विवेकचूडामणी - श्लोक संग्रह ३०१-३५०

विवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.


तमोगुणाने अतिशय मूढ झालेल्या बुद्धीने शरीरावर कल्पिलेला जो अहंकार 'हे शरीर मी आहे' अशा प्रकारे प्रतीतीस येत आहे. त्याचाच पूर्णपणे लय झाला असता ब्रह्मात्मभाव निष्प्रतिबंध होतो. ॥३०१॥

सत्त्व, रज आणि तम या तीन प्रचंड फडा ज्याला आहेत असा जबरदस्त आणि भयंकर अहंकार नावाचा सर्प आपल्या शरीराने ब्रह्मानंदरूप निधीला वेढून त्याची राखण करीत आहे. श्रुतीचे ज्याला साहाय्य आहे अशा विज्ञान नावाच्या मोठ्या तरवारीने तीन फडा तोडून अर्थात या सर्पाचे निर्मूलन करून सुखकर निधीचा उपभोग घेण्यास धीर पुरुषच समर्थ आहे. ॥३०२॥

जोपर्यंत शरीरात थोडा देखील विषाचा विकार जाणवत असेल, तोपर्यंत आरोग्य कसे होईल. तद्वत जोपर्यंत योग्याच्या आंगी अहंता आहे तोपर्यंत मुक्ति कशी होईल? ॥३०३॥

अहंकाराची अतिशय निवृत्ती, त्याने केलेल्या विकल्पाचा लय आणि प्रत्यगात्म्याचा विवेक यापासून 'हे (ब्रह्म) मी आहे' अशा प्रकारचे सत्य स्वरुप प्राप्त होते. ॥३०४॥

आत्म्याचे प्रतिबिंब ज्यात आहे, जो आत्म्याच्या (मूळच्या) स्थितीचा लोप करणारा, विकारी आणि कर्ता अशा अहंकारावरची अहंबुद्धि तू एकदम सोडून दे. कारण, प्रत्यग्रूप, चैतन्यरूप आणि आनंदरूप अशा तुला या अहंकाराच्या अध्यासामुळे जन्म, जरा, मरण आणि दुःख यांनी भरलेला असा संसार प्राप्त झाला आहे. ॥३०५॥

सर्वदा एकरूप, चेतन, व्यापक, आनन्दमूर्ति, शुद्धकीर्तीमान आणि निर्विकार अशा तुला या एका अहंकाराच्या अध्यासावाचून दुसर्‍या कोणत्याही प्रकाराने कोठेही संसार नाही. ॥३०६॥

जेवणार्‍या घशात जसा काटा असावा, तशा तर्‍हेचा भासणारा जो हा अहंकाररूप आपला शत्रु त्याला विज्ञानरूप मोठ्या तरवारीने छाटून तू उघडपणे आपल्या साम्राज्यसुखाचा यथेष्ट अनुभव घे. ॥३०७॥

तस्मात्, परमार्थाचा लाभ झाल्यामुळे ज्याने विषयांवरची आवड सोडून दिली आहे असा तू अहंकारादिकांच्या वृत्तीला लयास नेऊन आणि आत्मसुखाच्या अनुभवाने निर्विकल्प होऊन ब्रह्माचे ठाई पूर्णरूपाने गुपचूप रहा. ॥३०८॥

जबरदस्त अहंकार समूळ कापून टाकला तथापि चित्त जर त्याला पुन्हा क्षणमात्र उकरून काढील, तर तो पुन्हा जिवंत होऊन पावसाळ्यात वायूने फिरून आणलेल्या ढगाप्रमाणे शेकडो विक्षेप उत्पन्न करील. ॥३०९॥

अहंकाररूप शत्रूचे निर्मूलन केल्यानंतर फिरून विषयांच्या चिंतनाने त्याला कधीही सवड देऊ नये कारण ही सवडच, सुकलेल्या लिंबाच्या झाडाला पुन्हा जिवंत करणारे जसे पाणी, त्याप्रमाणे अहंकाराला फिरून जिवंत करण्यास कारण होते. ॥३१०॥

विषयांची इच्छा करणारा पुरुष देहरूपानेच राहिलेला असतो. कारण, जर त्या पुरुषाला 'मी देहाहून वेगळा आहे' असे भान असेल तर तो विषयांची इच्छा करणारा कसा होईल ? तस्मात् देहरूप झाल्याने जो आत्म्यापासून वेगळेपणा प्राप्त झाला, व त्याच्या योगाने जी विषयाचे अनुसंधान करण्याची तत्परता झाली, तीच संसारबंधनास कारण आहे. ॥३११॥

बीजाची कार्यै वाढली म्हणजे बीजाची वृद्धि झाल्याचे आढळते, आणि कार्याचा नाश झाला म्हणजे बीजाचाही नाश झाल्याचे आढळते, तस्मात कार्य होऊ देण्यासच प्रतिबंध केला पाहिजे. ॥३१२॥

वासना वाढल्याने विषय वाढतात, आणि विषय वाढल्याने वासना वाढते आणि असे झाल्याने पुरुषाचा संसार कोणत्याही प्रकारे बंद पडत नाही. ॥३१३॥

संसारबंधनाला तोडण्यासाठी वासना आणि विषय या दोहोंचा संन्याश्याने त्याग केला पाहिजे. मनात चिंतन केल्याने आणि बाहेरच्या क्रिया केल्याने वासना वाढते, आणि वाढत जाणारी वासना संसाराला उत्पन्न करते. म्हणून सर्वकाळ आणि सर्व अवस्थेत चिंतनक्रिया आणि वासना या तिघांच्या नाशाचा उपयोग केला पाहिजे. ॥३१४॥ ॥३१५॥

सर्व ठिकाणी सर्वदा सर्व वस्तू ब्रह्मच आहेत अशा अवलोकनापासून ब्रह्मभावाची वासना दृढ झाल्याने वर सांगितलेल्या तिघांचाही लय होतो. ॥३१६॥

क्रियेचा नाश झाला म्हणजे चिंतनाचा नाश होतो आणि चिंतनाचा नाश झाला म्हणजे वासनांचा नाश होतो. वासनांचा अतिशय नाश होणे याचेच नाव मोक्ष आणि यालाच जीवन्मुक्ति म्हणतात. ॥३१७॥

रात्र फार अंधारी असली तरी ती जशी अरुणाच्या कांतीचा उदय झाला असता अगदी लयास जाते. तद्वत अतिशय प्रबल अशीही अहंकारादिकांची वासना ब्रह्मभावाच्या वासनेचे अतिशय स्फुरण होऊ लागले असता चांगली लयास जाते. ॥३१८॥

सूर्योदय झाला असता अंधकार आणि अंधकारापासून झालेले अनेक अनर्थ दृष्टीस पडेनासे होतात. तद्वत अद्वैत आनंदरसाचा अनुभव आला असता बंध नाही, आणि दुःखाचा गंध देखील नाही. ॥३१९॥

जर तुला कर्मब्ध असेल तर, तू आत बाहेर सावध राहून प्रत्यक्ष दिसणार्‍या दृश्य वस्तूंचा लय करीत आणि सच्चिदानंदरूप ब्रह्माची भावना करीत काळ घालीव. ॥३२०॥

ब्रह्मनिष्ठेविषयी प्रमाद (गाफलपणा) कधीही करु नये कारण, 'प्रमाद हाच मृत्यु आहे' असे भगवान सनत्कुमार मुनीने म्हटले आहे. ॥३२१॥

स्वस्वरूपाविषयी प्रमाद करणे याहून दुसरा ज्ञान्याला मोठा अनर्थ नाही. कारण, प्रमादापासून मोह होतो, मोहापासून अहंकार होतो, अहंकारापासून बंध होतो, आणि बंधनापासून व्यथा होते. ॥३२२॥

स्त्री जशी आपल्या आवडत्या जाराला बुद्धीच्या दोषांनी विक्षिप्त करते, त्याप्रमाणे विस्मरण हे विद्वानाला देखील विषयांकडे वळलेला पाहून त्याला बुद्धीच्या दोषांनी विक्षिप्त करते. ॥३२३॥

एकीकडे केलेले शेवाळे जसे तशा स्थितीत क्षणभर देखील रहात नाही, तर पुन्हा पाण्याला झाकून टाकते, तद्वत माया असत्य जाणली तथापि बहिर्मुख झालेल्या विद्वानाला क्षणात घेरते. ॥३२४॥

ज्ञान्याचे चित्त जर लक्ष्यावरून घसरून किंचित बहिर्मुख झाले तर, गैरसावधपणामुळे सुटून गेलेला खेळायचा चेंडू जसा पायर्‍यांवरून आथडत खाली पडतो, तद्वत ते इकडे तिकडे आथडत पडते. ॥३२५॥

विषयांचे ठायी प्रवेश करणारे चित्त विषयांच्या ठिकाणी गुणांची कल्पना करते, कल्पनेपासून काम उत्पन्न होतो, आणि कामामुळे पुरुषाची (विषयांचे ठायी) प्रवृत्ति होते. ॥३२६॥

यासाठी विचारशील ब्रह्मवेत्त्याला समाधीच्या समयी प्रमादाहून वेगळा मृत्युच नाही. ब्रह्माचे ठायी चित्ताची एकाग्रता ठेव, आणि विषयांच्या संबंधाने सावध रहा. ॥३२७॥

प्रमाद केल्याने स्वरूपापासून भ्रंश होतो, आणि भ्रष्ट झालेला पुरुष अधःपात पावतो, जो अधःपात पावला तो नाशच पावतो; पण पुन्हा चढू शकत नाही. ॥३२८॥

तस्मात सर्व अनर्थाचे मूळ जो संकल्प तो सोडून दिला पाहिजे. ज्याला जीवन्मुक्ति प्राप्त होते त्याला विदेहमुक्तिही प्राप्त होते. जो पुरुष किंचित भेददृष्टी राखतो, त्याला भय प्राप्त होते असे यजुर्वेद म्हणतो. ॥३२९॥

जो विद्वान पुरुष कोणत्याही समयी परिपूर्ण ब्रह्माचे ठायी अणुमात्र भेद पाहतो, त्याला त्याच वेळी भय उत्पन्न होते. कारण, प्रमादापासून झालेल्या भेददृष्टीने अवलोकन केले. ॥३३०॥

शेकडो श्रुति, शेकडो स्मृति आणि शेकडो न्याय यांच्या योगाने मिथ्या ठरवून टाकलेल्या दृश्य वस्तूवर जो पुरुष अहंबुद्धि करतो तो निंद्य कर्म करणार्‍या मलिन पुरुषाप्रमाणे दुःखावर दुःखेच पावत असतो. ॥३३१॥

ज्याप्रमाणे सावकार सत्यास अनुसरल्यामुळे मोकळा राहून निरंतर आपला मोठेपणा संपादित असतो, आणि चोरी करणारा मनुष्य खोटेपणास अनुसरल्यामुळे बंधनात पडून मरणसमान दुःख भोगतो, तद्वत पुरुष सत्य ब्रह्माचे अनुसंधान केल्याने मुक्त होऊन स्वताच्या अविचल मोठेपणास पावतो, आणि देहादिक असत्य वस्तूंचे अनुसंधान केल्याने संसारात भ्रमत असतो. ॥३३२॥

मुमुक्षु पुरुषाने बंधास कारण जे मिथ्यावस्तूचे अनुसंधान ते सोडून देऊन 'मी स्वतः ब्रह्म आहे' अशी स्वस्वरूपावर दृष्टी ठेवूनच रहावे. ब्रह्मनिष्ठा स्वस्वरूपाच्या अनुभवाने सुख देते आणि भासणारे जे अविद्येपासून झालेले दुःख त्याला अगदी लयास नेते. ॥३३३॥

विषयादिक बाह्य वस्तूंचे अनुसंधान दुष्टवासनारूप फलालाच उत्तरोत्तर अधिक वाढवीत असते. यासाठी विवेकाने समजून व बाह्य वस्तूंचा परिहार करून नित्य स्वरूपानुसंधान करीत असावे. ॥३३४॥

बाह्य विषयांचा निरोध केल्याने मन प्रसन्न होते. मन प्रसन्न झाल्याने परमात्म्याचे ज्ञान होते. परमात्म्याचे उत्तम ज्ञान झाले असता भवबंधाचा नाश होतो. तस्मात् बाह्य विषयांचा निरोध करणे हा मुक्तीचा मार्ग होय. ॥३३५॥

कोणता मुक्त होऊ इच्छिणारा सुज्ञ पुरुष स्वतः समजूतदार, सदसद्विवेकी, वेदाला प्रमाणभूत मानणारा आणि परमार्थ जाणणारा असा असून मुलाप्रमाणे आपल्या पतनास कारण अशा मिथ्या वस्तूचे अवलंबन करील? ॥३३६॥

जशी झोपी गेलेल्या पुरुषाला (झोपेत असता) जागृति नाही आणि जागा असणार्‍याला (जागेपणात) झोप नाही. त्याप्रमाणे देहादिकांवर आसक्ति ठेवणाराला मुक्ति होत नसते आणि मुक्त झालेल्याची देहादिकांवर आसक्ति नसते. ॥३३७॥

आपणच आधारभूत असल्याने स्थावरजंगमात्मक वस्तूचे ठायी आत बाहेर स्वस्वरूपच आहे असे समजून व त्याप्रमाणे दृष्टि ठेवून जो सकल उपाधींचा त्याग करतो, आणि आपल्या पूर्ण स्वरूपाने अखंडरूप होऊन राहतो, तो मुक्त होय ॥३३८॥

सर्वथा बंधनातून सुटण्याला उपाय सर्वात्मकपणावाचून दुसरा नाही आणि हा सर्वात्मकपणा दृश्य वस्तूंचे ग्रहण बंद पडून निरंतर स्वस्वरूपी निष्ठा ठेवल्याने ज्ञान्याला प्राप्त होत असतो. ॥३३९॥

पुरुष जोपर्यंत देहरूपाने राहिला आहे, बाह्य विषयांचा अनुभव घेण्याकडे जोपर्यंत त्याचे मन गुंतले आहे, ती ती क्रिया जोपर्यंत तो (अभिमानाने) करीत आहे, तोपर्यंत दृश्य वस्तूंचे ग्रहण न होणे कसे घडेल? यासाठी निरंतर आनंदस्वरूप होऊ इच्छिणार्‍या तत्वज्ञान्यांनी सकल धर्मकर्मांचा आणि विषयांचा त्याग करून आणि नित्य आत्म्याचे ठायी निष्ठा ठेऊन दृश्य वस्तूंचे ग्रहण न होईल असे केले पाहिजे. ॥३४०॥

ज्याने वेदान्तशास्त्राचे श्रवण केले अशा संन्याशाला सर्वात्मकपणाची सिद्धि होण्यासाठी 'शान्तो दान्तः' ही श्रुती सभाधि करावी म्हणून सांगत आहे. ॥३४१॥

जे लोक निर्विकल्पनामक समाधीमध्ये निश्चल झाले असतील त्यावाचून इतर पंडितांच्यानेही बलवत्तर अहंकाराचा नाश एकाएकी करवणार नाही. कारण, वासना अनंत जन्मांच्या चिकटलेल्या आहेत. ॥३४२॥

विक्षेपशक्ति, आवरणशक्तीच्या बळाने मोहित करणार्‍या अहंबुद्धीशी पुरुषाला जोडून तिच्या गुणांनी त्याला विक्षिप्त करते. ॥३४३॥

जोपर्यंत आवरण शक्ति निःषेश गेली नाही तोपर्यंत विक्षेपशक्तीला जिंकणे कठीण आहे. ज्ञान आणि ज्ञेय यांचे दूध आणि पाणि याप्रमाणे जेव्हा स्पष्टपृथक्करण होईल, तेव्हा आत्म्यावरची आवरण शक्ति आपोआप नाहीशी होईल. ॥३४४॥

मिथ्या वस्तूचे ठायी विक्षेप न होईल तर कोणताही प्रतिबंध न येता निःसंशय बोध होतो. स्पष्ट बोधापासून झालेला उत्तम विवेक ज्ञान आणि ज्ञेय या दोन वस्तूंच्या तत्वाचे पृथक्करण करून मायेने केलेल्या मोहरूप बंधनाला तोडून टाकतो. मोहबंधनातून जो सुटला त्याला पुन्हा संसार प्राप्त होत नाही. ॥३४५॥

'जीव आणि ब्रह्म हे एक आहेत' असे जे जीवब्रह्माचे ऐक्यज्ञान तीच अग्नि चट सार्‍या अविद्यारूप अरण्याला जाळून टाकतो. अद्वैतभाव ज्याला प्राप्त झाला त्याला पुन्हा संसार प्राप्त होण्याचे कारण ते कोणते असणार ? ॥३४६॥

वस्तूच्या स्वरूपाचे यथार्थज्ञान झाले असता आवरणाची निवृत्ति, मिथ्याज्ञानाचा नाश आणि विक्षेपापासून झालेल्या दुःखाची निवृत्ति या तीन गोष्टी होत असतात. ॥३४७॥

लोकातही रज्जूच्या यथार्थज्ञान झाल्याने आवरणाची निवृत्ति, मिथ्याज्ञानाचा नाश आणि विक्षेपापासून झालेल्या दुःखाची निवृत्ति या तीन गोष्टी झालेल्या आढळात येतात. तस्मात बंधनातून सुटका होण्यासाठी सुज्ञ पुरुषाने ब्रह्मरूप वस्तूचे यथार्थस्वरूप जाणले पाहिजे. ॥३४८॥

अग्नीचा संबंध झाल्यामुळे लोखंड जसे दाहक आहे असे प्रतीतीस येते, तद्वत सद्रूप ब्रह्माचा योग असल्यामुळे बुधि प्रमातादिरूपाने प्रतितीस येते. त्या बुद्धीचे जे हे द्वैतरूप कार्य ते मिथ्या आहे. याचे मिथ्यात्व भ्रम, स्वप्न आणि मनोरथ यांचे ठायी सर्वांच्या अनुभवास येते. ॥३४९॥

तस्मात अहंकारापासून ते देहापर्यंत असलेले सर्व मायेचे विकार (कार्ये) आणि सर्व विषय मिथ्या आहेत. प्रत्येक क्षणी त्यांचे स्वरूप निरनिराळ्या प्रकारचे होत असल्यामुळे हे मिथ्या आहेत आणि आत्मा तसा नसल्यामुळे सत्य आहे. ॥३५०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP