मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठरावा|

एकनाथी भागवत - श्लोक ४८ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


एतत्तेऽभिहितं साधो भवन्पृच्छति यच्च माम् ।

यथा स्वधर्मसंयुक्तो भक्तो मां समियात्परम् ॥४८॥

इति श्रीभागवते महापुराणे पारमहंस्यां संगितायामेकादशस्कन्धे अष्टादशोऽध्यायः ॥१८॥

उद्धवा पुसिलें त्वां मजप्रती । स्वधर्में केवीं घडे मुक्ती ।

भक्तीनें पाविजे निजमुक्ती । तें म्यां तुजप्रती सांगितले ॥७८॥

हाता आलिया स्वधर्म । तत्काळ निरसे स्वकर्म ।

उडोनि जाय भवभ्रम । प्राप्ती परम स्वधर्में ॥७९॥

माझिया प्राप्तीलागीं स्वकर्म । नैराश्यें आचरावा स्वधर्म ।

हें ज्यासी कळे वर्म । तया पुरुषोत्तम सदा वश्य ॥३८०॥

स्वधर्माऐसा स्पर्शमणी । सांपडल्या निर्विकल्पपणीं ।

तो लावितां दृश्यस्थानीं । चिन्मात्रसुवर्णीं तेज उठी ॥८१॥

स्वधर्माऐसा दिनमणी । नैराश्यें उगवलिया स्वभुवनीं ।

तो अज्ञाननिशा निरसुनी । स्वप्रकाशपणीं सदा वर्ते ॥८२॥

स्वधर्माऐसें निज‍अमृत । जे निर्विकल्पें सेवूं जाणत ।

त्यांसी जन्ममरणांचा आवर्त । मी श्रीअनंत लागों नेदीं ॥८३॥

जे कां स्वधर्मीं विमुख । त्यासीं माझी प्राप्ती नाहीं देख ।

जन्मकोटी परम दुःख । सकामें मूर्ख भोगिती ॥८४॥

त्या स्वधर्माची अतर्क्य गोष्टी । न कळे नैष्कर्में निजदृष्टीं ।

याचिलागीं जन्मकोटी । अतिसंकटीं जीव भोगी ॥८५॥

स्वधर्में करितां स्वकर्म । जैं नैष्कर्म्यतेचें कळे वर्म ।

तैं विभांडूनि मरणजन्म । परब्रह्म पावती ॥८६॥

एवं स्वधर्म यापरी । तारक होय संसारीं ।

स्वधर्माचे नावेवरी । तरले भवसागरीं निजभक्त ॥८७॥

संसार तरले हा बोलु कुडा । स्वधर्म करितं माझिया चाडा ।

होय भवसागर कोरडा । मी सांपडें पुढा निजात्मा ॥८८॥

ऐशी स्वधर्माची थोरी । निष्कामतेच्या निजकुसरी ।

देवो सांगे आवडीभरीं । नानापरी प्रबोधें ॥८९॥

भक्तिप्राधान्य भागवत । मुख्य भक्ति ते स्वधर्मयुक्त ।

येणें स्वधर्मभजनें समस्त । परम भागवत उद्धरले ॥३९०॥

त्या स्वधर्मकर्माचा एकान्त । निजभजनभक्तीचा भावार्थ ।

उद्धवासी श्रीकृष्णनाथ । स्वयें सांगत एकादशीं ॥९१॥

त्या एकादशाच्या गोष्टी । स्वधर्मकर्माची कसवटी ।

एका जानार्दनकृपादृष्टीं । टीका मराठी हे केली ॥९२॥

हे करणी केली जनार्दनें । मज अभंगीं घातलें तेणें ।

शेखीं मीतूंपणाचे ठाणें । येणें निरूपणें उडविलें ॥९३॥

उडविलें विषयीं विषयपण । उडविले भेदाचें भान ।

उडविलें जीवशिवपण । जनीं जनार्दन तुष्टोनी ॥९४॥

जनार्दनें जनकें तेणें । आम्हां केलें परब्रह्म खेळणें ।

यालागीं सकळ क्रिया तेणें होणें । स्वधर्मपणें सहजेंचि ॥९५॥

सहजीं लागल्या स्वधर्म । कर्मचि होय निष्कर्म ।

संसार होय परब्रह्म । हे कृपा परम जनार्दनीं ॥९६॥

यालागीं सांडूनियां एकपण । एका जनार्दन शरण ।

स्वधर्मकर्माचें निरूपण । झालें संपूर्ण तया कृपा ॥९७॥

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे

एकाकारटीकायां वानप्रस्थसंन्यासधर्मनिरूपणं नाम अष्टादशोऽध्यायः ॥९८॥

॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ओंव्या ३९७॥श्लोक ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP