एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


एष वै परमो योगो, मनसः संग्रहः स्मृतः ।

हृदययज्ञत्वमन्विच्छन्, दम्यस्येवार्वतो मुहुः ॥२१॥

जैसा वारु उपलाणी । वश्य करी अश्वसाहणी ।

मागें तरटांचा कर झणाणी । पुढें राखे नेहटुनी रागबागा ॥१६॥

तेथ जें जें पाऊल वोजा करी । तेथ मान दे जीजीकारीं ।

जेथ फुटोनि पडे बाहेरी । तेथ तरट मारी सवर्म ॥१७॥

जेथ हटावला न सांडी खोडी । ते ठायीं दे मोकळवाडी ।

परी निःशेष पीडी ना सोडी । ऐसा पडिपाडीं राखत ॥१८॥

दमनीं देखोनि अत्यादरु । स्वामीहृदय जाणे वारु ।

आणि वारुवाचें अभ्यंतरु । कळे साचारु स्वामीसी ॥१९॥

ऐसें उभयहृदय-ऐक्ययोगें । वारु न धरितां रागबागें ।

अडणें उडणें सांडी वेगें । मग नाचों लागे मोकळा ॥२२०॥

ऐसें वश्य केलिया अश्वातें । मग कर्त्याचिया मनोगतें ।

वारु नाचे काचेनि सुतें । यापरी मनातें दमावें ॥२१॥

मनोजयो कीजे आपण । तोचि ’परमयोग’ कारण ।

हेंचि मागिले श्लोकीं निरुपण । तुज म्यां संपूर्ण सांगितलें ॥२२॥

’नृदेहमाद्यं’ या श्लोकाचे अंतीं । कर्मवैराग्यद्वारा मुक्ती ।

आतां सांगितली हे स्थिती । उत्तमगतीं अभ्यासें ॥२३॥

मुख्यतः सांख्ययोगें माझी प्राप्ती । तें मी सांगेन तुजप्रती ।

मिथ्या संसाराची स्फूर्ती । ब्रह्मसंविती साचार ॥२४॥

हें ज्ञानगहन निरुपण । तुज मी सांगेन गुह्य ज्ञान ।

जें असोनि त्रिगुणीं वर्तमान । अलिप्त जाण गुणकार्या ॥२५॥

’तुज मी सांगेन गुह्य ज्ञान’ । हें ऐकोनि देवाचें वचन ।

उद्धव स्वयेंचि झाला कान । अतिसावधान श्रवणार्थी ॥२६॥

देखोनि उद्धवाचा अत्यादरु । आर्तचित्तचकोरचंद्रु ।

निजज्ञानगुणसमुद्रु । काय यादवेंद्रु बोलिला ॥२७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP