मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|पौराणिक कथा|संग्रह ३|
शंबरासुर वध

शंबरासुर वध

हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.


शंबरासुर नावाचा एक राक्षसांचा राजा होता. असुरांमध्ये जरी त्याला मान होता तरी तो क्रूरकर्मा होता. श्रीकृष्ण व रुक्‍मिणीचा पुत्र प्रद्युन्न हा आपला वध करणार आहे, असे त्याला समजले. म्हणून प्रद्युन्नाचा जन्म झाल्यावर सहाव्या दिवशी त्याने त्याला पळवून नेऊन समुद्रात फेकले. तेथे एका मोठ्या माशाने त्याला गिळले. काही दिवसांनी एका मासेमाराने त्या माशाला पकडले. तो नेमका शंबरासुराची स्वयंपाकगृहाची व्यवस्था पाहणार्‍या मायावती या स्त्रीकडे गेला. ही मायावती पूर्वजन्मी कामदेवाची पत्नी होती. कामदेव भस्म झाल्यावर त्याच्या पुनर्जन्माची प्रतीक्षा करताना तिने शंबरासुरास मोहित केले व ती त्याच्या अंतःपुरात राहू लागली. मायावतीने तो मासा चिरताच त्यातून एक सुंदर बालक बाहेर आले. मायावतीस नारदाने सांगितले, हा भगवंतांचा पुत्र असून तू त्याचे पालनपोषण कर. तिने त्याचे संगोपन केले. तो तरुण झाल्यावर मायावतीस त्याच्याबद्दल आकर्षण वाटू लागले. आपल्या आईचे हे आपल्यावर आसक्त होणे प्रद्युन्नाच्या लक्षात येताच त्याने आश्‍चर्य प्रकट केले. यावर मायावतीने त्याला खरे काय ते सांगितले. प्रद्युन्न ते ऐकताच शंबरासुरावर चालून गेला. मायावतीने शिकवलेल्या मायावी विद्येने त्याने शंबरासुर व त्याच्या सैन्याला मारून टाकले. मायावतीबरोबर तो विमानाने आपल्या पित्याच्या नगरीत आला. रुक्‍मिणीला त्याला पाहताच वात्सल्यभाव दाटून आला व तिला आपल्या हरण झालेल्या मुलाची आठवण येऊ लागली. तो आपला व श्रीकृष्णाचा पुत्र असावा, असेच तिला वाटू लागले. याच वेळी नारदमुनी श्रीकृष्णासह तेथे आले. त्यांनी रुक्‍मिणीला हा तिचाच मुलगा असून, शंबरासुराचा वध करून तो आल्याचे सांगितले. तसेच हा प्रत्यक्ष कामदेव अर्थात मदन असून, मायावती म्हणजेच त्याची पूर्वजन्माची प्रिया रती आहे, असेही सांगितले. हे सर्व ऐकून कृष्ण व रुक्‍मिणीसह सर्व द्वारकानगरी आनंदित झाली.

N/A

References : N/A
Last Updated : January 09, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP