मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सप्तशती गुरूचरित्र|

श्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय ६

श्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.


कथा असी परिसून । नामधारक करी प्रश्न । म्हणे सर्व क्षेत्रें त्यजून । ये गोकर्णक्षेत्रीं कां हा ॥१॥

शैव धर्में रावणमाता । कैलासाची धरुनि चिंता । मृन्मयलिंग पूजिता । ये श्रीमत्ता सुता खेद ॥२॥

तो आश्‍चर्य मानून । म्हणे कैलास आणून । देतों, दे हीमाती त्यजून । असें म्हणून चालिला ॥३॥

बळें मूळासह कैलासा । उचलितां हाले सहसा । भिवूनिगौरी वदे गिरिशा । प्रळय कसा हा वारी ॥४॥

तैं कैलासा चेपी हर । खालीं रगडे निशाचर । मरणोन्मुख हो करी स्तोत्र । तेणें हर प्रसन्न हो ॥५॥

त्वदन्य न मला त्राता । तूंचि माझा प्राणदाता । दयाळू तूं राखें आतां । असें म्हणतां सोडी शंभू ॥६॥

त्वां अनुमान न करितां । शिवा सोडविलें आतां । असें म्हणूनी तो गीता । गाता झाला सप्तस्वरें ॥७॥

गायी संम्यक्‌ रागरागिणी । निजशिर छेदुनि । त्याचा वीणा करुनी । काल साधुनि प्रेमानें ॥८॥

शिव तयाच्या गाण्यासी । भुलोनी ये तयापाशीं । आत्मलिंग देउनि त्यासी । म्हणे होसी तूंच शंभू ॥९॥

ये हाता अमरता । तीन वर्षें हें पूजितां । लंका कैलासचि ताता । होईल आतां निःसंशय ॥१०॥

अवनिवरी मध्यें जरी । ठेवितां न ये करीं । येणें परी नेई पुरीं । काय करिसी कैलासा ॥११॥

शिवा करुनी नमन । पुरा जाई रावण । त्वरें नारद जाऊन । करी कथन सर्व इंद्रा ॥१२॥

अधर्मा त्या जाणून । इंद्र ब्रम्ह्या दे सांगून । तोही विष्णूसी कथून । ये घेऊन शिवाप्रती ॥१३॥

त्या अनुचितकर्मे हर । पश्चात्तापें म्हणे विसर । पडला झाला पाव प्रहर । गेला क्रूर येथोनियां ॥१४॥

देव बंदींत पडले । विष्णू म्हणे तुज कळलें । तरी कां हें असें केलें । जड ठेलें पुढें मज ॥१५॥

जो आधी मारी जीव । तया केला चिरंजीव । वरदान सांगे शिव । म्हणे उपाय करीं तूं ॥१६॥

ऐसें निगुती ऐकून । नारदा दे पाठवून । विष्णू करावया विघ्न । धाडी विघ्ननायकातें ॥१७॥

मुनी मनोवेगें तया । गांठुनि लोटी काळ वायां । धाडी संध्या करावया । गणराया तव आला ॥१८॥

त्या मानुनी ब्रह्मचारी । तो न घेतां त्याचे करीं । रावण दे लिंग तरी । अवधारी म्हणे बटू ॥१९॥

स्वपोष्य मी अतिदीन । तीन वार बोलावीन । जड होतां खालीं ठेवीन । दोष ने मग मला ॥२०॥

स्वर्गलोकीं सुर पाहतां । बोलावी त्या अर्घ्य देतां । तीन वेळ तो न येतां । तो स्थापिता झाला लिंग ॥२१॥

त्यानें केलें तें स्थापन । रावणा न हाले म्हणून । महाबळी हो गोकर्ण । क्षेत्र जाण भूकैलास ॥२२॥

इति श्री०प०प०वा०वि० गोकर्णमहाबळेश्वरप्रतिष्ठापनं नाम षष्ठो०

N/A

References : N/A
Last Updated : March 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP