भाविकता - संग्रह १०

ग्रामीण जनतेत शिक्षणाचे मान कमी असूनसुद्धा देवावरची श्रद्धा अटळ व भक्ति मनापासून असते हेच या ओव्यांतून दिसून येते

ग्रामीण जनतेच्या हृदयातील देव कोणता म्हणाल तर पंढरीचा राणा विठ्ठल हाच. ओवी रुपाने विठ्ठलाची भक्तिगीते खेड्यातून घरोघरी गायली जातात.


१२६

रुक्माई बोले, देवा जनीचं काय नातं

मायेचं लेकरुं वसतीला आलं हुतं

१२७

इठ्ठ्ल बोलती, जनीला न्हाई माय

घेईन वजरी, घासीन तिचं पाय

१२८

पंढरी म्यां केली, माबाप इठुला पुसूनी

अंघुळ करते आका चंद्रभागेत बसुनी

१२९

भरली चंद्रभागा भरुनी रानमळा

बुडे कबीराची धर्मसाळ

१३०

भरली चंद्रभागा चालली संपुर्ण

देवा पुंडलिकावरून

१३१

भरली चंद्रभारा, नाव झालीया नवरी

पीर्तीच पांडुरंग शेला जरीचा आवरी

१३२

भरली चंद्रभारा, नाव येतीया नटत

सावळा पांडुरंग उभा तुळशी बेटांत

१३३

भरली चंद्रभागा, सारी बुडाली म्हातारी

देव झालाया उतारी

१३४

भरली चंद्रभारा तुंबले वारकरी

देव झाले अंबेकरी

१३५

भरली चंद्रभागा चालली सुसाट

मधी पुंडलीक हांसत

१३६

चंद्रभागेला आला पूर, पंढरीला पडला वेढा

सोन्याच्या इटेवर, विठुरुक्माईचा जोडा

१३७

भरली चंद्रभागा उतार नावेचा

संगं पुत्र जावेचा

१३८

इठ्ठलदेव म्हणे संभाळ रुक्मीनी घरदार

मला जायाचं, चंद्रभागेत नावेवर

१३९

भरली चंद्रभागा पानी लागलं चढायाला

बुडल पुंडलीक, इठुरुक्मीन आली सोडायाला

१४०

भरली चंद्रभागा, धोंडा बुडिला न्हानथोर

इठ्ठलाचा झगा, जनी धुतीया पायावर

१४१

रुक्मीन धुनं धुते, इठ्ठचाला झगा

त्येच्या अबीरानं दरवळे चंद्रभागा

१४२

चंद्रभागेच्या कडेला, सारी पताक झाली गोळा

आला देवाचा गोतावळा

१४३

चंद्रभागेच्या काठाला कथा करी इठूराया

नांव देवाचं ऐकाया, भरल्या घागरी उभ्या बाया

१४४

चंद्रभागेचं पानी आनूंया रांजनांत

देव तान्हेलं भजनांत

१४५

चंद्रभागेच्या कडेला वाळूचा केला ओटा

भजनाचा छंद मोठा

१४६

चंद्रभागेची पायरी मी चढते भारानं

तुळसी मंजुरीचं माझ्या ओटीला तोरण

१४७

सया पुशित्यात, पंढरी जाऊनी काय केलं ?

चंद्रभागेच्या पान्यानं देहभांडं उजळलं

१४८

रुसली रुक्माई, इठूशेजारी बसेना

अबीर बुक्याची तिला दंगल सोसेना

१४९

रुक्मीण बोलते, देवा साधुसंताची लई गोडी

माझी सवती बांधा माडी

१५०

इठ्ठल बोलती, चल रुक्मीणी माडीवर

माळबुक्याचा भडिमार तुझ्या तेलंग्या साडीवर

१५१

रूसली रुक्माई बसेना पालखींत

पीर्तीचा पांडुरंग रथावरून देई हात

१५२

रुक्माई रुसली बसली खिडकींत

सावळा पांडुरंग सगळी पंढरी हुडकीत !

१५३

रुक्मीण बोलते देवा, कमरा बांधून काय केलं ?

तुळसीबनाला पानी नेलं

१५४

रूसली रुक्माबाई, इठ्ठल समजावी

वाडियाच्या मागें झाड पतंगाचे लावी

१५५

रूसली रुक्माई सर्व्या पंढरींत न्हाई

विठ्ठल म्हनती, रागाला करूं काई !

१५६

रूसली रुक्माई, गेली मंगळविढीयाला

सावळा पांडुरंग, जीन घालीतो घोडीयाला

१५७

रुक्मीन लेनं लेते सोन्याची कांकनं

बडवे बसले राखन

१५८

फुलांची शेज, बडव्यांनी केली दाट

सख्या इठुला रुतलं, फुलांचं देठ

१५९

रुक्माईचं लेनं नऊ तोळ्याच्या पाटल्या

कंगन्या हाताला दाटल्या

१६०

रुक्माईची चोळी टाका पडे लांब लांब

नामदेव शिंपी रेखितो गरुडखांब

१६१

कस्तुरी महागली रुपयानं तोळा

पांडुरंग माझा नेमाचा लावी टिळा

१६२

कस्तुरीचा वास माझ्या अंगाला कोठून ?

आले माझ्या इठूला भेटून

१६३

माझ्या इठूला नका म्हनुंसा काळाकाळा

माझा तो सबजाचा ढाळा

१६४

माझ्या घरीं पाव्हनं, आलं पंढरीचं हरी

चंद्राच्यावांचून उजेड पडला माझ्या दारीं

१६५

आल्या गेल्याला पुशिते, इठू दिसतो कुनावानी ?

सावळं त्याचं रूप ! दिसतो जवसाच्या फुलावाणी

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP