केकावली - प्रसंग ६

केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.


(भगवत्कथाप्रसंग)

कथा श्रवनचत्वरी जरि पुनःपुन्हा ये, रते

महारसिक तद्रसी, विटति ऐकता येर ते; ।

विलोकुनि विलासिनीजन पुनःपुन्हा कामुका

करी वश; नव्हे बुळा, विवश घेइना कां मुका ! ॥१०१॥

कथा सुपुरुषा तुझी वश तशी करी, राधिका

जशी तुज, जिला स्वये म्हणसि तू शरीराधिका;

तिचे न घडता, रमाह्रदयवल्लभा ! सेवन

प्रभो ! तुज जसे, तसे मतिस गेह भासे वन. ॥१०२॥

(कथा मोहिनीपेक्षा श्रेष्ठ)

कथा भुवनमोहिनी, अशि न मोहिनी होय ती;

हरो असुरधी; हिणे भुलविले किती हो ! यती; ।

नव्हे न म्हणवे; असो; जरि विमोहिला दक्षहा,

प्रिया बसविली शिरी, मुनिपथी कसा दक्ष हा ? ॥१०३॥

सुरासुरनरोरगां भुलवुनी कथा न त्यजी;

न भेद करि पंक्तिचा; अमृत पाजिती सत्य जी; ।

तिणे जरि सुधारस खरतमानसां पाजिला,

वधी अमृत घोटितां, द्रव नयेचि बापा ! जिला ॥१०४॥

अभीष्ट वरितात, जे तव कथेसि विश्वासती;

भली असुरवंचनी, श्रुत असेचि विश्वास ती; ।

कथा कशि सखी तिची? ठकवुनी हरी संचिते,

तरी अमृत दे, असे सदय, दाखवी वंचिते ॥१०५॥

(कथेची वंचना भक्तकल्याणार्थ)

करा श्रवण येवढे, अपटु लोक हांसो मला;

अहो ! जरि गिळावया प्रियकुमार गे सोमला, ।

तयासि ठकवूनि दे बहुत शर्करा माय जी,

तिला स्वशिशुवंचने अदयता शिवे काय ? जी ! ॥१०६॥

म्हणोनि बहु मोहिनीहुनि भली कथा हे तुजी,

अभीष्ट फल द्यावया नतमनोरथां हेतु जी; ।

म्हणाल जरि ’मीच त्या, विषम काय दोघीत रे ?

जसा जन सितासिताभिधनदीसदोघी तरे ॥१०७॥

अहा ! बहु विशुद्ध हे प्रभु ! तव स्वरूपाहुनी;

न भिन्नतनु त्या; भले भजति, एकता पाहुनी; ।

परंतु वदतो जनानुबव, नातळो पाप गा !

तशी न यमुना गमे, जशि गमे, निलिंपापगा ॥१०८॥

(गंगावर्णन)

न द्गिरुमहेश्वरप्रभुशिरी जिचे नांदणे,

तिच्या जळमळे तुळे न शरदिंदुचे चांदणे,

प्रजा हरिहरा अशा यदुदरी अनेका; कवी

भिऊनि म्हणतील कां जशि सुधा तशी काकवी ?॥१०९॥

(मोहिनीची यमुनेशी व गंगेची कथेशी तुलना)

तुला स्वयमुनेसवे, कुवलयद्युतिश्यामला !

म्हणाल जरि मोहिनी निजतनू, अवश्या मला; ।

तुलीन अमृतोदधिप्रभवपुंडरीकामला

कथा सुरधुनीसवे, सुजन जीत विश्रामला ॥११०॥

(कथा तुला व निरुपमा-भागवताची व गुरूची साक्ष.)

शुकोदित पुराण ज्या श्रवण सन्मुखे साग्रही,

म्हणेल ’अतुला कथा’ झणि म्हणाल, ’तो आग्रही;’ ।

न केवळ मलाचि हे निरुपमा, यशोमंडिता,

गुरुसहि गमे, पुसा खबरदा महापंडिता ॥१११॥

(भगवत्कथा मोहिनीपेक्षा श्रेष्ठ-आणखी एक कारण)

प्रभो ! तुज न मोहिनी भुलवि; मोहिला तोहि ती

त्यजी जन; नव्हे तशी, तुझी कथा मोहिती; ।

निजानुभव तू पहा; जशि महौषधी पारदा,

तुला स्थिर बळे करी, कळविले तुवा नारदा ॥११२॥

(प्रभूची स्वकथासक्ति)

सुरर्षिजवळी स्वये वदसि, ’तत्र तिष्ठामि;’ या

तुझ्याचि वचने म्हणे तुज ’कथावश’ स्वामिया !

जसा स्थिर कथेत तू, स्थिर करी तसे या मना;

स्वभक्तसुरपादया ! सफळ हे असो कामना ॥११३॥

(भगवद्गुणवर्णनाची नारदाला आवड)

सुरषि म्हणतो, ’तुझे यशचि धन्य; यो गायना

मला; कवि म्हणोत ते सुखद अन्ययोगायना;’

विमुक्तिबहुसाधने तदितरे गणीनाच तो;

सजूनि वरवल्लकी तव सभांगणी नाचतो ॥११४॥

(भगवत्कथामाहात्म्य-देवर्षि नारदाचा अनुभव)

तुझे चरित सन्मुखे श्रवण जाहले, यास्तव

प्रजापतिसुतत्व ये, करिति साधु ज्याचा स्तव; ।

स्वनीचपण मागिले, बहु दया अशी नारदा

स्मरे घडिघडि, प्रभो ! भवपयोधिच्या पारदा ! ॥११५॥

तुझे यशचि तारिते, परि न केवळा तारवे;

सहाय असिला असे, तरिच शत्रुला मारवे; ।

न भागवता भेटता, न घडतांहि सत्संगती,

न अज्ञह्रदये, तशी तव यशोरसी रंगती ॥११६॥

(नौकेचा दृष्टांत)

बुडे, बुडवि सागरी तरि, सुकर्णधाराविना; ।

सहाय नसता स्वये परतटासि ती दाविना; ।

सहाय भगवज्जना तव सुकीर्ति जेव्हा करी,

तयीच उतरी भवोदधितट जनां लौकरी ॥११७॥

(वरप्रसादयाचना)

सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानी पडो;

कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो; ।

सदंघ्रिकमळी दडो; मुरडितां हटाने अडो;

वियोग घडता रडो मन, भवच्चरित्री जडो ॥११८॥

न निश्चय कधी ढळो; कुजनविघ्नबाधा टळो;

न चित्त भजनी चळो मति सदुक्तमार्गी वळो; ।

स्वतत्त्व ह्रदया कळो; दुरभिमान सारा गळो;

पुन्हा न मन हे मेळो दुरित आत्मबोधे जळो ॥११९॥

मुखी हरि ! वसो तुझी कुशलधामनामावली,

क्षणांत पुरवील जी सकल कामना, मावली; ।

कृपा करिशि तू जगत्रयनिवास दासांवरी,

तशि प्रकट हे निजाश्रितजनां सदा सावरी ॥१२०॥

दयामृतघना ! अहो हरि ! वळा मयूराकडे;

रडे शिशु, तयासि घे कळवळोनि माता कडे; ।

असा अतिथि धार्मिकस्तुतपदा कदा ! सापडे ?

तुह्मा जड भवार्णवी उतरिता न दासा पडे ॥१२१॥

(उपसंहार-उपास्यदेवता श्रीरामांचे मांगल्य सूचक सप्रेम स्मरण.)

कारुण्यांभोद राम प्रियसखा गुरुही जो मयूरा नटाचा,

होता तापत्रयार्त त्वरित भववनी रक्षिता रानटाचा,

त्याचे साचे स्वभद्रस्मरण, मग न ते त्या कसे ये कवीस ?

केका, एका सख्याते स्मरुनि, करि अशा एकशे एकवीस ॥१२२॥

श्रीराम जयराम जयजयराम

N/A

References : N/A
Last Updated : August 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP