एकनाथी भागवत - श्लोक १ ला

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


श्रीभगवानुवाच -

गुणानामसमिश्राणां पुमान्येन यथा भवेत् ।

तन्मे पुरुषवर्येदमुपधारय शंसतः ॥१॥

ज्याचेनि चरणें पवित्र क्षिती । नामें उद्धरे त्रिजगती ।

ज्याची ऐकतां गुणकीर्ती । क्षयो पावती महापापें ॥३९॥

ज्याचें मृदु मधुर अविट नाम । उच्चारितां निववी परम ।

तो उद्धवासी पुरुषोत्तम । आवडीं परम बोलत ॥४०॥

सत्व रज तम तिनी गुण । न मिसळतां भिन्नभिन्न ।

पुरुषापासीं एकैक गुण । उपजवी चिन्ह तें ऐका ॥४१॥

निःसंदेह सावधान । निर्विकल्प करुनि मन ।

ऐकतां माझें वचन । पुरुषोत्तम पूर्ण होइजे स्वयें ॥४२॥

माझे स्वरुपीं सद्भावता । ते पुरुषाची उत्तमावस्था ।

माझे वचनीं विश्वासतां । पुरुषोत्तमता घर रिघे ॥४३॥

ऐशी उत्तमा अतिउत्तम । निर्गुण पदवी निरुपम ।

तुज मी अर्पितसें पुरुषोत्तम । माझें वचन परम विश्वासल्या ॥४४॥

भक्तिभावार्थें परम श्रेष्ठा । वचनविश्वासीं अतिवरिष्ठ ।

यालागीं उद्धवासी पुरुषश्रेष्ठ । स्वमुखें वैकुंठ संबोधी ॥४५॥

संसारीं योनि अनेग । त्यामाजीं मनुष्यत्व अतिचांग ।

तेंही अविकळ अव्यंग । संपूर्ण सांग निर्दुष्ट ॥४६॥

सकळ देहांमाजीं जाण । असे पुरुषदेहप्राधान्य ।

त्याहीमाजीं विवेकसंपन्न । वेदशास्त्रज्ञ मुमुक्षू ॥४७॥

वेदशास्त्रविवेकसंपन्न । त्याहीमाजीं ज्या माझें भजन ।

भजत्यांमाजीं अनन्य शरण । सर्वस्वें जाण मजलागीं ॥४८॥

सर्वस्वें जे अनन्य शरण । तेथ माझी कृपा परिपूर्ण ।

माझे कृपें माझें ज्ञान । पावोनि संपन्न मद्भजनीं ॥४९॥

येंहीं गुणीं विचारितां लोक । आथिला दिसे उद्धव एक ।

त्यालागीं यदुनायक । पुरुषवर्याभिषेक वचनें करी ॥५०॥

ऐसें संबोधूनि उद्धवासी । त्रिगुणगुणस्वभावांसी ।

सांगतां प्रथम सत्वासी । हृषीकेशी उपपादी ॥५१॥

उदंड सत्वाचीं लक्षणें । त्यांत पंधरा बोलिलीं श्रीकृष्णें ।

तेंचि ऐका कोणकोणें । निजनिरुपणें हरि सांगे ॥५२॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP