कथाकल्पतरू - स्तबक ४ - अध्याय ६

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

रायासि ह्नणती वैशंपायन ॥ श्रीकृष्णप्रताप ऐकोन ॥ कंस बैसला दुःखेंकरुन ॥ सभेमाजी ॥१॥

तंव नारद मथुरेसि पातला ॥ तेणें कंस प्रबोधिला ॥ कीं गोकुळीं तुझा शत्रु उदेला ॥ वसुदेवपुत्र ॥२॥

देवकी तुझी बहीण ॥ ते कां रक्षिलीस वैरिण ॥ वसुदेवें गौकुळीं नेऊन ॥ ठेविले सुत दोघे ॥३॥

तुझे समस्त दैत्यभार ॥ गोकुळीं वधिले निर्धार ॥ दोघे असती वसुदेवकुमर ॥ नंदाघरीं ॥४॥

ऐकूनियां ऐसी परी ॥ कंसें खर्ग घेतलेम करीं ॥ वसुदेव हाणावा जंव करीं ॥ तंव धरिला नारदें ॥५॥

ह्नणे होणार तें होवोनि गेलें ॥ यासी कां मारिसी निष्फळें ॥ जें केलिया अपकीतींबळें ॥ निंदी जग ॥६॥

सर्प गेलिया विवरीं ॥ मार्ग खंडिजे खड्रधारीं ॥ तैसी करिसी कंसा परी ॥ न विचारितां ॥७॥

तरी तुझा असे जो रिपु ॥ तोचि मारीं गा कृष्णसर्पु ॥ तेणेंचि मारिला होय बापु ॥ आणि माता ॥८॥

मग बोले उग्रसेन ॥ वसुदेव तरी तुज आधीन ॥ तरी याचें करितां हनन ॥ होईल निंदा ॥९॥

जन्म मरण आणि जरा ॥ हें तंव असे चराचरा ॥ तरी काहीम नचले कुमरा ॥ ब्रह्मरेखेसी ॥१०॥

आपणा आपण होय शत्रू ॥ आणि आप आपणा मित्रू ॥ आपणाचि रची आचारु ॥ बंधमोक्षांचा ॥११॥

वायां ठेविजे निमित्त ॥ आपुलें भोगिजे पूर्वार्जित ॥ जैसें पंचभूतांचे मिश्रित ॥ न कळे काहीं ॥१२॥

ऐकोनि इनुकिया वचना ॥ कंस कोपला उग्रसेना ॥ ह्नणे मज मारुनि सिंहासना ॥ भोगूं पाहसी ॥१३॥

मज सांगतोसि धर्मकथा ॥ परी माझे मरणाची नाहीं चिंता ॥ तरी तूं नव्हसी गा सर्वथा ॥ पिता माझा ॥१४॥

ऐसें बोलोनि उग्रसेना ॥ लोहपाशीम केली रक्षणा ॥ आणि वसुदेवदेवकी दोघांजणा ॥ बंदिशाळे पाठविलें ॥१५॥

मग कंसें बोलाविला केशी ॥ ह्नणे तुझा धाकरे देवांसी ॥ तरी नंदाचिये बाळकासी ॥ जावोनि वधीं ॥१६॥

तेथोनि निघाला तो केशी ॥ अश्वरुपें पापराशी ॥ तेणें देखिला हषीकेशी ॥ यमुनेतटीं ॥१७॥

मग पसरोनियां आवाळे ॥ ग्रासूं धांवला गोपाळें ॥ महा करितसे लाताळें ॥ शब्दध्वनी ॥१८॥

तें जाणवलेसे मुरारी ॥ ह्नणे हा तरी देवांचा वैरी ॥ ह्नणोनि कृष्ण चरण धरी ॥ धांवोनिया ॥१९॥

गरगरां फिरवोनि पोकळी ॥ केशी आपटिला भूमंडळीं ॥ तेवेळीं कृष्णासि कांबळी ॥ वोंवाळिती गोपाळ ॥२०॥

मग कोणें एके काळीं ॥ गोपाळ खेळती रासकेली ॥ तंव व्योमासुर महाबळी ॥ आला तेथें ॥२१॥

तो मयदैत्याचा कुमर ॥ रुप धरोनियां तस्कर ॥ घेवोनि गेला वत्सपरिवार ॥ विवरामाजी ॥ ॥२२॥

ऐसीं नेलीं गा समस्तें ॥ जंव कृष्ण पाहे भोवतें ॥ तं वन देखे खेळतें ॥ बाळकें तीं ॥२३॥

ऐसा करितां विचार ॥ मागुती तेथें आला असुर ॥ तंव करिता जाहला नंदकुमर ॥ मावनिद्रा ॥२४॥

मग तेणें उचलिला हरी नेवोनि घातला महाविवरीं ॥ शिळा ठेवावी जंव द्वारीं ॥ तंव हरी धरी तयातें ॥२५॥

तो आपटूनि मारिला असुर ॥ गोपाळीं देखिला चमत्कार ॥ तंव आला ब्रह्मकुमर ॥ नारद तेथें ॥२६॥

नारद ह्नणे गा श्रीहरी ॥ तूं उपजलासि परोपकारीं ॥ तुज झूंजतां रणक्षेत्री ॥ न पुरती दैत्य ॥२७॥

पूजापात्र तूं त्रिभूवना ॥ पुत्रपौत्रीं पावसी अंगना ॥ तरी कंस वधितां काय कृष्णा ॥ धरिशी शंका ॥२८॥

सकळ सांगूनियां कृत्य ॥ आद्यावसान समस्त ॥ तें करुनियां श्रृत ॥ बोले नारद ॥२९॥

कृष्णा तुझी पूर्वील अंतुरीं ॥ ते जाण गा भीमकाची कुमरी ॥ कमळजा कौडण्यपुरीं ॥ जन्मली असे ॥३०॥

कृष्णा एक परिसें विनंती ॥ गोकुळीं मांडिली बरवी स्थिती ॥ जेणें सुरवाडें राहिलेती ॥ क्षीरपानें ॥३१॥

तरी विचारीं पां स्वचित्तें ॥ कार्य उपदेशिलें जें होतें ॥ तें लोटिलें नेणों केउतें ॥ क्रीडा अनेक मांडिली ॥३२॥

वसुदेवासि पूर्वील भरंवसा ॥ आलेत ज्याचिया गर्भवासा ॥ तो सांडिला सायासा ॥ निगडबंदीं ॥ ॥३३॥

देवकी बापुडी गाय ॥ जे लोकीं जाणितली माय ॥ तयेसि कठिण दशा होय ॥ शृंखळा पायीं ॥३४॥

ऐसें नारदें बोलिलें ॥ ते कृष्णा अभिप्राय कळले ॥ परि अज्ञपणें नारदासि पुसिलें ॥ काय ह्नणोनी ॥३५॥

नारद ह्नणे गौप्य कायसें ॥ जें सूत्र आदरिलें कंसें ॥ तुह्मां तेथ यावया उद्देशें ॥ केलें कपट ॥३६॥

धनुर्याग आरंभिला ॥ मल्लें रंगआखाडा केला ॥ कृष्ण बळदेव यावया रचिला ॥ दिशाबंध ॥३७॥

चाणूर मुष्टिकां दीधला विडा ॥ युद्ध करावया मालखडा ॥ गजा बांधिलें कुवलयापीडा ॥ महाद्वारीं ॥३८॥

आतां अक्रूर येतसे मूळ ॥ बोलवावया नंदगोपाळ ॥ रामकृष्ण परिवार सकळ ॥ दर्शनभेटी ॥३९॥

इतुकें देवषीं बोलले ॥ ते कृष्णासि अभिप्राय कळले ॥ मग स्वागत करोनि पाठविलें ॥ देवलोकासी ॥४०॥

तंव ते दूतमुखें वार्ता ॥ कंसें ऐकिली गा भारता ॥ मग अक्रुरा होय बोलता ॥ मथुरानाथ ॥४१॥

त्यातें ह्नणे तो कंसासुर ॥ नरांमाजी तूं बुद्धिसागर ॥ उदार जैसा मेरु थोर ॥ क्षमा असे पृथ्वीसम ॥४२॥

यादवांमाजी मुकुटमणी ॥ भोजवंशियांमाजी शिरोमणी ॥ उभयांमाजी तुझी करणी ॥ प्रज्ञासमर्थ ॥४३॥

तुवां आमुचें ह्नणितलें करावें ॥ गोकुळामाजी शीघ्र जावें ॥ नंदादिकांसि आणावें ॥ परिवारासहित ॥४४॥

तेथें असती वसुदेवकुमर ॥ दोघे पराक्रमी बाळवीर ॥ ते धनुर्यागासि धुरंधर ॥ आणावे येथें ॥४५॥

तुझी आह्मां ऐक्यता असे ॥ तो यादव तुज विश्वासे ॥ त्यायें आणिल्या आपैसें ॥ फिटेल आधी ॥४६॥

हें सांगितलें गुजतुज ॥ होवों नेदावें भाइज ॥ मग तुजवांचोनि आह्मी निज ॥ नेणों कोणीं ॥४७॥

हा जो मी मांडिला धनुर्याग ॥ त्यातें वधावयाचा प्रयोग ॥ तो तुझेनि घडेल संयोग ॥ कार्यसिद्धिचा ॥४८॥

इतुकें ऐकूनियां अक्रुर ॥ मनीं करितसे विचार ॥ करोनि शब्दाचा अंगिकार ॥ कंसाप्रती बोलिला ॥४९॥

ह्नणे ऐकें गा कंसा भूपती ॥ मज गेलिया सर्व येती ॥ राया परियेसी राजनीती ॥ भरंवसा मानूं नये ॥५०॥

देशकाळें धाकुटे होती ॥ वयसापात यौवनीं येती ॥ येथें जालिया संगतीं ॥ घडेल कैसें ॥५१॥

आह्मीं तरी श्रेष्ठ तुझे ॥ तीं गौळियें असती अर्बुजें ॥ येथें आणिलिया नेणिजे ॥ काय वर्तेल ॥५२॥

आह्मासी तुझाचि आधार ॥ प्रजा लोक कां धुरंधर ॥ पाठीं आणिक धरोनि विचार ॥ आह्मां दोष ठेविती ॥५३॥

मी बोलतसें तुझें हित ॥ तूर्ते असें जागवित ॥ ते सर्वथा भले नव्हेत ॥ ह्नणोनि ऐसेम न करींगा ॥ ॥५४॥

कंस ह्नणे अक्रुरा जाण ॥ म्यां वोळखिलें तुझेम मन ॥ परि उद्यम करावा आपण ॥ मग भलतें होवो कां ॥५५॥

ते वेळीं निघाला अक्रुर ॥ मनीं चिंतोनि शारंगधर ॥ तोचि वोळखिजे पवित्र ॥ अंतर्बाह्य ॥५६॥

आतां ययाचा प्रस्तावा ॥ हरि आपपर न ह्नणावा ॥ आह्मीं कृष्णाचि अंतरी धरावा ॥ सर्वप्रकारीं ॥५७॥

तोचि फेडील सांकडें ॥ वोळखील खरें कुडें ॥ अनुसरेल आपणा पुढें ॥ भक्तिभावेम ॥५८॥

होवोनि जातों कंसदूत ॥ त्यासीं उघड बोलावा संकेत ॥ मग त्यासी आणितां येथ ॥ नेटकें मज होईल ॥६०॥

नंद आतां काय बोलेले ॥ कृष्ण तरी काय विचारील ॥ आणि येथें काय वर्तेल ॥ वसुदेव देवकीये ॥६१॥

आतां बहुत काय विचार ॥ कंसवचनीं केला प्रकार ॥ तेथें जावोनि करावा विचार ॥ या संकटाचा ॥६२॥

तेवेळां निजमंदिरासि गेला ॥ स्त्रियेसि विचार सांगितला ॥ जो होता तयासि बोलिला ॥ कंसराणा ॥६३॥

ऐसें अक्रुरें बोलिलें ॥ तिचिया मना तैसेंचि आलें ॥ ह्नणे कृष्णदर्शना जातां भलें ॥ तो वोळखील भाव ॥६४॥

तेवेळीं रथ संजोगिला ॥ अक्रुर मथुरे बाहेर निघाला ॥ गोकुळाचे मार्गे चालिला ॥ मग विचारी मानसी ॥६५॥

मार्गीं असे रथ चालत ॥ तों तयासि शकुन बरवे होत ॥ तेणें मनीं संतोषत ॥ अक्रुर तो ॥६६॥

रथ मार्गी असे चालत ॥ येरु आनंदें मनीं डोलत ॥ ह्नणे ज्यातें मुनी संतोषत ॥ तो नयनीं देखेत आजी ॥६७॥

धन्यधन्य आजिंचा दिवस ॥ दृष्टीं देखेन क्षीराब्धिवास ॥ मज होईल परम संतोषा ॥ जो दुर्लभ योगियां ॥६८॥

जीवित माझें होईल सफळ ॥ जाहलें सत्कर्माचें फळ ॥ देह पवित्रपण पावेल ॥ भूमिदंडवतें ॥६९॥

धन्य माझे दोनी नयन ॥ होईल कृष्णदेवाचें दर्शन ॥ शरीर होईल पावन ॥ चरणस्पर्शे ॥७०॥

ऐसा मार्गी असे चालत ॥ कृष्णचरणीं राहिलें चित्त ॥ पुढें चालतां अडखळत ॥ ध्यानभुलीनें ॥७१॥

ऐसें चालत असतां पंथीं ॥ सवें चरणी सवेंच रथीं ॥ तया न कळे मार्गाची गती ॥ सायंकाळी पावला ॥७२॥

तंव गाई परतलिया गोकुळीं ॥ मार्गी कृष्णपाउलें उमटलीं ॥ देखोनि लोटांगण घाली ॥ देहभाव हरपला ॥७३॥

मथुरेहुनि उदयकाळीं ॥ चालतां लोटांगणें घाली ॥ तेणेंकरुनि वेळेचा अवेळीं ॥ पातला तो ॥७४॥

अक्रुर मनीं विचारी ॥ कीं कैसें भेटावें श्रीहरी ॥ धांवोनि दोनी चरणांवरी ॥ अंग टाकूं आपुलें ॥७५॥

प्रवशोनि गोकुळा माझारी ॥ अक्रुर पावला नंदाचे घरीं ॥ जेथें बैसलासे परिवारीं ॥ नंदराव ॥७६॥

तंव पुढें मांदी धाविन्नली ॥ अक्रुराची शुद्धी जाणवली ॥ तेणें नंदादिकां वर्तली ॥ पूर्णसंतुष्टी ॥७७॥

अवघे धांवले गौळी ॥ तंव तेथें पावला राउळी ॥ उदित जाहला ते वेळीं ॥ कृष्णदर्शना ॥७८॥

इकडे श्रीगोपालनाथ ॥ गाईदोह असे सारित ॥ चहूंभुजांसमवेत ॥ अलंकारलासे ॥७९॥

अक्रुरें देखतां गोपिनाथ ॥ पुरला मनींचा मनोरथ ॥ जंव साष्टांग घाली दंडवत ॥ तंव कृष्णें माथा उचलिला ॥८०॥

अक्रुरें दोनीबाहीं आलिंगिला ॥ संतोषें हदयी धरियेला ॥ परमप्रीतीं सन्मानिला ॥ देहभावें ॥८१॥

मग बळदेवा नमस्कारिलें ॥ आणि नंदासि आलिंगन दीधलें ॥ परमप्रीतीं निवारिले ॥ अष्टभाव ॥८२॥

तंव यशोदा आली जवळी ॥ नंद अक्रुराचे चरण प्रक्षाळी ॥ येरी उदक वरी घाली ॥ मग तें शिरीं वंदिलें ॥८३॥

करुनि षोडशोपचार पूजा ॥ अक्रुरासि पूजी राजा ॥ दक्षिणा देऊनियां द्विजां ॥ सारिलें भोजन ॥८४॥

नंद ह्नणे जी धन्य जाहलें ॥ अक्रुरा तुमचें दर्शन लाधलें ॥ कवणकार्यी बिजें केलें ॥ तें आह्मां निरोपिजे ॥८५॥

येरु ह्नणे नंदाप्रती ॥ कैसे धनुर्यागाची केली आयती ॥ तेथें सकळ येतील भूपती ॥ वर्‍हाडिके ॥८६॥

गौळीं सकळीम चलावें ॥ कुटुंबपरिवारेंसी यावें ॥ कृष्णबळदेव आणावे ॥ सांगातें पैं ॥८७॥

ऐसे अक्रुरें बोलिलें ॥ तें वचन कृष्णासि मानवलें ॥ मग मेळोनि उभे राहिले ॥ रामकृष्ण ॥८८॥

तंव नंद ह्नणे बारे कान्हा ॥ मागें कोणीच नसे रक्षणा ॥ आणि असती व्रजागना ॥ तरी तुझीं न यावें तेथें ॥८९॥

तंव कृष्ण ह्नणे जी ताता ॥ अक्रुर होय आमुचा चुलता ॥ ह्नणोनि त्याचा बोल अव्हेरितां ॥ नये आह्मां ॥९०॥

आणिक उत्तम स्नेह करित ॥ अखंड आमुची चिंता वाहत ॥ त्याचे पुरवावया मनोरथ ॥ जाणें आह्मां निश्वयें ॥९१॥

आह्यांसि खोडी आहे मोठी ॥ जो आमुची चिंता वाहे पोटीं ॥ त्याची भक्ति अथवा वैर पोटीं ॥ घेतों आह्मीं ॥९२॥

इतुका जंव समय वर्तला ॥ तंव गोकुळीं हाहाशब्द जाहला ॥ गोपीसमूह मीनला ॥ येकवटीनें ॥९३॥

मग बोलती अक्रुरासी ॥ तूं काळरुपी रे आलासी ॥ हा आमुचा प्राण नेतोसी ॥ काढोनियां ॥९४॥

तुझें नाम ह्नणती अक्रुर ॥ परि तूं आह्मां झालासि क्रुर ॥ महापापी दुष्ट निष्ठूर ॥ झालासि आह्मां ॥९५॥

कृष्णासि मथुरेतें नेसी ॥ तेथें कंसासुरा वोपिसी ॥ तरी आमुच्या शापें वांचसी ॥ कैशापरी ॥९६॥

हा कृष्ण आत्मा आमुचा ॥ आणि तूं भृत्य कंसाचा ॥ तुजला बाळ नेतां लोकाचा ॥ कैसे दुःख न वाटे ॥९७॥

ऐशा विलापिती गौळणी ॥ रुदती यशोदा रोहिणी ॥ अवघ्या पडती मूर्छा येउनी ॥ दुःखे अबला ॥९८॥

गोकुळीं सकळां पडली भ्रांती ॥ कीं कृष्णबळिभद्र येथूनि जाती ॥ ह्नणती गोकुळीची जाहली माती ॥ कृष्णाविणें ॥९९॥

जितुकीं उठलीं होतीं चिन्हें ॥ असंभाव्य महारुद्रणें ॥ तितुकीं निवारिली या कान्हें ॥ क्षणामाजी ॥१००॥

आतां दोघे बंधु निघाले ॥ पांघुरण आमुचें फिटलें ॥ गोकुळ उघडें जाहलें ॥ या गौळियांचे ॥१॥

हा सर्वथा न ये मागुता ॥ सांपडला कंसाचिये हाता ॥ त्या कंसाची रणग्राह्यता ॥ न सोडी यातें ॥२॥

याची प्रताप वार्ता फांकली ॥ ह्नणोनि कंसें गोकुळा दृष्टी सूदली ॥ आणि तेणें आयती रचिली ॥ कौशल्यसूचना ॥३॥

कृष्णनंदातें मथुरेसि न्यावें ॥ दोघे कुमर कपटें मारावे ॥ नंदासि धरोनि दंडावें ॥ हरावीं गोधनें ॥४॥

ऐसे चिंतिती नानाप्रकार ॥ गौळी करिती विचार ॥ त्यांचे वोळखोनि अंतर ॥ बोलिला कृष्ण ॥५॥

ह्नणे वायांच असा भीत ॥ मी जाणें हें कंसाचें चित्त ॥ मज गेलिया तुमचें हित ॥ होईल निश्वयें ॥ ॥६॥

तुह्मीं अंतरीं न धरावी भ्रांती ॥ नंदजी चिंता न कराचित्तीं ॥ गोकुळीं गौळी सुखें नांदती ॥ ऐसा उपाय करुं आह्मी ॥७॥

इतुकेन गौळी धिरावले ॥ आपण तेथूनियां चालिले ॥ तंव गोपीतें विलपतां देखिलें ॥ कृष्णजीनें ॥८॥

कृष्णदेव तेथोनियां उठती ॥ गोपीतें एकांती नेती ॥ त्यांसि दाविली प्रतीती ॥ आत्मबोधाची ॥९॥

त्यांतें प्रबोध उपजविला ॥ निजरुप सांगता जाहला ॥ कीं तुह्मी निजपती भोगितां वहिला ॥ तो स्वरुपें मीच ॥११०॥

भ्रांती न धरावी तत्वतां ॥ तुह्मी जेथें तेथें अनुभविता ॥ मीच सर्वत्रदेहीं वर्तता ॥ पहावें मज ॥११॥

यापरी ऐकोनि गोपांगना ॥ संतोष मानिताती मना ॥ जैसा योगी होय आत्मज्ञाना ॥ वरपंडा पैं ॥१२॥

मग परतोनि चालिल्या निश्विता ॥ आनंदाचिया पावोनि चित्ता ॥ जेवीं अज्ञाना विद्या देतां ॥ संभवे विवेक ॥१३॥

संबोखिली यशोदा सती ॥ माते त्वां अधीर न व्हावें चित्तीं ॥ जिहीं आत्मा अर्पिला आह्मांप्रती ॥ त्यांसि कैंचा वियोग ॥१४॥

तये वेळीं सुप्रभातीं ॥ नंदे चालविली आयती ॥ घृतें घागरी भरिती ॥ दधिदुग्धेंसीं ॥१५॥

गौळी गोपाळ चालिले ॥ घोडे बैल पालाणिले ॥ वहनें गाडे जुपिले ॥ जावया मथुरे ॥१६॥

राम कृष्ण अक्रुर रथीं ॥ बाराशतें गोपाळ सांगाती ॥ पायांचे मोगर चालती ॥ कृष्णासवें ॥१७॥

अग्रध्वजी अक्रुर बैसला ॥ कृष्णा सन्मुख जाहला ॥ जैसा प्रेमळ भक्त चालिला ॥ सायुज्यतेसी ॥१८॥

ऐसे पावले कालिंदीतीरा ॥ तंव कृष्ण दिसतसे अक्रुरा ॥ मेघश्याम कांति सुंदरा ॥ दिव्यरुप ॥१९॥

चतुर्भुज श्यामनीळ ॥ कौस्तुभमणी कंठीं सुढाळ ॥ पद्मनेत्र आकर्ण विशाळ ॥ आजानुबाहू ॥१२०॥

झळाळीत पीतांबर ॥ वैजयंती दिव्य हार ॥ शंखचक्रगदाधर ॥ उभयवरदें ॥२१॥

मिरवती कर्णी कुंडलें ॥ बाहू कीर्तिमुखें सुढाळें ॥ हस्ताग्रीं कंकणें सोज्वळें ॥ अनुपम्य पैं ॥२२॥

विस्तीर्ण दिसती ललाटपटलें ॥ शोभती चांचुर कुरळें ॥ उभयाभागीं मिरवती सुनीळें ॥ तेजोमय ॥२३॥

ऐसा देव वैकुंठनाथ ॥ देखोनि अक्रुर होय विस्मित ॥ ह्नणे काय असें मी पाहत ॥ माझिये दृष्टीं ॥२४॥

साच कीं हें वैकुंठभुवन ॥ कीं मज दिसतसे स्वप्न ॥ नातरी माझेंचि अंतर्ध्यान ॥ दृष्टीं वोडवत ॥२५॥

मागुता निर्धारुनि पाहे ॥ तंव रामकृष्ण बैसला आहे ॥ जरी अभ्य़ंतरी पाहे ॥ तरी पूर्वसादृश्य ॥२६॥

ऐसी कल्पितां वासना ॥ आले कालिंदीच्या पुलिना ॥ सकळही उतरले भोजना ॥ नंदादिक ॥२७॥

तीर्थी करोनियां स्त्राना ॥ शुचिर्भूत शौचाचमना ॥ अक्रुर निघाला अनुष्ठाना ॥ संकल्पविधिचे ॥२८॥

गंगाजळी बुडी दीधली ॥ मध्येंच कृष्णमूर्ती भासली ॥ जैसी स्वप्नावस्था देखिली ॥ तैसे देखेजळांत ॥२९॥

क्षणैक ध्यानीं निश्वळ राहिला ॥ परमसंतुष्टे निवाला ॥ वरुणलोकी देखता जाहला ॥ आदिरुप ॥१३०॥

पुढती करी दंडवत ॥ मननध्यानें ठेला पाहत ॥ काकुळती असे करित ॥ भक्तिभावें ॥३१॥

जळीं राहिला वाढवेळा ॥ तेव्हां विसर्जिली लीळा ॥ पाठी निघे बाहेरि जळा ॥ धोत्रेंवरी ॥३२॥

ह्नणे संध्या कोणाची करुं ॥ कोणीकडे पूजावा ईश्वरु ॥ कोणा दावूं उपहारु ॥ अवघा कृष्ण ॥३३॥

तोचि भूमी तोचि नीर ॥ तोचि मी नरदेही अक्रुर ॥ बाह्याभ्यंतरीं सभराभर ॥ असे तोचि ॥३४॥

देवपूजा न करितां आला ॥ ह्नणोनि मग कृष्ण हांसला ॥ लाजेनें राहिला असे ठेला ॥ वरतें न पाहे ॥३५॥

कृष्ण ह्नणे गा अक्रुरा ॥ मी तुझिया जाणें अभ्यंतरा ॥ जे वेळां मथुरे बाहेरा ॥ निघालासि तूं ॥३६॥

तुज केवळ माझी वासना ॥ अनुसरलासि माझिया मना ॥ पुढील सांगतां विवंचना ॥ असे बहुत ॥३७॥

पूर्वी सूचक वर्तलेसे ॥ तें मी तुज सांगितअसें ॥ कंसा सर्वथा मरण असे ॥ माझिये हातें ॥३८॥

मग ते तेथूनि चालिले ॥ मथुराप्रवेश पावले ॥ बारारपालंगी उतरले ॥ नंदादि गौळी ॥३९॥

तेव्हां अक्रुर कृष्णासि विनवी ॥ कीं माझिये मंदिरीं कृपा करावी ॥ मजला सनाथता द्यावी ॥ सेवकासी ॥१४०॥

तंव कृष्ण ह्नणे गा अक्रुरा ॥ तवगृहीं यावया ये अवसरा ॥ उचित नव्हे निर्धारा ॥ कंसा विषाद उपजेल ॥४१॥

आतां त्वां कंसासि उमजवावें ॥ कीं आले नंदादि गौळी आघवे ॥ कृष्णबलदेव तयांसवें ॥ आले आहेती ॥४२॥

येरु तेथोनि त्वरें निघाला ॥ कंसालागीं जाणवी लीळा ॥ मग निजमंदिरासि गेला ॥ अक्रुर तो ॥४३॥

गौळिये सामुग्री घेतली ॥ ते कंसालागीं निवेदिली ॥ रायें सन्मानें अंगिकारिली ॥ अधिकारपणें ॥४४॥

इकडे रामकृष्ण अवधारा ॥ पाहूं चालिले नगर मथुरा ॥ पावले जंव महाद्वारा ॥ तंव रजक भेटला ॥४५॥

कंसगृहींची वस्त्रें सांडलीं ॥ नानापरींची धूतलीं ॥ गर्दभभारीं हारी लाविली ॥ राजद्वारीं येतहोता ॥४६॥

तंव त्यासी बोलिलें कृष्णें ॥ कीं आह्मां दे कां पांघुरणें ॥ मग कंसा भेटां जाइजणें ॥ घेवोनि वस्त्रें ॥४७॥

परि हांसोनि बोले रजक ॥ तुं रानट रे अविवेक ॥ हा बोल बोलतांचि यमलोक ॥ पावसी तूं ॥४८॥

ऐकतां क्रोध आला कृष्णासी ॥ भूमीं आपटिलें त्यासी ॥ वस्त्रें दीधलीं गोपाळांसी ॥ वांटोनि समस्त ॥४९॥

तंव ह्नणे जन्मेजयो ॥ एक असे जी संदेहो ॥ रजक मारणें हा जयो ॥ मिरवूं नये ॥१५०॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ राया पुसिला सांगतों प्रश्न ॥ तरी दोषेंविण नारायण ॥ न दंडी कवणा ॥५१॥

अनेक दाऊनि निमित्त ॥ पूर्वदोषां करी प्रायश्वित ॥ तें ऐकें गा भारता गुप्त ॥ सावधानपणें ॥५२॥

कीं व्हावयासी निमित्त ॥ कृष्ण अवतरला असे गुप्त ॥ रामसीतेसि जाहला वियोग सत्य ॥ तयाचेनि बोलेम ॥५३॥

तरी पूर्वी रामावतारीं ॥ राम होता अयोध्यापुरीं ॥ रात्रीं हिंडतां रजकद्वारीं ॥ पातले हेर रामाचे ॥५४॥

तंव तया रजकाची नारी ॥ पळोनि गेलीसे माहेरीं ॥ तयेसि घेवोनियां सोयरी ॥ आली घरासी ॥५५॥

त्याची माता असे हातारी ॥ तिनें लावालावी केली उत्तरीं ॥ ह्नणे हे नित्य जाते बाहेरी ॥ पळूनियां ॥५६॥

आह्मी ह्नणूं आहे माहेरीं ॥ ते ह्नणती असेल आमुचे घेरीं ॥ हे कवटाळीण हिंडतसे घरोघरीं ॥ न कळे कोणा ॥५७॥

मग रजक कोपला भारी ॥ तेणें तोडिली तिची गळसरी ॥ आणि घालूनियां बाहेरी ॥ काय बोलिला पापिष्ठ ॥५८॥

ह्नणे तो मी नव्हे रामराजा ॥ राक्षसें नेली त्याची भाजा ॥ रावण वधोनियां तयेच्या काजा ॥ तेणें आणिली गृहातें ॥५९॥

हें रामें ऐकिलें हेरवचनीं ॥ ह्नणे निंद्य जाहली लोकवाणी ॥ ह्नणोनि ते पाठविली वनीं ॥ जनकात्मजा ॥१६०॥

ऐसा असे पूर्व संबंध ॥ तो मनी धरोनियां गोविंद ॥ रजकाचा केला शिरच्छेद ॥ इये प्रसंगीं ॥६१॥

तो देव लक्ष्मीनारायण ॥ तया वियोग बोलेल कोण ॥ परि पुराणमतें संबोखुन ॥ सांगितलेम वृत्त ॥६२॥

हे रजकाची पूर्वकथा ॥ भागवतीं नाहीं गा भारता ॥ परि रामायणीं असे वार्ता ॥ वाल्मिकाची ॥६३॥

ऐसा वधिला प्रसंगी रजक ॥ परि कृष्ण परम पुण्यश्लोक ॥ आतां असो हा विवेक ॥ आडकथेचा ॥६४॥

मग भेटला सुदामामाळी ॥ तो पुष्पें नेत होता राउळीं ॥ तंव बोलिले वनमाळी ॥ मार्गी तयासी ॥६५॥

कीं बकुळचंपकाच्या सरा ॥ आह्मांसि दे कां रे बनकरा ॥ तेणें सौरभ्यें कंसासुरा ॥ भेटों आह्मीं ॥६६॥

येरु पुष्पें देवोनि त्वरिता ॥ ह्नणे तुजहूनि कोण आहे भोक्ता ॥ ऐकतां आनंद जाहला चित्ता ॥ गोपिनाथाचे ॥६७॥

तंव नगरीं आले सामोरे ॥ श्रृंगारिले हाट चौबारे ॥ उभविलीं गुढिया मखरें ॥ नगरामाजी ॥६८॥

ऐसे चालिले चौबारां ॥ तंव रामावतारीमची मंथरा ॥ ते मार्गी भेटली अवधारा ॥ कुबिजा नावें ॥६९॥

ते कंसासि नेतां चंदन ॥ कृष्णें मागितला अडवून ॥ तंव तेचि स्वहस्तें करुन ॥ चर्चीतसे कृष्णासी ॥१७०॥

कृष्णें चरण ठेविला चरणांगुष्ठी ॥ वामकरें धरिली हनुवटी ॥ मग उद्धरिली व्यंकटी ॥ कुबिजा ते ॥७१॥

तंव ते सुंदरा कामदृष्टीं ॥ कृष्णासि धरितसे मनगटीं ॥ आणि हावभावांचिया गोष्टी ॥ करिती जाहली ॥७२॥

तयेसि कृष्ण ह्नणे हो नारी ॥ मी नेमस्थ आहें ब्रह्मचारी ॥ परि कंस भेटलियावरी ॥ भेटेन तुज ॥७३॥

मग तेथोनि चालिले साटोप ॥ तंव पावले धनुर्यागमंडप ॥ पूजिलिया धनुष्या सन्मुख ॥ जाहले येते ॥ ॥७४॥

तेथें दोनशत धनुर्धर ॥ तीनशत उभे खांडेकर ॥ शेले सांबळीचे झुंजार वीर ॥ पांचशतें पैं ॥७५॥

तिहीं देखिले येतयेत ॥ रामकृष्ण गोपांसहित ॥ कीं हे यात्रेसि आले ह्नणत ॥ भोंवतील आह्मां ॥७६॥

रामकृष्ण निघाले भीतरें ॥ गोपाळ ठेविले माघारे ॥ पाड घ्यावया पूजाकरें ॥ पुढें उभे असती ॥७७॥

तंव दोनी उचलिलीं धनुष्येम ॥ वोढी काढितां महातबकें ॥ परि वोढि बळ न पुरे हरिखें ॥ यास्तव कडकडलीं महरवें ॥७८॥

तो उठिलासे महागजर ॥ जाणों खचला गिरिवर ॥ गजबजोनियां परिवार ॥ खड्रवीर उठावले ॥७९॥

देखोनि रामकृष्ण कोपले ॥ धांवोनि मंडपस्तंभ उपटिले ॥ तेचि हतियार असे केलें ॥ निर्दाळणासी ॥१८०॥

एक पळती मोकळे केशीं ॥ सांगूं गेले ते राउळीं वार्ता ऐकिली ॥ कंसासुरासी ॥ एकीं धरोनियां भूमीसी ॥ त्रासले पैं ॥८१॥

ऐसी केली रवंदळी ॥ धनुर्यागाची बोणी जाहली ॥ ते राउळीं वार्ता ऐकिली ॥ कंसासुरें ॥८२॥

कंसासि जाणविती हेर ॥ कीं दोनी असती जी कुमर ॥ गोरे सांवळे सुकुमार ॥ बाळवयसा ॥८३॥

सवें गोपाळांची राउळी ॥ ते आले धनुष्यांजवळी ॥ दोघीं दोनी बळें वोढिलीं ॥ महाधनुष्यें ॥८४॥

धनुष्यांसि भरतां कानाडी ॥ मध्येच जाहली आडमोडी ॥ जैशीं उंसाचीं मोडिती कांडी ॥ बाळलीलें ॥८५॥

मग स्तंभ घेवोनि मंडपाचे ॥ सैन्य मारिलें आमुचें ॥ तेथोनि आह्मीं पळालों जिवाचे ॥ काकुळतीस्तव ॥८६॥

कंस ऐके इतुकी गोष्टी ॥ तंव रजक आले बोभाटी ॥ ह्नणती नगरद्वारीं जाहली मोठी ॥ नागवण पैं ॥८७॥

वस्त्रें अवघीं घेवोनि गेले ॥ सकळ रजकांसि मारिलें ॥ आह्मां देखतां पांघुरले ॥ वस्त्रें तुमची ॥ ॥८८॥

कंस पुसतसे ते कोण ॥ तंव ह्नणती जेकां दोघेजण ॥ मग येरु ह्नणे मिळाली खूण ॥ तेंचि सत्य ॥८९॥

इतुकें तेथं वर्तले ॥ तंव दासीमुखें ऐकिलें ॥ कीं आजि आमुचें हरिलें ॥ परिमळद्रव्य ॥१९०॥

कंस विस्मित मनीं ठेला ॥ ह्नणे नगरीं नागवो जाहला ॥ इतुका लोक मारिला ॥ असतां आह्मी ॥९१॥

अंतरीं लागली महाचिंता ॥ श्रीकृष्णाचा प्रताप ऐकतां ॥ दुःखे जाहला विव्हळ सर्वथा ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥९२॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ चतुर्थस्तबक मनोहरु ॥ श्रीकृष्णप्रतापप्रकारु ॥ षष्ठोऽध्यायीं सांगितला ॥१९३॥ ॥ शुभंभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP