ नमस्कार ॥४८॥

ऐसी केली महास्तुती ॥ तंव प्रसन्न जाहला पशुपती ॥ दीधलें ध्यानातर्गती ॥ पाशुपतास्त्र ॥४९॥

मग तें घेवोनियां आले ॥ ऐसें वरदान देखिलें ॥ तैंचि शुभशकुन जाहले ॥ तंव उगवला दिनकर ॥५०॥

सर्वसैनिक वीर उठोनी ॥ स्नानसंध्यादि कर्मे सारोनी ॥ वाहनें शस्त्रें सज्ज करोनी ॥ केला महानाद ॥५१॥

नादें भूमंडळ व्यापिलें ॥ पांडवीं पुण्याहवाचन केलें ॥ ब्राह्मणांसी संतोषविलें ॥ घेतले आशिर्वाद ॥५२॥

पार्थे येवोनि धर्मसभेंत ॥ नमस्कारिला श्रीअनंत ॥ रात्रिसमईचा कुशल वृत्तांत ॥ पुसिला परस्परीं ॥५३॥

धर्म ह्नणे हो जगज्जीवना ॥ सत्य कीजे पार्थप्रतिज्ञा ॥ नानासंकटीं तूंचि सर्वज्ञा ॥ रक्षिसी आह्मां ॥५४॥

तंव ह्नणे श्रीकृष्ण ॥ योद्धा नाहीं पार्थासमान ॥ ह्नणोनि चिंतेचें कारण ॥ त्वां न कीजे ॥५५॥

आजि पार्थप्रतिज्ञा सत्य ॥ होईल जाण निभ्रांत ॥ तंव पार्थे केलें दंडवत ॥ देवा धर्मासी ॥५६॥

त्यांचे आशिर्वाद घेतले ॥ मग रात्रीचें वृत्त कथिलें ॥ कीं पाशुपतास्त्र लाधलें ॥ शंकरापासोनी ॥५७॥

ऐकता सर्व हरुषले ॥ साधुसाधु बोलों लागले ॥ मग वाहनारुढ निघाले ॥ वाद्यगजरें ॥५८॥

तैं सात्यकीकृष्णासहित ॥ शोभों लागला वीर पार्थ ॥ प्रस्थानी पुढें असे देखत ॥ अपूर्व शकुन ॥५९॥

पार्थ ह्नणे सात्यकीसी ॥ तुवां रक्षावें धर्मासीं ॥ मग मी मारीन जयद्रथासी ॥ निर्भयपणें ॥६०॥

मजसी कृष्ण सारथी असतां ॥ त्या पापिया मारीन आतां ॥ ऐसें ऐकोनि राहता ॥ जाहला येरु ॥६१॥

तंव इकडे गुरुद्रोणें ॥ व्यूह रचोनि ससैन्यें ॥ वीर सन्नद्ध केले त्राणें ॥ निघाले वाद्यगजरें ॥६२॥

पुढां देखोनि गुरुद्रोण ॥ कृष्णासि ह्नणे अर्जुन ॥ काय गा पाहसी अजून ॥ प्रेरीं रथ ॥६३॥

तंव देवें रथ प्रेरिला ॥ थोर हलकल्लोळ जाहला ॥ अर्जुन बाणीं वरुषला ॥ वीरीं सोडिले शरसंघ ॥६४॥

पार्थे वधिलें तया वीरां ॥ तोडोनि शिरचरण करां ॥ धडमुंडीं वसुंधरा ॥ अगम्य केली ॥६५॥

मग सैनिक पळाले ॥ तंव दुःशासनें वाइलें ॥ तया पार्थे पराभविलें ॥ क्षणामाजी ॥६६॥

चालिला द्रोणदळावरी ॥ वर्षला पाशांकुशशरीं ॥ केलें द्रोणासवें समरीं ॥ घोरयुद्ध ॥६७॥

तंव पार्था ह्नणे श्रीहरी ॥ तुज यासीं झुंजतां समरीं ॥ दिवस होतील दोनच्यारी ॥ परि नावरे ॥६८॥

हा गुरु आचार्य ह्नणोन ॥ यासी करोनि प्रदक्षिण ॥ चालें पुढें सैन्य टाकोन ॥ ह्नणोनि रथ प्रेरिला ॥६९॥

मग कृतवर्मा कांबोज तेथ ॥ करुनियां पराजित ॥ पार्थ चालिला विंधित ॥ श्रुतायुधावरी ॥७०॥

तो वरुणाचा नंदन ॥ त्यासीं संग्राम केला दारुण ॥ तो अवध्य सर्वा जाण ॥ सर्वयुद्धीं ॥७१॥

त्याची माता वरुणा तियेनें ॥ प्रर्थिलेंसे पतिकारणें ॥ कीं हा पुत्र अवध्य करणें ॥ त्रैलोक्यासी ॥७२॥

येरें गदा दीधली मंत्रीं ॥ ह्नणे जो असेल निःशस्त्रीं ॥ हे न टाकावी तयावरी ॥ टाकितां होय स्वघात ॥ ॥७३॥

ते श्रुतायुधें ते वेळीं ॥ श्रीकृष्णावरी टाकिली ॥ देवें हदयावरी झेलिली ॥ तंव उसळली ते ॥७४॥

मागें फिरोनि श्रुतायुधासी ॥ तियें मारिलें रणभूमीसी ॥ हाहाःकार समस्तांसी ॥ प्रवर्तला नवलावो ॥७५॥

मग कांबोजराजनंदन ॥ मारिता होय अर्जुन ॥ तेव्हां सैनिक पळोन ॥ गेले समस्त ॥७६॥

यावरी आणिकही वीर ॥ रणीं लोटले अपार ॥ धडमुंडीं रणचत्वर ॥ आच्छादिलें देखा ॥७७॥

आला गजवृंदांसहित ॥ तया अंगाचाही केला निःपात ॥ तंव दुर्योधन ॥ आला धांवत ॥ वीरसमूहेंसीं ॥७८॥

कलिंग प्राच्य दाक्षिणात्य ॥ तेही वधिले असंख्यात ॥ गज मारिले मदोन्मत्त ॥ वाहाविल्या रक्तनद्या ॥७९॥

यावरी अंबष्ट मारिला ॥ ऐसा घोर संग्राम जाहला ॥ देखोनि दुर्योधन गेला ॥ द्रोणाजवळीं ॥ ॥८०॥

ह्नणे तुह्मां अवगणोनी ॥ पार्थे वीर पाडिले रणीं ॥ वांचतां दिसेना निर्वाणी ॥ जयद्रथ ॥८१॥

पळत होता सांडोनि मातें ॥ म्यां अभय दीधलें त्यातें ॥ तुमचे आश्वासनें निरुतें ॥ केलें सकळ ॥८२॥

द्रोण ह्नणे तयाप्रती ॥ अगा ज्याचा सारथी ॥ श्रीपती ॥ जाणे अश्व हदयगती ॥ तो केवीं जिंकवेल ॥८३॥

यावरी ह्नणे दुर्योधन ॥ महावीरां मारितो अर्जुन ॥ तरी स्वरक्षणार्थ प्रयत्न ॥ म्यां कायजी करावा ॥८४॥

द्रोण ह्नणे गा नृपमणी ॥ माझें कवच जाई घेवोनी ॥ हें लेइलें असतां बाणीं ॥ नपवसी पीडा ॥८५॥

मग उदकस्पर्श केला ॥ मंत्रें कवच बांधिता जाहला ॥ आणि आशिर्वाद दीधला ॥ द्रोणाचार्ये ॥८६॥

ऐका कवचाचा वृत्तांत ॥ वृत्रासुरें जिंकिले आदित्य ॥ मग ते शरण गेले समस्त ॥ सत्यनाथासी ॥८७॥

तेणें प्रार्थिला चक्रपाणी ॥ की वृत्र ब्रह्मतेजापासोनी ॥ जन्मलासे दैत्ययोनी ॥ चला जाऊं शिवापाशीं ॥८८॥

मग विष्णुसहित सुरवर ॥ गेले शिवापाशीं शीघ्र ॥ स्तुति करितां अपर्णावर ॥ बोलता जाहला ॥८९॥

ह्नणे इंद्रा अवधारीं ॥ माझें कवच लेई शरीरीं ॥ तेणें वृत्रासि करितां झुंजारी ॥ पावसील जय ॥९०॥

मग रुद्रें कवच दीधलें ॥ तें इंद्रें अंगी घातलें ॥ विधिविष्णूनीं अभिमंत्रिलें ॥ तेणें पावला इंद्र जया ॥९१॥

यावरी काहींका दिवशीं ॥ तें इंद्रें दीधलें अंगिरासी ॥ तेणें दीधलें बृहस्पतीसी ॥ कृपेस्तव ॥९२॥

तेणें अग्निवेश्या वोपिले ॥ अग्निवेश्यें द्रोणा दीधलें ॥ ऐसे आदिअवसान कथिलें ॥ कवचाचें पैं ॥९३॥

असो लेऊनि गेला दुर्योधन ॥ तंव येरीकडे कृष्णार्जुन ॥ व्यूहामाजी प्रवेशोन ॥ करिती युद्ध ॥९४॥

इकडे पांडव व्यूहद्वारीं ॥ द्रोणेंसि झुंजतें जाहले भारीं ॥ जें त्रैलोक्यीं पूर्वापरीं ॥ नाहीं दृष्टश्रुत ॥९५॥

द्रोणाचार्य पांडवांवरी ॥ जेवीं शरवृष्टी करी ॥ तैसीच धृष्टद्युम्न त्यावरी ॥ करिता जाहला ॥९६॥

भीम आणि दुःशासन ॥ युद्ध करिती अतिदारुण ॥ तैसेचि विविंशती चित्रसेन ॥ उठावले युद्धासी ॥९७॥

विंदानुविंद विकर्ण ॥ बाल्हीक क्षेमधृतीं जाण ॥ पांचही द्रौपदीचे नंदन ॥ करिती युद्ध ॥९८॥

घटोत्कचा आजायुधा ॥ झुंजतां कांपिन्नली वसुधा ॥ तंव कौरव जाहले त्रिधा ॥ झुंजत झुंजतां ॥९९॥

जळसंध भीमावरी ॥ धर्मासि कृतवर्मा पाचारी ॥ धृष्टद्युम्न समभारीं ॥ झुंजे द्रोणासवें ॥१००॥

व्यूहडोहीं एकला अर्जुन ॥ असंख्य पाडितसे सैन्य ॥ तंव माध्यान्हीं चंडकिरण ॥ प्राप्त जाहला ॥१॥

जगदीश्वर रथमंडळें ॥ सव्यापसव्य घेत स्वबळें ॥ नानालाघवें तिये वेळे ॥ करिता जाहला ॥२॥

अवंतिराज चूडामणी ॥ पार्थे झुंजतां मारिला रणीं ॥ पन्नाससहस्त्र धरणी ॥ पाडिले सैनिक ॥३॥

तेणें कौरवदळ मोडलें ॥ मागां ओसरोनि पडलें ॥ तंव अर्जुनें श्रांत देखिले ॥ स्वरथवाह ॥४॥

आणि दूरी जाणोनि जयद्रथ ॥ केशवासी ह्नणे पार्थ ॥ हे जगन्निवास रमाकांत ॥ वाजी तृषार्त जाहले ॥५॥

तरी शल्यें काढोनि जीवनीं ॥ वारु मेळवीं चक्रपाणी ॥ मग रथाखालीं उतरोनी ॥ पार्थ मेरुवत जाहला ॥६॥

तंव इतुकें छिद्र जाणोनी ॥ कौरव उठावले आयणी ॥ ते पार्थे अमितबाणीं ॥ पराभविले ॥७॥

श्रीकृष्ण ह्नणे आशींपाशीं ॥ उदक न दिसे वारुवांसी ॥ मग पार्थे तेचि भूमीसी ॥ केलें निर्माण सरोवर ॥८॥

हंसकारंडव मत्स्य कच्छ ॥ युक्त उदक बहुत स्वच्छ ॥ आणि बाणगृह विशेष ॥ रचिलें भोंवतें ॥९॥

श्रीकृष्णें तया वर्णिलें ॥ अश्व रथौनि सोडिले ॥ शल्यें काढोनि करविलें ॥ उदकपान ॥११०॥

सकळ श्रम करोनि दूरी ॥ मागुते जुंपिले रहंवरीं ॥ मग श्रीकृष्णार्जुन त्यावरी ॥ आरुढले ॥११॥

तंव सैनिक जाहले बोलते ॥ अरे आतां दिसत नव्हते ॥ तरी हे आतां आले मागुते ॥ कोठोनियां ॥१२॥

हे कृष्णार्जुन विश्वा अजित ॥ नकळे यांचा पार अंत ॥ परि दुर्योधनानिमित्त ॥ मरणें येथें निर्धारें ॥१३॥

द्रोणानीक दुर्भेद्य जेहीं ॥ भेदिलें दृढबाणघाई ॥ हे जयद्रथा मारिती सही ॥ नाहीं नवलावो ॥१४॥

ऐसें नानापरी कौरवदळ ॥ जाहलें चिंताग्रस्त सकळ ॥ तंव कृष्णार्जुन तुंबळ ॥ चालिले करित ॥१५॥

दळ बाणीं पराभविलें ॥ सैंधवासन्निध पातले ॥ तंव दुर्योधनें वाइलें ॥ तद्रक्षणार्थ ॥१६॥

कवचयुक्त पुढें गेला ॥ कौरवीं सिंहनाद केला ॥ तंव कृष्ण बोलता जाहला ॥ अर्जुनासी ॥१७॥

आजि हा हर्षित गांधार ॥ प्राप्त जाहला तुजसमोर ॥ परि अनर्थमूळ निर्धार ॥ नेणे तुझा पराक्रम ॥१८॥

द्यूतकर्मे केलें क्लेशी ॥ द्रौपदी आणविली सभेसी ॥ पांडवां धाडिलें वनवासीं ॥ येणें नष्टें ॥१९॥

याचा संहार करीं शीघ्र ॥ मग उगे राहतील समग्र ॥ हें ऐकोनि धनुर्धर ॥ क्रोधें न्याहाळी दुर्योधना ॥१२०॥

तंव दुर्योधनें वाइले ॥ अर्जुना तीनबाणी विंधिलें ॥ दहा मार्गण प्रेरिले ॥ कृष्णावरी ॥२१॥

पार्थे तीनबाण सोडिले ॥ परि ते निर्फळ जाहले ॥ ह्नणोनि चौदा टाकिले ॥ तेही जाहले निर्फळ ॥२२॥

तंव पार्थासि ह्नणे वासुदेव ॥ अगा सबळ असोनि गांडीव ॥ मज वाटतो नवलाव ॥ बाण वृथा जाती कां ॥२३॥

पार्थ यावरी ह्नणे ॥ यासी कवच दीधलें द्रोणें ॥ हें मीच कीं द्रोण जाणे ॥ येर कोणी नेणती ॥२४॥

वज्रही नचले यावरी ॥ तथापि माझा पराक्रम निहारीं ॥ ऐसे बोलोनि मंत्रें प्रेरी ॥ भयानक बाण ॥२५॥

तेणें भयें करुनी ॥ रणीं शस्त्रास्त्रें सांडोनी ॥ दुर्योधन गेला पळोनी ॥ तये वेळे ॥ ॥२६॥

येरीं शंखवादन केलें ॥ नादें त्रैलोक्य व्यापिन्नलें ॥ तंव कौरव उठावले ॥ एकदाची ॥२७॥

द्रोणपुत्रें सत्तरबाणीं ॥ कृष्णासि विंधिलें तयेक्षणीं ॥ तथा पार्था साठीबाणीं ॥ विंधिलें देखा ॥२८॥

अर्जुनें सोडोनि वीस बाण ॥ विरथ केला द्रोणनंदन ॥ मग जाहलें युद्ध दारुण ॥ नभूतो नभविष्यति ॥२९॥

सैन्यसागर फुटला तेथ ॥ माजी अर्जुनरथ जहाजवत ॥ क्षणक्षणां वादन होत ॥ देवदत्ताचें ॥१३०॥

होत युद्धाचें घनचक्र ॥ बाणीं कोंदलें अंबर ॥ शिरें उडती मालाकार ॥ कंदुकांऐशीं ॥३१॥

इकडे युधिष्ठिर उठावला ॥ थोर संग्रामा प्रवर्तला ॥ नकुळें विकर्ण विंधिला ॥ सहदेवें दुर्मुख ॥३२॥

सात्यकी झुंजे व्याघ्रदत्तासीं ॥ भीम पराभवूं पाहे द्रोणासी ॥ पाचारिती सोमदत्तासी ॥ द्रौपदेय ॥३३॥

नकुळें विकर्ण विंधिला ॥ सात्यकीयें व्याघ्रदत्त मारिला ॥ तंव कौरवभार उठिला ॥ पांडवांवरी ॥३४॥

उभयां मांडली झुंजारी ॥ एकदांचि उठिले शस्त्रास्त्रीं ॥ तंव घटोत्कचें समरीं ॥ मारिला अलंबुष ॥३५॥

तेणें कौरवदळीं थोर ॥ प्रवर्तला हाहाःकार ॥ तंव द्रोणें युधिष्ठिर ॥ पराजित केला ॥३६॥

ऐसी जाहली युद्धआयणी ॥ परि न ऐकतां शंखध्वनी ॥ चिंताग्रस्त होवोनि मनीं ॥ धर्म बोले सात्यकीसी ॥३७॥

ह्नणे सखया अवधारीं ॥ मित्र परीक्षावा समयांतरी ॥ तोचि काळ इये अवसरीं ॥ आला असे ॥३८॥

या सकळही वीरांआंत ॥ तूंचि आमुचा प्रियवंत ॥ जेवीं आह्मावरी अनंत ॥ तेवीं तत्पर तूं ॥३९॥

ह्नणोनि भार घालितों तुजवरी ॥ कीं पार्थसाह्य इये अवसरीं ॥ तुजवांचोनि दुजा करी ॥ ऐसा कोणी नसेची ॥१४०॥

तरी मित्रकार्य करणें ॥ तुवां पार्थसाह्या जाणें ॥ हर्षोद्नमीं पूर्वी अर्जुनें ॥ बोलिलें कीं मजप्रती ॥४१॥

आजानुबाहू लब्धास्त्र ॥ ज्ञाता शास्त्रज्ञ महावीर ॥ ऐसा ममसखा धनुर्धर ॥ सात्यकी एक ॥४२॥

तो मज साह्य होईल ॥ कौरवांतें जिंकील ॥ यादवां समस्तां आणील ॥ आपुले अर्थी ॥४३॥

ऐसें द्वैतवनीं पार्थ ॥ होता तुज प्रशंसित ॥ आजि तो बोल असत्य ॥ नकरीं बापा ॥४४॥

पैल कौरवसैन्याआंत ॥ धुरोळा जेथें असे उडत ॥ तेथें वीरांसीं असे झुंजत ॥ पार्थ प्रियप्राण माझा ॥४५॥

ऐसें सात्यकीयें ऐकिलें ॥ मग धर्माप्रति बोलिलें ॥ कीं मज पार्थे आज्ञापिलें ॥ तें आपणही जाणतां ॥४६॥

ऐसा समय असतां प्राप्त ॥ तुमचे आज्ञेनें पार्थानिमित्त ॥ प्राणही टाकणें येथ ॥ संदेह नाहीं ॥४७॥

आतांचि मारुनि जयद्रथ ॥ येईन कृष्णार्जुनांसहित ॥ परि मजसी बोलिला पार्थ ॥ वारंवार ॥४८॥

कीं जंवपरियंत जयद्रथ ॥ मी मारुन येईन येथ ॥ तुवां रक्षावा तंव परियंत ॥ धर्मराजा ॥४९॥

तुज आणि प्रद्युम्नासी ॥ मी ठेवितों धर्मापाशीं ॥ द्रोणें प्रतिज्ञा केली ऐशी ॥ कीं धरणें धर्मराजा ॥१५०॥

यावरी धर्म असे ह्नणत ॥ तुज कोपणार नाहीं पार्थ ॥ भीमादि दळभारसमस्त ॥ असे माझिये रक्षणा ॥५१॥

ऐकें सात्यकी विनंती ॥ तूं शीघ्र जाई पार्थाप्रती ॥ मग तेणें भीमाप्रती ॥ धर्मरक्षण निवेदिलें ॥५२॥

वारुवां जाणवोनि साट ॥ रथ लोटिला घडघडाट ॥ सात्यकी प्रवेशला धीट ॥ कौरवांमाजी ॥५३॥

आतां अग्रसंग्रामकथा ॥ वध होईल जयद्रथा ॥ ते ऐकावी अपूर्वता ॥ ह्नणे मधुकरकवी ॥५४॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ दशमस्तबक मनोहरु ॥ पार्थप्रतिज्ञाप्रकारु ॥ द्वादशोध्यायीं कथियेला ॥१५५॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP