एकनाथी भागवत - श्लोक २६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


स्वे स्वेऽधिकारे या निष्ठा, सगुणः परिकीर्तितः ।

कर्मणां जात्यशुद्धानामनेन नियमः कृतः ।

गुणदोषविधानेन, सङगानां त्याजनेच्छया ॥२६॥

न प्रेरितां शास्त्रें श्रुतीं । विषयीं स्वाभिवक प्रवृत्ती ।

तिची करावया निवृत्ती । माझी वेदोक्ती प्रवर्तली ॥४॥

एकाएकीं विषयत्यजन । करावया अशक्त जन ।

त्यासी वेद दावी दोषगुण । त्यागावया जाण विषयांसी ॥५॥

हे माता हे सहोदर । येथ करुं नये व्यभिचार ।

हे वेद न बोलता अधिकार । तैं यथेष्टाचार विषयांचा ॥६॥

जेथवरी स्त्रीपुरुषव्यक्ती । तेथवरी कामासक्ती ।

मी नेमितों ना वेदोक्ती । तैं व्यभिचारप्राप्ती अनिवार ॥७॥

सकळ स्त्रिया सांडून । त्यजूनियां इतर वर्ण ।

सवर्ण स्त्री वरावी आपण । अष्टवर्षा जाण नेमस्त ॥८॥

तिचें वेदोक्त पाणिग्रहण । तेथ साक्षी अग्नि आणि ब्राह्मण ।

इतर स्त्रियांची वाहूनि आण । स्वदारागमन विध्युक्त ॥९॥

यापरी म्यां सकळ लोक । स्त्रीकामें अतिकामुक ।

स्वदारागमनें देख । केले एकमुख वेदोक्तीं ॥३१०॥

याचिपरी म्यां अन्नसंपर्क । वेदवादें नेमिले लोक ।

येरवीं वर्णसंकर देख । होता आवश्यक वेदेंवीण ॥११॥

तो चुकवावया वर्णसंकर । वर्णाश्रमांचा प्रकार ।

वेद बोलिला साचार । विषयसंचार त्यागावया ॥१२॥

विषयांची जे प्रवृत्ती । तेचि ’अविद्या’ बाधा निश्चितीं ।

जे विषयांची अतिनिवृत्ती । ती नांव ’मुक्ति’ उद्धवा ॥१३॥

करावया विषयनिवृत्ती । वेदें द्योतिली कर्मप्रवृत्ती ।

वर्णाश्रमाचारस्थिती । विषयासक्तीच्छेदक ॥१४॥

नित्य नैमित्तिक कर्मतंत्र । नाना गुणदोषप्रकार ।

वेदें द्योतिले स्वाधिकार । विरक्त नर व्हावया ॥१५॥

स्वकर्में होय चित्तशुद्धी । तेणें वैराग्य उपजे त्रिशुद्धी ।

वैराग्य विषयावस्था छेदी । गुणकार्यउपाधी रजतम हे ॥१६॥

तेव्हां उरे शुद्ध-सत्त्वगुण । तेथें प्रकटे गुरुभजन ।

गुरुभजनास्तव जाण । ज्ञान विज्ञान घर रिघे ॥१७॥

पूर्ण करितां भगवद्भक्ति । तैं गुरुभजनीं अधिकारप्राप्ती ।

सद्गुरुमहिमा सांगों किती । मी आज्ञावर्ती गुरुचा ॥१८॥

गुरु ज्यावरी अनुग्रहो करी । त्यासी मी भगवंत उद्धरीं ।

आदरें वाऊनियां शिरीं । निजऐश्वर्यावरी बैसवीं ॥१९॥

गुरु परमात्मा परेशु । ऐसा जयाचा विश्वासु ।

त्याचा अंकिला मी हृषीकेशु । जो जगदीशु जगाचा ॥३२०॥

जेथ मी अंकित झालों आपण । तेथ समाधीसीं ज्ञानविज्ञान ।

वोळंगे गुरुभक्ताचें अंगण । तेथ केवा कोण सिद्धींचा ॥२१॥

त्या गुरुचें करुनि हेळण । जो करी माझें भजन ।

तेणें विखेंसीं मिष्टान्न । मज भोजन घातलें ॥२२॥

तोंडीं घास डोईं टोला । ऐसा भजनार्थ तो झाला ।

तो जाण सर्वस्वें नागवला । वैरी आपला आपणचि ॥२३॥

येथवरी गुरुचें महिमान । माझेनि वेदें द्योतिलें जाण ।

करुनि विषयनिर्दळण । स्वाधिकारें जन तरावया ॥२४॥

यालागीं ज्यासी जो अधिकार । तो तेणें नुल्लंघावा अणुमात्र ।

हा वेदें केला निजनिर्धार । स्वकर्में नर तरावया ॥२५॥

तरी म्हणशी कर्मचि पावन । हेंही सर्वथा न घडे जाण ।

स्वाधिकारेंवीण कर्माचरण । तें अतिदारुण बाधक ॥२६॥

संन्यासी करी गृहस्थधर्म । तें त्यासी वोडवलें अकर्म ।

गृहस्थ करी करपात्रकर्म । तोचि अधर्म तयासी ॥२७॥

हितासी वोखद घेतां जाण । त्याचें चुकलिया अनुपान ॥

तेंचि अन्यथा होय आपण । पीडी दारुण मरणान्त ॥२८॥

तैसें अनधिकारें करितां कर्म । तेंचि बाधक होय परम ।

हें वेदें जाणोनियां वर्म । स्वधर्म सुगम नेमिले ॥२९॥

स्वाधिकारें स्वधर्मनिष्ठा । हाचि पुरुषाचा गुण मोठा ।

तेणें फिटे गुणकर्ममळकटा । प्रिय वैकुंठा तो होय ॥३३०॥

वेदें बोलिला जो गुण । तो अंगीकारावा आपण ।

वेदें ठेविलें ज्यासी दूषण । तें सर्वथा जाण त्यजावें ॥३१॥

हेंचि गुणदोषलक्षण । करितां वेदविवंचन ।

गुंतले गा अतिसज्ञान । माझे कृपेवीण वेदार्थ न कळे ॥३२॥

निषेधमुखेंकरितां त्यागु । वेद त्यागवी विषयसंगु ।

हें वर्म जाणोनि जो चांगु । तो होय निःसंगु महायोगी ॥३३॥

उद्धवा हें वेदतत्त्वसार । तुज म्यां सांगितलें साचार ।

ज्यालागीं शिणताति सुरनर । ऋषीश्वर तपस्वी ॥३४॥

परी माझे कृपेवीण सर्वथा । हें न ये कोणाचिये हाता ।

तें तुज म्यां सांगितलें आतां । तुझे हितार्था निजगुह्य ॥३५॥

मागें म्यां केलें निरुपण । गुणदोष देखणें तो दोष जाण ।

त्याचेंही विशद विवेचन । तुज मीं संपूर्ण सांगितलें ॥३६॥

पराचा देखावा दोषगुण । हें नाहीं नाहीं माझें वेदवचन ।

दोष त्यजोनियां आपण । घ्यावा गुण हा वेदार्थ ॥३७॥

त्यजोनि पराचे दोषगुण । स्वयें गुण घ्यावा आपण ।

हेंही माझे कृपेवीण । नव्हे जाण उद्धवा ॥३८॥

न देखोनि पराचे दोषगुण । स्वयें होइजे ब्रह्मसंपन्न ।

म्हणशी ऐशी कृपा परिपूर्ण । केवीं आपण लाहिजे ॥३९॥

तेचिविखींचें निरुपण । कृपेनें सांगताहे श्रीकृष्ण ।

माझे कृपेचें आयतन । उद्धवा जाण मद्भक्ती ॥३४०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP