पूजेचे साहित्य, प्रसाद व महानैवेद्य

श्रीसत्याम्बा म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून जगन्माता दुर्गा किंवा जगदम्बाच होय.


पूजेचे साहित्य

या व्रतासाठी प्रथम केळीचे खांब, आंब्याची पाने, कलश, देवीची सुवर्णाची (वा अन्य धातूची) प्रतिमा. चौरंग, गहू किंवा तांदूळ, विडयाची पाने, सुपार्‍या, खोबर्‍याची वाटी, बदाम, खारका, वस्त्र, उपवस्त्र, नारळ, हळद, कुंकू, बुक्का, गुलाल, कापूर, उदबत्ती, फुले, बेल, दुर्वा, पंचामृत, सुगंधी तेल आणि दक्षिणा इ. सामुग्री जमवावी.

प्रसाद व महानैवेद्य

त्याचप्रमाणे प्रसाद व महानैवेद्यही तयार करावा. प्रसादासाठी खवा, तूप, साखर, रवा, केशर, बदाम, खिसमिस, वेलदोडे याची आवश्यकता असून प्रसादाचे साहित्य दिडीच्या प्रमाणात असावे.

महानैवेद्यात भात, भाज्या, कोशिंबिरी तसेच मुख्य खीर असावी. दुसर्‍या नैवेद्यासाठी केशरमिश्रित रव्याचे लाडू करावेत. (हा नैवेद्य अर्थातच सोवळ्यात तयार करावा.)

हा व्रतविधी संध्याकाळी करावयाचा असून त्यासाठी संध्याकाळ होण्यापूर्वी थोडावेळ अगोदर पतिपत्‍नींनी स्नान करून शुचिर्भूत व्हावे व पवित्र महावस्त्र नेसून शुद्ध केलेल्या आसनावर प्रसन्न चित्ताने विराजमान व्हावे. नंतर मंडप तोरणांनी सुशोभित केलेल्या चौरंगावरील श्रीसत्याम्बेच्या सुवर्ण अथवा अन्य धातूच्या प्रतिमेची पूजा करावी.

प्रथम आचमन, प्राणायाम करुन व देशकालाचे स्मरण करुन संकल्पाचा उच्चार करावा. हा संकल्प पुढीलप्रमाणे उच्चारावा-

'ममात्मनः श्रुतिस्मृति पुरोणोक्‍त फलप्राप्‍तर्थ्य मम सहकुटुम्बस्य क्षेमस्थैर्यायुरारोग्यैश्वर्याभ्युदयार्थं मनोप्सितकामनासिद्धयर्थं

(येथे कामनेचा उच्चार करावा.)

श्रीसत्यांबाव्रतांगत्वेन यथासंपादितसामग्रया श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वतीस्वरुपि श्रीसत्यांम्बामहादेवीपूजनं करिष्ये' ।


त्यानंतर सर्व व्रतकार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी महागणपतीचे आवाहन करुन पूजन करावे.

यांनतर पूजा विधी पुढे अतिशय सोप्या संस्कृत भाषेत दिला आहे. त्याप्रमाणे करावा व शेवटी कथा वाचन करुन आरती करावी. तसेच प्रसाद व महानैवेद्याचा प्रसाद देवीला दाखवावा.

हे व्रत करणार्‍या यजमानाने व त्याच्या पत्‍नीने संपूर्ण दिवस उपवास करावा व रात्री आरती नंतर ब्राह्मणांना दक्षिणा वगैरे देऊन आप्तजन व ब्राह्मण यांचेसह आनंदाने भोजन करावे. रात्रौ झोपण्यापूर्वी श्रीसत्याम्बा देवीचे अत्यंत श्रद्धायुक्‍त व शुद्ध अंतःकरणाने स्मरण करावे.

या व्रताचे माहात्म्य स्वयं भगवान् शंकरांनी आपला पुत्र कार्तिकेय उर्फ षडानन यास सांगितले असून ते म्हणतात की, हे सत्याम्बाव्रत मनुष्याच्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण करणारे असून कलियुगात खरोखरच महान् फल देणारे आहे.

या व्रताच्याच योगे प्रत्यक्ष शंकरही प्राप्‍त संकटातून मुक्‍त झाले. तसेच त्यांचा पुत्र षडानन यालाही असुरांबरोबरच्या युद्धात मोठा विजय प्राप्‍त झाला !

तसेच फार वर्षापूर्वी कांचीपुरात कौंडिण्य नावाचा एक ब्राह्मण रहात होता. तो अत्यंत दरिद्री असल्याने त्याची पत्‍नी त्यास नेहमी टाकून बोलत असे. त्यायोगे जीवनास कंटाळून तो ब्राह्मण जीव देण्यासाठी विहिरीपाशी गेला. परंतु पूर्वपुण्याईच्या योगे त्याचवेळी देवी सत्याम्बा तेथे प्रकट झाली व तिने त्यास आत्महत्त्येपासून परावृत्त करुन सर्व मनोरथ पूर्ण करणारे असे श्रीसत्याम्बा व्रत करण्याचा उपदेश केला. त्या ब्राह्मणानेही तिच्या शब्दावर विश्वास ठेवून हे प्रभावी व्रत केले व त्यायोगे त्यास विपुल धनाची प्राप्‍ती होऊन त्याचा संसार सुखाचा झाला.

मागध देशाचा राजा सूर्यकेतू याच्यावर मालवराजा चाल करुन आला. त्यामुळे सूर्यकेतू अतिशय चिंताक्रांत झाला. परंतु त्याच्या गुरुने त्यास सत्याम्बाव्रत करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे राजाने हे व्रत केले व त्यायोगे मालवराजाचा पराभव होऊन तो सूर्यकेतूस शरण आला.

या सूर्यकेतूच्याच राज्यात गुण्ड नावाचा एक शूद्र रहात होता, त्यास संतति नव्हती. तेव्हा त्यानेही सूर्यकेतूकडून या व्रताची माहिती मिळविली व ते व्रत सुरु केले. त्यायोगे त्यासही पुत्र झाला. परंतु पुढे व्रताचे विस्मरण झाल्यामुळे त्याच्यावर अनेक संकटे आली. तथापि योगायोगाने त्यास पुन्हा या व्रताचे स्मरण झाले व त्याची सर्व दुःखे नष्‍ट झाली व तो सुखासमाधानाने राहू लागला.

या व्रताचे माहात्म्य वर्णन करताना श्रीसूत शौनकादी ऋषींना सांगतात की, 'हे सत्याम्बाव्रत या लोकी मोठमोठया संकटांचा नाश करणारे असून पुत्र आणि धन देणारे आहे. तसेच हे व्रत करणार्‍या मनुष्यास अंती मुक्‍ती मिळून तो सत्याम्बा लोकात जाऊन तेथे हजारो वर्षे आनंदाने कालक्रमणा करतो.'

या व्रताचे माहात्म्य असे आहे की या व्रताची नुसती कथा श्रवण करण्यानेही व्रत केल्याचे फल मनुष्याला प्राप्‍त होते !

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP