मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अकरावा|
श्लोक २० वा

एकनाथी भागवत - श्लोक २० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


यस्यां न मे पावनमङ्ग कर्म स्थित्युद्‍भवप्राणनिरोधमस्य ।

लीलावतारेप्सितजन्म वा स्याद् वन्ध्यां गिरं तां बिभृयान्न धीरः ॥२०॥

जगातें पवित्र करिती । महादोषांतें हरिती ।

माझीं नामकर्में गुणकीर्ती । जड उद्धरती हरिनामें ॥४॥

म्हणसी तूं बोलिलासी निजवर्म । मी विद्याविद्यातीत ब्रह्म ।

त्या तुज कैंचे गुण नाम कर्म । कीर्तनधर्म केवीं घडे ॥५॥

उद्धवा हें मनीं न धरीं । मी स्वलीला स्वमायें करीं ।

नाना अवतारांतें धरीं । न करूनि करीं स्थित्यंतू ॥६॥

त्रिगुणगुणी गुणावतार । ब्रह्मा आणि हरिहर ।

तिहीं रूपीं मीच साचार । चराचर करीं हरीं ॥७॥

स्त्रष्टारूपें मी स्त्रजिता । विष्णुरूपें मी प्रतिपाळिता ।

रुद्ररूपें मी संहर्ता । जाण तत्त्वतां मी एकू ॥८॥

बाल्यतारुण्यवार्धक्यांसी । एक पुरुष तिहीं अवस्थांसी ।

तेवीं उत्पत्तिस्थितिप्रळयांसी । गुणकर्मांसी मी कर्ता ॥९॥

मी कर्ताचि अकर्ता । अकर्तेपणे कर्ता ।

हें माझें मीचि जाणें तत्त्वतां । आणिकासी सर्वथा कळेना ॥६१०॥

हींचि माझीं नामकर्में गातां । माझी पदवी लाभे वक्ता ।

माझे लीलावतार कीर्तितां । कीर्तिमंतां निजलाभू ॥११॥

अवतारांमाजीं उत्तमोत्तम । श्रीरामकृष्णादिजन्मकर्म ।

नाना चरित्रें संभ्रम । अविश्रम जे गाती ॥१२॥

सेतु बांधिला अवलीळा । सागरीं तारिल्या शिळा ।

गोवर्धनु उचलिला हेळा । दावानळा प्राशिलें ॥१३॥

ताटिका वधिली एके बाणीं । पूतना शोखिली तानेपणीं ।

अहल्या तारिली चरणीं । यमलार्जुन दोन्ही उद्धरिले ॥१४॥

रावणू आदळला धनुष्य वाहतां । तें भंगोनि पर्णिली सीता ।

मथूनि चैद्यादि समस्तां । भीमकदुहिता आणिली ॥१५॥

मारिला सुबाहु खरदूषणू । अघ बक केशिया मारी श्रीकृष्णू ।

सुग्रीवू स्थापिला राज्य देऊनू । येरें उग्रसेनू स्थापिला ॥१६॥

मेळवूनि वानरांचा पाळा । वधू केला राक्षसकुळा ।

मेळवून बाळां गोपाळां । मल्लां सकळां मर्दिलें ॥१७॥

रावणकुंभकर्णां केला मारू । मारिला कंसचाणूरू ।

रामें ठकिला वाली वानरू । (कृष्णे) ठकिला महावीरू काळयवनू ॥१८॥

रामें बिभीषण स्थापिला । कृष्णें धर्म संस्थापिला ।

एक पितृवचनें वना गेला । एक घेऊनि आला गतपुत्र ॥१९॥

हीं अवतारचरित्रें वर्णितां । चोरटा वाल्मीकि झाला तत्त्वतां ।

व्यास जारपुत्र सर्वथा । केला सरता तिहीं लोकीं ॥६२०॥

या दोहीं अवतारांची पदवी । वर्णितां दोन्ही झाले महाकवी ।

व्यास वाल्मीकि वंदिजे देवीं । कीर्तिगौरवीं गौरविले ॥२१॥

त्या महाकवींची कवित्वकथा । शेष नेत्रद्वारें श्रवण करितां ।

दोन सहस्त्र नयनीं आइकतां । धणी सर्वथा बाणेना ॥२२॥

हेचि कथा स्वर्गाच्या ठायीं । श्रवण करावया पाहीं ।

इंद्र लागे बृहस्पतीचे पायीं । कीर्ति लोकत्रयीं वर्णिती ॥२३॥

असो कथेचें महिमान । माझेनि नाममात्रें जाण ।

तारिला अजामिळ ब्राह्मण । गजेंद्रउद्धरण हरिनामें ॥२४॥

पक्ष्याचे मिषेंकरूनी । रामु या दों अक्षरस्मरणीं ।

महादोषांची श्रेणी । तत्काळ कुंटिणी तारिली ॥२५॥

माझिया नामासमान । नव्हे वेदशास्त्रशब्दज्ञान ।

वेदशास्त्रांचा बोधु कठिण । तैसें जाण नाम नव्हे ॥२६॥

पठणमात्रें वेदशास्त्रवक्ता । नव्हे मजमाजीं येणेंचि सरता ।

स्वभावें माझें नाम घेतां । अतिपढियंता मज होये ॥२७॥

वेदशास्त्रांचा अधिकारी ब्राह्मण । नामासी अधिकारी चार्‍ही वर्ण ।

जग उद्धरावया कारण । नाम जाण पैं माझें ॥२८॥

जेथ नित्य नामाचा उच्चार । तेथ मी असें साचार ।

येथ करणें न लगे विचार । नाम सधर तारावया ॥२९॥

ते माझे जन्म नाम कीर्ति गुण । जे वाचेसी नाहीं पठण ।

ते वाचा पिशाचिका जाण । वृथालापन वटवटी ॥६३०॥

माझे कीर्तीवीण जें वदन । तें केवळ मद्यपानाचें भाजन ।

त्या उन्मादविटाळाभेण । नाम जाण तेथ न ये ॥३१॥

जेथ उच्चारू नाहीं नामाचा । ते जाणावी वांझ वाचा ।

गर्भ न हरिकथेचा । निष्फळ तिचा उद्योगू ॥३२॥

उद्धवासी म्हणे श्रीरंगू । आइकें बापा उपावो चांगू ।

माझा नाममार्ग सुगमू सांगू । न पडे पांगू आणिकांचा ॥३३॥

हरिनामेंवीण वाणी । कदा न राखावी सज्जनीं ।

हाचि अभिप्रावो चक्रपाणीं । प्रीतिकरोनि सांगीतला ॥३४॥

करूनियां शब्दज्ञान । अतियोग्यतां पंडितपण ।

तेणें माझी प्राप्ति नव्हे जाण । वैराग्येंवीण सर्वथा ॥३५॥

अथवा वैराग्यही जालें । परी तें विवेकहीन उपजलें ।

जैसें धृतराष्ट्रा ज्येष्ठत्व आलें । नेत्रेंवीण गेलें स्वराज्य ॥३६॥

तैसें वैराग्य विवेकेंवीण । केवळ आंधळें अनधिकारी जाण ।

नाहीं सन्मार्गदेखणेपण । वृथा परिभ्रमण तयाचें ॥३७॥

जो विवेकें पूर्ण भरित । त्यावरी वैराग्य वोसंडत ।

माझी जिज्ञासा अद्‍भुत । तेंचि निश्चित सांगतू ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP