विवेकचूडामणी - श्लोक संग्रह १५१-२०२

विवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.


त्याप्रमाणे पाचही कोशांचा अपवाद केला असता शुद्ध, नित्य, आनंदैकस्वरूप, सर्वोत्कृष्ट आणि स्वयंप्रकाश असा हा प्रत्यगात्मा स्पष्टपणे प्रतीतीस येतो. ॥१५१॥

सूज्ञ पुरुषाने बंधातून सुटका होण्यासाठी आत्मा आणि अनात्मा यांचे विवेचन करावे. म्हणजे त्या योगानेच यो सच्चिदानंद स्वरूपाला जाणून आनंदी होतो ॥१५२॥

जो पुरुष, मुंज नावाच्या गवतातून जशी बारीक सळई निवडून काढतात, त्याप्रमाणे दृष्टीला गोचर होणार्‍या पाच कोशातून असंग आणि अक्रिय अशा प्रत्यगात्म्याचे विवेचन करून आणि त्या प्रत्यगात्म्याच्या ठिकाणी सर्वांचा लय करून आत्मस्वरूपाने राहतो तो मुक्त होय. ॥१५३॥

हा देह अन्नापासून झालेला आहे. अन्नाने वाचतो आणि अन्न न मिळाले तर नष्ट होतो. म्हणून हा (देह) अन्नमय कोश होय. हा (देह) म्हणजे त्वचा, चर्म, मांस, रक्त, अस्थि आणि विष्ठा यांची एक रास आहे. म्हणूनच हा स्वतः नित्यशुद्ध आत्मा होण्यास योग्य नाही. ॥१५४॥

हा देह जन्माच्या पूर्वी आणि मरणानंतरही नसतो, केवळ वर्तमानकाळीच भासतो. क्षणक्षणी याचे गुण बदलत असतात, याचा स्वभाव अनिश्चित असतो. याची रूपे अनेक असतात, हा जड आहे, आणि घटादिकांप्रमाणे हा दृष्टीला गोचर होतो. असा हा देह जन्मादिक सर्व विकारांना जाणणारा आत्मा असा संभवेल ? संभवणार नाही. ॥१५५॥

हात, पाय इत्यादिक अवयव ज्याला आहेत असा देह आत्मा नव्हे, कारण, देह व्यंग झाला तरी आत्मा अखंडीत राहतो, आणि त्याच्या कोणत्याही शक्तीचा नाश होत नाही, म्हणून आत्मा देह नव्हे. तर देहाचा नियंता आहे. ॥१५६॥

आत्मा हा देहाचा, देहाच्या धर्माचा, देहाच्या कर्माचा आणि देहाच्या अवस्थादिकांचा साक्षी आहे, म्हणून आत्म्याचा देहाहून वेगळेपणा आपोआपच सिद्ध होतो. ॥१५७॥

ज्ञानरहित, अस्थींची रास हे ज्याचे रूप मांसाने लिंपलेला, मळाने भरलेला आणि अतिशय ओंगळवाणा असा हा देह स्वतः आत्मा कसा होऊ शकेल? कारण, आत्मा ज्ञानरूप आहे, अस्थींची रास हे त्याचे स्वरुप नव्हे, तो मांसाने लिंपलेला नाही, मळाने भरलेला नाही, आणि ओंगळवाणा नाही. ॥१५८॥

मूढ मनुष्य त्वचा, मांस, मेद, अस्थि, आणि विष्ठा यांच्या राशिला (देहाला) 'मी मी ' असे मानतो; पण विचारशील मनुष्य देहाहून वेगळे असे आपले सत्यस्वरूप जाणतो. ॥१५९॥

'मी देह' अशीच मूढ मनुष्याची देहावर अहंबुद्धी असते 'मी जीव आहे' अशी विद्वानाची जीवावर अहंबुद्धी असते. आणि आत्मानात्मविवेचन व अपरोक्ष ज्ञान ज्याच्या अंगी आहे अशा महात्म्याची सत्य आत्म्यास अनुलक्षून 'मी ब्रह्म आहे' अशी मति असते. ॥१६०॥

मूढा ! त्वचा, मांस, मेद, अस्थि आणि विष्ठा यांची केवळ रास अशा या देहावरची अहंबुद्धि टाकून दे. आणि सर्वांचे पारमार्थिक रूप अशा निर्विकल्प ब्रह्मावर 'मी ब्रह्म आहे' अशी बुद्धि ठेव, आणि अत्यंत शांतीला प्राप्त हो. ॥१६१॥

देह, इंद्रिये इत्यादिक मिथ्या पदार्थांवर भ्रांतीने उत्पन्न झालेली जी अहंबुद्धि (देह मी आहे इत्यादिक प्रकारची बुद्धि), तिला सूज्ञ मनुष्य जोपर्यंत सोडीत नाही, तोपर्यंत तो वेदान्त शास्त्राच्या सिद्धांतात पारंगत का असेना, त्याला मुक्ति होण्याची गोष्ट देखील नको. ॥१६२॥

या देहाच्या छायेवर, याच्या (पाण्यात वगैरे पडलेल्या प्रतिबिंबावर, आणि ह्रदयात ज्याच्या अवयवांची कल्पना केली जाते अशा स्वप्नांतील देहावर तुझी जशी कोणत्याही प्रकारची अहंबुद्धि नाही, तद्वत या जीवंत शरीरावरही तुझी अहंबुद्धि नसावी. ॥१६३॥

दूषित ज्यांचे चित्त अशा मनुष्यांना 'मी देह आहे' असा अभिमानच ज्यापेक्षा जन्मादिक दुःखे उत्पन्न होण्यास कारण आहे, त्यापेक्षा तू प्रयत्न करून त्या अभिमानाला सोडून दे. त्याला सोडले असता पुन्हा जन्मास येण्याची आशा राहणार नाही. ॥१६४॥

पाच कर्मैंद्रियांनी युक्त जो हा प्राण तोच प्राणमय कोश होय. आत्मा ज्याचा नियन्ता आहे असा हा अन्नाने पूर्ण असलेला अन्नमय कोश या प्राणमय कोशामुळेच सकल क्रियांचे ठाई प्रवृत्त होतो. ॥१६५॥

प्राणमय कोश पण आत्मा नव्हे. कारण, तो वायूपासून झालेला आहे. वायूप्रमाणे हा आतबाहेर जात येत असतो. काही आवडत्या किंवा नावडत्या वस्तूला अथवा स्वताला किंवा दुसर्‍याला कोणत्याहि वेळी व किंचितही जाणत नाही. आणि हा सर्वदा परतंत्र आहे. ॥१६६॥

पाच ज्ञानेंद्रिये आणि मन मिळून मनोमय कोश होतो. हा कोशच, 'मी आणि माझे, अशी कल्पना होण्यास कारण आहे नामादिक भेदांच्या रचनेने युक्त असा हा बलवान कोश आपल्यापेक्षा पूर्वीच्या कोशाला व्यापून वृद्धि पावत असतो. ॥१६७॥

पाच होत्यांसारख्या पाच इंद्रियांनी विषयरूप घृताच्या धारेने पेटवलेला आणि अनेक वासनारूप काष्ठांनी भडकलेला असा मनोमय कोशरूप अग्नि प्रपंचाला वहातो आहे. ॥१६८॥

अविद्या मनाहून वेगळी नाही. मन म्हणून जे आहे तीच संसारबंधनाला कारणीभूत अशी अविद्या होय. ते मन लयास गेले म्हणजे सर्व प्रपंचाचा लय होतो. आणि ते वृद्धिंगत झाले असता सकल प्रपंचाची वृद्धि होते. ॥१६९॥

स्वप्नात दुसरे काही नसता मनच भोक्ता, भोग्य इत्यादि सकल जगाला जसे उत्पन्न करते तसेच जागृति अवस्थेतही ते उत्पन्न करते. स्वप्नात आणि जागृतीत काही फरक नाही. तस्मात् हा सर्व प्रपंच म्हणजे मनची कल्पना मात्र आहे. ॥१७०॥

सुषुप्तीच्या वेळी मनाचा लय झाला असता काहीही नसते. ही गोष्ट सर्वानुभवसिद्ध आहे, यासाठीच जीवाला जो संसार प्राप्त झालेला आहे तो मनःकल्पित आहे, वास्तविक नाही. ॥१७१॥

जसा वायु मेघाला आणतो आणि पुन्हा तोच घेऊन जातो. तद्वत, मनच बंधाची कल्पना करते, आणि तेच मुक्तिचीही कल्पना करते. ॥१७२॥

आपण जसे दाव्याने जनावराला बांधतो त्याप्रमाणे, मन देहादिक सर्व विषयांवर प्रीती उत्पन्न करून त्या प्रीतीच्या योगाने जीवाला बंधात घालते; आणि मागून तेच मन विषयाप्रमाणे या देहादिक विषयांवर विसरपणा (वैराग्य) उत्पन्न करून या जीवाला बंधातून सोडविते. ॥१७३॥

तस्मात् मनच या जीवाला बंधात घालण्यास आणि त्यातून सोडविण्यास कारण आहे. मन जर रजोगुणाने आणि तमोगुणाने मलिन झाले तर ते बंधास कारण आहे. आणि तेच जर रजोगुण आणि तमोगुण यांनी रहित अर्थात शुद्ध होईल तर ते मोक्षास कारण होते. ॥१७४॥

विवेक आणि वैराग्य हे दोन गुण वाढल्याने मन शुद्धपणास प्राप्त होऊन मोक्षास कारण होते. यासाठी बुद्धिमान मुमुक्षूचे विवेक आणि वैराग्य हे दोन गुण प्रथमच दृढ झाले पाहिजेत. ॥१७५॥

मन नावाचा मोठा वाघ विषयरूप अरण्यातील भूमीवर फिरत आहे. यासाठी मुक्तीची इच्छा करणारे जे सत्पुरुष असतील त्यांनी तेथे जाऊ नये. ॥१७६॥

भोक्त्यासाठी स्थूल आणि सूक्ष्म विषयांना, शरीर, वर्ण, आश्रम आणि जाति यांच्या भेदांना, गुण, क्रिया, कारणे आणि त्यांची फळे यांना मनच सर्वदा उत्पन्न करीत असते. ॥१७७॥

असंग आणि चैतन्यरूप अशा या जीवाला मनच मोहित करून देह, इंद्रिये आणि प्राण या बंधनांनी बांधून व फलोपभोगरूप आपल्या कृत्यांवर अहंता आणि ममता उत्पन्न करून नेहमी भ्रमवीत असते. ॥१७८॥

अध्यासरूप दोषाने जीवाला संसार प्राप्त होतो. आणि अध्यास हे बंधन मनानेच कल्पिलेले आहे. तस्मात रजोगुण आणि तमोगुण हे दोष ज्याच्या आंगी आहेत अशा अविवेकी जीवाला जन्मादिक दुःखांचे कारण मनच आहे. ॥१७९॥

यासाठी तत्त्वज्ञानी विद्वान लोक मनालाच अविद्या म्हणतात. वायु जसा मेघमंडळाला फिरवीत असतो त्याप्रमाणे मनच जगाला भ्रमवीत आहे. ॥१८०॥

तस्मात मुक्त होऊ इच्छिणार्‍या पुरुषाने प्रयत्‍न करून मनाची शुद्धि करावी. हे मन शुद्ध झाले असता मुक्ति हस्तगत होते. ॥१८१॥

जो पुरुष एका मोक्षावरच असक्ति ठेवून विषयांवरची गोडी नाहीशी करून टाकतो, सर्व कर्मांचा त्याग करतो, आणि चांगल्या श्रद्धेने श्रवण, मनन इत्यादिकांचे ठाई तत्पर होतो, तो पुरुष बुद्धीच्या रजोगुणी स्वभावाला नाहीसा करतो. ॥१८२॥

हा मनोमय कोशही परमात्मा नव्हे. कारण या कोशाचा आदि आणि अंत आहे; याच्या अवस्था बदलतात; हा दुःखमय आहे; आणि हा दृश्य आहे. आत्मा तर आदी, अंत, परिणाम आणि दुःख यांनी रहित आहे व द्रष्टा आहे. जो द्रष्टा तो दृश्य होऊ शकत नाही. ॥१८३॥

ज्ञानेंद्रिये, वृत्ति आणि बुद्धी ही सर्व मिळून कर्तृरूप विज्ञानमय कोश होय. हा जीवाला संसार प्राप्त होण्याचे कारण होय. ॥१८४॥

चैतन्याचे प्रतिबिब ज्याच्या बरोबर येत असते असा हा विज्ञानमय नावाचा प्रकृतीचा विकार (कार्य) देह, इंद्रिये इत्यादिकांचे ठाई विज्ञानरूप क्रिया करणारा मी आहे' असा अतिशय अभिमान निरंतर मानीत असतो. ॥१८५॥

'मी मी' असा अभिमान बाळगणे हा ज्याचा स्वभाव असा हा सकल व्यवहार चालवणारा जो अनादिकाळचा विज्ञानमय कोश त्यालाच जीव म्हणतात. हा पूर्व वासनेच्या योगाने पुण्य कर्मे किंवा पाप कर्मे करीत असतो; नानाप्रकारच्या योनीमध्ये जाऊन त्या कर्माची फळे भोगतो; हा वरच्या लोकी निघून जातो, व खाली येतो; याच विज्ञानमय कोशाला जाग्रत, स्वप्न इत्यादिक अवस्था आहेत. सुखदुःखांचा उपभोग यालाच आहे; आणि देहादिकांस अवलंबून असणारी जी धर्मकर्मै आणि गुण त्यांच्या संबंधाने सतत 'माझे माझे' असा अभिमान हाच धरीत असतो. परमात्म्याच्या अतिशय सानिध्यामुळे हा विज्ञानमय कोश अतिशय प्रकाशयुक्त आहे. म्हणूनच हा परमात्म्याचा उपाधि रूप आहे. या उपाधीवर भ्रांतीने 'मी मी' असा अभिमान बाळगल्यामुळे पुरुष जन्ममरणरूप संसार पावत आहे.॥१८६॥॥१८७॥॥१८८॥

स्वयंप्रकाश आत्मा इंद्रियांचे ठायी सामान्यज्ञानरूपाने स्फुरत असतो, तेव्हा त्याला कूटस्थ म्हणतात आणि तोच उपाधीचे ठाई असतो तेव्हा त्याला कर्ता आणि भोक्ता म्हणतात. ॥१८९॥

अगदी असत्य जिचे स्वरूप अशी बुद्धि आणि आपण एकच आहो, अशी समजुन हाच दोष त्याच्या योगाने पुरुष स्वतः परिच्छेदास प्राप्त होऊन आपण सर्वव्यापक असताही, घटांना जसे मृत्तिकेहून वेगळे पहावे, त्याप्रमाणे पदार्थांना आपल्याहून वेगळे पाहतो. ॥१९०॥

अग्नि स्वभावतः निर्विकार असताही लोखंडाच्या विकारास अनुसरल्यामुळे जसा लोखंडाचे गुण ज्याच्या आंगी आहेत असा भासतो, तद्वत आत्मा स्वभावतः निरंतर एकरूप असताही उपाधीचा संबंध होऊन त्याच्या धर्मास अनुसरल्यामुळे उपाधीचे गुण ज्याच्या अंगी आहेत असा भासतो. ॥१९१॥

शिष्य म्हणाला - गुरुवर्या ! परमात्म्याला जीवपणा जो आलेला आहे तो भ्रांतीने आलेला असो की दुसर्‍या कोणत्याही प्रकारे आलेला असो. तथापि जीवाचा उपाधि अनादि आहे, आणि अनादि वस्तूंचा नाश कोणालाही संमत नाही. म्हणून या जीवाचा जीवपणा नित्य आहे, म्हणूनच (त्यामुळे आलेला) संसार कधीही नाहीसा होणार नाही. तर मग मोक्ष कसा मिळणार, हे मला कथन करा.॥१९२॥॥१९३॥

गुरु म्हणाले,

सुज्ञा ! बरे विचारलेस तर आता सावधपणाने ऐक. भ्रांतीने मोहित झाल्यानंतरची जी कल्पना ती प्रमाणसिद्ध (खरी) असत नाही. ॥१९४॥

आकाशाला निळेपणा वगैरे गुणांचा संबंध जसा भ्रांती वाचून संभवत नाही; तद्वत् असंग, क्रियारहित आणि निराकार अशा परमात्म्याला उपाधीचा संबंध भ्रांतीवाचून संभवत नाही. ॥१९५॥

द्रष्टा, निर्गुण क्रियारहित, प्रत्यगबोधरूप आणि आनंदरूप जसा आत्मा आहे. त्याला बुद्धीशी ऐक्य झाल्याच्या भ्रांतीने जीवपणा प्राप्त झालेला आहे. तो सत्य नाही म्हणून भ्रांति दूर होईल तेव्हा अर्थात् मिथ्या असलेला जीवपणा नाही कारण, भ्रांति दूर झाली असता स्वतः नाहीसे होणे हा मिथ्या वस्तूचा स्वभावच आहे. ॥१९६॥

बेसावधपणामुळे मिथ्याज्ञानाच्या योगाने भासणार्‍या वस्तूची सेवा जोपर्यंत भ्रांति तोपर्यंतच असते.जितका वेळपर्यंत भ्रांति असते तितका वेळपर्यंतच रज्जूवर सर्पाचे अस्तित्व असते. भ्रांतीचा नाश झाला असता सर्प भासत नाही. तद्वत समजावे. ॥१९७॥

जशी अविद्या अनादि तसेच तिचे कार्यही अनादी, हे संमत आहे. तथापि जागृति झाली असता स्वप्न जसे नाहीसे होते तद्वत विद्या (ज्ञान) उत्पन्न झाली असता अविद्या आणि तिचे कार्य हे अनादि आहे तरी नित्य नाही. जसा घटाचा प्रागभाव, म्हणजे घट उत्पन्न होण्याच्या पूर्वीचा त्याचा अभाव, अनादि म्हणजे ज्याचा आदि (उत्पत्ति काल) केव्हा हे ठाऊक नाही असा आहे; तथापि तो जसा घट उत्पन्न झाल्यावर नाहीसा होतो, तद्वत समजावे. ॥१९८॥ ॥१९९॥

घटाचा प्रागभाव अनादि असताही त्याचा घटाची उत्पत्ति झाल्यानंतर जसा नाश झाल्याचा आढळतो, तसे अविद्या आणि अविद्येचे कार्य अनादी असताही विद्येची उत्पत्ति झाल्यावर त्याचा नाश होतो. बुद्धिरूप उपाधीच्या संबंधाने आत्म्याच्या ठिकाणी जीवपणा जो कल्पिलेला आहे, त्याचे स्वरूप कल्पनेहून वेगळे काहीच नाही. आत्म्याचा बुद्धीशी संबंध होण्यास कारण मिथ्याज्ञानच आहे, आणि मिथ्याज्ञानाची निवृत्ति यथार्थ ज्ञानानेच होते. दुसर्‍या कोणत्याही रीतीने होत नाही. आत्मा आणि ब्रह्म यांचे ऐक्य समजणे हेच यथार्थ ज्ञान आहे, आणि ते श्रुतीला संमत आहे. ॥२००॥ ॥२०१॥ ॥२०२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP