कथाकल्पतरू - स्तबक ४ - अध्याय १३

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

वैशंपायनासि पुसे जन्मेजयो ॥ सुदर्शन पावला वासुदेवो ॥ त्या कैसा केला उपावो दिव्यस्त्राचा ॥१॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ हरीनें प्रसन्न केला त्रिनयन ॥ आपुला वाहोनियां नयन ॥ साधिला मंत्र ॥२॥

कोणे एके अवसरीं ॥ जालंधर उदेला गा क्षेत्री ॥ तो वधावया त्रिपुरारीं ॥ योजिला मंत्र ॥३॥

दैत्य प्रौढीचा महाथोर ॥ जेणें जिंकिले हरिहर ॥ तो गंगे सिंधूचा कुमर ॥ महाबाहो ॥४॥

मग सकळ देव आणि तीर्थे ॥ औषधी पर्वत पंचभूतें ॥ शक्ती घेतल्या जगन्नाथें ॥ समस्तांचिया ॥५॥

त्यांची केली सहस्त्रधारा ॥ तेणें रचिले सुदर्शनचक्रा ॥ मग छेदिलें वज्रशिरा ॥ जालंधराचे ॥६॥

ऐसा तो वधिला हरहरीं ॥ आणि सुदर्शन जाहलें यापरी ॥ मग तें वाहिलें त्रिपुरारीं ॥ मस्तकीं आपुले ॥७॥

तंव विष्णु करी शिवसेवन ॥ पूजेविण न करी उदक प्राशन ॥ जैसें शरीर प्राणेंविण ॥ न चाले कांहीं ॥८॥

हरी सत्वगुणी शुद्धांश ॥ परि तमोगुणी महेश ॥ तरी त्याचेनि ध्यानें हषीकेश ॥ जाहला सांवळा ॥९॥

असो विष्णु हिंडोनि सप्तपाताळें ॥ नित्यानें आणी सहस्त्र कमळें ॥ अनुच्छिष्ट पाहोनि अलिकुळें ॥ नाहीं हुंगिलें जें ॥१०॥

ऐसा तो षोडशोपचारीं ॥ नित्य पूजीतसे त्रिपुरारी ॥ सुवर्णकमळें श्रीहरी ॥ वाहे मोजूनियां ॥११॥

तंव कोणे एके अवसरीं ॥ निर्धार पाहे त्रिपुरारी ॥ दुश्वित व्हावया मुरारी ॥ चोरिलें कमळ एक ॥१२॥

जंव विष्णु करी शिवपूजन ॥ तंव कमळ एक असे न्यून ॥ ह्नणे आतां कैंचें पां सुमन ॥ अनुपम्य मज ॥१३॥

ऐसी करितां चिंतवणी ॥ मग नेत्रींची बाहुली काढोनी ॥ ते योजिली कमळस्थानीं ॥ नारायणें ॥१४॥

तैं नेत्र वाहोनि केलें पूर्ण ॥ रुद्र ह्नणे माग जाहलों प्रसन्न ॥ तंव हरि ह्नणे मस्तकीचें सुदर्शन ॥ देई महाचक्र ॥१५॥

मनीं विचारी त्रिनयनू ॥ या शस्त्रयोगें तोषेल विष्णू ॥ मग मस्तकींचें काढुनु ॥ दीधलें हरीसी ॥ ॥१६॥

तरी ऐसें गा सुदर्शन ॥ तुज सांगितलें मूळावसान ॥ हें विष्णूसि दीधलें भूषण ॥ महारुद्रें ॥१७॥

जेथें सर्वही देवांचे तेज ॥ सर्व औषधींचें बीज ॥ पंचभूतादिकीं सहज ॥ स्थापिलें जैं ॥१८॥

आणि सर्वमंत्रशक्ती जाण ॥ ऐसें जे दिव्य सुदर्शन ॥ तें पावला नारायण ॥ शिवप्रसादें ॥१९॥

हे पद्मपुराणींची कथा ॥ तुज म्यां कथिली गा भारता ॥ गदा प्राप्त जाहली अनंता ॥ तें ऐक आतां ॥२०॥

खांडववन दाहिलें अग्नीं ॥ तें गदा लावला चक्रपाणी ॥ परि मार्केडेपुराणींच्या कथनीं ॥ अनारिसें गा ॥२१॥

खांडाववन दाहिलें द्वापारीं ॥ तरी गदा कैंची मागील चरित्रीं ॥ ह्नणोनि कथा ऐक पां दुसरी ॥ पूर्वापरींची ॥२२॥

एकदा कोपला श्रीकरधर ॥ भूमीं मर्दिली लवणासुर ॥ आणि तैसाचि तो गयासुर ॥ चेपिला चरणीं ॥२३॥

तंव त्या लवणाचा कुमर ॥ गद नामें महाथोर ॥ तेणें मातेसि पुसिला विचार ॥ स्वपितयाचा ॥२४॥

माता ह्नणे तयासी ॥ तूं होतासिरे गर्भवासी ॥ तें लवण मर्दिला हषीकेशीं ॥ चरणातळीं ॥२५॥

तंव मातेसि ह्नणे गद ॥ जेणें केला पितयाचा वध ॥ तो मारीन मी गोविंद ॥ सत्य जाण ॥२६॥

शरीराचा सांडीन स्वार्थ ॥ प्रसन्न करीन जगन्नाथ ॥ तेणें करीन निःपात ॥ द्रैत्यारीचा ॥२७॥

मग मांडिलें अनुशासन ॥ आणि रुद्राचें करी चिंतन ॥ सहस्त्रवर्षे धूम्रपान ॥ केलें तेणें ॥२८॥

रुद्र ह्नणे जाहलों प्रसन्न ॥ येरें मागितलें वरदान ॥ कीं जेणें पित्याचा घेतला प्राण ॥ तो म्यां जिंकावा ॥२९॥

आणि त्रिभुवनासारिखें थोर ॥ येवढें पेलील जो शस्त्र ॥ त्या वांचोनियां समग्र ॥ जिंकावे म्यां ॥३०॥

मजसमान गा दूसरा ॥ वैरी नसावा चराचरा ॥ तंव रुद्र ह्नणे गा अवधारा ॥ दीधला वर ॥३१॥

ऐसा तो लाधला वर ॥ तें ऐकताजाहला शारंगधर ॥ मग तेथें गेला गदासुर ॥ परमवेगें ॥३२॥

गोविंदासीं ह्नणे गद ॥ त्वां केला पित्याचा वध ॥ तरी तोचि तूं रे प्रसिद्ध ॥ आमुचा वैरी ॥३३॥

ह्नणोनि हाणितला त्रिशूळें ॥ घायें दुमदुमिलीं पाताळें ॥ त्रास मानिला गोपाळें ॥ तया घायाचा ॥३४॥

ऐसा घायामागें घावो ॥ हाणितसे दैत्यरावो ॥ परि विष्णुचा न चढे पावो ॥ गदासुरावरी ॥३५॥

जैसा आकळिजे मदोन्मत्त ॥ कीं मृग जैसा वागोर्‍यात ॥ तैसा सांपडिला अनंत ॥ गदासुरासी ॥३६॥

मग विष्णू हाणे आपण ॥ तें त्यासि वाटलें जैसें सुमन ॥ ह्नणोनि उचलिलें सुदर्शन ॥ हाणावयासी ॥३७॥

तंव अंतरी जाहली वाचा ॥ नकोनको गा हषीकेशा ॥ सुदर्शनाचा भरंवसा ॥ न चाले यावरी ॥३८॥

हे संधान जाईल वृथा ॥ तेणें चक्रा येईल न्यूनता ॥ मग उपजली चिंता ॥ गोविंदासी ॥३९॥

तंव जवळी असे चतुरानन ॥ तो ज्ञानीं पाहे विचारुन ॥ कीं यासी असे प्रसन्न ॥ महादेवो ॥४०॥

मग ते सकळ कथा ॥ ब्रहयानें कथिली अनंता ॥ कीं त्रिभुवनघातें लवणसुता ॥ आहे मरण ॥४१॥

मग घेवोनि त्रिभुवनाचा भार ॥ कमळीं प्रवेशला शारंगधर ॥ तेचि गदें करोनि असुर ॥ हाणीतला मस्तकीं ॥४२॥

ऐसा विष्णूनें वधिला असुर ॥ तेणें गुणनाम जाहलें गदाधर ॥ हा मार्केडेयपुराणींचा विचार ॥ कौमोदकीगदेचा ॥४३॥

ह्नणोनि गये बोलिजे गदाधर ॥ आतां असो हा विस्तार ॥ शंख लाधला शारंगधर ॥ तें ऐक पां राया ॥४४॥

संदीपनाच्या नंदना ॥ श्रीक्रुष्णें दीधली गुरुदक्षिणा ॥ तें वधोनियां पांचजन्या ॥ आणिला शंख ॥४५॥

हें आयुध लाधलें द्वापारीं ॥ परीं शंख होता पूर्वापारीं ॥ तरी ते कथा ऐक पां दुसरी ॥ गोविंदाची ॥४६॥

वैशंपायना ह्नणे भारत ॥ दुजिया शंखाचा वृत्तांत ॥ तो करावाजी श्रुतार्थ ॥ सकळ मजसी ॥ ॥४७॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ द्वापारीं पावला पांचजन्य ॥ आणिक लाधला नारायण ॥ तें ऐक आतां ॥४८॥

कोणे एके काळवेळीं ॥ दैत्य मिळोनियां सकळीं ॥ आलांप मांडिला पाताळीं ॥ हयग्रीवेंसीं ॥४९॥

त्यांहीं ऐसा केला सिद्धांत ॥ कीं हवनांचा मोडावा पंथ ॥ त्या वेदमंत्रीं सुरनाथ ॥ होय सबळ ॥५०॥

वेदमंत्रें देती आहुती ॥ तेणें देवांसी होय तृप्ती ॥ तरी तो कुरठा दैत्यांहातीं ॥ हरावे वेद ॥५१॥

मग तो हयग्रीवासुर ॥ जाहला शंखाचा आकार ॥ रुप धरोनियाम चराचर ॥ आला ब्रह्मलोकातें ॥५२॥

तंव ब्रह्मा बैसलासे ध्यानीं ॥ येरें हाक ठोकिली कानीं ॥ जैसी प्रळ्ययकाळींची ध्वनी ॥ महाकाळाची ॥५३॥

तेणें दुमदुमिलें पाताळ ॥ सागरीं जाहला कल्लोळ ॥ आंदोळले अष्टकुळाचळ ॥ निर्घातेम तेणें ॥५४॥

त्या महाशब्दाचे गजरीं ॥ ब्रह्मा दचकला अभ्यंतरीं ॥ तेणें वेद सांडिले मुखद्वारीं ॥ चारीही तेव्हां ॥५५॥

जैसें यंत्राचे निर्घाती ॥ उदक पळे पर्वतीं ॥ कीं महाशब्द श्रवणें प्रसूती ॥ होय अंबळे ॥५६॥

मग ब्रह्मया जाहली मोहनी ॥ तेणें होमाहुती न मिळे वन्ही ॥ देव राहिले अभोजनी ॥ वेदेंविण ॥५७॥

भारता मग तो शंखासुर ॥ वेद घेवोनि गेल तस्कर ॥ सखोल जाणोनियां सागर ॥ राहिला तेथें ॥ ॥५८॥

मग थोरावलें दैत्यकुळ ॥ देव जाहले हीनबळ ॥ दानधर्म राहिले सकळ ॥ वेदेंविण ॥५९॥

तंव देवांसि ह्नणे बृहस्पती ॥ कीं क्षीरसागरीं आहे श्रीपती ॥ त्यावांचोनियां वेदश्रुती ॥ आणील कवण ॥६०॥

मग ब्रह्मादिक सुरवर ॥ क्ष्रीरसागरा गेले सत्वर ॥ दृष्टीं देखता शीघ्र ॥ उतरले खालीं ॥६१॥

निर्जरीं मांडिली स्तुती ॥ जयजयाजी कमळापती ॥ जयजय हो वेदमूर्ती ॥ नारायणा ॥६२॥

जयजयाजी शेषशयना ॥ मेघश्यामा कमळनयना ॥ परमपुरुषा वरदाना ॥ महद्भूता ॥६३॥

जयजयजी मंगळमूर्ती ॥ शंखें हरिल्या वेदश्रुती ॥ त्या तुजवांचोनि श्रीपती ॥ आणील कवण ॥६४॥

तंव अंतरीं जाहली ध्वनी ॥ कीं तुह्मीं जावेम स्वभुवनीं ॥ मी आपुली निद्रा विसर्जुनी ॥ आणीन वेद ॥६५॥

तेथोनि देव गेले समस्त ॥ तंव काळ क्रमिला बहुत ॥ मग निद्रा सारोनि जागृत ॥ जाहला देव ॥६६॥

मनीं विचरी श्रीहरी ॥ तंव शंख आहे सागरीं ॥ श्रुती घालोनियां उदरीं ॥ राहिला असे ॥६७॥

तो वधावयालागीं शंख ॥ देवें धरिला मत्स्यवेष ॥ कैसा नटला आदिपुरुष ॥ तें ऐकावें गा ॥६८॥

द्राविडदेशींचा नृपवर ॥ सत्यव्रत नामें महाथोर ॥ तो राजर्षि असे पवित्र ॥ पुण्यश्लोक ॥६९॥

तो भागीरथीचे तीरीं ॥ तपें आगळा ब्रह्मचारी ॥ अर्ध्य द्यावया कारणें करीं ॥ घेतलें उदक ॥७०॥

ते अर्कासि देतां अंजुळीं ॥ तंव स्वर्गीहूनि पडली मासोळी ॥ तैं देखिली नेत्रकमळीं ॥ उतरतां तेणें ॥७१॥

ऋषीनें ते अर्घ्यौजुळी ॥ कृपेनें सांडिली नदीजळीं ॥ परि ते बोभाइली मासोळी ॥ ऋषीप्रती ॥७२॥

येथें मत्स्य असती गा थोर ॥ मज जाणोनि अल्पमात्र ॥ ग्रासितील कीं स्वगोत्र ॥ सत्यव्रता मज ॥७३॥

तरी या उदकावेगळा ॥ मज काढीं गा भूपाळा ॥ हें ऐकोनियां त्या सुशीळा ॥ जाहला विस्मयो ॥७४॥

मग ते काढोनि मासोळी ॥ वेगां घातली कमंडलीं ॥ परि सातां घटिकीं बोभाइली ॥ गंभीरस्वरें ॥७५॥

अगा हें कमंडलूचें पात्र ॥ सांकडें पडतसे शरीर ॥ तरी निर्मळ पाहोनियां नीर ॥ घालीं मज ॥७६॥

जंव ऋषी करी न्याहाळ ॥ तंव देखिला महास्थूळ ॥ फुटों पाहे कमंडल ॥ दाटलेपणें ॥७७॥

तो ऐकोनियां बोल ॥ मग उलंडिला कमंडल ॥ तंव जाहला विशाळ ॥ महामीन तो ॥७८॥

मागुता बोभाइला जळचर ॥ सत्यव्रता तूं पुण्यपवित्र ॥ थोरसें पाहोनि सरोवर ॥ घालीं मज ॥७९॥

तेथोनि काढिला करकमळें ॥ तंव दृष्टीं देखिलें महातळे ॥ तेथें घातला भूपाळें ॥ महामीन तो ॥८०॥

तैणें सरोवरीं जों घातलें ॥ तों महास्थूळ देह जाहलें ॥ मग महानदीसि नेलें ॥ तया मीनासी ॥८१॥

तेथेंही न माय जळचर ॥ दृष्टीं पाहतसे ॠषेश्वर ॥ तंव वाचा जाहली सत्वर ॥ पूर्वीलऐसी ॥८२॥

मग तो उचलिला मीन ॥ जैसा पर्वत असे गहन ॥ परि उचलितां परणाणुसमान ॥ होवोनि ठेला ॥८३॥

बोले सत्यव्रता तूं निर्धारी ॥ माझेनि कष्टलासि भारी ॥ तरी आतां नेवोनि सागरीं ॥ सोडीं मज ॥८४॥

मग तो घातला सिंधुजळीं ॥ तंव मीन बोलिला मंजुळीं ॥ प्रळयो आला गा जवळी ॥ ऋषीजना आतां ॥८५॥

पृथ्वीचें होईल आकर्षण ॥ सर्वोगें ग्रासील हें जीवन ॥ ते वेळीं करावें स्मरण ॥ तुवां माझें ॥८६॥

मग अदृश्य जाहला जळचर ॥ अवस्थें व्यापिला ऋषीश्वर ॥ तंव हेलावला सागर ॥ प्रळयोदकें ॥ ॥८७॥

उदका होतसे वळसा ॥ असुरा पाहतसे मासा ॥ घेवों पाहे आमिषा ॥ शंखासुराचिये ॥८८॥

देवढे सांडी पिसारे ॥ फोडिले कपाटींचे थारे ॥ आणि महा गिरिकंदरें ॥ केलीं चूर्ण ॥८९॥

श्वास सांडिला वदनीं ॥ ते ऊर्मी उठिली गगनीं ॥ तंव तो देखिला नयनीं ॥ शंखासुर ॥९०॥

माथां काढोनियां पिसारा ॥ मिशिया चाळीतसे थरथरां ॥ दाढे घालावया असुरा ॥ पसरी वदन ॥९१॥

दाढे हाणे आडवाटा ॥ परी वरील न फूटे कंवटा ॥ जाणों दधीचीचे घनवटा ॥ वज्र जैसें ॥९२॥

मग दोघां जाहला आदळ ॥ एक एकाहूनि सबळ ॥ जाणों रत्नमंथनीं मंदराचळ ॥ हाले जैसा ॥९३॥

एकमेकां देती थडका ॥ शंख ग्रासों पाहे हषीकेशा ॥ आणि मीन घेवों पाहे आमिषां ॥ शंखासुराचे ॥ ॥९४॥

ऐसा होतसे वळसा ॥ धांव घेतली दाही दिशा ॥ तंव आठवली हषीकेशा ॥ बुद्धी एक ॥९५॥

हरी ह्नणे माग रे प्रसन्न ॥ तंव येरु ह्नणे हें न बोलें वचन ॥ तुज म्यां दीधलें भाकदान ॥ तरी माग मज ॥९६॥

मग बोलिला श्रीअनंत ॥ तुझा दावींरे मज मृत्य ॥ येरु ह्नणे रोंवावा दंत ॥ माझिया उदरीं ॥९७॥

ऐसा ठकिला यजमान ॥ मग दृष्टीं पाहे नारायण ॥ नम्र जाणोनियां दशन ॥ घातला उदरीं ॥९८॥

जंव उदर चिरी श्रीपती ॥ तंव बोभाइल्या वेदश्रुती ॥ कीं आह्मा जाहली बंधनमुक्ती ॥ तवप्रसादें ॥९९॥

मग संतोषला नारायण ॥ ह्नणे शंखा तूं जाहलासि ब्राह्मण ॥ श्रुतिसंगें दैत्यअवगुण ॥ गेला तुझा ॥१००॥

जैसें परिसें नासे किडाळ ॥ मग तें कर्णी मिरवे कुंडल ॥ कीं वेदमंत्रें काष्ठ शिळ ॥ पूज्य जैसे ॥१॥

तैसा तूं श्रुतीचेनि संगें ॥ पवित्र जाहलासी संयोगें ॥ जैसा मृत्यु जालिया गंगे ॥ उद्धरे प्राणी ॥२॥

हरी ह्नणे माग जाहलों प्रसन्न ॥ तुवां दाविलें आपुलें मरण ॥ तंव शंख ह्नणे सेवादान ॥ द्यावें मज ॥३॥

जरी तूं जाहलासी प्रसन्न ॥ तरी माझेनि पात्रें करावें स्नान ॥ हेंचि मागतसें वरदान ॥ गोविंदा तुज ॥४॥

तंव हरी बोलिला वचन ॥ आधीं तूं गा पावसी पूजन ॥ मग मी करीनरे स्त्रान ॥ तवउदकें ॥५॥

ऐसा तूं गा ब्रह्ममूर्ती ॥ तुज न विसंबें मी क्षणरती ॥ तूं भूषणाचिया पंक्ती ॥ मानिलासि म्यां ॥६॥

ऐसा वधिला शंखासुर ॥ त्याचा घेतला अस्थिपंजर ॥ त्राहाटोनि शब्द केला गंभीर ॥ प्रळ्यकाळींचा ॥७॥

असो आतां हा शंखासुर ॥ त्याचा शब्द जाहला गंभीर ॥ तो लोकीं असे पूज्य सर्वत्र ॥ विष्णुपूजनीं ॥८॥

मग तो वाजविला गोविंदीं ॥ तेणें उचंबळला उदधी ॥ आणि उलट्या चालल्या नदी ॥ प्रळय मांडिला जळचरां ॥९॥

उदक चालिलें धुंधुवात ॥ समस्त बुडाले तरु पर्वत ॥ चहूंखाणीचे प्राणिजात ॥ नासिले तेणें ॥११०॥

तेणें सत्यव्रत जाहला कासाविशी ॥ तंव मीन स्मरिला मानसीं ॥ त्या पासाव नाव आली ऊर्मीशीं ॥ महाथोर ॥११॥

वेगां वोळगला ऋषीश्वर ॥ तंव दिशां दाटला सागर ॥ दृष्टीं पाहतां चमत्कार ॥ देखिला तेणें ॥१२॥

चहूं खाणींचे नाना जीव ॥ तेणें भरिली असे नाव ॥ ऐशीं बीजें राखिली अवेव ॥ सृष्टिनायकें ॥१३॥

मग नावे बैसला सत्यव्रत ॥ तंव सुटला चंडवात ॥ त्या जीवबीजांचा तंत ॥ तो दाखवावया ॥१४॥

त्या पाणियाचेनि आदळें ॥ नाव घेतसे हिंदोळे ॥ तंव मागील वचन आठवलें ॥ ऋषीश्वरासी ॥१५॥

ह्नणे धांव गा महामीना ॥ सांभाळी आपुल्या पूर्वील वचना ॥ या उदकाचिया आपमरणा ॥ राखें मज ॥१६॥

ऐसी करितां महास्तुती ॥ तंव तो पावला शीघ्रगती ॥ भोंवतां धरिली युगदंतीं ॥ नाव तेणें ॥१७॥

येथें कांहीं अनुमानत ॥ जाणों पृथ्वी ते नाव सत्य ॥ ह्नणोनि राखे जीवांसहित ॥ नारायण ॥१८॥

मग ह्नणे सत्यव्रत ॥ तूं मत्स्यरुपें गा अनंत ॥ येरवीं येवढा पुरुषार्थ आणिका कैंचा ॥१९॥

तेणें मांडिली प्रेमस्तुती ॥ जयजयाजी त्रिभुवनपती ॥ अजरामरा नानायुक्तीं ॥ तूं अरुपा ॥ ॥१२०॥

जयजयाजी परमहंसा ॥ आदिरुपा महामत्स्या ॥ लीलालाधवा गर्भवासा ॥ वेगळा तूं ॥२१॥

जयजयाजी परमेश्वरा ॥ परमपूज्या योगीश्वरा ॥ जयजयाजी असुरवीरां ॥ मर्दना तूं ॥२२॥

जयजयाजी मत्स्यरुपा ॥ दुष्टदहना महादीपा ॥ त्रिविध वळींचिया तापा ॥ सोडवीं मज ॥२३॥

मग तया ऋषीप्रती ॥ रुप दाविलें श्रीपतीं ॥ तंव शंखचक्र देखिलें हातीं ॥ दिव्यरुपें ॥२४॥

श्रीपतीस ह्नणे मुनी ॥ हें श्वेत कायजी पाणीं ॥ तंव बोले प्रेंमवचनीं ॥ नारायण ॥२५॥

जेणे हरिल्या ब्रहयाच्या श्रुती ॥ तो म्यां वधिला त्याची हे अस्थी ॥ परी कंठनाळ घेतलेंसे हातीं ॥ प्रीतीस्तव ॥२६॥

तरी याचे व्हावें पूर्वपुजन ॥ हें म्यां दीधलें वरदान ॥ कीं श्रुतिसंगें मळीणपण ॥ गेलें याचें ॥२७॥

यचे पात्रीचें जीवन ॥ तें मज दुर्लभ गा स्त्रान ॥ तैसें अपूर्व गा तुलसी पान ॥ दुसरें मज ॥२८॥

ऐसी करितां दोघां गोष्टी ॥ तंव विमान आलें उठाउठी ॥ सत्यव्रत नेला वैकुंठी ॥ वाहोनिया ॥२९॥

आतां असो हा शंखासुर ॥ प्रथम जाहला मत्स्यावतार ॥ हा सांगितला विचार ॥ श्रीभागवतींचा ॥१३०॥

आतां पुढील कथेचा प्रश्न ॥ कैसा सांगेल वैशंपायन ॥ तें ऐका चित्त देवोन ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥३१॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ चतुर्थस्तबक मनोहरु ॥ मत्स्यावतारप्रकारु ॥ त्रयोदशोऽध्यायीं सांगितला ॥१३२॥

॥ शुभंभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP