मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|अनंत फंदी|माधवाख्यान| तृतीयोध्याय माधवाख्यान प्रथमोध्याय द्वितीयोध्याय तृतीयोध्याय चतुर्थोध्याय पंचमोऽध्याय षष्ठोध्याय माधवाख्यान - तृतीयोध्याय अनंत फंदीने लावणीइतकाच आख्यान प्रकारही तितक्याच प्रभावीपणे लिहीला. Tags : anant phandimadhavakhyanअनंत फंदीमाधवाख्यान तृतीयोध्याय Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः ॥ गत झाले माधव नारायण । लोकांस केलें शोकपरायण । टाकूनि गेले विघ्नवारायण । दीप दक्षिणचा मालवला ॥१॥देवावांचूनि देउळ सुनें । कीं नासिकेवांचूनि वदन । कीं पुत्रावांचूनि जैसें सदन । व्यर्थ काय तें जाळावें ॥२॥कीं गळ्यावांचूनि गायन । कीं बुबुळावांचूनि नयन । कीं शरीर जैसे प्राणावीण पंडितावीण सभा जैशी ॥३॥कीं शूरत्वावांचूनि शिपायगिरी । कीं हिर्यावांचूनी मुद्रिका करी । कीं पतिवांचूनि दिव्य नारी । कीं यजमानावांचूनि याचक ॥४॥कीं चंद्रावांचूनि तारांगण । कीं वस्त्रावांचूनि शरीर नग्न । कीं वरावांचूनि जैसें लग्न। शोभूं नेदी सर्वथा ॥५॥तैसें श्रीमाधवावांचूनि । भयानक भासे पृथ्वी सुनी । असो द्वितियाध्यायीं निरुपणीं । नानाशीं प्रभू बोलिले ॥६॥मग नानाशीं म्हणे रावबाजी । पुण्यांत येणार दवलतरावजी । तुम्ही एक दो रोजांमाजी । सातार्याशीं जाईजे ॥७॥येथें मी व भाऊ दोघेजण । बाबाफडक्यासह वर्तमान । मानकरी तुकाजी जाण । मी आपल्या जवळी ठेवितों ॥८॥शिंद्यास मी गोड गोड वचन । बोलूनी मोहितों त्याचें मन । श्रीमंतांची आज्ञा घेऊन । सातार्यास नाना निघाले ॥९॥भाऊस म्हणे जनार्दनकुमर । शिंद्याचा व आमुचा बहुत हाडवैर । द्वेषाद्वेष वाढला फार । म्हणुनी जातों सातार्या ॥१०॥श्रीमंतापाशीं तुम्ही असा । मुलाची रखवाली करीतसा । मसलतीचा हावभाव कैसा । धन्यास नाहीं ठावका ॥११॥तुम्ही सांभाळा शहाणपणानें । प्रस्तुत मी सातार्यास जातों म्हणे । मग प्रयाण केलें बाळाजी जनार्दनें । इकडे पुण्यास शिंदा पातला ॥१२॥खडकी-पुलाजवळी जाहल्या भेटी । श्रीमंतास धरुनिया मनगटीं । वाडयांत आणिले उठाउठी । अत्यादरें शिंद्यानें ॥१३॥वाडयांत आणिले दोघेजण । हें नानास कळलें वर्तमान । म्हणे श्रीमंत शिंदे एकचि जाण । आधार कवणाचा मजलागी ॥१४॥आतां सातार्यास राज्याचीं वस्त्रें । घ्यावीं म्हणूनि निघालें त्वरें । सेना सिद्ध करुनिया राघवकुमरें । पुण्या बाहेरी निघाले ॥१५॥कुच करुनि गेले थेउरीं । तेथें शिंद्याचे कारभारी । कोण कोण पातले त्या अवसरी । बाळोबा व धोंडिबा ॥१६॥बाळोबाचा व धोंडिबाचा । एकांत जाहला श्रीमंताचा । म्हणती आम्ही शत्रु स्वामीचा । धरुं कैद करुं नानातें ॥१७॥कीं नानाचे करावया वाईट । आज्ञा स्वामीनीं द्यावी स्पष्ट । मग बाजीराव म्हणे मी क्रियाभ्रष्ट । नानाविषयीं होणार नव्हें ॥१८॥नाना म्हणजे मला दादा । मी त्याचें वाईट न करी कदां । ऐकूनिया दवलतराव शिंदा । मर्जी खट्टी जाहली ॥१९॥ह्मणे धन्याचेच नाहीं चित्तांत । आह्मी मर्जीस्तव केला बेत । आतां मर्जी धन्याचीं ज्यांत । त्यांतचि मर्जी आमुची ॥२०॥हें बाळोबाच्या न ये मना । ह्मणे धरुनिया घ्यावें नाना । कालेंकरुन आपुल्या प्राणा । तो हा नाना घेईल ॥२१॥मग बाजीरायास बाळोबा ह्मणे । आम्हास स्वामीचें बरें करणें । म्हणूनि घेतलें असे धरणें । नाना नाशातें पावावया ॥२२॥आम्ही स्वामीच्या जिवासाठीं । नाना सर्प दुखविला पोटीं । आतां स्वामीच्या ऐशा गोष्टी । तस्मात् अम्हां बुडवितां ॥२३॥आधीं नानावरी मसलत । करणें हेंचि दुरापस्त । पदरीं दो कोटीची दवलत । फौजही असावी दोन लक्ष ॥२४॥इतुकी ज्याला अनकूळ जाहली । मग त्याणें हालवावी जिभली । त्या नानाला आम्ही केली । बुडावावयाची मसलत ॥२५॥आतां स्वामी म्हणतात । कीं नाना धरावे हें अयुक्त । मग बाळोबाशीं श्रीमंत । बोलते जाहले तेधवां ॥२६॥म्यां दादासाहेब म्हटलें नाना । तेपक्षीं धक्कां त्याचिया प्राणा । लागों दिल्यास माझिया वचना - माजी अंतर पडों पाहे ॥२७॥मग त्यासमयीं बाळोबानें । परशुराम भाऊस बोलावून । बाजीराव नाना दोघेजण । म्हणे कैद करावे धरुनियां ॥२८॥रावबाजीस नानाचा अग्रह फार । तरी राघोबाचा कनिष्ठ कुमर । यशोदाबाईचे मांडीवर । चिमाजीआप्पा बसवावे ॥२९॥ही गोष्ट भाऊच्या आली मना । म्हणे धरा जा दोघेजण । मागील भाऊंनीं आणा प्रमाण । अवघ्या ठेविल्या गुंडाळोनी ॥३०॥असो भाऊंनीं बाळोबाशीं । रुकार दिधला धरावयासी । श्रीगणपतीस थेउराशीं । क्रियाशपथा जाहल्या ॥३१॥मग परशुरामभाऊंनीं त्या समयांत । लिमये बोलावून चिंत्तोपंत । सातार्यास मार्गस्त केलें त्वरीत । नानाकडे तेधवां ॥३२॥कीं राज्यास योग्य नाहींत रावबाजी । मज दैववान भासे चिमाआपाजी । यशोदाबाईचे मांडीवर राजी । चिमाआपा बसवावें ॥३३॥मग नानासही आनंद जाहला । चिंतोपंतालागी बोलिला । म्हणे सत्वर भटाभिक्षुकाला । विधानपत्रिका पाठवा ॥३४॥थोरथोर ब्राह्मणांच्या विद्यमानें । दत्त मुल्सद्याचें मत घेणें । आपटे महादेव दीक्षित बोलाविणें । भास्करभट कर्वे बोलवा ॥३५॥लहान मोठे समस्त । ज्योतिष वैदिक पुराणिक । यज्ञेश्वर शास्त्री बोलवा त्वरित । चिमणाआपा स्थापावया ॥३६॥आपला कारकून बक्षी चांगला । बाबा फडक्याकडे पाठवा त्याला । कीं भाऊ सांगतील तैसे चाला । कारकून गेला नानाचा ॥३७॥इकडे भाऊंनीं मनसुबा करुन । गोविंदराव पिंगळे बोलाऊन । बहिरोपंत मेहेंदळ्या लागून । आपुल्याजवळी बोलाविलें ॥३८॥परचुरे त्रिंबकरावही आले । आन्याबा मेहेंदळे पाचारिले । राघोपंतादिक थत्ते भले । दुसरे राघोपंत ठोसर ॥३९॥विसाजीपंत वाडदेकर । हरी विष्णुलागीं लवकर । सहस्त्रबुद्धे वरचेवर । पंत बाळाजी बोलाविले ॥४०॥सुभेदार जनोबालागीं आणा । हरिबा धायगुडे सर्वत्रांना । सदाशिवपंत गोखल्यांना । शिवाय मुत्सुद्दी अवघे चला ॥४१॥वेगळे करुनी दवलतरावजी । या कामाला इतुके राजी । दत्तचि घ्यावा चिमाजी आपाजी । मनांत ऐसें सर्वत्रांच्या ॥४२॥तेवीं धोंडिंबादादा सत्वर । सवें सदाशिव मल्हार । दोन सहस्त्र फौज बरोबर । तोफा चारद्वय पलटणें ॥४३॥इतुका सरंजाम सांगातें । शिंदे कवडीचे मुकामीं होते । मग आले थेउरातें । साहेबांकडे ते काळीं ॥४४॥बाजीराव होते स्नानसंध्येंत । धोंडिबा भाऊंचा एकांत । झाला कीं राहोटीसभोंवतीं समस्त । बंदोबस्त करावा ॥४५॥स्नानसंध्येमाजी राघवसुत । दोघे बंधु राहुटींत । भाऊ धोंडिबा फितुरी समस्त । चिमाआपातें नेऊं म्हणे ॥४६॥पुढें चिमणाजी-रघुनाथाते । भाऊ धरुं जातील त्यातें । मग रायाजी पाटील तेथे । बोध करितील भाऊला ॥४७॥स्वस्ति श्रीमाधवकवन सुंदर । संमत बाजीरघुनाथ पत्राधार । संतुष्ट होतील ऐकणार । तृतीयोध्याय गोड हा ॥४८॥ N/A References : N/A Last Updated : December 24, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP